स्वतः खुर्चीला जखडलेल्या असून इतर अपंगांना ‘उभं’ करणाऱ्या जिद्दीची गोष्ट
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखिका : अनुराधा तेंडुलकर
===
एकेकाळी आर्ततेनं विधात्याकडे “सोडव रे या मला या दीनवाण्या अवस्थेतून ….!” अशी विनवणी काकुळतीला येऊन करणारी षोडषवर्षीय चुलबुली नसीमा कधी स्वतः सारख्याच हजारो दिव्यांगांचा आदर्श आणि आधारस्तंभ बनणार आहे अशी कल्पना तिनं स्वतः तरी कधी केली असेल का?
०२ – ०९ – १९५० रोजी सोलापुरात जन्मलेली नसीमा, एक चुणचुणीत आनंदी मुलगी! वडील सरकारी नोकरी करणारे. भावाबहिणींबरोबर हसत खेळत बालपणाचा आनंद घेत मोठी होत होती. ऍथलिट होण्याची स्वप्नं रंगवत होती.
शाळा- कॉलेजमध्ये प्रत्येक खेळात सहभागी व्हावं, सांस्कृतिक कार्यक्रमांत हिरीरीनं भाग घ्यावा असं सर्वसामान्य मुलीसारखंच जीणं होतं तिचं. नियतीनं मात्र तिच्यापुढे भयंकर आव्हान मांडून ठेवलं होतं.
वयाच्या १६ व्या वर्षी तिचा पाठीचा कणा दुखावतो काय, पॅराप्लेजिया हा तिच्या जीवनाचा साथी बनतो काय.. आयुष्यभराचं दु :स्वप्न तिच्यापुढं आ वासून उभं राहिलं. साऱ्या स्वप्नांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या.
नसीमनं स्वतः ला खोलीत बंद करुन घेतलं. नैसर्गिक विधींसाठी सुध्दा इतरांची मदत घ्यावी लागे, तेव्हा शरमेनं नकोनकोसं होई. घरची मंडळी सारं काही करत होती तरी ती मिटून गेली होती आतल्या आत. अशातच अचानक तिच्या वडिलांचा मृत्यू झाला!
काय करणार होती असहाय्य नसीमा? पण नियतीनं तिच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. हजारो अपंगांसाठी तिला काम करायचं होतं फक्त तिलाच ते माहीत नव्हतं.
समोर असा अंधार पसरलेला असतांनाच तिला स्व. बाबुकाका दिवाण हे बुलंद व्यक्तिमत्व भेटलं. स्वत:अपंग असूनही सुधारित चारचाकी चालवणारे , देशविदेशात प्रवास करणारे, A P D – The Association of People with Disability या बंगळूरू स्थित संस्थेच्या संस्थापकांपैकी एक.
बाबुकाका दिवाणांनी नसीमचं सगळं रडगाणं ऐकून घेतलं. मनातलं चिड आणि निराशेचे गरळ ओकून टाकायला लावली आणि स्वतः साठी आणि आपल्यासारख्या इतरांसाठी काही करण्याची नवी दिशा दाखवली. त्याबद्दल नसीमा दीदी आजन्म कृतज्ञ आहेत.
तशा अवस्थेतही नसीमा दीदींनी पदवी मिळवली. सेंट्रल एक्साईज मध्ये नोकरी मिळाली. अडचणींवर मात करत तिथं बढती मिळवली. स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत सहकाऱ्यांच्या मदतीने कामं केली.
कमी का अडचणी आल्या तिला? हेवा, मत्सर, कुचेष्टा, हेटाळणी, गैरफायदा घेण्याचे प्रसंग! रोज टेबलावर फुलं ठेवणारा “माळी” भेटला, तशी वाटेवर विनाकारण काटे पेरणारी माणसंही भेटली. दीदी चालत राहिल्या, चालत राहिल्या … चाकाच्या खुर्चीवरून…………!
नसीमादीदींनी सुरुवातीला १९७२ मध्ये बाबुकाकांकडून प्रेरणा घेऊन अपंग पुनर्वसन संस्था सुरू केली. चुकतमाकत, नवे अनुभव घेत, अपंगांना सहाय्य करणं चालू झालं. कालांतरानं ती संस्था सोडावी लागली.
