Site icon InMarathi

‘‘आज एकटेच दिसता, वहिनी कोणाबरोबर…’’ वाचा अत्रेंचे विनोदी किस्से!

atre inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

‘हसा आणि निरोगी राहा’ किंवा ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ असं आपण नेहमीच ऐकतो किंवा लोकांना सांगतो. हसण्याने आपले मन निरोगी राहते आणि साहजिकच शरीरही सुदृढ राहते. पण या हसण्यासाठी विनोदबुद्धी पाहिजे.

विनोदनिर्मिती करणं म्हणजे स्वत:ला आणि सहवासातील सगळ्यांना सुखात ठेवणं, आणि हेच काम फार कठीण आहे.

एक वेळ आपण आपल्याला नसलेला किंवा असलेला त्रास सगळ्या लोकांना सांगून, आपल्याबद्दल ‘सॉफ्ट कॉर्नर’ दुसर्‍याच्या मनात सहज निर्माण करू शकतो किंवा लोकांना आपल्याबद्दल कीव वाटेल.

‘अरेरे बिचारा किती त्रास सहन करतोय’ असं भासवू शकतो, पण लोकांना हसवणं तितकं सोपं नसतं.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

विनोदी लेखन म्हटलं की, प्र. के. अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्रातील दोन नावं लगेचंच डोळ्यांसमोर येतात.

लहान मुलांपासून ज्येष्ठ लोकांपर्यंत कुणालाही हे दोन लेखक माहीत नाहीत असं होत नाही, इतकी यांची प्रसिद्धी आहे. असे लेखक असल्याने कदाचित तेव्हा ‘हास्यक्लब’ वगैरेची गरज नसावी. असो. तर आचार्य अत्रेंबद्दल आज आपण थोडी माहीत करून घेऊ.

 

 

आचार्य अत्रे यांचा जन्म सासवडला १३ ऑगस्ट १८९८  साली झाला. त्यांचा मृत्यू १३ जून १९६९ साली मुंबई इथे झाला.

म्हणजे त्यांच्यामृत्युनंतरही लोकं त्यांना विसरली नाहीत, उलट त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे.

किती सामर्थ्य असेल ना यांच्या लेखणीत? खरोखरच आश्‍चर्यकारक लोकं आहेत ही. आचार्य अत्रे यांची अनेक पुस्तकं गाजली.

त्यांचं ‘मोरूची मावशी’ हे त्यांचं नाटक आजही प्रेक्षकांची हसून, हसून वाट लावतं. तर अशा या आचार्य अत्र्यांचे नऊ  विनोदी किस्से आपण आज बघुया.

 

१. एकटा पुरतो ना?

एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते, मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे बळ विरोधकांच्या संख्याबळापेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला करत असत.

एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले, ‘‘अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पडता खरे, पण त्यांच्याएवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?’’ त्यांनी इकडेतिकडे पाहिले.

मग ज्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला म्हणाले, ‘‘काय बळवंतराव? कोंबड्या पाळता की नाही?’’

‘‘व्हय तर!’’

‘‘किती कोंबड्या आहेत?’’

‘‘चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!’’ बळवंतरावांनी भाबडेपणाने उत्तर दिले.

‘‘आणि कोंबडे किती?’’ अत्र्यांनी मुद्दाम विचारले.

‘‘कोंबडा होय. त्यो फकस्त एकच हाये.’’

‘‘एकटा पुरतो ना?’’

झालं जमलेल्या लोकांमध्ये प्रचंड हशा पिकला आणि प्रश्‍न विचारून बेजार करणारे पत्रकारही त्या हशात सामील झाले.

२. कर्तृत्ववान राष्ट्र-‘पती’

भूतपूर्व राष्ट्रपती कै. व्ही. व्ही. गिरी यांना एकूण आठ मुले होती. त्यांच्याबद्दल आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’ वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असे.

 

 

एकदा अत्र्यांनी श्री. गिरी, सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचे एक छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आणि त्याखाली शीर्षक दिले, ‘गिरी आणि त्यांची ‘कामगिरी’.

