' शाळा सोडली..आईची नाराजी..सुरांचा ध्यास! लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा प्रवास – InMarathi

शाळा सोडली..आईची नाराजी..सुरांचा ध्यास! लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखिका : अनुराधा तेंडुलकर

===

ढोलकी कडाडायला लागली, तुणतुणं वाजायला लागलं आणि सुलोचनाबाईंचे स्वर कानावर पडले, की क्षणभर थबकला नाही तो कोल्हापूरकर नव्हेच असं वाटतं मला! आमच्या लहानपणीचा काळ म्हणजे १९६० नंतरचा काळ हा मराठी तमाशापटांचा सुवर्ण काळ म्हणावा असा काळ.

तमाशापट म्हटलं, की दहा बारा लावण्या आल्याच त्यात. लावणी हा मराठी संस्कृतीचा जणू शृंगार! पेशवाईच्या उत्तर काळात लावणी बहरली. शाहीर होनाजी, राम जोशी, सगनभाऊ, शाहीर परशुराम, अनंत फंदी यांनी उत्तमोत्तम लावण्या केल्या.

दुःख आणि विरहाचं वर्णन करणारी बालेघाटी लावणी, बैठकीची लावणी, तमाशातील वगाची लावणी, शृंगाराचा कळस म्हणावी अशी छक्कड लावणी, धावत्या चालीची जुन्नरी लावणी, सवाल (पूर्वपक्ष)- जबाब (उत्तरपक्ष) असणारी हौद्याची लावणी असे लावणीचे प्रकार. शृंगारिक लावण्यांखेरीज तीर्थक्षेत्रांचं महात्म्य सांगणाऱ्या लावण्यासुध्दा आढळतात.

 

lavani inmarathi

 

पूर्वसुरींचा वारसा जपणाऱ्या ग .दि . माडगूळकर , जगदिश खेबूडकरांसारख्या गीतकारांनी एकापेक्षा एक लावण्या रचल्या. वसंत पवार, राम कदम, बाळ पळसुले आदिंनी उत्तमोत्तम चाली लावल्या आणि सुलोचना चव्हाणांनी त्या महाराष्ट्रात घरोघरी पोहचवल्या.

एवढी लोकप्रियता लाभली त्यांना, की लावणी आणि सुलोचना चव्हाण असं समीकरणच होऊन बसलं. पण त्यामुळे त्यांचं आधीचं गाणं झाकोळलं गेलं.

महादेव‌ विठ्ठल कदम आणि सौ.राधाबाई महादेव कदम या गिरगाव- फणसवाडीत रहाणाऱ्या जोडप्याच्या पोटी १३ मार्च १९३३ रोजी जन्मलेली सुलोचना “बबन” या लाडाच्या नावानं ओळखली जाई.

नवी वाडीतल्या पोतदार हायस्कूल मधून कशीबशी चौथीपर्यंत शिकली आणि दिली तिनं शाळा सोडून. तीन भावंडं होती. पण भावांची मिळून घरात १८ मुलं. घरात ग्रामोफोन होता. त्यावर संत तुकाराम मधलं “आधी बीज एकले” हे विष्णुपंत पागनीस यांनी गायलेलं आठवल्यांचं गाणं आईला फार आवडायचं. पण छोट्या सुलोचनाचं आवडतं गाणं म्हणजे वत्सलाबाई कुमठेकर यांची लावणी – ” सांभाळ गं सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखांची, तुझ्या ज्वारीची कस्तुरी पाहून गं, चहू बाजूंनी येतील पारधी गं, तुझी तूच एकली नावाडी गं”

हे शब्द कानावर पडले रे पडले, की आई चिडायची आणि ओरडायची, “बंद करा ती बांगडी!” (रेकॉर्ड) पण पुढं अशाच कितीतरी लावण्या तिची सुलोचना गाणार होती.

थोरले बंधू दीनाअण्णा यांचा एक बालमेळा होता. त्यात अभिनेत्री संध्या ( पिंजरा ) व बहीण वत्सलाबाई देशमुख ( रंजनाच्या आई) मुख्य कामं करत. बालगीतं, श्रीकृष्ण गोपिकांचा गरबा, देशभक्तीपर गीतं असं स्वरूप असे त्या मेळ्याचं.

मेळ्याचे मेकअपमन दांडेकर म्हणून होते. त्यांनी बबनला (सुलोचना) गुजराती नाटकात डान्स करायला नेलं. आधी सुलोचनानं लैला मजनू , चांदबीबी अशा हिंदी , उर्दू नाटकात काम केलं होतं. त्याचे १५/- रुपये मिळाले. मुलाबाळांच्या संसारात पैशांची गरज होतीच. आई व्यवहारी. तिनं खटपट केली.

