Site icon InMarathi

डॉ. आनंदीबाईंनंतर त्यांनी घेतला डॉक्टर होण्याचा ध्यास, संघर्षाने केलं स्वप्न पूर्ण!!

krushnabai kelavkar inmarathi 3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका  – अनुराधा तेंडुलकर

===

भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आपण कै.डॉ. आनंदीबाई जोशी यांचं स्मरण करतो, पण दुर्दैवाने डॉ. आनंदी बाईंना अकाली (वयाच्या २१ व्या वर्षी) मृत्यूमुळे आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजासाठी करण्याची संधीच मिळाली नाही.

त्यानंतरच्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर म्हणून नाव घ्यावं लागतं ते डॉ. रखमाबाई (सावे) राऊत यांचं. त्या पहिल्या भारतीय M.D, पण डॉ. रखमाबाई यांचं कार्यक्षेत्र मुंबई व गुजरात. (शिवाय त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीपेक्षा अधिक गाजावाजा झाला तो त्यांच्या विवाह खटल्याबद्दल.)

महाराष्ट्रात – कोल्हापूरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर म्हणून डॉ . कृष्णाबाई केळवकर यांचं नाव घ्यावं लागतं. डॉ आनंदीबाई जोशी जगल्या असत्य, तर कोल्हापूरला त्यांचं कर्तृत्व अनुभवण्याची संधी मिळाली असती, कारण तशी योजना करुन छ. शाहू महाराजांनी त्यांना संस्थानात नोकरीसाठी निमंत्रित केलंही होतं. पण महाराजांची ती इच्छा अपुरीच राहिली. पुढं डॉ. कृष्णाबाई केळवकर यांच्या रुपानं ती पूर्ण झाली.

 

 

डॉ. कृष्णाजी व रखमाबाई यांच्या पोटी २६ – ०४ – १८८९ रोजी कृष्णाबाई यांचा जन्म अलिबाग येथे झाला. मूळची ही केळवकर मंडळी राजस्थानी रजपूत – क्षत्रिय. आताच्या पालघर जिल्ह्यातील केळवे माहिम इथं स्थायिक झाले म्हणून त्यांचं नाव पडलं केळवकर. तिथं या मंडळींच्या बागा – वाड्या – मिठागरे होती.

डॉ. कृष्णाजी दादाजी केळवकर हे सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून अलिबाग येथे कार्यरत होते. ही मंडळी प्रार्थना समाजाची अनुयायी असल्याने अत्यंत उदारमतवादी. डॉ. कृष्णाजी यांनी त्या काळात आंतरजातीय विवाह केला होता. स्रीशिक्षणाची तळमळ असल्यानं त्यांनी आपल्या पत्नी रखमाबाई (जन्म – १८५७ मृत्यू -१९५०) यांना घरीच शिक्षण दिलं होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

डॉ. केळवकर जेव्हा असाध्य आजार होऊन अंथरुणाला खिळले, तेव्हा कुटुंबाची जबाबदारी साहजिकच रखमाबाईंवर पडली. पदरी द्वारकाबाई, कृष्णाबाई, यमुनाबाई, अहिल्याबाई या चार मुली आणि माधवराव, श्यामराव, यशवंतराव असे तीन मुलगे. मुलांच्या भविष्यासाठी रखमाबाईंनी कंबर कसली. अध्यापनक्षेत्रातील शिक्षण घेऊन त्यांनी नोकरी धरली.

त्यावेळी इथं कोल्हापूरात छत्रपती चौथे शिवाजी यांच्या पत्नी आनंदीबाई यांच्यासाठी सुयोग्य कंपॅनियनची आवश्यकता होती. त्यासाठी तेव्हाचे रिजंट बापूसाहेब महाराज यांनी मुंबईचे गव्हर्नर यांच्याकडे शब्द टाकला होता. त्यांनी बापूसाहेबांना रखमाबाई यांचं नाव सूचवलं. रखमाबाईंची नेमणूक कोल्हापूर दरबारतर्फे करण्यात आली आणि केळवकर परिवार कोल्हापूराशी जोडला गेला तो कायमचा, पिढ्यानपिढ्यासाठी.

