Site icon InMarathi

नरभक्षक वाघ आणि स्वतःहून त्याची शिकार बनलेला माणूस!- भाग ४

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ह्या लेखमालेतील पहिले तीन भाग –

नरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या रंजक कथा – भाग १

नरभक्षक वाघ – कुप्रसिद्ध “चंपावतची वाघीण”, रुद्रप्रयाग चा बिबट्या आणि T24 उर्फ “उस्ताद” – भाग २

ब्रिटिश साम्राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला संकटात पाडणारे २ क्रूर सिंह – नरभक्षक – भाग ३

===

लेखक – सुरज उदगीरकर

===

वाघ असो सिंह असो किंवा अजून कुठला वन्यप्राणी असो, मुद्दाम तुम्हाला शोधत तुमच्या घरात येत नाही. वाघ किंवा तत्सम प्राणी हे नरभक्षक बनतात याला मुख्य करून मनुष्यच जबाबदार असतो. का बनतात नरभक्षक?

हे वन्य प्राणी अत्यंत शक्तिशाली असतात. निसर्गाने त्यांना तीक्ष्ण आणि अंधारात बघू शकणारी नजर, ताकदवान जबडे आणि सुळे, मजबूत नख्या, तिखट नाक, वेग, चपळता आणि अपार शारीरिक शक्ती दिली आहे. शिकार करण्यासाठीच ते विकसित झालेले आहेत. पण कधी कधी शिकार करताना हे प्राणी जखमी किंवा जायबंदी होतात.

उदाहरणार्थ वाघाला साळींदाराचे मांस अत्यंत आवडते. पण त्याची शिकार करताना काटे लागण्याची शक्यता फार असते. वाघाच्या पावलांची गादी नाजूक असते. त्यात काटा घुसला कि वाघ लंगडा होतो. धावू न शकल्याने चितळ-सांभार वगैरेंची शिकार तो करू शकत नाही.

कधी कधी चोरटे किंवा शिकारी कमी ताकदीच्या बंदुकी वापरून वाघाला जखमी करतात. अशावेळी वाघ सोप्प्या शिकारीकडे वळतो. जसं कि जंगलच्या तोंडाशी चरणाऱ्या शेळ्या-गाई-म्हशी. जेंव्हा वाघ ह्या प्राण्यांवर हल्ला करतो तेंव्हा गुराखी अति-धाडस दाखवून त्याला मारायला जातात. अशावेळी वाघाने परतून केलेल्या हल्ल्यात त्यांचा बळी जातो.

कधी कधी माणूस मूर्खपणा करत किंवा गरज नसताना धाडस दाखवत वन्यप्राण्यांच्या नको तितका जवळ जातो. कधी जंगलावर अतिक्रमण करायला पाहतो. वन्यप्राणी कुठल्याही इतर प्राण्याला आपल्या इलाख्यात खपवून घेत नसतात. अशावेळी हल्ला होतो आणि बहुतकरून माणसाचा जीव जातो.

माणूस मारल्यानंतर वाघाला किंवा तत्सम जंगली प्राण्यांना लगेच एक गोष्ट लक्षात येते की माणूस हा अत्यंत दुबळा प्राणी आहे. ह्याला वास येत नाही, नजर तीक्ष्ण नाही, धावू शकत नाही. शिवाय संरक्षणार्थ मोठे दात-नख्या किंवा शिंग नाहीत. शारीरिक ताकद नाही आणि चामडी जाड नाही.

 

 

 

मारण्यास अत्यंत सोपा आणि अशावेळी जर वाघ भुकेला असेल तर तो माणसाला अन्न समजतो. आणि मग वाघ माणसाची सोपी शिकार करायला चटावतो. रक्ताची चटक वगैरे नसते…माणसाचं रक्त म्हणजे दारू नव्हे. चटक ही सोपी शिकार करण्याची असते.

कधी कधी वाघ किंवा इतर वन्य प्राणी माणसाला फक्त घुसखोर म्हणून किंवा बचावात्मक पावित्रा घेऊन किंवा रागापोटी मारतात. अशा वेळी ते माणसांना खात नाहीत. हे नरभक्षक नसतात पण माणसांना मारतात! ताडोबा जंगलात काही वाघ माणसांना मारतात, खात नाहीत.

