Site icon InMarathi

भारत तर ‘फेव्हरेट’ आहेच, पण ‘हे’ संघ सुद्धा आहेत विजेतेपदाचे दावेदार…!!

world cup strong teams inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

संकल्पना आणि विचार – हिमांशू वाढवणकर
शब्दांकन – ईशान पांडुरंग घमंडे

===

भारताकडे यजमानपद असणाऱ्या आणि भारताबाहेर होऊ घातलेला टी-२० वर्ल्डकप आता सुरु होतोय. नाक्यापासून ते ऑफिसपर्यंत सगळीकडेच याची चर्चा सुद्धा रंगू लागली आहे. मग या चर्चेत एक विषय तर ओघाने येतोच, तो म्हणजे या वर्ल्डकपची फेव्हरेट टीम कोण?

हेच चौघे फेव्हरेट्स…

भारत हा नेहमीच आवडीचा संघ असतो, त्यात काही शंकाच नाही. पण कागदावर असो किंवा प्रत्यक्षात टीम म्हणून इतरही काही संघ तगडे वाटतात. माझ्या मते विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान हे चार संघ अगदीच जबरदस्त वाटतायत.

तुम्ही क्रमवारी बघायला गेलात तर इंग्लंड पहिल्या, भारत दुसऱ्या, पाकिस्तान तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानावर पाहायला मिळतो. हेच चार संघ मुख्य दावेदारही ठरतात.

 

 

ब्लॅक कॅप्स दमदार…

केन विल्यम्सनसारखा उत्तम कर्णधार ही न्यूझीलंडची जमेची बाजू ठरते. अष्टपैलूंचा संघात भरणा असणं हा कुठल्याही संघासाठी महत्त्वाचा भाग ठरतो. न्यूझीलंडची ती बाजू सुद्धा भक्कम आहे. जिमी निशम, काईल जेमिसन असे दमदार अष्टपैलू त्यांच्या संघात आहेत. मुख्य म्हणजे, ते उत्तम फॉर्ममध्ये आहेत.

 

 

न्यूझीलंडची गोलंदाजी सुद्धा दर्जेदार वाटते. ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन हे ताज्या दमाचे गोलंदाज अप्रतिम आहेत. फर्ग्युसन तर आयपीएलपासून चांगल्या फॉर्मात असल्याचं पाहायला मिळालंय. टीम साऊदी हा अनुभवी गोलंदाज आजही झकास कामगिरी करण्याची क्षमता असणारा आहे. ईश सोधी आणि सँटनर हे स्पिनर उत्तम सपोर्ट करू शकतात.

सलामीवीर कॉनवे हा झकास फॉर्मात आहे. सर्व सामन्यांमध्येही त्याने त्याच्या स्फोटक फलंदाजीची ताकद दाखवून दिली आहे. मार्टिन गप्टिल त्याला उत्तम साथ देऊ शकतो. एकूण न्यूझीलंड संघ तगडा आहे यात शंकाच नाही.

पाकिस्तान सुद्धा दावेदार

चाळीशी गाठलेले शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिझ पाकिस्तानसाठी महत्त्वपूर्ण ठरतील. त्यांचा दांडगा अनुभव ही संघासाठी जमेची बाजू आहे. एवढंच नाही, तर माजी कर्णधार सर्फराज अहमदचं पुनरागमन हादेखील त्यांच्यासाठी फायदेशीर निर्णय ठरू शकतो.

मागील काही वर्षं सातत्याने चांगली कामगिरी करत फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल ५ जणांमध्ये स्थान मिळवणारा बाबर आझम हा पाकिस्तानचा की फॅक्टर म्हणता येईल. त्याचा फॉर्म पाकिस्तानसाठी उपयुक्त ठरेल. अर्थात, त्याच्यावरच संघाचा संपूर्ण भार आहे असंही म्हणता येईल. त्यामुळेच बाबर हाच त्यांचा कमजोर दुवा ठरू शकतो, हेदेखील तितकंच खरं आहे.

 

 

अनुभवाचा भरणा असलेले काही खेळाडू नव्या दमाचे खेळाडू अशी पाकिस्तानची बॅलन्स टीम वाटते. गोलंदाजी आधीप्रमाणे भेदक नसली, तरीही गुणी गोलंदाज या संघात आहेत. शाहीन आफ्रिदी, हसन अली हे चांगली गोलंदाजी करत आहेत.