छ.आनंदीबाई यांच्या सोबती ( कम्पॅनियन ) म्हणून काही काळ जबाबदारी पार पाडल्यानंतर रखमाबाई यांची नेमणूक फिमेल ट्रेनिंग स्कूलच्या लेडी सुपरिटेंडंट मिस लिटल यांच्या हाताखाली झाली. १८९५ पासून महाराजांनी त्यांची नेमणूक अधिक्षक म्हणून केली. १९२२ मध्ये त्या ५० रुपये मासिक वेतनावर निवृत्त झाल्या. स्री सुधारणाविषयक भाषणांमुळे व तत्द्विषयक परिसंवादांतील सहभागामुळे त्याकाळी त्या विशेष गाजल्या.

अशा बुध्दिमान व कर्तृत्ववान मायपित्यांच्या पोटी १८७९ साली २६ एप्रिल रोजी जन्मलेल्या कृष्णाबाई तशाच निपजल्या यात आश्चर्य नाही. आपल्या मुलींनाही उत्तम शिक्षण मिळावं ही आईबापांची तळमळ. या मुलींना पुण्यातील हुजुरपागेत शिकवावं ही आईवडीलांची इच्छा. मुलींना हुजुरपागेत दाखल करण्यासाठी १९८६ साली बैलगाडीचा आठ दिवसांचा खडतर प्रवास करुन हे दांपत्य पुण्यात पोहचलं आणि मुलींना शाळा दाखवून आणली.

प्रत्यक्ष शाळेत प्रवेश १८८७ मध्ये घेतला. द्वारका , यमुना आणि कृष्णाबाई या तिघी बहिणी हुजुरपागेत शिकू लागल्या. शाळकरी वयातच कृष्णाबाई आपल्या तेजस्वी स्वभावानं चमकू लागल्या. “बालसमाज”, “वनिता समाज” अशा संघटना मध्ये काम करुन त्यांनी आपल्या सामाजिक कामाचा पाया घातला.

वयाच्या चौदाव्या वर्षी मुंबई युनिव्हर्सिटीची मॅट्रिक्युलेशन परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या, त्यावेळी इलाख्यात त्या १० व्या आल्या होत्या.(१८९३) ( संदर्भ आठवत नाही, पण या शालेय शिक्षणाच्या काळात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे त्यांचे स्थानिक पालक होते आणि त्यांच्या प्रगतीवर सातत्याने नजर ठेवून होते असं वाचनात आलेलं स्मरतं. माहित असलेल्यांनी जरूर कळवावं.)

कृष्णाबाईंना पुढं शिकायचं होतं, पण त्या काळचे समाजाचे विचार आणि सनातनी वातावरण. मुलींना साधं प्राथमिक शिक्षण मिळण्याची मारामार , तिथं कॉलेज शिक्षण मिळणं तसं दुरापास्तच. कृष्णाबाईंना तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घ्यायची इच्छा. तत्कालीन सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल गोपाळराव आगरकर, प्रोफेसर गोपाळ कृष्ण गोखले यांनी या हुशार विद्यार्थिनीला प्रवेश दिला.

फर्ग्युसन महाविद्यालयात मुलींच्या प्रवेशाचा मार्ग कृष्णाबाईना मोकळा करून दिला. त्या कॉलेजच्या कृष्णाबाई पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या. सुरुवातीला काही काळ त्या चिकाच्या पडद्याआड बसून प्राध्यापकांची लेक्चर्स ऐकत. ( मला वाचलेलं आठवतंय, कॉलेजचा जिना चढता – उतरतांनाही पुरुष विद्यार्थ्यांशी संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी लागे.) विश्वास बसत नाही ना? पण तो काळच तसा होता.

अशा पडदानशीन वातावरणात शिकूनही कोल्हापूरातून आलेल्या या बुध्दिमान विद्यार्थिनीने इंटर आर्टस् परिक्षेत सर्वाधिक गुण पटकावले आणि ती १८९५ सालच्या “गंगाबाई भट शिष्यवृत्ती”ची मानकरी ठरली.

त्याच वर्षी पुण्यात नॅशनल कॉंग्रेसचे अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनात कोल्हापूर संस्थानाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी छ. शाहू महाराजांनी द्वारकाबाई आणि कृष्णाबाई (वय वर्षे फक्त १६)या भगिनींची निवड केली होती हे लक्षात घ्यायला हवं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये रॅंग्लर परांजपे, प्रिंन्सि.आगरकर,  प्रो.गोखले, प्रो. धोंडो केशव कर्वे अशा थोर प्राध्यापकांचं मार्गदर्शन आणि सहवास त्यांना लाभला.

