टिकली न लावणाऱ्या मुलाखतकाराची गोष्ट
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखिका – सानिका कुसूरकर
===
#NoBindiNoBusiness नावाचं वादळ गुरुवारी संध्याकाळी सोशल मिडीयावर धडकलं आणि त्यानंतर याचा तडाखा अनेकांना बसला. शेफाली वैद्य यांनी सुरु केलेल्या या कॅम्पनमध्ये काहीजण कौतुकाने सामील झाले तर काहींनी केवळ तोंडसुख घेण्यासाठी आपला सहभाग दर्शवला.
सोशल मिडीयातच पूर्णवेळ काम करत असल्याने या वादळापासून दूर राहण्याचा मोह जास्त काळ आवरता आला नाही. त्यामुळे गुरुवार संध्याकाळपासून सोशल मिडीयावर अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या, टिकाकारांना चपखल उत्तर देणाऱ्या शेफालीजी यांना गाठलं आणि इनमराठीच्या व्यासपीठावर त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
सर्वप्रथम अनेक प्रतिष्ठित मिडीया कंपन्यांना नकार देत इनमराठीसाठी खास वेळ राखून ठेवत आपली सडेतोड भूमिका मनमोकळेपणाने मांडण्यासाठी शेफालीजी यांचे आभार! त्यांच्याशी गप्पा मारण्याचा, त्यांच्या विचारांचे अनेक पैलू प्रत्यक्ष उलगडण्याचा अनुभव खरंच समृद्ध करणारा होता यात शंका नाही,
मुलाखत रंगली, त्यानंतर त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला, अजूनही इनमराठीच्या मंचावरून हे वारू चौफेर उधळत आहे. मात्र या सगळ्या गदारोळात काही गमतीशीर प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या, त्या सर्वांना माझ्यापरिने उत्तर देण्यासाठी हा सगळा खटाटोप!
तर झालं असं की मुलाखत घ्यायची निश्चित झाली तेव्हा प्रश्नांपेक्षाही आधी विचार डोक्यात आला तो आपण टिकली लावावी की नाही? बहुतांश मुलाखतीच्या आधी प्रश्नांची उजळणी वैगरे केली जाते, मात्र ही मुलाखत काहीशी वेगळी असल्याने अवघ्या छोट्याशा टिकलीने माझा बराच वेळ घेतला.
टिकली लावली नाही तर टिका होणार, नेटकरी मूळ मुद्दा बाजूला सारून नवं टार्गेट शोधणार याची कल्पना होतीच, मात्र नेटक-यांना घाबरून, किंवा इतर कोणाच्या प्रतिक्रियांचा विचार करत मी माझं मत बदललं, मनाविरुद्ध टिकली लावली तर ती स्वतःचीच फसवणूक ठरणार नाही का?
केवळ टिकाकारांना घाबरून किंवा विषय समजून न घेता कायमच विरोधकांच्या भुमिकेत असणा-यांचे समाधान व्हावे यासाठी स्वतःचं मत बदलणं मला मान्य नाही.
दररोज ऑफिसला जाताना मी योग्य तो पोषाख करते, मात्र त्या कपड्यांवर टिकली लावणं मला रुचत नाही. असं असताना केवळ कालच्या दिवशी शेफाली यांची मुलाखत घ्यायची म्हणून टिकली लावणं आणि मुलाखत संपताच टिकलीला पुन्हा एकदा तिच्या नेहमीच्या जागी म्हणजे आरशावर चिकटवणं कितपत योग्य आहे?
याचाच अर्थ दररोज टिकली लावणे गैर किंवा न लावणारे शहाणे असा अजिबात नाही. रोजच्या आयुष्यात टिकली लावायची की नाही हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. खरंतर हा इतका साधा प्रश्न आहे, मात्र तरीही कालपासून यावर उडणाऱ्या टिकेच्या फैरी पाहता प्रत्येकाला, प्रत्येक विषयात आपलं अमूल्य मत मांडण्याची किती घाई असते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना प्रत्येकाला (हवं ते आणि हवं तसं) मत मांडण्याची मुभा कायद्यानेच दिली असताना ते रोखणारे आपण कोण? किंबहूना ते रोखणं योग्यही नाही, मात्र भविष्यात होणा-या (विनाकारण) टिकांना घाबरून केवळ दिखाव्यापुरती टिकली लावणं अर्थात माझं मत बदलणं मला मान्य नाही.
