आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारतात सगळीकडे कोरोनाचा प्रभाव हळू हळू कमी होताना दिसत आहे. गेल्या दीड वर्षांपासून लोकांनी सण अत्यंत सामान्य पद्धतीने साजरे केले आहेत. कोणत्याही सणाचा उत्सव न करता साध्या पद्धतीने घरात सण साजरा केला आहे.
कोरोनाचे नियम देशभरात शिथिल होत असतानाच जवळच आलेल्या दिवाळी निमित्त लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावर्षीची दिवाळी अगदी दणक्यात साजरी करायची असेच आजूबाजूला लोकांकडून ऐकायला मिळतंय.
संपूर्ण भारतात दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. विविध प्रदेशांमध्ये त्यांच्या परंपरेनुसार साजरी केली जाते.
अशीच एक दिवाळीतील आगळीवेगळी परंपरा मध्य प्रदेश मधील इंदोर मध्ये पाहायला मिळते. २०० वर्षांपासून चालू असणाऱ्या या परंपरेला हिंगोट युद्ध म्हंटले जाते. इंदोर जवळील गौतमपुरा या गावात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा खेळ खेळाला जातो.
हिंगोट युद्ध :
इंदोर मधील गौतमपूरा येथे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या हिंगोट युद्धाच्या खेळाची तयारी एक महिना आधीपासूनच होते. या खेळात ज्या शस्त्र म्हणून एका फळाचा वापर केला जातो, त्याला हिंगोट म्हंटले जाते. दोन संघ एकमेकांवर हे शस्त्र सोडतात.
हिंगोट कसे बनते?
हिंगोट हे हिंगोरिया या झाडावर तयार होणारे फळ आहे. दिवाळीच्या एक महिना आधीच लोक हे फळ तोडून घेऊन येतात. लिंबाच्या आकाराचं असणारे हे फळ बाहेरून नारळासारखे टणक आणि आतून रिकामे असते.
फळाला वरून साफ करून त्याच्या आतील सर्व गोष्टी काढून टाकल्या जातात. त्याला पूर्ण रिकामं करून ते उन्हात सुकवण्यासाठी ठेवतात. यात अजून एक मोठे भोक पाडून त्यात फटाक्यातील दारू व माती भरून बंद केले जाते. हिंगोटच्या दुसऱ्या बाजूला एक छोटं भोक पाडून त्यात दारूसाठी जी वात लागते ती टाकली जाते.
अशा प्रकारे तयार केलेल्या हिंगोटवर ८ इंच लांब बांबूची काठी बांधली जाते, ज्यामुळे निशाणा एकदम सरळ लागेल. नवरात्रीच्या आधीच हे खेळाडू या खेळाची तयारी करण्यास सुरुवात करतात. या खेळादरम्यान सुरक्षतेसाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो.
–
- दिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो? तसं नाहीये! वाचा जगभरातील दिवाळीबद्दल…
- जुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले
–
दोन गावांमधील युद्ध :
गौतमपूरा आणि रुणजी या दोन गावांमध्ये ही परंपरा २०० वर्षांपासून चालू आहे. या दोन्ही गावातील तरुण मुलं गोवर्धन पूजेच्या दिवशी संध्याकाळी एकत्र येऊन बडनगर रोड येथील देवनारायण मंदिरात दर्शन घेतात.
यानंतर, मंदिरासमोरील दर्शकांसाठी सुरक्षा जाळ्यांनी वेढलेल्या मैदानात हे दोन्ही संघ एकमेकांपासून सुमारे २०० फूट अंतरावर समोरासमोर येतात आणि हिंगोट युद्धास सुरुवात होते. यातील गौतमपुरा गावातील संघाला तुर्रा आणि रुणजी गावातील संघाला कलंगी म्हंटले जाते.
दोन्ही संघ एकमेकांवर हिंगोट सोडतात आणि समोरून येणारे हिंगोट पासून स्वतःला वाचवण्यासाठी ढालीचा वापर करतात. या खेळात हार जीत न पाहता हे संपूर्णपणे परंपरेसाठी खेळले जाते.
हिंगोट युद्धाची परंपरा :
या हिंगोट युद्धाची परंपरा कधी आणि केव्हापासून सुरु झाली यामागे कोणतेही पुरावे नाहीयेत. परंतु या युद्धाबद्दल एक कथा सांगितली जाते आणि ती अशीकी गौतमपुरा प्रदेशाच्या सीमेचे रक्षण करणारे योद्धा गौतमपुराच्या दिशेने हल्ला करणाऱ्या मुघल सैन्याच्या शत्रू घोडदळ सैनिकांना मारण्यासाठी हिंगोट या शस्त्राचा वापर करायचे.
तेव्हापासून गौतमपुरा आणि रुंजी गावातील लोकांनी या युद्धाचा सराव सुरू केला जेणेकरून ते आपले गाव शत्रूंपासून सुरक्षित ठेवू शकतील. पुढे हे युद्धाचे परंपरेत रूपांतर झाले आणि ही परंपरा गौतमपुरा आणि रुंजी येथील लोक शतकांपासून साजरी करत आहेत. यात अनेक जण जखमीही होतात
या खेळात स्वतःचा बचाव करण्यासाठी ढालीचा किंवा इतर गोष्टींचा वापर केला जातो तरीही काहीवेळा लोक जखमी होतात. २०१७ मध्ये हा खेळ पाहत असताना, एक मुलगा हिंगोटेने जखमी झाला.
ज्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हिंगोटे युद्धाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली.
मात्र, आजपर्यंत यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण दरवर्षी हिंगोटे युद्धात अनेक लोक जखमी होतात. परंतु परंपरेच्या नावाखाली चालणारे हे युद्ध अजूनही थांबलेले नाही.
तुरा आणि कलंगी दलाच्या योद्ध्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींसमोर १९८४ मध्ये दिल्ली येथे आयोजित मालवा कला महोत्सवात विशेष आमंत्रणाद्वारे या खेळाचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर शहरातील प्रकाश जैन यांनी सुमारे १६ योद्ध्यांना दिल्लीला नेले. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुमारे एक तास हे सादरीकरण करण्यात आले.
अत्यंत भयानक वाटणारी अशी २०० वर्ष जुनी परंपरा आजही चालू आहे. कोरोनाच्या काळामुळे मागच्या वर्षी लोकांना हा खेळ खेळता आला नाही परंतु या वर्षी गौतमपूरा मधील लोकांना त्यांच्या परंपरेनुसार हे युद्ध खेळण्यात येईल अशी आशा आहे.
युद्धाचे खेळात झालेलं रूपांतर आणि त्यातून सुरु झालेली ही २०० वर्षांची परंपरा गौतमपुरातील लोक तितक्याच आस्थेने पाळताना दिसतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.