असं काय घडलं की प्रभु श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आदर्श भावंडांचा दाखला द्यायचा असेल तर ‘राम लक्ष्मणाची जोडी’ असं आपसूकच म्हटलं जातं. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, युद्धाचे बाण झेलताना दुसऱ्याच्या जीव वाचवण्यासाठी धडपडणारे, वनवासासारख्या कठीण प्रसंगातही राजवैभव सोडून एकमेकांचा आधार बनणारे राम-लक्ष्मण हे पौराणिक कथांपासून भाऊ कसा असावा याचे प्रतीक आहेत.
अर्थात रामायणात राम-लक्ष्मणाच्या खांद्याला खांदा भिडवून उभे राहणारे भरतष शत्रुघ्न यांचे महत्वही अनन्यसाधारण आहे. एकंदरित अयोध्येत वावरणाऱ्या या चारही भावंडांनी रामायण व्यापून टाकले, यांच्या पराक्रमाच्या गाथा आजही गायल्या जातात, मात्र या चार भावंडांच्या बहिणीबाबत फारसं बोललं जात नाही.
प्रभु श्रीरामाची एकुलती एक बहीण कायमच रामायणाच्या कथेपासून आणि भक्तांच्या श्रद्धेपासून दूर राहिली. असं का घडलं? कोण होती ही बहीण? रामाच्या या बहिणीची नेमकी कथा काय? हे जाणून घ्यायचं असेल तर हा लेख तुम्ही वाचायलाच हवा.
रामायण म्हटलं, की राम, लक्ष्मण, सीता, दशरथ, कौसल्या, कैकयी, यांपासून ते रावण, जटायु, मरिच, शुर्पणखा अशा अनेक व्यक्तीरेखा आपल्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात, मात्र नात्यांच्या या गर्दीत रामाची बहीण ‘शांता’ ही मात्र हरवली आहे. शंकुतला असेही त्यांचे नाव आहे मात्र शांता ही त्यांची ओळख अधिक आख्यायिकांमध्ये सापडते.
प्रभु रामचंद्रांना बहीण आहे हेच अनेकांना ठाऊक नाही त्यामुळे जितक्या सहजेने रामायणातील इतर पात्र आपल्याला आठवतात तितक्याच ताकदीने शांता हे नाव मात्र आपल्याला आठवत नाही.
कोण होती देवी शांता?
तुम्हाला वाटत असेल की रघुकूल वंशात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा चार मुलांचा जन्म झाला मात्र त्यापुर्वीही दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता.
रघुवंश कुळातील ही सर्वात ज्येष्ठ कन्या होती. शांतेचा जन्म झाला आणि राणी कौसल्येच्या मांडीवर ती खेळू लागली. मात्र त्यानंतर पुढील तब्बल १२ वर्ष दशरथ राजाला मुलगा होत नव्हता.
शांता लहान असतानाच दशरथ राजाकडे कौसल्या राणीची बहिण वर्षीणी आणि तिचे पतीदेव राजा रोमपद आले होते. दशरथ राजा आणि कौसल्या राणी यांनी त्यांचे आगतस्वागत केले. मात्र चर्चादरम्यान राणी वर्षीणी दुःखी असल्याचे कौसल्या राणीला कळले.
विवाहानंतर अनेक वर्ष उलटली तरीही अपत्यप्राप्ती नसल्याने हे दाम्पत्य दुःखी असल्याचे कळताच राजा दशरथाने उदार मताने आपली लाडकी लेक शांता या दाम्पत्याला दत्तक म्हणून देण्याचे जाहीर केले.
अर्थात शांता ही मावशीच्याच घरी राहणार असल्याने तिचे उत्तम प्रकारे संगोपन होईल याची कौसल्या राणीला खात्री होती. शिवाय या निर्णयाने आपली बहीण आनंदी राहील या विचारांनी राणी कौसल्येने राजाच्या निर्णयाला होकार दिला आणि तेव्हापासून लहानगी शांता रोमपद राजाच्या राजवाड्यात आनंदाने नांदू लागली.
अंगद देशाच्या राजा रोमपद यांच्या राजवाड्यात लाडाने वाढणाऱ्या शांतेला वेदशास्त्र, धनुर्विद्या, कला अशा वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानही अवगत असल्याचे आख्यायिका सांगतात.
म्हणून रामायणात फारसा उल्लेख नाही…
रामायणाचती कथा सुरु होते ती दशरथ राजा आणि त्याच्या तिन्ही राण्यांना अपत्यप्राप्ती होत नसल्याच्या चिंतेपासून! शांताच्या जन्मानंतर पुन्हा एकदा आपल्या घरात बाललिला दिसू लागतील या विचारांनी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांनी आपल्या लेकीला बहिणीला दत्तक दिले, मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. अशातच राणी कैकयी आणि सुमित्रा यांच्याही पदरी मुलबाळ नव्हते.
राजा दशरथ यांनी श्रृंगी ऋषींच्या आदेशाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्याचेच फलित म्हणजे अयोध्येत चार बालकांचा जन्म झाला.
रामायणात या घटना सापडतात मात्र यापुर्वी घडलेल्या घटनांचा फारसा उल्लेख नाही. त्यामुळे रामायणातील या कन्येबाबत आजही अनेकांना माहिती नाही.
–
रामायणातील फारश्या माहित नसलेल्या या १२ गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील…
कथा शबरीची: फारशी माहित नसलेली, पण तिच्या बोरांइतकीच गोड आणि ह्रदयस्पर्शी!
–
शांतेचा विवाह
रोमपद राजाच्या घरी लाडाने वाढणाऱ्या शांता देवीच्या विवाहाबद्दलही एक आख्यायिका सांगितली जाते. रोमपद राजा शांतेशी खेळण्यात, तिच्याशी गप्पा मारण्यात व्यस्त असताना एका याचकाने आपल्या शेतीसाठी राजाकडे याचना केली. मात्र राजाने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.
राजाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने याचक चांगलाच संतापला. हा याचक इंद्र देवाचा भक्त होता. इंद्रदेवाला आपल्या याचकाच्या अपमानामुळे राग आला, त्यामुळे रोमपद राजाला अद्दल घडवण्यासाठी इंद्रदेवाने शाप दिला.
यामुळे पुढील वर्षी रोमपद राजाच्या राज्यात पाऊस पडला नाही, दुष्काळामुळे राज्यातील जनता आणि पर्यायाने राजाही हैराण झाला.
या समस्येतून मार्ग काढण्यासाठी राज्याने श्रृंग ऋषींना पाचारण केले. ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्याच नेतृत्वाखाली हा यज्ञ भक्तीभावाने केला गेला आणि त्यानंतर दुष्काळाचे संकट टळले.
राज्यात सारंकाही अलबेल झाल्याचे पाहून रोमपद राजाने खूश होत आपली कन्या शांता हिचा विवाह ऋषींशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शांता देवी आणि ऋषी श्रृंग हे कुल्लू येथे राहू लागले अशी कथा आहे.
आजही केली जाते पूजा
कुल्लू येथून ५० किलोमीटर अंतरावर देवी शांता यांचे मंदिर आहे.
या मंदिरात शांता देवीसह त्यांचे पती ऋषी श्रृंग यांचीही पुजा केली जाते. आजही देशातून अनेक भाविक या मंदिरात नित्यनियमाने पुजा करतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.