३. सहचारिणी

अत्र्यांची आर्थिक परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात एकदा त्यांची गाडी बिघडली म्हणून ते चालतच कामासाठी निघाले.

तेवढ्यात रस्त्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला, अशा लोकांना संधी हवीच असते. लगेच त्याने खोचकपणे विचारले, ‘‘काय बाबूराव, आज पायीच? गाडी विकली की काय?’’

पण अत्रेच ते! ते काय गप्प बसणार का मूग गिळून?’’

ते दुसर्‍या क्षणाला म्हणाले, ‘‘अरे, आज तुम्ही एकटेच वहिनी दिसत नाहीत तुमच्याबरोबर? कुणाबरोबर पळून-बिळून गेल्या की काय?’’
विरोधकाला मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल. तो आपला खाली मान घालून निघून गेला.

हजरजबाबीपणा हा गुण आचार्य अत्र्यांच्या नसानसात भिनला होता. त्यामुळे समोरच्याने आपली शोभा करून घ्यायची नसेल तर गप्प बसलेलं बरं हा नियम पाळलेलाच बरा.

 

 

४. ‘च चे महत्त्व’

आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील हा किस्सा सर्वश्रुत आहेच. आचार्य अत्र्यांनी एका भाषणात ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.’ असं विधान केलं होतं. यशवंतराव चव्हाणांना तो ‘च’ फार खटकत होता.

यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘‘अत्रे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे’ हे तुमचे विधान ठीक आहे, पण तो ‘च’ कशाला मध्ये?
अत्रे म्हणाले, ‘‘अहो, तो ‘च’ अतिशय महत्त्वाचा आहे.’’

‘‘ ‘च’ ला कशाला एवढे महत्त्व?’’

त्यावर मिस्कीलपणे अत्रे म्हणाले, ‘‘अहो, ‘च’ किती महत्त्वाचा असतो हे मी का तुम्हाला सांगायला पाहिजे? तुमच्या अडनावातला ‘चा काढला तर मागे काय राहतं व्हाण!’’ तर अशी ही समयसूचकता.

५. खिशात हात

१९६५ सालची गोष्ट असावी. सांगलीमध्ये अत्रे यांचे भाषण होते. अत्र्यांच्या भाषणाला तुफान गर्दी होती. अत्र्यांना बोलताना खिशात हात ठेवून बोलायची सवय होती.

भाषण सुरू होते तेवढ्यात कोणीतरी ओरडले, ‘‘अत्रेसाहेब, खिशातला हात काढा.’’

त्यावर लगेचच अत्र्यांनी उत्तर दिले, ‘‘तुमच्या मनात जे आहे ते माझ्या हातात नाही.’’ गर्दीतून प्रचंड हशा नि टाळ्या पडल्या आणि त्यांचे भाषण तसेच सुरू राहिले.

६. चिखल

एकदा पावसाळ्यात आचार्य अत्रे पुण्याच्या रस्त्यावरून चालले होते.

 

 

एक स्नेही मागून आला आणि म्हणाला, ‘‘अत्रेसाहेब, तुमच्या पँटवर मागच्या बाजूला चिखलाचे शिंतोडे उडाले आहेत.’’ अत्रे लगेच म्हणाले, ‘‘हा पुण्याचा चिखल पुणेकरांसारखाच आहे. अहो, तो मागून निंदा करतो!’’

७. स्वल्पविराम

एकदा ना. सी. फडके अत्र्यांना म्हणाले की, ‘‘वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?’’ त्यावर अत्रे म्हणाले, ‘‘योग्य वेळ आल्यावर सांगेन.

 

 

त्यानंतर फडके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता ते म्हणाले, ‘‘मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ.’’ झाले! ही गोष्ट लगेचच बायकोने फडक्यांना सांगितली.

त्यांनी अत्र्यांकडे याबाबत खुलासा मागितला, तेव्हा अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले, ‘मी, तुझा नवरा, तू, माझी बायको आपण सिनेमाला जाऊ.’’ झाली ना बोलती बंद.