१९८४ मध्ये दीदींनी “हेल्पर्स ऑफ द हॅन्डीकॅप्ड” ही संस्था स्थापन केली. गेल्या ३५ वर्षांत १३००० पॅराप्लेजिक आणि इतर अपंगांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं.
१९९३ मध्ये व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर उभं राहिलं. १९९६ मध्ये समर्थ विद्यामंदिराची स्थापना झाली. २००१ मध्ये माणगावकर कुटुंबानं कुडाळ इथं दिलेल्या जागेवर स्वप्ननगरी उभारायची धडपड करत, काजू प्रक्रिया केंद्राला सुरूवात झाली.
मधल्या काळात अपंगांना उपचार, शस्त्रक्रिया, शिबीरामध्ये तपासण्या, कृत्रिम साधनं पुरवणं, अपंगांसाठी क्रीडास्पर्धा, स्वतः क्रीडास्पर्धात भाग घेत बक्षिस़ मिळवणं, अपंगांना जीवनसाथी मिळवून देण्यासाठी मंडळ काढणं, संस्थेचं आर्थिक गणित जमवण्यासाठी गॅस एजन्सी मिळवणं …. सतत धडपड आणि संघर्ष ……
संघर्षाच्या या प्रवासात सहकारी भेटत गेले … लाभार्थ्यांचे कडू – गोड अनुभव आले, देणगीदारांचं विशाल दातृत्व अनुभवलं, नातेवाईकांचा त्याग समजला, राजकारण्यांचे रंग दिसले, नोकरशाहीचे ढंग पाहिले.
संस्थेकडून फायदा घेऊन स्वतःच्या लाभासाठी गैरकामं करणारी माणसं बघितली. अपंगांच्या स्थितीचा विचार करू न शकणारी असंवेदनशील माणसं भेटली, तशी कळवळ्यापोटी मदतीला धावणारी देवमाणसंही भेटली. किती अनुभव .. किती माणसं …. किती आशा – निराशांचे हिंदोळे! सारं गाठीशी बांधत दीदी पुढे पुढे जातच राहिल्या.”चालत” राहिल्या चाकाच्या खुर्चीवरून….
नसीमादीदींच्या कार्याची नोंद समाज घेतच होता. कामं करतांना प्रहारांबरोबर हारही वाट्याला आले. दीदींना पुरस्कार मिळत गेले. त्यापैकी काही :
हॅन्डीकॅप वेल्फेअर फेडरेशन – नवी दिल्लीचं राष्ट्रीय पारितोषिक( १९८६)
फाय फाऊंडेशन सन्मान (१९९६)
बेस्ट लेडी आंत्रप्युनर ऑफ कोल्हापूर (१९९८)
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा “बाया कर्वे” पुरस्कार (१९९८)
सामाजिक न्याय व कल्याण मंत्रालयाचा रोल मॉडेल पुरस्कार ( २००१)
कोल्हापूर भूषण (२००२)
Cavin Care Ability Award for Eminence – Ability Foundation – Chennai ( २००२)
NASEOH तर्फे बी.जे.मोदी फाऊंडेशन पुरस्कार ( २००९)
याशिवाय पुढील संस्था ) समित्यांवर त्यांची निवड / नियुक्ती करण्यात आली.
नॅशनल कमिशन फॉर वुमनची अपंग महिलांसाठीची कमिटी
नॅशनल ट्रस्ट – ( ऑटीझम , सेरेब्रल पाल्सी , मेंटल रिटार्डेशन , मल्टिपल अपंगत्व इ.चं मंत्रालय )
न्यू जर्सी येथे भरलेल्या वुमन एम्पाॅवरमेंट सेलिब्रेशन मध्ये महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे सहभाग.
शिवाजी विद्यापीठ वुमेन्स स्टडी सेंटर सदस्य इ.इ.
जीवनाच्या या खडतर, पण इतरांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणणाऱ्या अथक प्रवासाचे अनुभव सांगणारं आपलं आत्मकथन नसीमादीदींनी “चाकाची खुर्ची ” या नावानं प्रसिद्ध केलंय. ( मेहता पब्लिशिंग हाऊस – २००१ ) खरंतर त्यानंतरही अनुभवांच गाठोडं एवढं झालंय, की आत्मकथनाचा पुढचा भाग लिहायलाच हवा.
