Site icon InMarathi

असा किल्ला जिथे “शून्य” चा आकडा पहिल्यांदाच सापडला

gwalior-featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आपला भारत देश इतिहासाच्या बाबतीत अतिशय श्रीमंत आहे. आपल्या देशात अनेक शुरवीर राजांनी बांधलेले इतिहासाची साक्ष देणारे अनेक सुंदर आणि भव्य गड, किल्ले आहेत. आपला महाराष्ट्र सुद्धा गड, कोट ह्या बाबतीत अतिशय लकी आहे.

शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले जे आजही आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात आणि इतिहासाच्या खुणा अंगावर बाळगून आहेत.

पण दुर्दैवाने आपण त्या गड किल्ल्यांचे नीट जतन केले नाही. उलट ह्या सुंदर, भव्य वास्तूंचे विद्रुपीकरण करण्यातच अनेक टुरिस्ट लोकांना रस असतो.

पण अनेक लोकांना आजही इतिहासाचे महत्व कळते आणि त्या इतिहासाच्या सुवर्णखुणा जतन करण्याचा ते प्रयत्न करतात.

अशीच भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा अभिमानाने अंगावर मिरवणारी एक वास्तू म्हणजे मध्य प्रदेशातील एक फेमस टुरिस्ट स्पॉट –

मध्य प्रदेशमधील ग्वालियर किल्ला…!

 

 

हा ग्वालियर किल्ला इसवी सनाच्या आठव्या शतकात ग्वालियर जवळच्या एका टेकडीजवळ बांधण्यात आला आहे. ह्या किल्ल्याचे प्रामुख्याने दोन भाग आहेत.

मन मंदिर” जे मान सिंग तोमर ह्यांनी बांधले आहे.

 

आणि दुसरा भाग म्हणजे गुजरी महाल..

 

 

ह्या किल्ल्यावरील शिलालेख जवळपास १५०० वर्षे जुने आहेत. शून्याचा सगळ्यात जुना रेकॉर्ड ह्याच किल्ल्यावरील एका छोट्या मंदिरामध्ये सापडला आहे.

हे मंदिर ह्याच किल्ल्यावर आहे. ह्या किल्ल्याचे बांधकाम नक्की कुठल्या काळात झाले ह्या विषयी नक्की माहिती उपलब्ध नाही.

पण सुरज सेन नावाच्या एका राजाने ग्वालियर चा किल्ला बांधला अशी आख्यायिका आहे. ह्या किल्ल्याच्या निर्माणामागे सुद्धा एक रंजक कथा आहे.

एकदा राजा सुरज सेन एका रम्य दिवशी शिकारीसाठी बाहेर पडले. शिकारीचा शोध घेत असताना त्यांना एक मोठा दगड दिसला . शिकारीसाठी फिरत असताना राजा दमला आणि तहानलेला राजा पाण्याच्या शोधात असताना त्याला एक साधूचे दर्शन झाले.

राजाने साधू महाराजांना पाणी कुठे मिळू शकेल आणि तिथपर्यंत मार्ग दाखवण्याची विनंती केली. त्या साधूंचे नाव होते ग्वालिपा.

 

 

त्यांनी जमिनीवर एक दगड आपटला आणि तिथूनच एक झरा बाहेर पडून वाहू लागला. राजाने साधूचे आभार मानून तहान भागेपर्यंत पाणी प्यायले आणि तिथेच झऱ्याच्या साठलेल्या पाण्यात स्नान केले.

आणि काय आश्चर्य ! त्या पाण्यात स्नान केल्याने राजाचा दुर्धर असा त्वचारोग पूर्णपणे बरा झाला…!

