Site icon InMarathi

“…आणि मग आईच मुलीला भीक कशी मागायची ते शिकवू लागते!”

child beggar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे 

===

दोन-चार दिवसांपूर्वीच घडलेला प्रसंग; सकाळी भूक लागली म्हणून मी नाश्ता करायला एका स्नॅक्स सेंटरला शिरलो. नेहमीप्रमाणे इडली सांबाराची ऑर्डर गेली आणि एकीकडे विचार सुरु झाला. दिवसभरात पूर्ण करायची होती ती कामं मानत घोळू लागली. कामांची यादीच सुरु झाली म्हणा ना…

असाच विचारमग्न असताना खाणं संपलं, पैसे दिले आणि मी मागे वळलो. दोन पावलंही पुढे टाकली असतील-नसतील, तेवढ्यात गुडघ्याशी काहीतरी हालचाल जाणवली. ४-५ वर्षांची एक चिमुरडी भीक मागायला म्हणून पुढ्यात उभी होती.

 

 

अशा मुलांच्या हातात पैसे ठेवायचं माझ्या जीवावर येतं. त्यांना दिलेले हे पैसे नक्की कुठे जातात, त्यांचं काय होतं याविषयी ठामपणे कुणी मला योग्य माहिती देऊ शकलं, तर त्या व्यक्तीविषयी माझ्या मनात आदराची भावना निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

साहजिकपणे पायाशी येऊन उभ्या राहिलेल्या त्या मुलीला मी दूर व्हायला सांगितलं. ती दूर झालीदेखील, आणि त्याच क्षणी एका स्त्रीचा आवाज कानावर पडला. तिची आई जवळच्याच एका फुटपाथवर बसली होती. तिने तिथूनच त्या मुलीला सूचना द्यायला सुरुवात केली.

माझ्या जवळून बाजूला गेलेली ती मुलगी आईकडे परतत होती आणि तिने तस करू नये अशी आईची इच्छा असल्याचं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. कुठल्यातरी दाक्षिणात्य भाषेत ती बोलत असावी, कारण शब्द फारसे कळत नव्हते.

त्या स्त्रीचे हातवारे, हावभाव यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होत होती, की त्या मुलीने माघार घेऊ नये अशी आईची इच्छा होती.

खरं तर एखाद्या व्यक्तीने हटकलं तरी माघार न घेता जिद्दीने भीक मागतच राहावं, मागे हटू नये असं सांगायचा प्रयत्न ती आई करत होती. अगदीच त्या व्यक्तीकडून काहीही मिळणार नाही, हे कळलं तरी लगेचंच दुसऱ्या व्यक्तीकडे जावं आणि पैसे मिळवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवावेत असंही काहीसं ती माऊली मुलीला सांगायचं प्रयत्न करत होती.

 

newindianexpress.com

 

मनातल्या भावना अगदी संमिश्र होत्या त्यावेळी… त्या मातेचा राग आला होता, मुलीबद्दल वाईट वाटत होतं, मुलीला  लागत असलेल्या त्या मातेबद्दल सुद्धा दयेची भावना होतीच काहीशी! नेमकं काय करावं ते सुचलं नाही. जे दिसत होतं ते मनाला रुचलं नाही. आधी मनात असणारे सगळे विचार बाजूला पडले आणि हेच विचार डोक्यात घोळवत मी बाईक सुरु करून पार्किंगकडे निघालो.

हा अनुभव विचारात पाडणारा होता, नक्कीच… विचारचक्र सुरु झाली. एखादी आईच तिच्या मुलीला भीक मागायला शिकवतेय हेच मुळात पटत नव्हतं. का पटेल आणि ते? गरीब मुलांना शिक्षण मिळत नाही अशी ओरड अगदी नेहमी सुरु असते. पण याचीच दुसरी बाजू अशी की फक्त पुस्तकी शिक्षण नाही मिळालं म्हणून सगळेच जण मागे राहत नाहीत.

