या बेटावर माणसांची नाही, तर चक्क पछाडलेल्या बाहुल्यांची वस्ती आहे…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भयावह बेट, झपाटलेल्या जागा असे आपण काही ऐकलं की थोडी भीती वाटते आणि त्याहीपेक्षा जास्त कुतूहल निर्माण होतं की नक्की या जागांमध्ये काय घडलं असेल. जगभरात अशा अनेक जागा आहेत ज्या झपाटलेल्या आहेत. आणि लोक कायम अशा जागा शोधून तिथे जाण्याचा प्रयत्न करत असतात.
लोकांना तिथे जाऊन काय घडतंय ते पाहण्याची आणि अनुभवायची जबरदस्त इच्छा असते. काहीवेळा हा अनुभव कुतुहलापेक्षा भीतीदायकच ठरतो. मेक्सिकोमधील एक जागा आहे जिथे पछाडलेल्या बाहुल्या राहतात असे तेथील लोक म्हणतात.
ला इस्ला डे ला मुनेकस हे या जागेचं नाव असून ते एक बेट आहे. सध्या ही जागा लोकांसाठी पर्यटनाचं स्थळ बनलं आहे. इथे तुम्हांला फिरायचं असल्यास गाईड शिवाय तुम्ही फिरू शकत नाही तुम्हाला तो सोबत ठेवावाच लागतो.
येथील लोक म्हणतात की येथे लटकलेल्या बाहुल्या एकमेकांशी बोलतात, एकमेकांना खुणा दाखवतात. येथील बेटावर लोकांच्या संख्येपेक्षा जास्त भुतांच्या संख्या आहेत.
परंतु हे बेट कायमच भयावह नव्हते पूर्वी ते साधे बेट होते पण नंतर घडलेल्या काही घटनांमुळे ते असे बनले आहे. ते असे का बनले त्या मागची रंजक कथा जाणून घेऊया.
डॉन ज्युलियन सॅंटाना बॅरेरा यांचा जन्म मेक्सिको सिटीच्या शोषिमिलिको बरोमध्ये १९२१ मध्ये झाला. १९५० च्या दरम्यान ते त्या बेटावर गेले आणि त्या बेटाची रखवाली करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी भाजीपाला वगैरे पिकवून अत्यंत साधे जीवन जगण्यास सुरुवात केली.
अशा शांत ठिकाणी ते का राहायला गेले या बाबतीत अनेकांनी वेगवेगळे तर्क लावले पण ते अत्यंत धार्मिक असून त्यांना संन्यासासारखे आयुष्य जगावेसे वाटत होते.
१९५० मध्ये ते ज्या धर्मासाठी कार्य करत होते, जवळच असणाऱ्या धर्मस्थळांना भेटी देत होते. यातूनच काही गैरसमजांमुळे ज्युलियनला कॅथलिक समुदायातील लोकांकडून मारहाण झाली आणि या दुःखाने तो आणखी एकटा पडला आणि याच वेळी ती घटना घडली ज्यामुळे पुढे या बेटाला भयावह बेट ठरवण्यात आले.
ज्युलियन आपले नित्यनियमाची काम करत असताना त्याला बेटाच्या किनाऱ्यावर एक लहान मुलीचे मृतदेह दिसले आणि त्या बाजूला एक बाहुली होती.
ज्युलियन अत्यंत धार्मिक व्यक्ती असल्यामुळे त्याने त्या मुलीचा अंत्यविधी करण्यासाठी तिचा मृतदेह किनाऱ्यावर पुरला व त्या मुलीचा आत्मा शांत करण्यासाठी तिच्या बाहुलीला झाडावर लटकवले.
–
- “या” कारणासाठी कुप्रसिद्ध आहेत, मुंबईतील ही १० ठिकाणे
- भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या!
–
ज्युलियनचा असा समज होता की ती लहान मुलगी या बाहुलीशी खेळेल. पण या सगळ्या कथा आहेत असे म्हंटले जाते वास्तविक असा कोणत्याही मुलीचा मृतदेह आढळला नव्हता.
कालांतराने ज्युलियन जेव्हा बेटावर एकटा राहत होता तेव्हा त्याला रात्री झोपेत त्या मुलीचे आवाज ऐकू यायला लागले. तसेच विचित्र आवाज आणि वेगवेगळ्या घटना घडण्यास सुरुवात झाली. यात असेही घडत होते की त्याने बाहुली ज्या जागेवर लटकवली होती ती काही काळाने दुसऱ्याच ठिकाणी दिसायची.
काही काळाने त्याला कळले कि बेटाला भुताने पछाडले आहे. त्यामुळे तो बेटाला शांत करण्यासाठी मेक्सिको सिटीमधून विविध बाहुल्या घेऊन आला.
तो त्या मुलीच्या आत्म्याला शांत करण्यासाठी त्या आणलेल्या बाहुल्यांना झाडावर लटकवायला लागला. काही वेळा साठी सर्व शांत झालं पण नंतर परत त्याला भयानक अनुभव येण्यास सुरुवात झाली.
परत काही दिवसांनी सर्व सुरळीत सुरु झाले आणि जुलियनलाही वाटले की आत्ता भूत वगैरे नाहीये सगळं गेलं आहे. पण अचानक एके दिवशी त्याला झोकिमिल्को नदीत खाली असंख्य बाहुल्या तरंगताना दिसल्या. आणि मग हळू हळू पूर्वीसारखेच त्याला आवाज ऐकू येण्यास सुरुवात झाली.