नको ते धाडस आणि नको तितका आत्मविश्वास अनेकांचा बळी घेतो. टिमोथी असाच बळी गेला. टीमोथी ट्रेडवेल! स्टीव्ह आयर्विन आठवतो? डिस्कव्हरी चॅनेलवर मगरी आणि मोठाले साप लीलया पकडणारा अवलिया! स्टिंग-रे ह्या बऱ्यापैकी निरुपद्रवी माश्याच्या दंशाने त्याला जीव गमवावा लागला. टीमोथी ट्रेडवेलची गोष्ट जास्त विदारक आहे. टीमोथी फार भयानक मृत्यूला प्राप्त झाला.

स्टीव्ह प्रमाणे टीमोथी ट्रेडवेल वन्य प्राणी अभ्यासक होता. ग्रीझली अस्वलांवर त्याचं विशेष प्रेम होतं. मला मनुष्य जमात आवडत नाही, त्यांच्यापेक्षा मला वन्यप्राणी आणि ग्रीजली अस्वले जवळची वाटतात असं तो म्हणत असे.

दरवर्षी उन्हाळ्यात तो अलास्कामधल्या ‘काटमाई राष्ट्रीय अभयारण्यात’ अस्वलांवर अभ्यास करत असे. त्यांना कॅमेऱ्यात कैद करत असताना नको तेवढं जवळ जात असे. अनेक वर्षे जात राहिल्यामुळे त्या भागातली अस्वलं आता आपल्याला ओळखू लागली असल्याचा दावा त्याने केला होता.

२००३ साली ट्रेडवेल आणि त्याची प्रेयसी एमी ह्युगेनार्ड असेच काटमाई मध्ये गेले. एका नदीच्या काठावर त्यांनी तंबू ठोकला. पहिली चूक. ग्रीझली अस्वलं ७००-९०० किलो वजन आणि ८-९ फूट उंच असतात.

ग्रीझली अस्वल ताकदीच्या बाबतीत पूर्ण वाढलेल्या सिंहाला किंवा वाघाला देखील सहज लोळवू शकतं! ग्रीझली अस्वलं हिवाळा सुरु होण्याआधी खा खा खाऊन चरबी वाढवतात आणि अक्खा हिवाळा सुस्तावतात. या अस्वलाना गोड्या पाण्यातले सालमन मासे खूप आवडतात.

 

 

अनेक अस्वलं नदीवर यायची. ट्रेडवेलनं त्याचं शूटिंग केलं. बरेच दिवस त्यांच्यासोबत राहिला. एमिला अस्वलं अजिबात आवडायची नाहीत. तिला भीती वाटायची

असं करता करता उन्हाळा संपत आला. ट्रेडवेलच्या सहकाऱ्यांनी त्याला सॅटेलाईट फोनवरून संपर्क केला तेंव्हा ट्रेडवेल म्हणाला की तो अजून आठवडाभर जंगलात राहील. दुसरी चूक.

ट्रेडवेलच्या परिचयाची अस्वलं एव्हाना खाऊन खाऊन सुस्तावायला निघून गेली होती आणि तिथे त्याला आता दूरवरून आलेली नवीच अस्वलं दिसायला लागली. ज्या अस्वलांना हिवाळा सुरु होण्याआधी पुरेसं खाद्य मिळत नाही ती अशीच दूरदूर हिंडतात आणि जास्त आक्रमक असतात. हे माहित असून ट्रेडवेल थांबला. शेवटची चूक!

ठरल्या दिवशी अभयारण्याचे रेंजर आणि ट्रेडवेलचे सहकारी त्याला घ्यायला कॅम्पपाशी पोचले तेंव्हा तंबू उध्वस्त होता. एक मोठंच्या मोठं अस्वल तिथे बसलेलं होतं.