अत्यानंदित झालेल्या राजाने नम्रपणे साधू महाराजांना विचारले कि त्यांच्या उपकाराच्या बदल्यात राजाने त्यांच्यासाठी काय करावे? साधू महाराजांनी राजाला सुचवलं की –

झऱ्याचे पात्र मोठे करून ते पाणी एका सरोवरात साठवावे. बऱ्याच वेळी वन्य प्राणी साधू महाराजांच्या साधनेमध्ये व्यत्यय आणीत असत. म्हणूनच वन्य प्राण्यांना तेथे जाण्यास मज्जाव व्हावा ह्यासाठी त्या मोठ्या दगडाभोवती संरक्षक भिंती बांधाव्या.

राजाने साधू महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या टेकडीवर एक मोठा किल्ला बांधला व त्या साधू महाराजांच्या स्मरणार्थ किल्ल्याचे नाव ‘ग्वालियर’ असे ठेवले.

 

 

ग्वालियर किल्ला हा भारतातील किल्ल्यांमधील सर्वश्रेष्ठ किल्ल्यांपैकी एक समजला जातो. ह्या किल्ल्याने अनेक प्रकारच्या शासकांचे राज्य बघितले आहे आणि अजूनही ह्या किल्ल्याची भव्यता तशीच कायम आहे.

तोमर, मुघल, मराठे, ब्रिटिश आणि आता सिंधिया अशा अनेक राजवंशाचा ग्वालियरचा किल्ला साक्षीदार आहे.

हा किल्ला ३ किमी च्या परिसरात पसरला आहे तर ३५ फूट उंच ह्याची वास्तू आहे. ह्या किल्याची खासियत म्हणजे ग्वालियर शहराच्या कुठल्याही भागातून ह्या किल्ल्याचे दर्शन होते.

आधी म्हटल्या प्रमाणे, ह्या किल्ल्यावर असलेल्या विष्णू मंदिरामध्ये पहिल्यांदा शून्य हा आकडा लिखित स्वरूपात सापडल्याची नोंद आहे. ग्वालियर किल्ल्याची काही महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये एकूण ६ महाल आहेत.

त्यांची नावे आहेत मन मंदिर महाल, जय विलास महाल, गुजरी महाल, शहाजहान महाल, करण महाल आणि जहांगीर महाल.

ह्यातील मन मंदिर महाल सर्वात सुंदर मानला जातो. कारण ह्या महालाची बाहेरची बाजू पिवळ्या, हिरव्या व निळ्या फरश्यांवर हत्ती, वाघ व मगर अशा प्राण्यांच्या सुरेख पॅटर्न ने सुशोभित केली आहे. ह्या कलर आणि डिजाईन च्या पॅटर्न मुळे ह्या महालाला ‘द पेन्टेड पॅलेस’ असे सुद्धा नाव आहे.

 

 

येथील जय विलास महालात जो प्रसिद्ध गालिचा आहे तो विणण्यासाठी एकूण १२ वर्षांचा कालावधी लागला असे म्हणतात. तर गुजरी महाल महाराजा मान सिंग ह्यांनी आपल्या लाडक्या बायकोसाठी म्हणजेच राणी मृगनयनी हिच्या साठी बांधला असे लोक सांगतात.

ह्या किल्ल्यामध्ये अनेक बुद्ध तसेच जैन पंथांची मंदिरे आहेत तसेच अनेक स्मारके सुद्धा बांधलेली आहेत.

येथील प्रसिद्ध ‘तेली का मंदिर‘ इ.स. ९व्या शतकात बांधले आहे. ह्या मंदिराचे बांधकाम द्राविडी तसेच इंडो आर्यन स्टाईलचे आहे. तसेच ‘सास -बहू’ मंदिर इ.स. ११व्या शतकात बांधले असून भगवान विष्णू ह्यांना समर्पित केले आहे.

हा किल्ला बघायला गेलात तर तेथे रोज होणार अप्रतिम लाईट अँड साउंड शो चुकवू नका.

 

 

अतिशय सुंदर अशा ह्या शो मध्ये ग्वालियर किल्ल्याविषयीची माहिती अतिशय रंजक स्वरूपात सादर केली जाते.

तर असा हा भव्य दिव्य किल्ला आयुष्यात एकदा तरी नक्की बघायलाच हवा, नाही का ?

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version