' ‘अमृतांजन’च्या निर्मात्यांनी बामच्या प्रसिद्धीचा वापर चक्क सामाजिक सुधारणेसाठी केला! – InMarathi

‘अमृतांजन’च्या निर्मात्यांनी बामच्या प्रसिद्धीचा वापर चक्क सामाजिक सुधारणेसाठी केला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सध्या शरीराला काही दुखापत झाली किंवा कोणता भाग दुखायला लागला, तर आपण ताबडतोब फॅमिली डॉक्टरांकडे पोहोचतो. छोटी गोष्ट असेल, तरी त्याचा नंतर त्रास व्हायला नको हा त्यामागचा विचार असतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत मात्र, असं काही लागलं किंवा छोटे आजार वगैरे झाले की त्यांच्यावरचा उपाय घरातच केला जात असे. कारण आजीच्या बटव्यात त्यावर उपाय असे. आजीचा बटवा हा शब्द अलीकडे फार कमी ऐकायला मिळतो ज्यात वेगवेगळ्या आजारांवर घरच्या घरी उपाय होत असत.

आधुनिक आजीच्या बटव्यातील एक औषध जे डोके दुखी, अंग दुखी किंवा शरीराच्या एखाद्या भागाला मार लागला अशा सगळ्यावर उपयोगी पडत असतं, ते म्हणजे अमृतांजन बाम.

 

amrutanjan balm inmarathi

 

घरात अमृतांजन बाम नाही किंवा हा बाम कधीच वापरला नाही अशी व्यक्ती सापडणं जवळपास अशक्य आहे. १९८०-९० च्या काळात औषंधाच्या खणात पिवळ्या रंगाची अमृतांजनची डबी हमखास दिसणार. माझं डोकं दुखायला लागल्यावर अमृतांजन बाम लावला की काही क्षणात डोकेदुखी थांबते असे आपण आपल्या कुटुंबातील लोकांकडून ऐकतोच.

हा अमृतांजन बाम भारतातला वेदना शमवणारा पहिला बाम ठरला आहे. तुम्हाला माहिती आहे का अमृतांजन बाम बनवणारी व्यक्ती एक स्वातंत्रसेनानी, पत्रकार आणि समाज सुधारक होती. ज्यांचे नाव होते काशिनाधुनी नागेश्वर राव!

राव यांच्याविषयी…

१८६७ मध्ये आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात राव यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळगावी झाले आणि पुढील शिक्षण त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून करून पदवी संपादित केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वातंत्रसेनानी म्हणून काम करायची इच्छा असणाऱ्या राव यांना घरच्यांच्या इच्छेखातर नोकरी करणे भाग पडले.

राव यांनी कलकत्ता येथील औषध तयार करणाऱ्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. औषधांबद्दलच्या मूलभूत गोष्टी ते शिकले. त्यानंतर ते विल्यम अँड कंपनी या युरोपियन फर्ममध्ये काम करण्यासाठी मुंबईला गेले. तिथेही त्यांनी चांगले काम करून उत्तम अनुभव मिळवला.

 

kasinadhuni nageswara rao inmarathi

कलकत्तामधील अनुभव आणि अभ्यास या विश्वासावर त्यांनी एक औषधाचा प्रयोग करायचे ठरवले. हा प्रयोग करण्यामागे स्वतःच्या देशासाठी काहीतरी करावे हादेखील हेतू होता.

तेलुगु भाषेतील नवजागरण चळवळीचे जनक कंडुकुरी वीरसलिंगम पंतुलू यांचा राव यांच्यावर प्रभाव पडला. झाडांमधील नैसर्गिक अर्क आणि काही रसायनांच्या साहाय्याने त्यांनी अमृतांजन बाम बनवला. हा सुगंधित आणि वेदनाशामक बाम अत्यंत उपयोगी ठरला आणि त्याचे काही दुष्परिणामही नव्हते.

