' व्हॉट्सअॅप इतकं सुरक्षित असूनही बॉलिवूडच्या मंडळींचे चॅट्स लीक कसे होतात? – InMarathi

व्हॉट्सअॅप इतकं सुरक्षित असूनही बॉलिवूडच्या मंडळींचे चॅट्स लीक कसे होतात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आजच्या ‘हायटेक’ जगात एखाद्या व्यक्तीसोबत चॅट करणं म्हणजे त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्यासारखं आहे. “माध्यम कोणतेही असो, संवाद व्हायला हवा” हे आता लोकांना पटलं आहे. दोन व्यक्तींमध्ये होणारा संवाद हा खाजगी रहावा, सार्वजनिक होऊ नये ही त्या दोन व्यक्तींची रास्त अपेक्षा असते.

व्हाट्सअॅप ने ‘इन्क्रिप्टेड’ चॅट हा प्रकार सुरू केल्यापासून ही सोय सुद्धा आपल्या सर्वांना मिळाली आणि त्यामुळे व्हाट्सअँप हे लोकांच्या गळ्यातील ताईत बनलं. पण, बॉलीवूड सेलिब्रिटींना हे सुख नाहीये असंच मागच्या काही वर्षात वारंवार बघायला मिळत आहे.

 

whatsapp message inmarathi

 

“दीपिका पदुकोण चे ड्रग्स पुरवठा करणाऱ्या व्यक्ती सोबत झालेलं चॅट लिक झालं”, “रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यातील चॅट लिक झालं”, “अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यातील चॅट लिक झालं” अशा बातम्या आपण ऐकत आलो आहोत.

तुमच्या खाजगी आयुष्याची हमी देणारा व्हाट्सअॅप तुमचा संवाद वाचतो कसा? इतरांना तो वाचायला मिळतो कसा? असे प्रश्न तेव्हा सर्वांनाच पडले होते. बॉलीवूड सेलिब्रिटी सोबत असं का आणि कसं होतं? जाणून घेऊयात.

 

ncb inmarathi

 

व्हाट्सअॅपमध्ये असलेल्या ‘क्रिप्टोग्राफिक लॉक’ मुळे तुमच्या मोबाईल मधून निघालेला चॅट हा केवळ तुम्ही पाठवलेल्या व्यक्तीलाच वाचायला मिळत असतो. हे फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हाट्सअपने नेहमीच सांगितलं आहे.

वादग्रस्त सेलिब्रिटी किंवा गुन्हेगारांच्या बाबतीत असं होतं की, पोलिसांकडे जेव्हा त्यांच्या नावाचं अटक किंवा चौकशी करण्याचं ‘वॉरंट’ असतं तेव्हा ते सर्वप्रथम त्या लोकांकडून त्यांचा मोबाईल हस्तगत करतात, त्यांना तो अनलॉक करायला लावतात. तिथून हा चॅट सर्वजनिक होण्याची प्रक्रिया सुरु होत असते.

whatsapp ban inmarathi

 

‘व्यक्तिगत स्वातंत्र्य’ या बाबतीत भारतीय कायद्यात फार कमी तरतूद करण्यात आली आहे. अमेरिकेचं, युरोपचं जर उदाहरण द्यायचं झालं तर, तिथल्या गुन्हेगारांचा मोबाईल, वॉलेट, लॅपटॉप सारख्या वस्तू पोलिसांना बघायच्या असतील तर त्यासाठी त्यांच्याकडे त्याचं वेगळं वॉरंट असावं लागतं.

भारतात संशयित गुन्हेगारासमोर त्याचा गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच त्याचा फोन अनलॉक केला जातो, त्याचे स्क्रीनशॉट काढले जतात आणि ते व्हायरल केले जातात. कित्येक गुप्तहेर, पोलीस व्यक्तींना वृत्तपत्र वाहिन्यांकडून मोठी रक्कम मिळत असते असंही सांगितलं जातं.

