Site icon InMarathi

… आणि पुण्याच्या रस्त्यावर दिसली ‘चेटकीण’! दिलीप प्रभावळकरांचा धमाल किस्सा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पुणे तेथे काय उणे.. असं म्हणतात ते काही उगाच नाही. पुण्यात सांस्कृतिक वारसा आहे, पेशवाईचा थाट आहे, खाण्याची चंगळ आहे, पेठांची गर्दी आहे, कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि पुणेकरांचा बाणेदारपणा आहे. अशा या शहरात भर रस्त्यावर जर तुम्ही चेटकीण पाहिलीत तर?

आश्चर्य वाटतंय? वाटणारच. भर दिवसा पुण्याच्या टिळक रोडवर तुम्ही चेटकीण पाहिलीत असं कोणाला सांगितलंत, तर ती व्यक्तीही तुम्हाला वेड्यातच काढेल, पण अशी घटना खरंच घडलीये! कशी? वाचा.

 

 

हा किस्सा आहे पुण्यातील एका नाटकाच्या प्रयोगाचा. नाटक म्हटलं, की दौरे, एका दिवशी २-३ प्रयोग हे सगळं ओघाने आलंच. दिलीप प्रभावळकरांच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यानही असाच एक कमाल किस्सा घडला, आणि पुण्याच्या रस्त्यावर चक्क चेटकीण अवतरली..!

दिलीप प्रभावळकरांनी त्यांच्या अभिनयप्रवासाची सुरुवात ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकापासून केली, याच नाटकाचा एक धमाल किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रत्नाकर मतकरी यांच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात दिलीप प्रभावळकर एका चेटकिणीची भूमिका करायचे. या चेटकिणीचं रूप खूप भीतीदायक होतं. ढगळा परकरवजा घागरा, वर काळं ब्लाउज, खांद्यावर शाल, चिकटवलेलं लांब नाक, मोकळे सोडलेले पांढरे केस, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं, हातात वाकडी काठी असं या चेटकिणीची वेशभूषा होती.

अशा या भीतीदायक चेटकिणीची नाटकात एंट्री झाली, की मुलं दचकून ओरडत, रडत.

 

 

 

या नाटकाचे पुण्यात लागोपाठ दोन प्रयोग होते. एक होता एका शाळेच्या पटांगणात आणि दुसरा होता भरत नाट्यमंदिरात! शाळेतला प्रयोग झाल्यानंतर चेटकिणीचे कपडे- मेकअप तसाच ठेऊन भरत नाट्यमंदिरात जायचं होतं, कारण तिथे जाऊन पुन्हा मेकअप करण्याइतका वेळ नव्हता.

शाळेतला प्रयोग संपल्यानंतर भरत नाट्यमंदिरात जाण्यासाठी दोन गाड्या तयार ठेवण्यात आल्या होत्या. प्रयोग संपल्यानंतर नाटकातल्या चेटकिणीला, म्हणजे दिलीप प्रभावळकरांना भेटण्यासाठी अनेक लहान मुले आणि त्यांचे पालक आले. लहान मुलांशी गप्पा मारण्याच्या नादात दोन्ही गाड्या निघून गेल्या.

प्रत्येक गाडीतल्या लोकांना असं वाटलं, की दिलीप प्रभावळकर दुसऱ्या गाडीत आहेत. थोड्यावेळाने शाळेच्या विस्तीर्ण पटांगणात आपण एकटेच चेटकिणीच्या वेशात उभे आहोत हे प्रभावळकरांच्या लक्षात आलं.

नाटकवाली मंडळी निघून गेली होती, नाट्यमंदिराचा प्रयोगही लगेचच होता, त्यामुळे त्यांना निघणं भाग होतं. आतासारखं ओला- उबर करणं त्याकाळी शक्य नव्हतं. मोबाईलही फारसे वापरात नव्हते.

दिलीप प्रभावळकर तसेच चेटकिणीच्या कपड्यांमध्ये शाळेबाहेर आले, पण कोणीच रिक्षावाला थांबायला तयार होईना. शेवटी एका स्कुटरवाल्याला विनंती केली, आणि तो कसाबसा तयार झाला.

परकरवजा रंगीत घागरा, ब्लाउज वर शाल, लांब नाक, भुवया आणि मोकळे सोडलेले पांढरे केस अशा अवतारात संध्याकाळच्या वेळी तुडुंब ट्रॅफिकमध्ये, भर टिळक रस्त्यावरून दिलीप प्रभावळकर भरत नाट्यमंदिरात पोहोचले.

या अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासात रस्त्यावरची लोकं दचकून, आ वासून त्यांच्याकडे पाहत होती.

 

 

दिलीप प्रभावळकरांची बालनाट्यांमधली चेटकिणीची ही भूमिका अजरामर ठरली. नाटक संपल्यानंतर अनेकदा मुलं रंगपटात येऊन त्यांना बघत असतं. भीतीदायक- विक्षिप्त नाकाची, पांढऱ्या पिंजारलेल्या केसांची चेटकीण कशी दिसते हे बघण्यासाठी मुलं गर्दी करत.

पांढऱ्या केसांचा विग उतरवून, चेटकिणीचे कपडे काढून, साध्या कपड्यांमध्ये मेकअप पुसत बसलेल्या दिलीप प्रभावळकरांना पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव येत असतं. घाबरत घाबरत मुलं त्यांना हात लावत.

त्यांनी केलेल्या या भूमिकेची अनेक नाट्यसमीक्षकांनी दखल घेतली, त्यांच्या भूमिकेचं भरभरून कौतुक झालं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version