पाकिस्तानात असलेली आतंकवादाची भीती असल्याने बराच काळ पाकिस्तान देशाबाहेर क्रिकेट खेळत आहे. मात्र याचा फायदा असा झालाय, की मागचा बराच काळ ते दुबईमध्ये खेळत आहेत. त्यामुळे तिथल्या खेळपट्ट्या आणि वातावरणाची त्यांना योग्य जण आहे. हा पाकिस्तानच्या संघाला दावेदार बनवणारा महत्त्वाचा मुद्दा आहे.

उगाच नंबर वन नाहीत…

इंग्लंडचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर का आहे, हे त्यांचा संघ पाहिला की आपोआपच लक्षात येतं. टी-२० सामने खेळणारा त्यांचा संघ म्हणजे या प्रकारासाठी खास संघ वाटतो. वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगळे खेळाडू खेळवणं हा इंग्लंडचा प्लॅन इथे यशस्वी ठरतोय असं म्हणायला हवं.

जॉस बटलर, रॉय, बेअरस्टो, मलान, हे फलंदाज असोत, किंवा मोईन अली, जॉर्डनसारखा अष्टपैलू, त्यांच्या संघात दमदार खेळाडू आहेत हे स्पष्ट आहे. क्रिस जॉर्डन डेथ ओव्हर्समध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो. स्फोटक फलंदाजी करण्यात सुद्धा त्याचा हातखंडा आहे.

मोईन अली आणि आदिल रशीद ही फिरकी जोडगोळी उत्तम आहे. मार्क वूड, वोक्स हे जलदगती गोलंदाज सुद्धा दर्जेदार आहेत. आदिल रशीद हा त्यांचा हुकुमी एक्का ठरू शकेल, कर्णधाराचा पाठिंबा असणं ही त्याच्यासाठी जमेची बाब आहे. अर्थात कर्णधार मॉर्गनचा खराब फॉर्म हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे हे नक्की…

गरज पडल्यास स्वतः संघाबाहेर बसण्याची मानसिक तयारी असल्याचं मॉर्गनने म्हटलं आहे. त्यामुळे हा कळीचा मुद्दा आहे हे तर नक्की…

 

अर्थातच भारत…

भारताची फलंदाजी उत्तम आहे. रोहित आणि राहुलसारखे सलामीवीर त्यानंतर विराट, मग सूर्या, ईशान किशन हे फलंदाज कागदावर तर अगदीच उत्कृष्ट आहेत.

अश्विनचा अनुभव हा भारतासाठी कळीचा मुद्दा आहे. त्याची कामगिरी सातत्यपूर्ण नसणं हा चिंतेचा विषय म्हणता येईल. जडेजासारखा अष्टपैलू संघात असल्यामुळे ३ जलदगती गोलंदाजांसह एक फिरकीपटू संघात घेणं सहजशक्य आहे. जडेजा संघात हवाच हे मात्र खरं…

 

 

रिषभ पंत हा यष्टिरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज अशी दुहेरी भूमिका साकारण्यात यशस्वी होतो, त्यामुळे फलंदाजीचा बॅलन्स उत्तम आहे असं म्हणायला हरकत नाही. हार्दिक गोलंदाजी करणार नसेल, तर त्याने संघात असणं फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे सूर्या आणि रिषभ हे मधल्या फळीतील की फॅक्टर ठरतात.

जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी, शमीचा फॉर्म, चांगली फलंदाजी करू शकणारा शार्दूल ठाकूर, अशी गोलंदाजीची तगडी फळी भारताकडे आहे. त्यामुळे भारत झकास कामगिरी करण्यासाठी सक्षम संघ आहे.

 

 

हे ठरू शकतात डार्क हॉर्स…

प्रत्येक स्पर्धेत काही संघ डार्क हॉर्स ठरतात. त्यांच्याकडून म्हटलं तर अपेक्षा असते, म्हटलं तर नसते. अशाच स्थितीत ते अचानक सर्वोत्तम कामगिरी करून जातात. ऑस्ट्रलिया आणि वेस्ट इंडिज हे दोन संघ या स्पर्धेचे डार्क हॉर्स वाटतात.

कारण तो ऑस्ट्रलिया आहे…

वॉर्नर आणि फिंच हे सलामीवीर फॉर्मात नाहीत, पण अनुभवी असल्याने उत्तम कामगिरी करू शकतात यावर कुणी शंका घेणार नाही. मॅक्सवेल जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांची मधली फळी सुद्धा फारशी अनुभवी वाटत नाही. गोलंदाजी सुद्धा आधीसारखी दर्जेदार आणि भेदक राहिलेली नाही, पण असं असलं तरी तो ऑस्ट्रलियाचा संघ आहे.