रेंजर्सच्या अंगावर येऊ पाहायला लागताच रेंजर्सनी त्याला एका गोळीत उडवलं. जराशी शोधाशोध केली तेंव्हा ट्रेडवेलचं भग्न मुंडकं, छिन्नविच्छिन्न मणका आणि एक हात सापडला तर एमीचं अर्धं खाल्लेलं प्रेत पुरून ठेवलेलं आढळलं. त्या भल्यामोठ्या ग्रीझली नर अस्वलाने दोघांना फाडून खाल्लं होतं. वाघ, सिंह, बिबळ्यापेक्षा अस्वल जास्त क्रूर असतं.

 

 

हे तिन्ही प्राणी आधी दम घोटून किंवा मान मोडून जीव घेतात मग खातात. अस्वल मात्र पकडून लचके तोडत-ओरबाडत खायला सुरु करतं. सावज मरायची वाट पाहत नाही. जंगली कुत्र्याचं पण असच.

झालं असं की ट्रेडवेल आणि एमी एका भल्यामोठ्या अस्वलाची शूटिंग घ्यायला निघत होते. अस्वल नदीत सालमन पकडायला आलेलं होतं. पण ह्या दोघांकडे लक्ष जाताच त्याने सालमनचा नाद सोडला आणि ह्या दोघांकडे मोर्चा वळवला. ७०० किलोच्या त्या धुडाने आधी ट्रेडवेलचे लचके तोडून ओरबाडून त्याचा जीव घेतला. ट्रेडवेलचा जीव जाताक्षणी हजारो चौरस किलोमीटरच्या त्या जंगलात एमी त्या अस्वलासमोर एकटीच राहिली..तिला देखील अस्वलाने क्रूरपणाने मारलं!!

पण थरार इथेच थांबत नाही…

ट्रेडवेल आणि एमी अस्वलांची शूटिंग करण्याच्या तयारीत असताना हा प्रकार घडला होता आणि कॅमेरा चालू देखील झाला होता पण लेन्स वरचं झाकण निघालं नव्हतं. हा सगळा दुर्दैवी प्रकार कॅमेऱ्याने कैद करून ठेवलाय. अस्वलाची गुरगुर…ट्रेडवेलच्या आर्त किंकाळ्या…”oh my god…get him off me” म्हणून असहाय्यपणे एमीकडे मागितलेली मदत..एमीचं जिवाच्या आकांताने “fight back…fight back …” म्हणून अगतिकतेनं ओरडणं…मग तोडलेले लचके…मग ट्रेडवेलचा जीव जाताना घशातून निघालेले विचित्र आवाज…तो त्या भयाण अरण्यात एकटं त्या अस्वलासमोर अडकलेल्या एमीचं गर्भगळीत होऊन किंचाळणं…मग परत अस्वलाचं गुरगुरणं..आणि एमीच्या आर्त…रक्त गोठवणाऱ्या किंकाळ्या!! सगळं!!

ही क्लिप इंटरनेटवर उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी मी ऐकली आहे म्हणून एक सल्ला : चुकूनही…चु-कू-न-सु-द्धा जाऊन ऐकण्याचा प्रयत्न करू नका. झोप लागणार नाही!! कमजोर जिगरवाल्यानी तर बिलकूलच वाट्याला जाऊ नका! हां पण टिमोथीच्या आयुष्यावर बनलेली “ग्रीझली मॅन” हि डॉक्यूमेंटरी जरूर पहा.

शेवटी माणसाने, तुम्ही आणि मी, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि हे वन्यजीव अन्नसाखळीमध्ये आपल्यापेक्षा वर आहेत. जंगलात जाताना नेहमी खबरदारी घ्यावी. नको ते धाडस कधीहि आपल्यापेक्षा जास्त ताकदीच्या जीवांसमोर दाखवू नये. तिथे सॉरी/क्षमा करा वगैरे गोष्टी चालत नसतात. जंगल हे ह्या प्राण्यांचं घर आहे…तिथे त्यांना रमू देत. आपण तिथे घुसखोरी करता कामा नये! ते तिथे खुश, आपण आपल्या जागी खुश. तरच दोघांमध्ये सगळं आलबेल राहील!

~समाप्त~

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version