अनुभव, निसर्ग आणि आजूबाजूचे लोक यांच्याकडून शिकायला हवं. शिकता येतं. त्यात श्रीमंत, गरीब हा प्रश्नच उद्भवत नाही. गरिबांना शिक्षण ‘मिळत’च’ नाही’ हे म्हणणं चुकीचं आहे. त्यांना जे शिक्षण मिळतं ते चुकीचं आहे, असं म्हणायला हवं.

मी जो अनुभव मांडलाय तिथेही पहा ना, त्या लहानग्या मुलीला आई शिकवतेय. म्हणजे शिक्षण मिळतंय, फक्त ते चुकीचं आणि जसं मिळू नये असं आहे.

हे असंच सुरु राहिलं, तर भारतातील भिकाऱ्यांची संख्या कमी होणार कशी? होऊच शकत नाही. हाच विचार मनात येऊन गेला. खरं तर, वर्षानुवर्षं हे असंच सुरु आहे म्हणूनच भारतात भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, असं म्हणायला हवं.

 

 

मुलीचं बालपण हिरावून घेणाऱ्या त्या मातेचा राग येत होता. हे असं कुणी करावंच का? हा विचार मनातून जातच नव्हता. या नव्या पिढीवर तुम्ही हेच संस्कार करणार, मग ती मुलंही तेच करणार आणि पुढील वर्षानुवर्षे हे असंच सुरु राहणार… कारण संस्कार हे असेच कळत नकळतपणे होत असतात.

याच गोष्टीविषयी इतरांशी चर्चा झाली तेव्हा एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली. हे संस्कार अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून होत असले, तरी त्यांच्यापुढे दुसरा काही पर्याय नाही. ‘पापी पेट का सवाल’ असतोच शेवटी. संस्कार वगैरे सगळं नंतर येतं, आधी समोर दिसतं ते जगणं.

‘त्या चिमुरडीने चार पैसे गोळा करून आणले तरच आज रात्रीची चूल पेटेल’, हा आणि एवढा एकच मुद्दा कदाचित त्या मातेच्या मनात असेल का? आज जगलो तर उद्याचा सूर्योदय पाहता येईल, आणि उद्याचा दिवस पाहिला तरच पुढे जगता येईल, असाच विचार ती करत असेल.

मुलांना आपल्याहून चांगलं आयुष्य जगता यावं, असं कुठल्या आई-बापाला वाटत नाही. तिथे गरिबी श्रीमंती नसते. असं असूनही, जेव्हा जीवावर बेतू शकतं तेव्हा आधी स्वतःचा विचार मनात येणं अत्यंत स्वाभाविक आणि साहजिक आहे, हेदेखील कटू सत्य आहे.

 

tribuneindia.com

बुडून मरण्याची वेळ येणार हे कळल्यावर, आपल्या पोटच्या पिल्लाला अंगाखाली धरून स्वतःचा जीव वाचवू पाहणाऱ्या माकडिणीची कथा तुम्ही सगळ्यांनीच वाचली असेल. तसंच काहीसं या पालकांचं होत असेल. जगायचं म्हणजे आधी पोटाची खळगी भरावी लागते, त्यासाठी पैसा लागतो; त्याचं सोंग आणता येत नाही.

‘हा पैसा मिळवण्यासाठी वाट्टेल ते करावं लागलं तरी चालेल…’ अशी या पालकांची मानसिकता असू शकेल का? असेलही कदाचित…

त्यासाठी काम करावं आणि २-४ दिवस पोटाला चिमटा काढून आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करावा, असा विचार मात्र त्यांच्या मनात येत नाही. पण आपल्या हातात काहीच नाही, हेच दुर्दैव आहे, नाही का…. असो…

भिकारी असली तरी तीही हाडामांसाची माणसं आहेत, त्यांना जगायचं आहे. त्यासाठी सुरु असलेला हा खटाटोप असावा अशी मनाची समजूत करून घेतली मग मी…

 

 

कारण त्या माऊलीला दिसत असतं ते फक्त आणि फक्त जगणं, आणि मग आईच मुलीला भीक कशी मागायची ते शिकवू लागते! 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version