या बामची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी त्यांनी १८९३ मध्ये मुंबईत अमृतांजन लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. प्रत्येक व्यवसायातील सुरुवातीचा काळ हा फार कठीण असतो. याच काळात ब्रँड लोकप्रिय होण्यासाठी राव यांनी हे बाम मोफत वाटले.

सुरुवातीच्या काळात या बामची किंमत दहा आणा इतकी होती. लोकांकडून अमृतांजनला इतकी पसंती मिळाली, की त्यातून राव हे आंध्रप्रदेशमधील बडे व्यावसायिक बनले. त्यांचा व्यवसाय भरभराटीस येत असतानाच, राव यांनी या प्रभावाचा वापर सामाजिक सुधारणा करण्यासाठी केला.

तेलुगु लोकांसाठी वेगळे राज्य असावे या गोष्टीवर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी १९०९ मध्ये तेलगू लोकांच्या मनात स्वातंत्र्यबद्दलची संकल्पना जगवण्यासाठी आंध्र पत्रिका नावाचे साप्ताहिक सुरु केले.

 

andhra patrika inmarathi

 

याच काळात त्यांना मिठाच्या सत्याग्रहासाठी ६ महिने तुरुंगात जावे लागले होते. १९३६ साली त्यांनी आपल्या कंपनीचे आणि मुखपत्राचे मुख्यालय मद्रासमध्ये हलवले. मद्रासमधील तेलगू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

पुढील काही वर्षांमध्ये राव आंध्र चळवळीचे संस्थापक बनले. तेलुगू भाषिकांकडून या चळवळीला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि प्रयत्नांचे आयोजन करण्यासाठी एक अधिकृत समिती स्थापन करण्यात आली.

१९२४ ते १९३४ पर्यंत राव यांनी आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम केले. या चळवळीतील त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा सहभाग आणि त्यांच्या राष्ट्रीय लेखांमुळे त्यांना ‘देसोधारका’ किंवा जनतेचे उत्थान करणारे असे नाव त्यांना मिळाले.

नोव्हेंबर १९३७ मध्ये त्यांच्या घरी तेलुगू नेत्यांनी आंध्र राज्याचा कृती आराखडा तयार करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. तथापि, जागतिक युद्ध आणि भारताच्या स्वातंत्र्योत्तर संघर्षामुळे हा विषय काही काळासाठी बाजूला पडला.

राव यांच्या घरी तेलुगू नेत्यांच्या बैठकीच्या अध्यक्षतेच्या पाच महिन्यांनंतर राव यांचे ११ एप्रिल १९३८ रोजी निधन झाले. आणि दुर्दैवाने त्यांचे स्वप्न साकार होताना ते पाहू शकले नाहीत.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे प्रकाशन गृह, त्यांनी तयार केलेली ग्रंथालये आणि भारताचा आवडता अमृतांजन बाम या सगळ्याची जबाबदारी त्यांचा भाचा एस शंभू प्रसाद यांनी घेतली. शंभू प्रसाद यांनी नंतर अमृतांजन बाम सोबतच विविध प्रकारची इतर औषधं बनवली.

 

amrutanjan inmarathi

२००७ साली अमृतांजन लिमिटेड कंपनीचे नाव बदलून अमृतांजन हेल्थ केअर लिमिटेड ठेवण्यात आले. या सोबतच सॉफ्टवेअर व्यवसायात उतरत देशभरात त्यांनी कॉल सेंटर सुरु केले.

आजच्या घडीला २५०० करोड रुपये हा या कंपनीचा टर्नओव्हर आहे. आपल्या घरात असणारी पिवळी अमृतांजन बामची डबी आणि तिचा प्रवास इतका मोठा आहे, हे कदाचित फार कमी जणांना माहिती असेल. आपल्या कामातून आपल्या देशाची कशाप्रकारे सेवा करता येते याचे उत्तम उदाहरणं म्हणजे काशिनाधुनी नागेश्वर राव…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?