दांडेकरांनी श्यामबाबू पाठक आणि भट्टाचार्य या संगीतकाराकडे नेलं त्यांना. त्यावेळी ते‌ “कृष्ण सुदामा” सिनेमाचं संगीत करत होते. त्यात सुलोचनाला गाण्याची संधी मिळाली. २ नृत्यांसाठी तिनं पार्श्वगायन केलं (त्याला पार्श्व गायन म्हणतात हे कुणाला माहित होतं तेव्हा?) परकर पोलका घालणाऱ्या १४ वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या सुलोचनाची ती पहिली गाणी.

१) ” मैं‌ तो सो रही थी , बन्सी काहेको बजायी ” २) “नशेमें चूर ,प्याली हाथ ” गायिकेला नाव दिलं गेलं, सुलोचना के.( कदम). नोंद सापडते १९४९ पासूनच्या गाण्यांची.

अंदाजे ७० चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत सुलोचनाबाईंनी. त्यापैकी काही तर आजही रेडिओ सिलोनवर वाजवली जातात. त्यावेळी त्यांनी कोणाकोणाबरोबर गाणी गायली आहेत तेही पहाण्यासारखं आहे.

 

sulochana chavan inmarathi 5

 

चितळकर (म्हणजे आपले सी.रामचंद्र) चित्रपट बचके रहना. हेमंतकुमार व सुधा मल्होत्रा- चित्रपट: गोपीचंद. गीता, आशा, सुमन, चित्रपट : जीवनतारा. शमशाद बेगम , चित्रपट: रिफ्युजी, फॅशन. रफी, चित्रपट: दशावतार, ममता, ढोलक. मुबारक बेगम, चित्रपट: हरिहर भक्ती, बसेरा. गीता रॉय, चित्रपट: चंदाकी चांदनी. शाहू मोडक, चित्रपट: जय महाकाली. मुकेश, चित्रपट : हरहर महादेव. मन्नाडे चित्रपट: संत रघु, रामभक्ती, रामलक्ष्मण. आशा भोसले – चित्रपट: आग का दरिया इ.

मराठी भावगीत गायला सुरुवात केली संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांच्याकडे. शब्द होते – “सख्या हरी जडली प्रीत तुझ्यावरी “. पी. सावळाराम यांचं पहिलं गीतसुध्दा सुलोचना बाईंच गायल्या, ते होतं – “घे कुशीत क्षण आसरा , माझ्या अनोळखी पाखरा”.

मराठी सिनेविश्वात गाण्याची पहिली संधी दिली संगीतकार वसंत देसाई यांनी. आचार्य अत्रे यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटासाठी. रचना खुद्द अत्र्यांची आणि बोल होते – मुंबईच्या “कालिजात गेले पती आले होऊन बीए बी टी” सिनेमात ते गाणं – लावणी , हंसा वाडकरांवर चित्रित झालं होतं. अत्रे ऐकून एकदम खुश ! अत्रेच ते. सगळंच अफाट त्यांचं. त्यांनी सुलोचना बाईंना पदवी दिली, “लावणी सम्राज्ञी”.

१९५२ साली आचार्यांनी दिलेली ही पदवी सुलोचना बाईंनी सार्थ ठरवली. लावणी गायन क्षेत्रात त्यांनी आपलं अधिराज्य गाजवलं. कोल्हापूरचे शामराव दौलत चव्हाण यांच्या कुटुंबीयांचा “भजनी मंडप” होता.( हा प्रकार काय असे, हे जाणकारांनी सांगावं.) सिनेमाच्या नादानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी करत. पेटी वाजवत. त्यांनी “कलगी तुर ” या चित्रपटाची तयारी चालविली होती. लेखन कोणाचं असेल ? प्रबोधनकार ठाकरे यांचं.

