आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
काही लोकांची विचारसरणी ही इतकी जिद्दी असते, की नियती सुद्धा त्यांच्यासमोर हात टेकते. ‘कृतिका कुमारन’ हे अशाच एका मुलीचं नाव आहे जिला त्वचारोगामुळे आपल्या आईचा जीव गमवावा लागला, पण तिने त्याबद्दल मनात कोणताही आकस न ठेवता त्याच क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं, आपला व्यवसाय सुरू केला, स्वतःचा ब्रँड तयार केला आणि आईला श्रद्धांजली वाहिली.
नियती सोबत दोन हात करण्याची जिद्द असलेल्या तमिळनाडूच्या ३२ वर्षीय कृतिकाच्या आईचा मृत्यू हा केमिकल वापरलेल्या काही ‘स्किन केअर’ प्रॉडक्ट्सच्या वापराने आकस्मिक मृत्यू झाला होता.
आपल्या आईला जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये यासाठी कृतिका कुमारनने स्वतः नैसर्गिक घटकांनी युक्त साबण तयार करण्यास सुरुवात केली आणि ‘विल्वाह’ या ‘कॉस्मेटिक स्टार्टअप’ला सुरुवात झाली.
उद्देश चांगला असला, की फळ हे चांगलं मिळतंच. कृतिका कुमारनचं सुद्धा तेच झालं. १०,००० रुपयांच्या आर्थिक गुंतवणुकीने सुरू केलेल्या ‘विल्वाह’ या स्टार्टअपची उलाढाल ही अवघ्या ३ वर्षात १५ कोटी इतकी झाली आहे ही बाब सध्या तरुण उद्योजकांना प्रेरणा देत आहे.
आज अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर दणक्यात प्रतिसाद मिळणाऱ्या ‘विल्वाह’ची स्किन केअर प्रॉडक्ट्स तयार करण्याची प्रक्रिया घरातील छोट्या खोलीतून सुरुवात झाली होती ही बाब नवउद्योजकांसाठी शिकण्यासारखी आहे.
कॉस्मिटोलॉजीचं ऑनलाईन प्रशिक्षण घेतलेल्या कृतिका कुमारन यांनी सुरुवातीपासूनच कुटुंबाला प्राधान्य दिलं आहे. व्यवसाय सुरू करत असतांना देखील त्यांनी आपल्या पतीला संस्थापक म्हणून नियुक्त केलं आणि त्यांच्या ऑस्ट्रेलिया मधील एमबीए शिक्षणाचा त्यांनी व्यवसाय उभारणी आणि विस्तारासाठी उपयोग करून घेतला.
कृतिका कुमारन यांनी आपल्या जागेचा सुद्धा खूप योग्य रीतीने वापर करून घेतला. कोईंबतूर पासून जवळच असलेल्या ‘कासिया पालम’ या गावात कृतिका यांच्या नावाने एक वडिलोपार्जित जमीन होती. या जमिनीचं या दोघांनी मिळून ‘विल्वाह फार्म’ मध्ये रूपांतर केलं. या शेतामध्ये कृतिका यांनी बकरीच्या दुधापासून सौंदर्य प्रसाधने बनवण्यास सुरुवात केली.
विल्वाहच्या सर्व उत्पादनांमध्ये तेल, दही यांसारख्या त्वचेला मऊ असलेल्या गोष्टींचा फक्त उपयोग केला जातो. कोणतेही रासायनिक, सिंथेटिक तेल, अत्तर यांचा वापर करणं कटाक्षाने टाळलं जातं.
विल्वाहच्या प्रत्येक उत्पादनांचं हे वैशिष्ट्य आहे, की ते आजही कुमारन यांच्या निवासस्थानीच तयार केले जातात. प्रत्येक नवीन उत्पादन बाजारात आणण्यासाठी कृतिका कुमारन या एक ते दीड महिना त्यावर संशोधन करत असतात.
विल्वाहचे प्रॉडक्ट्स हे केसांची काळजी आणि अन्य सौंदर्य समस्यांवर तोडगा म्हणून ग्राहकांमध्ये लोकप्रिय होतांना सध्या दिसत आहेत. लहान मुलांना डासांपासून वाचवणारं ‘सिट्रोनेला’ आणि ‘लेमनग्रास’ युक्त क्रीम सुद्धा विल्वाह ग्रुपने तयार केले आहेत.