दीदींच्या आणि समस्त अपंग जनांच्या व्यथा, अडचणी, मागण्या जाणून घेण्यासाठी आणि मानवी मनाचे थक्क करणारे अनुभव पहाण्यासाठी हे आत्मकथन मूळातूनच वाचायला हवं. आज दीदींविषयी लिहायचं तर आधी. ते पुस्तक पुन्हा एकदा चाळावं म्हणून हातात घेतलं आणि पूर्ण वाचून पहाटे टाईप करायला बसले.
दीदींना बऱ्याच वर्षांपासून पहात आले, कारण आमच्या दोन घरांच्या मध्यावरच त्यांचं “नशेमन” हे घर आहे. कारणपरत्वे जाणं होई. त्यांच्या वहिनी इर्शाद यांच्याशी अधिक संबंध आले. दीदींच्या सोशिक अम्मी भेटत बरेचदा गेल्यावर.
दीदींची कीर्ती आधीच ऐकलेली. साध्या पांढऱ्या साड्या नेसणाऱ्या , कुरळे केस , गोल चेहरा, प्रसन्न हास्य आणि सदैव कामात गढलेल्या. गळ्यात एकदाणी, हातात एखादं काकण, थोडा करडा चेहरामोहरा असं त्यांचं बाह्य दर्शन.
चाकाच्या खुर्चीवर बांधलेलं अवघं आयुष्य, पण चेहऱ्यावरचा कर्तृत्वाची आभा त्यांचं अपंगत्व विसरायला लावते. दोनदा उचगावला कार्यक्रमांनाही गेले.( मला वाटतं एकदा नाना बेरीं बरोबर ) त्यांचं नियोजन, शिस्त पाहिली. आनंदी लाभार्थी पाहिले. त्यांचं आत्मकथनही वाचलं.
अपंगांना स्वावलंबनाच्या पायांवर स्वतंत्र पणे- स्वाभिमानाने उभं करणारी ही दिव्य शक्ती पाहून अचंबित व्हायला होतं. स्वतः खुर्चीवर जखडलेल्या असून, इतरांना “उभं” करणाऱ्या नसीमा दीदी ही देवाची एक स्पेशल निर्मितीच वाटते मला!
डाऊन टू अर्थ, आपली लो- प्रोफाइल स्टाईल कायम ठेवणाऱ्या, वंचितांसाठी आजवर केलेल्या कामाचं श्रेय समाज, कुटुंब सहकारी, संस्था कर्मचारी, हितचिंतक आणि ज्ञात अज्ञात देणगीदारांना देणाऱ्या नसीमा दीदी आज सत्तरीतही पूर्णतः कामात गढलेल्या आहेत.
एवढी वर्षं रक्त आणि घाम शिंपून वाढवलेली “हेल्पर्स ऑफ द हॅन्डीकॅप्ड “ही संस्था मतभिन्नता निर्माण झाल्यानं २०२० मध्ये सोडताना त्यांना किती क्लेश आणि यातना झाल्या असतील याची कल्पनाच केलेली बरी. त्या व्यथित जरूर झाल्या, पण डगमगल्या नाहीत. १ जुलैला त्यांनी हेल्पर्स सोडली आणि ३ डिसेंबर रोजी नवी “साहस” ही संस्था नोंदवली.
गेल्या ८-१० महिन्यात कोरोना काळात महाराष्ट्रभरातील १०० तरुण अपंगांना व्हीलचेअर्स घरपोच देण्यात आल्या. ( यासाठी श्री तेज घाटगे यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं.) नव्या कल्पना मनात आहेत. नवे प्रकल्प उभे करायचे आहेत. उमेद अद्याप कायम आहे….. महाबळेश्वरचे अंध उद्योजक श्री भावेश भाटीया यांच्या मार्गदर्शनाखाली मेणबत्ती प्रकल्प सुरु केला आहे.
दीदींचं आत्मकथन वाचताना कित्येकदा अंगावर काटा येतो, कधी डोळ्यात पाणी भरतं, तर कधी आपलीच व समाजाचीही चीड येते.