बेबी शकुंतला ( नाडगौडा) नायिका, बाबुराव पेंढारकर खलनायक, उषा किरण तमाशातील नाची , संगीतकार के. दत्ता( कोरगावकर) यांनी के.सुलोचनाला बोलावलं. चव्हाणांना वाटे, उभं कुंकू लावणारी, ( घरचा फुलं वेण्यांचा व्यवसाय असल्यानं ) रोजच केसात फुलं- गजरा माळणारी ही मुलगी मद्रासीच असणार, पण ती निघाली अस्सल मराठी. सुलोचनाबाईंच्या लावणीवर पडद्यावर विठा भाऊ मांग – नारायणगावकर नाचल्या होत्या. लावणीचे बोल होते – ” गत‌ न्यारी प्रेमाची गत न्यारी”

खरोखरच प्रेमाची गत न्यारी, खुद्द दिग्दर्शकच गायिकेच्या प्रेमात पडले. लावणीचे आणि प्रेमाचेही सूर जुळले. १२ ऑगस्ट १९५३ ला दोघांचं शुभमंगल झालं.

 

sulochana chavan inmarathi 4

 

सुलोचनाबाईंनी तमिळ भाषेत गायल्या, भोजपुरीत रामायण गायल्या. गुजरातमध्ये तर नवरात्रीत गरब्यासाठीही गायल्या. (आता फाल्गुनी पाठक गाते तसं लाईव्ह) देशभरातील जालंदर‌, काश्मिर अशा रेडिओ स्टेशनवर गायल्या. अक्षरशः काश्मिरपासून कन्याकुमारी (तामिळ गाणी) पर्यंत गात राहिल्या.

जयपूरच्या एका महोत्सवात सुलोचनाबाईंनी गायलेली गझल अख्तरीबाईंना फार आवडली. सुलोचनाबाई गाणं शिकलेल्या नाहीत यावर त्यांचा विश्वासच बसेना. इतर भाषांतील गाणी गातांना सुलोचना बाई भाषेतले बारकावे आणि ढंग समजून घेत. शिवाय कलाकार जन्मावा लागतो असं त्यांना वाटतं.

पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरला, त्यांच्या घरी वसंत पवार आले तो. दुपारच्या चार वाजता अवेळी मळकट कपडे घातलेले वसंत पवार “दत्त” म्हणून दारात उभे ठाकले.

हातात मळकट चुरगाळलेला कागद. सुलोचना बाईंनी तशा अवेळी सुध्दा आधी भुकेल्या पवारांना जेऊ-खाऊ घालून तृप्त केलं. पवारांनी मात्र बाईंच्या जन्मभराच्या भाकरीची सोय केली. त्यांच्या हातातल्या कागदावरील लावणी होती – जगदीश खेबुडकरांनी “रंगल्या रात्री अशा” चित्रपटांसाठी लिहिलेलं, ” नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची , मला हो म्हणतात लवंगी मिरची “. या गाण्यानं धुमाकूळ घातला नुसता. कोल्हापुरच्या या सूनबाईंनी कोल्हापूर आणि लावणी अशी जोडीच जमवून टाकली.

पुढं “मल्हारी मार्तंड” साठी ग.दि. माडगूळकरांची बारा गाणी सुलोचनाबाईंनी राजकमल रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एका दिवसात गायली. शांतारामबापूसुध्दा थक्क झाले हे समजल्यानंतर. या चित्रपटातली “पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा , आई मला नेसव शालू नवा ” आणि “फड सांभाळ तुऱ्याला गं आला , तुझ्या उसाला लागल कोल्हा ” ही गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली.

सुलोचनाबाईंच्या कीर्ती- यशाचा वारू चौफेर धावायला लागला. मल्हारी मार्तंड साठी त्यांना राज्य पुरस्कार ही मिळाला. (सर्वोत्कृष्ट लावणी गायिका – १९६५) आयुष्यभरात बरेच पुरस्कार मिळाले त्यांना – महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार – २०००साली. पी. सावळाराम – गंगाजमुना पुरस्कार , चंद्रभागेच्या तीरी – इचलकरंजीचा पुरस्कार , राम कदम कला गौरव पुरस्कार , २०१० महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार , रोटरी क्लब ऑफ चिंचवड तर्फे जीवन गौरव पुरस्कार – २०१५ इ.

 

sulochana chavan inmarathi 6

 

सुलोचना बाईंनी एच्. एम.व्ही.साठी गायलेली राजा बढे यांची “कळीदार कपुरी पान, रंगला कात केवढा, वर्खाचा विडा, घ्या हो मनरमणा, घ्या हो मनरमणा ” ही आबदार, राजस बैठकीची लावणी सादर झाल्याशिवाय त्यांच्या मैफिलीची सांगताच होत नाही. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही बहुतेक एकमेव लावणी असावी.