सुरुवातीच्या काळात विल्वाहने आयुर्वेदिक ‘मस्करा’ आणि ‘लिपस्टिक’ सारखे उत्पादन तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी जाहिरात करून पोहोचण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
ज्या वस्तूंपासून लोकांना ‘ऍलर्जी’ होऊ शकते असे सर्व उत्पादन तयार करण्यासाठी विल्वाह ग्रुप नेहमीच आग्रही असतो. ज्यामध्ये विविध प्रकारचे डिओड्रेन्ट, रसायन विरहित बॉडी लोशन यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक सौंदर्य प्रसाधन तयार करतांना कृतिका या स्वतः त्याच्या तेलाची पाहणी करत असतात. तेल हे जैविक, तुळसयुक्त, पेपरमिंट, लेमनग्रास युक्त असावं यासाठी त्या नेहमीच सर्वदूर आपली तेलाची असलेल्या गरजेची माहिती लोकांना सांगत असतात.
कोणताही व्यवसाय उभा करण्यासाठी ग्राहक जितके महत्वाचे असतात, तितकेच तुम्हाला कच्चा माल पुरवणारे लोक महत्वाचे असतात. कृतिका यांनी आपल्या विल्वाह फार्म मध्येच त्यांना लागणाऱ्या तेलाचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
इतर उत्पादनांसाठी विल्वाहने शेजारच्या शेतकऱ्यांना काम देऊन आपल्या भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची एक संधी निर्माण करून दिली आहे.
विल्वाह ग्रुपने आपल्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री ही सुरुवातीपासूनच ऑनलाईन पद्धतीने ठेवून मार्केटिंगवर होणाऱ्या खर्चावर खूप नियंत्रण ठेवलं आहे.
२०१७ मध्ये ‘इन्स्टाग्राम स्टोअर’ सुरू करून कृतिका यांनी नवीन पायंडा पाडला. २०१९ पर्यंत विल्वाहने वेबसाईट, वितरण विभाग, लॉजीस्टिक्स अशा सर्व सोयी उपलब्ध करून घेतल्या.
विल्वाह ग्रुपने ऑनलाईन सोबतच कोईंबतूर मध्ये ‘ऑफलाईन’ स्टोअर सुद्धा सुरू केले आहेत. पण, आजही विल्वाह चा ८०% उद्योग हा ऑनलाईन पद्धतीनेच होत असतो.
जैविक गोष्टींबद्दल वाढती मागणी सतर्कता ही विल्वाहच्या व्यवसाय विस्तारासाठी उपयुक्त ठरत आहे. विल्वाह व्यतिरिक्त प्लम, डीसगाईझ सारख्या कंपन्यांच्या ऑनलाईन सौंदर्य प्रसाधन विक्रीत सध्या प्रचंड वाढ झाली आहे.
एका सर्वेक्षणानुसार, भारतात सध्या प्रत्येक सौंदर्य प्रसाधन कंपनी ही साधारपणे ८,००० सौंदर्य प्रसाधनांची विक्री करत असते, ज्यांची प्रत्येकी विक्री किंमत ही १५०० रुपये इतकी असते.
दहा वर्ष आपल्या आईला त्वचा रोगासोबत लढतांना बघूनच कृतिका कुमारन यांनी असा त्रास परत कोणाला होऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेला कृतीची जोड मिळाली आणि कृतिका यांनी विल्वाह या व्यवसायात मोठं यश कमावलं.
व्यवसाय सुरू केला तेव्हा कृतिका या केवळ २१ वर्षांच्या होत्या. तामिळनाडूच्या बाहेर कधीही न पडलेली एक मुलगी आज जगभरात आपले घरगुती सौंदर्य प्रसाधनांची निर्यात करत आहे ही कौतुकाची गोष्ट मानली जात आहे.
कृतिका या प्रत्येक मुलाखतीत लोकांना बकरीच्या दुधाचे त्वचेसाठी असलेले फायदे सांगत असते. ज्यामध्ये त्वचा कोरडी न होणे, न फाटणे, केसांची निगा राखणे असे फायदे लोकांना सांगितले जातात.
विल्वाह ग्रुपच्या सर्व उत्पादनांपैकी बकरीच्या दुधापासून तयार केलेला शॅम्पू हे आजही प्रथम क्रमांकावर आहे.
कोरोना काळात सौंदर्य प्रसाधनांची ऑनलाईन विक्री करून ‘विल्वाह’ने कमी वेळात आपला ग्राहकवर्ग तयार केला. कृतिका कुमारन या आपल्या यशाचं श्रेय हे खालील ३ गोष्टींना देत असतात:
१. अंतर्मनाचा ऐका आणि त्यावर विश्वास ठेवा.
२. धोका पत्करून उद्योगात नवीन प्रयोग करा.
३. निर्णय बदलण्याची परवानगी स्वतःला देणे, त्यामध्ये आनंद वाटणे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.