मला माझी बाहुली हवी आहे असे आवाज त्याला ऐकू येऊ लागले. जेव्हा तो मध्येच उठून आजूबाजूला पाहत असे तेव्हा त्याला आजूबाजूला काहीच दिसत नसे. सगळीकडे काळाकुट्ट अंधार असे.
त्याने परत सगळं शांत करण्यासाठी नदीतील बाहुल्या झाडांवर टांगण्यास सुरुवात केली. काही लोकांच्या मते ही गोष्ट खरी असू शकते की त्या नदीत बाहुल्या सापडल्या पण काही बाहुल्या ह्या जुलियनने शोधून आणल्या होत्या असे ते म्हणतात.
लोक असेही म्हणतात की या बाहुल्यांची अवस्था पाहूनच ते भूत जुलियनला घाबरवत होते. त्या बाहुल्यांची अवस्था फार वाईट आणि कुरूप होती. आत्ता ७० वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या या बाहुल्या सडत आहेत त्यांचे डोळे वगैरे गहाळ झाले आहेत.
काही सुंदर बाहुल्यांसाठी ज्युलियनने कपडे आणले होते, त्यांच्यासाठी एक सुंदर घर बनवले होते ज्यात तो त्यांना ठेवत असे. तसेच अशा बाहुल्यांसाठी त्याने वेगवेगळे सामान विकत घेतले होते आणि त्यांना अगस्तीना व मोनेक अशी नावे दिली होती.
ज्युलियनने या बेटावर राहण्यासाठी आपल्या घरच्यांचा त्याग केला आणि तो त्याचे आयुष्य जगत होता. १९९० च्या काळात त्याने बेटाच्या किनाऱ्यावर ती मुलगी कशी मृत अवस्थेत सापडली आणि त्याने बाहुल्या शोधण्यास कशी सुरुवात केली हे लोकांना सांगण्यास सुरुवात केली.
या सगळ्या गोष्टी ऐकून लोकं उत्साहित झाले आणि त्यांनी या बेटावर येऊन तो भीतीदायक अनुभव घेण्यास सुरुवात केली. या बेटावर येण्याचे आणि त्या कथा ऐकण्याचे लोक ज्युलियनला पैसे देत असत. यातूनच त्याचे उत्पन्न सुरु झाले.
२००१ साली या सगळ्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाली होती आणि ज्या बेटावर ज्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह सापडला होता त्याच ठिकाणी २००१ ला ज्युलियनचा मृतदेह सापडला. त्याचा बुडून मृत्यू झाला होता असे लोक म्हणतात.
माध्यमांमुळे त्याच्या मृत्यूची बातमी अनेक लोकांपर्यंत पोहोचली आणि आजूबाजूचा स्थानिकांना यात रस निर्माण झाला. जे त्याला ओळखही नव्हते त्यांनीही त्याच्याबद्दल अनेक कथा लोकांना सांगण्यास सुरुवात केली.
ज्युलियन या बाहुल्या गोळा करत असे यामागे हे कारण आहे कि तो स्वतः त्या भुताच्या अधीन झाला होता. तो अजूनही या बेटावर राहतो असे म्हंटले जाते. धार्मिक लोक या बेटावर येत नाहीत ते मुद्दामहून येथे येण टाळतात. परंतु काही उत्साही लोक येथे येतात आणि येथील वेगवेगळ्या गोष्टी पाहतात.
सध्या हे बेट जुलियनचा पुतण्या अनास्तासियो सान्ताना वेलास्को याच्या ताब्यात आहे. २००२ पासून, वेलास्को आणि इतर असंख्य कंपन्या बोट टूर ऑफर करत आहेत जे मेक्सिको सिटीच्या काठावर फिरतात – यातील हे बाहुल्यांचे बेट हा त्या दौऱ्यातील सर्वात लोकप्रिय जागा आहे.
या शापित बेटाबद्दल दोन वेगवेगळी मतं आहेत. काही स्थानिक लोक हे टाळतात; तर इतर नियमितपणे बेटाला भेट देतात आणि दुष्ट आत्म्यांना रोखण्यासाठी झाडांपासून तुटलेल्या बाहुल्या लटकवण्याची परंपरा सुरू ठेवतात.
–
- या तलावांजवळ गेलात तर तुमचं काही खरं नाही! ‘मृत्यूचं घर’ मानले जाणारे ९ तलाव
- गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ११ ठिकाणे
–
परिणामी, काही अंदाज असा की बेटावर हजारो बाहुल्या आहेत. १९४३ मध्ये बेटावर एक चित्रपट चित्रीत करण्यात आला. एमिलियो फर्नांडीझने येथे मारिया कॅंडेलारियाचे चित्रीकरण केले – त्यात डोलोरेस डेल रिओ आणि पेड्रो अर्मेन्डिझर हे कलाकार होते.
लोकांच्या मते ज्युलियन हा फार चांगला माणूस होता तो समुद्रात बुडणाऱ्या मुलीला वाचवू शकला नाही ह्या गोष्टीची त्याला फार खंत वाटत होती. आणि यातच तो वेगवेगळ्या बाहुल्या झाडांवर टांगत होता. बेटाजवळ राहणारी अनेक माणसं या जुलियनच्या कथेला आजही दंतकथाच म्हणतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.