“तुका झालासे कळस” या चित्रपटासाठी स्नेहल (व्ही.जी.) भाटकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्या ” कसे करु बाई , मन आवरेना” ही लावणी गायल्या. पी. सावळाराम यांची “नका धरू राया मनामध्ये अढी, तुम्ही दाराला लाला कडी” ही लावणी सुध्दा त्याच गायल्या आहेत.

लावण्यांच्या या अव्याहत प्रवासात सुलोचनाबाईंचे अभंग ,भजनं , भावगीतं ,गझला हे सारं मागे पडत गेलं. अनिल भारती यांचं वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पुढील गाणं ऐकलंय का कुणी? जरुर ऐकून पहा :
“जन्मोजन्मी तुम्हीच यावे माझ्या संसारी ,
एकच आशा सदैव राहील अखेरची ह्या उरी
अलंकार सोन्याचे मजला नकोत माणिक मोती
शपथ गळ्याची तुमच्या , घ्यावी माझी पुरी कसोटी
महालात जन्मले, वाढले‌ वैभवात मी जरी
मंगल सौभाग्याचा ठेवा तुमच्या चरणामधी
अखंड वाहील प्रीतीची का निर्मळ गंगा मधी
युगायुगांच्या गाठीभेटी पडतील वरचेवरी
जन्मोजन्मी तुम्हीच यावे माझ्या संसारी .”

पांढऱ्या साडीचा अंगभर घेतलेला पदर आणि पूर्णवेळ खाली नजर ठेवून त्या गातात. आई राधाबाई यांना वावगं मुळीच खपायचं नाही. पदर घट्ट आवळून अंगभर असा घ्यायचा की चोळी दिसता कामा नये. ती शिस्त सुलोचना बाईंनी जन्मभर गाण्याचे कार्यक्रम करत गावोगावी फिरताना सदैव जपली. त्यामुळे शृंगारिक लावण्या गात असूनही त्यांची सोज्वळ प्रतिमा कायम टिकून राहिली.

रसिकाग्रणी रामूभैया दाते यांची एका दौऱ्याच्या वेळी गाठ पडली सुलोचनाबाईंची मनमाड रेल्वे स्टेशन वर. ते म्हणाले, “काय हो, मोठ्ठं कुंकू लावून, डोक्यावर पदर घेऊन लावणी म्हणता? डोळे बंद करून ऐकलं तर वाटतं, समोर कुणी फटाकडीच अदा करून गाणं म्हणतेय!

“सुलोचना बाईंनी उतर दिलं, मला नृत्याची माहिती आहे. लावणी म्हणताना मी मनातल्या मनात त्या नर्तकीला नाचवत असते, तिच्यावर माझ्या शब्दांची उधळण करत असते. शब्दात प्राण ओतते, पण गाणं संपलं, की कमळाच्या पानासारखी कोरडी (अलिप्त – निर्लेप.) या वृत्तीमुळे आणि पती – श्यामरावांच्या सततच्या साथीमुळे देशभर दौरे केले आणि अवघा महाराष्ट्र पिंजून काढला तरी त्यांची प्रतिमा स्वच्छ राहू शकली.

संगीतकार वसंत देसाई एकदा म्हणाले , ” ही मुलगी गातांना थोडीशी जरी अदा करुन गायली तर काय बहार येईल, कुठल्या कुठे पोहोचेल.” त्यावर सुलोचना बाईंनी आपली भूमिका स्पष्ट केली, तसलं पोहोचणं नकोच मला, माझं गाणं हेच खणखणीत नाणं आहे, कदर करणारे श्रोते आहेत , आणखी काय हवं? “

होळी, धुळवड आणि रंगपंचमी दिवशी नेहमी त्यांचे पुण्यात कार्यक्रम असत. पांडुरंग शिंदे यांची “खेळतांना रंग बाई होळीचा होळीचा , फाटला गं कोना माझ्या चोळीचा “गातांना श्रोत्यांनी स्टेजवर पैसे फेकायला सुरुवात केली ( दौलतजादा केल्यासारखी ) बाईंनी ते मुळीच खपवून घेतलं नाही, गाणं थांबवून त्यांनी घोषणा केली, हा प्रकार थांबवला नाही तर मी कार्यक्रम सोडून ताबडतोब निघून जाईन. थिल्लर प्रेक्षकांची काय बिशाद पुन्हा तसं करण्याची? आपला आब आपणच राखायला हवा असं बाईंचं वागणं सदैव राहीलं.