 

whatsapp privacy policy inmarathi

 

तंत्रज्ञान वापरून चॅट कसे बघितले जातात ?

व्हाट्सपचा घेतला जाणारा बॅकअप हा गुगल ड्राईव्ह किंवा ‘आय ड्राईव्ह’ वर स्टोअर केला जात असतो. व्हाट्सअप जरी मेसेजेस ‘एन्क्रिप्ट’ करत असलं तरी हे ड्राईव्ह तशी कोणतीही हमी देत नसल्याने सेलिब्रिटींचे चॅट लिक होऊ शकतात अशी एक शक्यता समोर आली आहे. ‘फॉरेन्सिक टूल्स’च्या सहाय्याने मोबाईलवरचा डेटा हा लॅपटॉपवर घेऊन बघितला जाऊ शकतो असं सुद्धा काही आयटी तज्ञांनी सांगितलं आहे.

 

google drives inmarathi
securitynewspaper.com

व्हाट्सअॅप वरील चॅट हे एनक्रिप्ट करावेत की नाहीत हे सुद्धा त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीला ठरवावं लागत असतं. जर काही लोकांनी, सेलिब्रिटींना हे ऑप्शन ‘ऑन’ केलं नसेल तेव्हा सुद्धा चॅट लिक होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात असते.

कायदा काय सांगतो ?

व्हाट्सअॅपने जरी तुमच्या खाजगी संवादाची हमी दिली असली तरीही तुमची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला व्हाट्सअॅपकडे ही माहिती मागण्याचा अधिकार आपल्या कायद्याने दिला आहे.

संशयित गुन्हेगारांच्या ‘अबाउट’ म्हणजेच माहिती, फोटो, ग्रुप्स, ईमेल एड्रेस बुक याची माहिती सायबर क्राईमला देण्यात यावी अशी रितसर परवानगी ही व्हाट्सअँपला केली जाते. व्हाट्सअँप या परवानगीची काळजीपूर्वक शहानिशा करते आणि खात्री पटल्यावरच ही माहिती पोलिसांना देत असते.

 

indian law

 

व्हाट्सअॅपवर दिलेली प्रश्नोत्तरांची माहिती वाचली तर त्यामध्ये हा मुद्दा कुठेच लिहिलेला नाहीये. कारण, “तुमचे मेसेजेस आम्ही बघत नाही, स्टोअर करत नाहीत” असाच दावा व्हाट्सअॅपने केला आहे.

तुम्ही पाठवलेले, पण समोरच्या व्यक्तीपर्यंत न पोहोचलेले मेसेजेस सुद्धा व्हाट्सअँप ३० दिवसात डिलीट करत असते असा विश्वास व्हाट्सअँपने आपल्या ग्राहकांना दिला आहे. इतकं सगळं असूनही पाणी कुठे मुरतं ? हे मात्र अनुत्तरित आहे. कारण, केवळ भारतातीलच नाही तर इतर देशातील व्हाट्सअँप लिक होण्याचे प्रकार इंटरनेटवर खूप गाजले आहेत.

 

whatsapp sharing inmarathi

 

२०१३ मध्ये ‘व्हाट्सअॅप प्रायव्हसी’ हा कळीचा मुद्दा ठरला होता. त्यानंतर व्हाट्सअप ने आपल्या कार्यपद्धतीत बरेच बदल केले होते. पण, हॅकर्स लोकांनी ‘फोन चा क्लोन करणे’, ‘स्पायवेअर’ असे काही उपाय शोधून काढले त्यामुळे तुमच्या फोनवर काय सुरू आहे याची पूर्ण माहिती ही काही हॅकर्स सहज मिळवू शकतात.

सेलिब्रिटींना त्यांचे वकील कसेही करून वाचवतील हे आपल्याला माहीतच आहे. आपण मात्र सतर्क रहाणे, माझा फोन माझी जबाबदारी हे मान्य करून त्याची काळजी घेणे इतकंच आपल्या हातात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?