“प्रेक्षक ८ तास बसू शकत नाहीत, आपण असं करूया…” टी-२० क्रिकेटची जन्मकथा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
क्रिकेट हा भारतीयांना जोडणारा एक दुवा आहे. भारताची मॅच सुरू असताना एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या छोट्या टपरीवर जेव्हा आपण एकत्रित येऊन जिंकण्याचा आनंद व्यक्त करत असतो तेव्हा आपल्यातील सर्व मतभेद नाहीसे झालेले असतात.
‘ट्वेंटी-ट्वेंटी’ क्रिकेट आल्यापासून तर आपण वारंवार हा आनंद साजरा करू शकत आहोत. ४ तासात मॅच संपते, निकाल लागतो आणि आपण पुन्हा आपल्या कामाला लागतो. ५० ओव्हरच्या मॅचची वेगळी मजा आहे, पण त्यासाठी ‘आपला पूर्ण दिवस द्यावा लागतो’ हा एक विचार नेहमीच लोकांच्या मनात येतो.
झटपट ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून ती जगभरातील लोकांची विचारसरणी बदलणारी गोष्ट ठरली आहे. प्रत्येक गोष्ट कमी वेळात व्हावी अशी आता सर्वांनाच अपेक्षा असते. “ट्वेन्टी-ट्वेंटी का जमाना है” हे वाक्य आपण सहज बोलत, ऐकत असतो. कोणी आणला हा क्रिकेट प्रकार? ५० ओव्हरच्या खेळापेक्षा २० ओव्हरच्या खेळात जास्त मजा असेल, हे कोणाच्या सर्वात आधी लक्षात आलं असेल? जाणून घेऊयात.
‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ हे नाव कदाचित आपण ऐकलं सुद्धा नसेल. ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ हा क्रिकेट प्रकार जगाला या व्यक्तीने सुचवला आहे.
काय घडलं होतं?
२००० साली इंग्लंड क्रिकेट बोर्ड हे क्रिकेटच्या दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या लोकप्रियतेबद्दल चिंतीत होतं. टेस्ट मॅचसाठी पाच दिवस देऊन स्टेडियमवर मॅच बघणं लोकांना योग्य वाटत नव्हतं. वनडे क्रिकेटच्या तिकीट बुकिंगवर सुद्धा विपरीत परिणाम झाला होता.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यावेळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार क्रिकेट सामना बघायला येणाऱ्या लोकांमध्ये १७% घट झाली होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी ‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ या इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या मार्केटिंग मॅनेजरवर सोपवली.
‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ने पूर्ण परिस्थिती समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण करायचं ठरवलं. अडीच लाख युरो खर्च करून हे सर्वेक्षण करण्यात आलं. इंग्लंडमधील विविध भागात लोकांना क्रिकेटबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले.
क्रिकेट बघण्यात प्रेक्षकांना वाटणारा ‘तोच तोच पणा’ हा त्या निमित्ताने लोकांनी व्यक्त केला. लोकांना काहीतरी नवीन हवं होतं. तरुण मुलांनी क्रिकेट हा ज्येष्ठ नागरिकांचा खेळ म्हणून जाहीर केलं होतं. काही लोकांनी काऊंटी क्रिकेटला जास्त पसंती दिली होती.
पालकांनी अशी माहिती दिली होती की, “आम्हाला क्रिकेट आवडतं. पण, आमच्या लहान मुलांना घेऊन आम्ही स्टेडियममध्ये पाच दिवस किंवा ८ तास बसू शकत नाही.”
–
- आज तिच्या ‘फलंदाजीचे’ चाहते सुद्धा लाखोंनी वाढले असतील…
- क्रिकेटमधील असे काही गमतीशीर नियम, जे कदाचित तुम्हाला ठाऊकही नसतील…
–
‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ यांच्या लक्षात आलं, की लोकांची मानसिकता आता बदलली आहे. एखाद्या सिनेमा किंवा पिकनिकसारखं त्यांना ३ ते ४ तासात संपेल असं क्रिकेट हवं आहे.