प्राचार्य आगरकर यांचं अकाली निधन झालं, पण प्रोफे. गोखले यांनी पुढेही या विद्यार्थिनीची पाठराखण केली. त्यामुळे योग्य वयात कृष्णाबाईंची वैचारिक मशागत उत्तम प्रकारे झाली. त्या काळातील महाराष्ट्रातील विचारवंत सुधारक, प्रार्थना समाजाचे अध्वर्यू न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि रमाबाई रानडे यांनी कृष्णाबाईंवर कटाक्षाने लक्ष पुरवून त्यांच्यावर पोटच्या पोरीगत प्रेम केलं.

सर्व विद्वान व ध्येयवादी प्राध्यापक वर्ग आणि रानडे दांपत्याच्या सुधारणावादी विचारांचा मोठा प्रभाव कृष्णाबाईंच्या कोवळ्या संस्कारक्षम मनावर निश्चितपणे पडला असला पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांची कृपादृष्टी, सर्वत्र जुनाट विचारांचे वातावरण असतानाही मोकळ्या, स्वच्छ , मनाच्या व आधुनिक विचारांच्या प्राध्यापक वर्गाचं मार्गदर्शन, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व रमाबाई यांची वत्सल सावली, अशा लाभलेल्या प्रत्येक दुर्मिळ संधीचं या भगिनी सोनं करत गेल्या आणि आपलं व्यक्तिमत्त्व अधिकाधिक समृध्द करुन पुढं समाजाचं देणं साभार परत करण्यासाठी त्या समर्थ बनल्या.

केळवकर पती-पत्नीला आपली ही हुषार कन्या डॉक्टर व्हावी असं वाटे. छ. शाहू महाराजांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कृष्णाबाईंना विशेष शिष्यवृत्ती देऊन मुंबईला ग्रॅंट मेडिकल कॉलेजला पाठवलं. १९०१ साली त्या बॉम्बे युनिव्हर्सिटी ची L. M. & S. परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या तेव्हा त्यांना वैद्यकीय परिक्षेत अव्वल दर्जा मिळवल्याबददल चार्ल्स मुनिरहेड अवॉर्ड देण्यात आलं.

 

 

“बाई हिराबाई कामा” मेडल , क्वीन एम्प्रेस गोल्ड मेडल अशी पारितोषिकंही त्यांना मिळाली. वैद्यकीय पदवी घेऊन डॉ. कृष्णाबाई आपल्या घरी कोल्हापूरात परतल्या. महाराजांचं आपल्या संस्थानात एतद्देशीय महिला डॉक्टर नेमण्याची स्वप्न अधुरं राहिलं होतं, ते पूर्ण झालं एकदाचं. तेव्हाच्या अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल मध्ये ( सध्याचं छ. प्रमिला राजे रुग्णालय) विशेष पद निर्माण करून त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.

महाराजांनी त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेतील महिला वर्गाला व्हावा म्हणून स्वतंत्र स्री- विभाग उघडला. गोरगरीब बायाबापड्यांची ही मोठीच सोय झाली.

कृष्णाबाईच्या मोठ्या भगिनी द्वारकाबाई याही डॉक्टर झाल्या, पण विवाहानंतर! ( डॉ. सौ. कमलाकर). भारतात सुरुवातीच्या काळात, जेव्हा रक्त आणि रक्तगट म्हणजे काय, हेच आपल्याकडं कुणाला माहीत नव्हतं, त्या काळात रक्त-संचय , रक्तपेढी या संदर्भात डॉ. द्वारकाबाई यांचं मोठं योगदान आहे. सोलापुरात त्यांनी या संदर्भात बरंच काम केलं. त्यांना ब्रिटिश सरकारने “कैसर – ए- हिंद” (सुवर्ण )सन्मान देऊन गौरवलं होतं.