८. आचार्य अत्रे आणि कै. श्री. अहिताग्नी राजवाडे

आचार्य अत्रे, गाढे विद्वान कै. श्री. अहिताग्नी राजवाडे यांचा खूप आदर करीत दरवर्षी हिवाळ्यात अहिताग्नी आपल्या घराच्या प्रांगणात ‘शारदीय ज्ञानसत्र’ नावाने व्याख्यानमाला आयोजित करीत असत.

प्रत्येक वर्षी एखादा नवीन विषय निवडून त्यावर अनेक विचारवंतांची भाषणे होत असत. यासाठी अहिताग्नीचा एक दंडक मात्र होता. तो असा की, सभेसाठी येणार्‍या सर्वांच्या डोक्यावर टोपी असलीच पाहिजे.

 

 

एका वर्षी ज्ञानसत्रात अत्रे आले तेव्हा त्यांच्या डोक्यावर टोपी नव्हती. अत्रे कुणाला फारसे न जुमानणारे, तर अहिताग्नी परखड स्वभावाचे. तेव्हा आता काय होणार, याची प्रेक्षकांना काळजी वाटू लागली.

अत्रे तसेच व्याख्यानमालेत उभे राहिले, पण भाषण सुरू होण्याआधी आपल्या कोटाच्या आतल्या खिशात ठेवलेली टोपी त्यांनी गंभीर चेहर्‍याने काढून डोक्यावर घातली आणि मिस्कीलपणाने हसून म्हणाले,

‘‘मी आजवर अनेकांना टोप्या घातल्या, परंतु मला टोपी घालणारे अहिताग्नी राजवाडे पहिलेच आहेत!’’

या बोलण्यामुळे साहजिकच वातावरणातील ताण निवळला आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला.

पण या विनोदाबरोबरच कधीतरी माणूस खरं आणि मनाला हेलावून बोलणारं सत्य पण बोलून जातं. त्याबद्दलचा किस्साही आपण ऐकू. तो विनोदी नसला तरी आपल्या मनाला नक्कीच भावेल. त्यामुळे त्यांचं मोठेपण सहज उमजून येईल.

९. विनोद नसेल तर काय उपयोग?

अशाच एका सभेतील त्यांच्या भाषणात अत्रे म्हणाले, ‘‘लोक मला म्हणतात, की ‘अत्रे, आम्हाला तुमच्या विनोदाची फार भीती वाटते. तेवढे तुम्ही बंद करा. मग बाकीचे तुमचे सारे आम्हाला मान्य आहे.’’

पुढे अत्रे म्हणाले, ‘‘बंधूंनो, माझा विनोद माझ्यापासून काढून घेतल्यावर मग माझे काय शिल्लक राहते? आणि ते जे काही शिल्लक राहील ते घेऊन मला या जगात एक क्षणभर तरी शिल्लक राहण्याचे काय कारण?

 

 

हे म्हणजे एखाद्या सिंहाला म्हणण्यासारखे आहे की, ‘आम्हाला तुझ्या आयाळाची भीती वाटते, तेवढी भादरून तू जंगलामध्ये हिंडत जा!

किंवा एखाद्या स्वर्गातील अप्सरेला म्हणायचे की, ‘डोळे हे जुलमी गडे’ तुझ्या डोळ्यांचे आम्हाला भय वाटते, म्हणून काळा चष्मा घालून तू आमच्या ‘केसरी’ कचेरीवरून हिंडत जा. तशापैकी आहे हे या लोकांचे म्हणणे आहे.’’

खरंच किती सत्यता आहे ना या वाक्यात? विनोद हेच त्यांचे सर्वस्व होते म्हणून तर आपण आजही विनोद म्हटलं की प्रकर्षाने त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्या विनोदबुद्धीला मनापासून सलाम करतो. ‘हसण्याने आयुष्य वाढतं म्हणतात’ तर बघा हसून.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version