आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |टेलिग्राम ।शेअरचॅट
===
“तुम्ही कधी कॉटन कँडी खाल्ली आहे का?” असा प्रश्न कोणी आपल्याला विचारलं तर आपण “नाही” म्हणू शकतो. पण, ‘बुढ्ढी के बाल’ खाल्ले नसतील अशी कोणीही व्यक्ती नसावी.
कोणत्याही उद्यानात किंवा जत्रेच्या ठिकाणी लहान मुलांना आवडणारी, आकर्षित करणारी गोष्ट ‘कॉटन कँडी’ म्हणजेच भारतातील ‘बुढ्ढी के बाल’ असतात.
गुलाबी रंगात मिळणाऱ्या पदार्थाबद्दल आज विचार केला तर असं वाटतं, कोणी शोध लावला असेल या पदार्थाचा? आपल्या आरोग्यासाठी तो चांगला आहे का? हे सर्व जाणून घेऊया.
‘बुढ्ढी के बाल’ कसे तयार होतात?
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, ‘बुढ्ढी के बाल’ हे केवळ रंगीत साखर आणि हवा यांच्या मदतीने तयार होत असते. ‘कॉटन कँडी’ तयार करण्याचं एक यंत्र विशिष्ट आहे, ज्याचा शोध १८९७ मध्ये इटलीत रहाणारे डेन्टिस्ट डॉक्टर विलियम मॉरिसन यांनी लावला होता.
जॉन सी. व्हर्टन या चॉकलेट तयार करणाऱ्या व्यक्तीसोबत काम करून या यंत्राचा शोध लावण्यात आला होता.
‘कॉटन कँडी मेकर’ हे यंत्र ३०० डिग्री पर्यंत तापमान वाढवण्याची क्षमता ठेवतं आणि त्या तापमानावर साखरेला वितळून हा पदार्थ तयार होत असतो. विक्रेत्याला अपेक्षित असलेल्या रंगाची साखर या प्रक्रियेत वापरली जाते.
‘कॉटन कँडी मेकर’ या यंत्राच्या मध्यभागी एक पंखा असतो, जो गोल फिरून या साखरेला एकत्रित करत असतो. जेव्हा हा पंखा फिरत असतो, तेव्हा वितळलेली साखर ही यंत्राच्या त्या भागात जाते जिथे साखरेच्या तुकड्यांचं रूपांतर हे पातळ धाग्यांमध्ये होतं आणि ‘बुढ्ढी के बाल’ आपल्याला मिळतात.
‘कॉटन कँडी मेकर’ या यंत्राचा शोध लागण्यापूर्वी वितळलेली साखर ही हाताने फिरवली जायची आणि हा पदार्थ तयार केला जायचा. या प्रक्रियेत जास्त वेळ, मेहनत आणि खर्च लागायचा.
१९०४ मध्ये डॉक्टर विलीयम मॉरिसन आणि व्हर्टन यांनी ‘कॉटन कँडी’ हे यंत्र सेंट लुईस वर्ल्ड येथील एका जत्रेत सर्वप्रथम लोकांसमोर आणलं होतं.
‘बुढ्ढी के बाल’ जेव्हा सर्वप्रथम लोकांना विकण्यात आलं होतं, तेव्हा त्याचं नाव ‘फेअरी फ्लॉस’ असं ठेवण्यात आलं होतं. लोकांना हा पदार्थ, हे यंत्र प्रचंड आवडलं होतं.
हेच कारण होतं की, या दोघांनी मिळून ६ महिन्यात ६८,००० यंत्रांची विक्री केली होती. साधारणपणे एका वर्षात सर्वच कॅण्डी स्टोअर मध्ये ‘फेअरी फ्लॉस’ची मागणी वाढली होती.
‘कॉटन कँडी’ला डॉक्टर विलियम यांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ मध्ये छापून आलेल्या जाहिरातींमुळे प्रसिद्धी मिळाली होती. ५ ते १० सेन्ट्स या किमतीत सुरू केलेली ‘फेअरी फ्लॉस’ ही या जाहिरातीनंतर लोकांपर्यंत पोहोचली.