कृष्णा बाईंचे धाकटे बंधू बॅरिस्टर शामराव ( डॉ. प्रल्हाद यांचे आजोबा). छ. राजाराम महाराज यांनी त्यांना फुटबॉल व क्रिकेट स्पर्धांविषयी सुचवलं. त्यावेळेस सुरूवात झालेल्या ज्युनिअर्ससाठी क्रिकेट व सिनियर्ससाठी फुटबॉल स्पर्धा आजतागायत “केळवकर लीग” या नावाने चालू आहेत.

कोल्हापुरात कार्यरत असल्या, तरी डॉ. कृष्णाबाईंची उच्च शिक्षणाची आकांक्षा जागृत होती. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी इंग्लंडला जाऊन F.R.C.S. करायचं ठरवलं. त्यासाठी गरजेची असणारी हिंदुस्तानी मुलींसाठी असणारी शिष्यवृत्ती सुध्दा त्यांनी मिळवली. शाहू महाराजांनी त्यांना या शिक्षण काळासाठी भरपगारी रजा व प्रवास खर्चासाठी आर्थिक मदतसुध्दा दिली.

बोटीचा सहा महिन्यांचा कठीण प्रवास करुन त्या लंडनला पोहोचल्यावर मात्र समजलं, की या शिक्षणासाठी किमान वयोमर्यादा २४ वर्षांची आहे.डॉ. कृष्णाबाईं वय होतं त्यावेळी २२ वर्षे. त्यामुळे प्रवेश मिळणं अशक्य, पण या अडचणींमुळे खचतील‌ तर त्या कृष्णाबाई कसल्या? डॉक्टरी शिक्षण पार पडलेल्या या “विद्यार्थिनी”नं चक्क आयर्लंडमध्ये जाऊन ‘मीडवायफरी’ चा डिप्लोमा पदरात पाडून घेतला. प्रसुती शास्त्रातील आपलं डॉक्टरी ज्ञान प्रात्यक्षिकांतून घासून पुसून, नव्यानं उजळवलं.

मिडवायफरीचा डिप्लोमा घेऊन भारतात – कोल्हापूरात परतल्यावर डॉ. कृष्णाबाईंनी आपलं काम पुन्हा दुप्पट जोमाने सुरू केलं.त्यांना २५/- रुपयांची पगारवाढ मिळाली. परिचारिकांना अद्ययावत शिक्षण देण्यासाठी त्यांनी नवा अभ्यासक्रम सुरू केला.

त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अजोड कामगिरी बद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना १९०८ मध्ये “कैसर- ए- हिंद ” ( रजत) ही मानाची पदवी देऊन गौरवलं.

डॉ. कृष्णाबाई यांचे वडील डॉ. कृष्णाजी केळवकर पहिल्यापासून प्रार्थना समाजाचे सदस्य. त्यामुळेच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या सारख्या महानुभावांचा स्नेह या परिवारास सदैव लाभला.

महर्षी शिंदे यांच्याशी डॉ. कृष्णाबाई यांची भेट इंग्लंडमध्ये झाली होती. त्या भेटीत महर्षी शिंदे यांनी राजा राम मोहन रॉय यांचे केस ठेवलेलं एक बहुमोल लॉकेट कृष्णाबाईंकडे सोपवून कलकत्त्याच्या “ब्राह्मो समाजा”च्या ताब्यात ते देण्याची जबाबदारी कृष्णाबाईंवर विश्वासानं टाकली होती.

वडिलांना दिलेल्या वचनानुसार पाठच्या भावंडांच्या शिक्षणासाठी डॉ. कृष्णाबाई आजन्म अविवाहित राहिल्या. जमखंडीचे गुरुदेव रानडे आप्पा महाराजांसोबत कोल्हापूरात येत त्यावेळी होणाऱ्या भेटीत ते डॉ. कृष्णाबाईंना “गुरुभगिनी” संबोधून आदरपूर्वक वंदन करीत असत.

१९०१ मध्ये कृष्णाबाई स्वतः प्रार्थना समाजाच्या सभासद झाल्या.आयुष्याच्या उत्तर काळात त्या जरा अध्यात्माकडे झुकल्या होत्या. १९२८ मध्ये कोल्हापूरात कौटुंबिक मंडळाची स्थापना झाली त्या कार्यात डॉ कृष्णाबाई आघाडीवर असत.