सणांना, साडीसारख्या पारंपरिक पोषाखावर मी हौसेने टिकली लावतेच, त्याने सौंदर्य अधिक खुलतं हे ही मला मान्य आहे. मात्र त्यावेळी ती कपाळावर असलेली टिकली ही केवळ स्वतःच्या मताने, स्वतःच्या आनंदासाठी लावलेली असते. आपण टिकली लावली नाही तर मुलाखतीनंतर आपल्यावर टिका होईल किंवा आपल्याला टिकली न लावण्याबद्दलचा जाब विचारला जाईल यासाठी टिकली चिटकवणं ही मला स्वतःची आणि पर्यायाने इतरांचीही फसवणूक वाटते.
हाच विचार करताना शेफाली यांच्या फेसबूक पोस्ट पुन्हा पुन्हा वाचल्या, आणि त्यानंतर माझा विचार पक्का झाला.
गुरुवारपासून आपलं मत ठासून सांगणा-या शेफाली यांनी कधीच कुणावर टिकली लावण्याची सक्ती केली नाहीये. टिकली न लावणा-या स्त्रिया हिंदू नाहीत असंही विधान त्यांनी कधीही केलं नाहीये, त्यांचा मुद्दा हा केवळ आणि केवळ दिवाळीसाठी आपल्या वस्तु विकणा-या ब्रॅन्ड्सच्या जाहिरातींबाबत आहे.
दिवाळीच्या निमित्ताने हिंदू ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या, त्यांच्या खिशाला कात्री लावत आपली तिजोरी भरणाऱ्या ब्रॅन्ड्सनी हिंदू सणांचा आदर करावा, हिंदूंच्या परंपरा जपाव्या आणि त्यासाठी या सणांच्या जाहिरातीतील देखण्या मॉडेल्स सालंकृत असाव्यात हा एकच मुद्दा सेफालीजी आपल्या प्रत्येक पोस्टमधून मांडत आहेत.
मात्र अनेकांना शेफाली यांचा मुद्दाच कळत नाहीये. ‘टिकली म्हणजे बाई’ या एकाच विचारांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत व्यक्तीस्वातंत्र्य, ‘ति’चे अधिकार, ‘ति’चा निर्णय असे अनेक परंपरागत हॅशटॅग्स व्हायरल केले गेले. पण गंमत ही आहे की यापैकी कोणत्याही हॅशटॅग्सना शेफाली यांचा नकार नाही.
मी टिकली लावली नाही, त्यात कोणचाही अविचार नाही, मुलाखत अदिक व्हायरल व्हावी यासाठी केलेला कोणताही पब्लिसिटी स्टन्ट नाही किंवा अनवधानाने मी टिकली लावायला विसरले असंही नाही, किंवा यामागे काहीतरी अगम्य, गूढ असा विचार आहे असंही नाही.
रोज वावरताना मी जशी असते, जितक्या सहजतेने, खरेपणाने मी वावरते त्याच पद्धतीने मुलाखत घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. माझं काम मी निष्ठेने, प्रामाणिकपणे केलं याचीच पोचपावती म्हणजे अनेकांना मुलाखत आवडली. मुख्यतः या मुलाखतीत शेफाली यांचे विचार ऐकणं आणि वाचकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं होतं, ते माझं उद्दिष्ट साध्य झालं. शिवाय कोणाच्याही टिकेला घाबरून किंवा इतरांचं समाधान होईल यासाठी मी माझा निर्णय बदलला नाही, मन मारून, इच्छा नसतानाही टिकली चिकटवली नाही या समाधानाने काल रात्री शांत झोपही लागली आणि कोणत्याही टिकेपेक्षा ती मला लाखमोलाची आहे.
नक्की काय आहे #NoBindiNoBusiness ? त्यामागचा नेमका विचार आणि माझ्या टिकली न लावण्यावर शेफाली यांचं समर्पक उत्तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.