क्रिकेटची मॅच लवकर संपवायची असेल तर ओव्हर कमी कराव्या लागतील. तीन तासात जितक्या ओव्हर होतील तितकीच मॅच असावी हे मत त्याने आपल्या सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद केलं. २०-२० ओव्हरची मॅच असावी हे ठरवण्यात आलं.
जर क्रिकेटची मॅच ३ तासात संपली, तर संध्याकाळचा वेळदेखील त्यासाठी पुरेसा असेल, प्रेक्षक आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून स्टेडियमवर येऊ शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
लोकांना क्रिकेट मनोरंजक वाटावं म्हणून स्टेडियमवर डीजे असेल असा सुद्धा निर्णय त्यावेळी घेण्यात आला.
मत पटवून दिलं…
इंग्लंड क्रिकेट बोर्डला हे सर्व पटवून देणं हे सोपं काम नव्हतं. पण, ‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ने ही जबाबदारी लीलया पार पाडली. क्रिकेटमधील हा बदल पारंपरिक प्रेक्षकांच्या पचनी पडेल की नाही? हा प्रश्न अनुत्तरित होता. मेलबोर्न क्रिकेट क्लबने याबद्दल एक मतदान घेण्याचा निर्णय घेतला.
मतमोजणी करतांना काही सदस्यांनी ‘ट्वेंटी-ट्वेंटी’चं समर्थन केलं, तर काहींनी त्याचा विरोध केला. काहींना हा बदल खूप घाईत घडवला जात आहे असं वाटलं. ‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ने इंग्लंड क्रिकेट बोर्डला हा विश्वास दिला, की क्रिकेटच्या मूळ रचनेत कोणताही बदल केला जाणार नाही, फक्त ओव्हर कमी केल्या जात आहेत.
आपल्याला जर स्टेडियमवर प्रेक्षक आणायचे असतील तर हा बदल करावाच लागेल यावर ‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ हे ठाम होते. ११ विरुद्ध ७ मत या फरकाने ‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ यांच्या ‘ट्वेंटी-ट्वेंटी’च्या प्रस्तावाचा विजय झाला.
लोकांपर्यंत या क्रिकेट प्रकाराची माहिती पोहचावी यासाठी विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना बोलावून त्याबद्दल लिहिण्याचं आवाहन करण्यात आलं. लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात आली आणि २००३ मध्ये इंग्लंडमध्ये ‘हॅम्पशायर’ विरुद्ध ‘ससेक्स’ हा जगातील पहिला ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ सामना खेळवण्यात आला.
संध्याकाळी साडे सहा वाजता सुरू झालेला सामना रात्री साडे दहा संपला आणि २७,००० प्रेक्षक आनंदात घरी जातांना बघून ‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डला ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ सुपरहिट ठरेल याची खात्री पटली. सर्व क्रिकेट बोर्ड हा बदल बघत होते आणि त्यानुसार स्वतःलाही बदलण्यास सज्ज झाले होते.
सहा महिन्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला आंतरराष्ट्रीय ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ सामना खेळवण्यात आला. या सामन्याला सुद्धा लोकांनी प्रचंड गर्दी केली. खेळाडूंना सुद्धा हा क्रिकेट प्रकार आवडायला सुरूवात झाली. आंतरराष्ट्रीय खेळाडूंपेक्षा स्थानिक खेळाडूंना बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील असा ‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ने सल्ला दिला आणि विविध ‘क्रिकेट लीग’ची सुरुवात करण्यात आली.
खेळाडूंना कमी वेळात, कमी श्रमात जास्त पैसे कमावण्याची ही संधी उपलब्ध झाली. भारताने २००७ मध्ये ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ क्रिकेटचा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ची लोकप्रियता खूप वाढली. आयपीएलनंतर ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ हेच क्रिकेटचं भविष्य आहे हे लोकांनी आणि क्रिकेट मंडळांनी मान्य केलं.
–
- त्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट होतं; पण आज मात्र स्थान नाही! वाचा यामागची कारणं
- ‘रणजी ट्रॉफी’ या नावामागची तुम्हाला माहित नसलेली कहाणी!
–
आपल्या करिअरला नवीन वळण देणाऱ्या ‘स्टुअर्ट रॉबर्ट्सन’ला प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, चिअर लिडर्स हे धन्यवाद देत असतील हे नक्की.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.