Site icon InMarathi

“हार्दिकची दुखापत हा तर भारतीय संघाचा मोठा फायदा…”

hardik pandya hospital inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

हार्दिक पंड्या या माणसाची कारकीर्द आता संपण्याच्या मार्गावर आहे. होय, अगदी खरंच… हार्दिक म्हणजे दुखापत हे आता समीकरणच बनलंय. अशा खेळाडूला फार काळ संधी देणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं झालं.

हार्दिक फार फार तर आणखी २-३ वर्षं संघात टिकाव धरेल असं वाटतंय. येत्या काळात आयपीएलच्या संघात सुद्धा हार्दिकचं नाव दिसणं बंद झालं, तर मला तरी अजिबातच आश्चर्य वाटणार नाही. एक दर्जेदार खेळाडू, भारतीय संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून कायम हार्दिक पंड्याकडे पाहण्याचं स्वप्न आता सत्यात उतरणे नाही…

 

 

परवा भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध हाराकिरी करत असताना, काही गोष्टींचा सकारात्मक प्रभाव मनावर पडत होता. विराटची फलंदाजी चांगली झाली, त्याने फॉर्मात येणं गरजेचं होतं. पाकिस्तानचा एकही गडी बाद झाला नव्हता, तरी १२-१३ व्या षटकापर्यंत भारतीय गोलंदाजांनी काही प्रमाणात फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. म्हणजे गोलंदाजी अगदीच सुमार झाली नाही.

याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, भारताचा अष्टपैलू (?) फलंदाज (!) हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. आता यावर तुम्ही असुरी आनंदाचा शिक्का मारत असाल, तर म्हणा लेको… पण मला बरं वाटलं होतं ते पाहून!

याचं कारण विचाराल तर अगदी स्पष्ट आहे, ‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…

 

 

आज हार्दिक संघात असल्यामुळे सहावा गोलंदाज खेळवण्याची मुभा भारतीय संघाला मिळत नाहीये. ‘पाच गोलंदाजांना जे जमू शकलं नाही, ते सहाव्या जमलं असतं का?’ या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नाही, पण कदाचित जमलंही असतं. सामना वाचता आला नसता, तरी कदाचित भारतीय संघावर पहिल्यांदाच १० विकेट्सनी हरण्याची नामुष्की ओढवली नसती.

आता हार्दिक पुन्हा दुखापतग्रस्त झालाय, म्हणजे आयतीच संधीच चालून आलीय की राव; दुखापतीचं कारण पुढे करा आणि द्या त्या पोराला डच्चू… बस म्हणावं खेळाडूंच्या पाण्याच्या बाटल्या भरत. असा निर्णय घेतला, तर भारतीय संघाला फायदाच होईल असं वाटतंय.

लॉर्ड शार्दूलचा पर्याय…

हार्दिकचा पर्यायी खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूरला संगत संधी मिळणं भारतीय संघासाठी फायद्याचं ठरू शकतं. सहाव्या गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध होईल. बरं फलंदाजीचं म्हणाल, तर सध्या हार्दिक जेमतेमच फलंदाजी करतोय. तेवढी कामचलाऊ फलंदाजी तर ठाकूर साहेब सुद्धा करतील. अगदीच वाटत असेल, तर अश्विनचा पर्याय आहेच की, घ्या त्याला संघात…!

 

 

शार्दूल ठाकूर हा चांगला गोलंदाज आहे, आणि मुख्य म्हणजे तो सहावा गोलंदाज ठरेल. एखाद्या गोलंदाजाला मार पडला, तरी त्यानेच चार षटकं पुरी करावीत हे काही मनाला रुचणारं नाही. त्यामुळे हार्दिकला सांगत ठेऊन शार्दूलला संधी न देणं हे भारतीय संघाच्या हिताचं अजिबात नाही.

ईशान ट्रम्प कार्ड ठरू शकेल…

एवढं असूनही, समजा ५ गोलंदाजावर विश्वास आहेच असं म्हटलं, तरीही हार्दिकला डावलून ईशानला संघात घेणं अधिक फायदेशीर आहे. गोलंदाजी करत नसला, तरीही तोदेखील एका अष्टपैलूची भूमिका बजावू शकतो. अहो कसं म्हणजे काय, गरज पडली तर रिषभचे ग्लोज घालून यष्ट्यांमागे उभं राहील की पठ्ठ्या!

शिवाय सलामीपासून ७ व्या अशा कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीला पाठवा, अगदी फिट्ट बसतोय हा पोरगा!

यापुढे जाऊन विचार केला, तर ईशान डावखुरा आहे, हादेखील मोठा फायदा ठरतो. रिषभ, जडेजा आणि ईशान असे तिघेच डावखुरे असले, की करा हवी तशी लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन्स आणि पाडा समोरच्या संघाला बुचकळ्यात!

 

 

ईशान संघात असला, म्हणजे सलामीची जोडी म्हणून सुद्धा वेगवेगळे पर्याय तयार झाले. रोहित आणि ईशान आयपीएल एकत्र खेळलेत, त्यांच्यात समन्वय सुद्धा चांगला झालाय त्यामुळे, मग द्या पाठवून या दोघांना सलामीला… म्हणजे पहिल्याच बॉलपासून प्रतिस्पर्ध्यांचे डाव उधळले जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

असं खरंच घडलं तर…

हे सगळं कधी शक्य आहे, तर हार्दिकला डच्चू दिल्यावरच! अनायसे पुन्हा दुखापत झालीच आहे, तर द्या चांगलं जालीम औषध; संघाबाहेर काढण्याचं…

भारतीय संघ पहिल्या सामन्यात मानहानीकारकरित्या पराभूत झाला, त्यात तो सामना पाकिस्तान विरुद्धचा होता, २०० वा सामना होता आणि १० विकेट्सनी पहिला पराभव झाला, त्यामुळे जिव्हारी लागणं साहजिक आहे. असं असूनही, फार काही बिघडलेलं नाही. अजूनही संधी आहे, अमाप संधी आहे.

 

 

अगदी पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात दोन हात करावे लागू शकतात अशी संधी आहे. अहो कसं म्हणून काय विचारताय, भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठायची, दोघांनी उपांत्य सामने जिंकायचे आणि भेटायचं पुन्हा अंतिम सामन्यात! मात्र भारताला हे करायचं असेल, तर हार्दिकबद्दल कटू निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.

सध्या तो जायबंदी झालाच आहे, तर हीच संधी आहे. म्हणूनच मी म्हणतोय, हार्दिकची दुखापत हा तर भारतीय संघाचा मोठा फायदा…

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version