त्याखेरीज समाजातील सर्व घटकांना विशेषतः महिलांना आरोग्यविषयक ज्ञान मिळेल असं माहितीप्रद लेखन त्या मासिक मनोरंजन, सुबोध पत्रिका श्रीजीनविजय अंक इ. नियतकालिकांमधून करीत असत. जमेल त्या सर्वांना जमेल तसे सहाय्य करण्याचा त्यांचा मुळ स्वभावच होता.

भाषाभूषण ज.र. आजगावकर यांना “ज्ञानप्रकाशा”त सहाय्यक संपादकपद मिळावं म्हणून डॉ. कृष्णाबाई यांनी “भारत सेवक समाज” चे गोपाळ कृष्ण गोखले यांना पत्र लिहिलं होतं. मोठ्या भगिनी द्वारकाबाईंप्रमाणे डॉ.कृष्णाबाईंनाही कैसर – ए – हिंद (रजत) पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

हा पुरस्कार मिळवणाऱ्या या दोघी भगिनी (असा पुरस्कार मिळवणाऱ्या एकाच परिवारातील दोघी असण्याचं‌ हे एकमेव उदाहरण असावं बहुतेक!) या भगिनी कोल्हापूरच्या असाव्यात ही आपणा कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. ( कैसर – ए- हिंदने गौरविण्यात आलेल्या आपल्या माहितीच्या अन्य नावांवर कटाक्ष टाकल्यास त्याचं महत्व लक्षात येईल. महात्मा गांधी, ( ज्यांनी ते पाच वर्षांनंतर सरकारला परत केलं.) हिज हायनेस माधवराव सिंधिया, महाराजा सयाजीराव गायकवाड, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, राजा रविवर्मा, सरोजिनी नायडू ,पंडिता रमाबाई, मध्य प्रांताचे डे. कमिशनर शंकर महादेव चिटणवीस आदी.)

छ.शाहू महाराजांच्या निधनानंतर १९२३ मध्ये डॉ. कृष्णाबाई सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्या पण हाती घेतलेला जनसेवेचा वसा त्यांनी टाकला नाही. शाहुपुरी इथं दवाखाना काढून त्यांनी तिथं रुग्णोपचार सुरू ठेवले.

विलक्षण बुध्दिमत्ता, अखंड ज्ञानसाधना, पराकोटीचे कष्ट आणि न ढळणारी जिद्द, सेवाभाव, स्वच्छ चारित्र्य आणि सुसंस्कृतपणा हा गुणसमुच्चय एके ठायी वसणारं हे तेजस्वी, व्रतस्थ व्यक्तिमत्त्व २ सप्टेंबर १९६१ रोजी काळाच्या पडद्याआड गेलं. शरीरानं दिसेनाशी झाली तरी अशी माणसं कधीच विस्मृतीत हरवून जात नसतात.

वैद्यकीय सेवेचा डॉ. कृष्णा बाईंचा वारसा त्यांचे नातू ( भाच्याचा मुलगा डॉ. प्रल्हाद प्रभाकर केळवकर पुढं चालवत आहेत. डॉ. सौ. कृष्णा प्रल्हाद केळवकर, त्यांचे डॉक्टर सुपुत्र व स्नुषाही या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशी अविरत -अखंड रुग्णसेवा हीच डॉ. कृष्णाबाई यांना खरी समर्पक श्रद्धांजली नाही काय? विवाहच केला नसला, अपत्ये नसली तरी त्यांचा रुग्णसेवेचा वारसा केळवकर घराण्यात अभंग राहिला आहे, ही गोष्ट मोठी मोलाची.

 

 

या आदर्श व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिण्याची सुबुध्दी मला दिली याबद्दल त्या आदिमायेचरणी कृतज्ञतापूर्वक, नतमस्तक होऊन दंडवत!!!

साभार संदर्भ व छायाचित्र :

१) राजर्षी शाहू छत्रपती ( रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र )
२) डॉ. प्रल्हाद केळवकर यांच्याकडून प्रत्यक्ष भेटीत मिळालेली माहिती.
३) डॉ. अरुणा ढेरे ( विस्मृती चित्रे)
४) डॉ. जयसिंगराव पवार ( राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ)
५) डॉ. गो. मा. पवार संपादित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
६) श्री विजय चोरमारे संपादित कर्तृत्ववान मराठा स्त्रिया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 —

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version