 

 

ऑस्ट्रलिया म्हणजे जिंकणं असा एक काळ होता, आजही हा संघ कधीही विजेतेपदे मिळवू शकतो. म्हणूनच कागदावर फारसा तगडा वाटत नसला, तरी हा संघ कधीही फिनिक्स भरारी घेऊ शकतो. गेल्या काही वर्षांमधील ही पहिलीच वेळ असावी, ज्यावेळी ऑस्ट्रलिया हा संघ ‘फेव्हरेट’च्या लिस्टमध्ये धरला जात नाहीये.

वेस्ट इंडिजचा बोलबाला असतोच…

वेस्ट इंडिजचे खेळाडू पाहिले की हे टी-२० क्रिकेटसाठीच बनले आहेत असं वाटतं. जगभरातील सगळ्याच टी-२० स्पर्धा ते सातत्याने खेळत असतात. इतका चांगला अनुभव असल्याने ते कधीही चांगली कामगिरी करू शकतात.

दोनवेळा वर्ल्डकप जिंकलेला वेस्ट इंडिजचा संघ हा सगळ्याच स्पर्धांमध्ये डार्क हॉर्स मानला जातो. ते या फॉरमॅटमधले दादा आहेत. पोलार्डसारखा कर्णधार, गेल, निकोलस पुराण, ब्राव्हो, रसेल, या सगळ्या खेळाडूंकडे पाहिलं की ते कधीही मॅच विनर ठरू शकतात असं वाटतं.

 

 

निकोलस आणि गेल हे स्फोटक फलंदाज आहेत. लुईससारखा सलामीवीर तुफान फटकेबाजी करू शकतो. त्याला योग्य साथ द्यायला लेंडल सिमन्ससारखा शांत डोक्याचा फलंदाज मैदानावर उतरणार आहे. हीदेखील विंडीजची जमेची बाजू आहे. गोलंदाजी चांगली नसली, तरी ती विंडीजची ताकद कधीच नसते असंही म्हटलं तरी ते चुकीचं नाही.

असं सगळं असूनही, ती वेस्ट इंडिजची टीम आहे. त्यामुळे ते कधीही भन्नाट कामगिरी करून स्पर्धा जिंकण्याची क्षमता असणारे आहेत यात शंकाच नाही.

खिजगणितीत सुद्धा नाहीत

असेही काही संघ आहेत, ज्यांच्याकडून फारशा अपेक्षाच नाहीत. या यादीत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचं नाव परफेक्ट फिट आहे.

यंदा चोकर्स नव्हेत

दक्षिण आफ्रिकेचा काही वर्षांपूर्वीचा संघ आणि आत्ताचा संघ यात काहीच साम्य दिसत नाही. फाफ डू प्लेसिस, डिव्हिलियर्स, डुमिनी, स्टेन, मॉर्केल अशी टीम कुठे आणि आजची टीम कुठे?

 

 

टेम्बा बावुमाच्या गळ्यात कप्तानीची माळ नशिबाने पडली आहे असं म्हणायला हवं. नॉरखिया, डिकॉक, रबाडा, मॉरिस अशी काही मंडळी सोडली तर त्यांच्या संघात फारसं अनुभवी कुणीच नाही. या संघाचा एकमेव प्लस पॉईंट म्हणायचा झाला, तर या खेळाडूंना फार कुणी खेळताना पाहिलेलं नाही. त्यामुळे ते सरप्राईज पॅकेज ठरू शकतील.

दुसरा सामना जिंकले तरी…

पात्रता फेरीत तो सर्वोत्तम संघ होता म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. मात्र मूळ स्पर्धेत दुसरा सामना जिंकणं सुद्धा त्यांना फारच कठीण जाणार आहे. एक सामना ते जिंकू शकतात, कारण एक संघ तर पात्रता फेरीतूनच वर आलेला असेल. तो श्रीलंकेच्या संघातून दुबळा असल्याने त्यांचा पराभव करणं त्यांना सोपं जाऊ शकेल.

इतर कुठलाही विचार करता, श्रीलंकेच्या संघाने मुख्य स्पर्धेत दुसरा सामना जिंकला तरी ती आश्चर्याची गोष्ट ठरेल यात काहीच शंका नाही.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version