अनंत माने यांचा “केला इशारा जाता जाता” पुण्यात धो धो गर्दीत चालू असतांना एक प्रेक्षक फक्त ” गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं ” हे गाणं ऐकण्यासाठी थिएटरात रोज हजेरी लावत असे. लावणीच्या कार्यक्रमाला येऊनही त्याची तिच प्रभावी असायची. नंतर नंतर फर्माईश करायला तो उठलेला दिसला, की बाई विजूला( मुलाला ) म्हणत ,”विजू घे वाजवायला “डोरलं” , म्हणजे ऐकून हा जाईल कुठं जायचा तो! ”

विदर्भाकडच्या कार्यक्रमात सुलोचना बाई गौरीचं एक गाणं म्हणत, “आनंद जाणू बाई , आनंद कर माझा ” गाण्याची धून वाढत जाईल तसं बायकांच्या अंगात येतं असे, ते प्रमाण वाढलं तसं ते गाणं गायचं बाईंनी बंद केलं. पण लोकप्रियतेमुळे एच . एम. व्ही नं त्याची रेकॉर्ड काढलीच.

आपली आई वारल्यानंतर त्या कार्यक्रमात शेवटी” आई म्हणून कोणी आईस हाक मारी” हे गाणं म्हणत , त्यांचा ऊर तर भरून यायचाच , पण उपस्थित प्रत्येक प्रेक्षक रडायचा म्हणून शेवटी ते गाणं बंद केलं.

सुरुवातीला महिला श्रोत्या लावणीच्या कार्यक्रमाला येत‌ नसत‌, पण नंतर नंतर महिला येऊ लागल्या. महाराष्ट्राबाहेर इंदूर वगैरे ठिकाणी महिला मंडळांनी बायकांसाठी कार्यक्रम ठरवले.

असाच एकदा हैद्राबाद महाराष्ट्र मंडळातर्फे बायकांसाठी कार्यक्रम सुरू असतांना मराठा रेजिमेंटचे सैनिक येऊन बसले आणि हॉल भरून गेला.
शाळांच्या इमारती बांधण्यासाठी, पानशेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, पोलीसांच्या निधीसाठी सुलोचना बाईंनी शेकडो कार्यक्रम केले.

 

sulochana chavan inmarathi 3

 

सीमेवरच्या सैनिकांसाठी तिथं जाऊन त्या गायल्या. दिलेला शब्द पाळला, “शो मस्ट गो ऑन” या ब्रीदाला जागल्या. आपली बिदागी बुडाली तरी साथीदारांचे पैसे वेळेवर चुकते केले. जयपूरमध्ये शून्य डीग्री तापमानात तरबल्लारशा ( चंद्रपूर) मध्ये अठ्ठेचाळीस तापमानात कार्यक्रम केले. दौऱ्यात कंबर पाण्यातून जावं लागलं.

आयुष्याच्या उत्तरार्धात पतीची साथ सुटली तरी जय, अजय या मुलांसह नातवंडांच्या सहवासात हसून खेळून रहातात. कधी कोल्हापूरात तर कधी मुंबईत. अजून सगळी कामं हातानं करतात.

पापडापर्यंतसगळं घरी करायची हौस. कपड्यांचा साबण सुध्दा घरी बनवतात. प्रवासात क्रोशा विणकामाचा छंद जोपासतात. बटवे, चष्माकेसचं कव्हर, पानांची चंची असं बरंच बनवलं‌ आहे. पूर्वी पैसे कमावण्यासाठी वेळ पडली तर दिवाळीचे कंदील बनवत होतो हे त्या विसरलेल्या नाहीत.

मुलगा अजय उस्ताद झाकीर हुसेन आणि त्रिलोक गुर्टू (तबलावादक) यांच्या बरोबर जगभर फिरतो याचं‌ कौतुक आहे.अझीझ हिंदी यांच्या सुलोचना बाईंनी गायलेल्या दोन गझला पाकिस्तानात गेल्या. तर रेडिओ सिलोनवर निवेदक त्यांचं गाणं वाजवून ,”हा आवाज कुठं हरवला” म्हणतो त्याची सुलोचना बाईंना गंमत वाटते.

२००७ मध्ये “माझं गाणं …. माझं जगणं ” हे (सविता दामले यांनी शब्दबध्द केलेलं ) आत्मकथन प्रसिद्ध केलंय.

आपल्या ढंगदार लावणीनं रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कोल्हापूरच्या सूनबाईंविषयी आणखी काय सांगू? प्रत्येक कोल्हापूरकराला त्यांचा अभिमान आहे, अख्खं कोल्हापूर नेहमीच म्हणतं , “शाब्बास सूनबाई शाब्बास!”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?