आपल्या घरीच ‘फेअरी फ्लॉस’ तयार करता यावेत म्हणून कित्येक ग्राहकांनी मॉरिसन आणि व्हर्टन यांच्याकडून ही ‘हॅन्ड मेड’ मशीन सुद्धा खरेदी केली होती.
मॉरिसन आणि व्हर्टन यांनी हा प्रतिसाद बघता या मशीनचा ‘पेटंट’ दाखल केला होता. ‘पेटंट’ तयार करतांना हा नियम लावण्यात आला होता, की या मशीनचे स्पर्धक हे कमीत कमी २५ वर्ष अशी दुसरी मशीन तयार करू शकणार नाहीत.
१९४९ मध्ये ‘कॉटन कॅण्डी मेकर’मध्ये स्प्रिंग सारखे ‘फीचर्स’ देण्यात आले आणि त्या यंत्राचा कायापालट झाला. सिनसीनाटी येथील ‘गोल्ड मेटल प्रॉडक्ट्स’ने हे बदल आमलात आणले.
‘कॉटन कँडी मेकर’ तयार करण्यात ही कंपनी प्रथम क्रमांकावर आहे. त्या खालोखाल ‘टुस्टी रोल ऑफ कॅनडा’ ही कंपनी ‘कॉटन कँडी’च्या मशिन्स आणि फळांच्या फ्लेवर मधील ‘बुढ्ढी के बाल’ लोकांना उपलब्ध करून देत असते.
१९७२ पासून पूर्णपणे ऑटोमॅटिक मशिन्स आल्याने ‘बुढ्ढी के बाल’ तयार करणं हे अजूनच सोपं आणि सामान्य विक्रेत्याच्या आवाक्यात आलं.
भारतात जसा हा पदार्थ ‘बुढ्ढी के बाल’ या नावाने प्रसिद्ध आहे, तसा तो इंग्लंडमध्ये ‘कॅण्डी फ्लॉस’, चीनमध्ये ‘ड्रॅगन’स् बिअर्ड’, फ्रान्समध्ये ‘पापा’ज् बिअर्ड’, हॉलंड मध्ये ‘शुगर स्पायडर’ आणि ग्रीस मध्ये ‘ओल्ड लेडी’ज् हेअर’ या नावाने ओळखला जातो.
‘कॉटन’ हे नाव का?
कापसाचा कुठे एक अंशही नसतांना या पदार्थाच्या नावात ‘कॉटन’ का आलं? हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. वितळलेल्या साखरेचे जेव्हा धागे तयार होत होते, तेव्हा ते एखाद्या कापसाच्या धाग्यासारखे दिसत होते. आपल्या केसांपेक्षाही पातळ असलेले हे धागे कापसासारखे मऊ लागत असल्याने त्याला ‘कॉटन कॅंडी’ हे नाव देण्यात आलं असावं.
एका ‘कॉटन कँडी’ मध्ये सोडाच्या कॅन पेक्षा कमी कॅलरी असतात असं प्रयोगशाळा तपासणीतून समोर आलं होतं.
७ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक कॉटन कँडी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेत त्या दिवशी जगातील सर्वात लांब ‘बुढ्ढी के बाल’ तयार करण्यात आले होते. या ‘बुढ्ढी के बाल’ची लांबी ही १४०० मीटर इतकी होती.
आज ‘बुढ्ढी के बाल’ हे केळी, व्हॅनिला, टरबूज आणि चॉकलेट सारख्या फ्लेवर्स मध्ये बाजारात उपलब्ध आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम केमिकल्स अशा दोन्ही प्रकारचे घटक वापरून आज ‘बुढ्ढी के बाल’ तयार केले जातात, पण त्यातील कोणताही घटक हा शरीराला हानिकारक नसतो म्हणून तो लहान मुलांना सुद्धा दिला जातो.
इटली मधील एका छोट्या ठिकाणी १२० वर्षांपूर्वी शोध लागलेला हा पदार्थ आजही तितक्याच आवडीने खाल्ला जातो हे एक आश्चर्य आहे. सध्या युरोपमध्ये ‘कॉटन कँडी पिझ्झा’ सारखे विविध प्रयोग सुद्धा खवय्या लोकांना प्रचंड आवडत आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.