बहीण कौसरच्या ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठात परिक्षकांना बोलावण्यासाठी जातांना भेटलेले, गांधी पैसे न घेणारे रिक्षा चालक, कधीच पैसे न स्वीकारणारे डॉ सातवेकर, सोज्वळ मालप सिस्टर, निरपेक्ष माया देणारे बाबुकाका दिवाण, मुंबईच्या नासीओच्या नमाताई भट, फेलोशीप ऑफ दी फिजीकली हॅन्डीकॅप्डच्या श्रीमती फातिमा इस्माईल, इतरांना आदर्शवत गुण असणारे, पण स्वतः स्मृती हरवून बसलेले, मनाला चटका लावून जाणारे शैलेंद्र जोशी, दर्यादिल देणगीदार श्री अरविंद रानडे , दागिने विकून देणगी देणाऱ्या ९० वर्षांच्या कमलाताई सोवनी इ. यांच्या आठवणी त्या अजून काढतात.
स्व.रजनी करकरे , पी.डी. देशपांडे , देशभ्रतार आणि सौ. नीता यांचे गुणदोष (गुणच जास्त) दाखवतात. लोळागोळा अवस्थेतल्या प्रकाशला घर आणि आई देऊ न शकल्याची खंत बोलून दाखवतात. वीजेचा शॉक बसून हातपाय गमावलेल्या माधवच्या उपचारासाठी कुष्ठरोग्यांकडे जाऊन मदत स्वीकारतात.
जिल्हा परिषदेत शिपायाची नोकरी करणारे, दोन्ही हात कोपरापासून व दोन्ही पाय गुडघ्यापासून नसलेले नावलीचे (पन्हाळा) भगवान पाटील आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिले असतील. ते उपजिविकेसाठी दारुचा धंदा करत. संस्थेमार्फत ते पॅरा ऑलिंपिक साठी परदेशात जाऊन आले , जि.प.मध्ये नोकरी मिळाली आणि त्यांचं लग्न सुध्दा झालं अशी अनेक उदाहरणं.
बेळगावच्या मिलिटरी महादेव मंदिरात कॅलिपर्समुळे प्रवेश न मिळणं, पन्हाळा सहलीत ३५ जणांचा केलेला स्वयंपाक, कित्येकदा रेल्वे प्रवासात आलेल्या अडचणी, परदेशात निर्दयपणे अडवणूक करणारी फिजीओथेरेपीस्ट, अखेरच्या भेटीत,” केळीचे सुकले बाग “हे गाणं रजनीताई कडून ऐकण्याची काळीज हलवणारी फर्माईश करणारे बाबुकाका, मैत्रिण रेखाची अखेरची इच्छा पुरवण्यासाठी जमवून आणलेली ताजमहाल ट्रीप, टीक् ट्वेंटी घेण्याचा सहकाऱ्यानं दिलेला सल्ला, कौसर (बहिण) च्या आजारानं कधी नव्हे ती आलेली उद्विग्नता, एकदा केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि “वह सुबह जरूर आयेगी” म्हणत पुन्हा पुन्हा मनानं नवी उभारी घेणं!
धड हात – पाय , निरोगी शरीर आणि पुरेसा अन्न -वस्त्र- निवारा मिळूनही रडत बसणाऱ्या आपल्या मनानं, अपंगांच्या भूमिकेत स्वतःला ठेवून पाहिलं, तर आपली बरीच कुरबुर कमी होईल. भौतिक साधनसंपत्तीपेक्षा निसर्गदत्त निरोगी देह- मनाची देणगी किती मोलाची आहे हे आपल्याला समजेल.
“कहो ना आस निरास भई” सारखी पारीतोषिकविजेती कथा आणि “चाकाची खुर्ची” सारखं आत्मकथन लिहिणाऱ्या नसीमादीदींकडून आणखी लेखनाची अपेक्षा आहे.
स्वतः कडे नाही, त्यासाठी रडत बसण्यापेक्षा, आपल्यासारख्या इतरांसाठी काही करण्याची इच्छा तुम्हालाही आत्मकथन वाचून होईल. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही, हे नसीमादीदींकडे पाहून शिकला नाही तो काय शिकला?
कित्येक वर्ष दीदी नियमित रक्तदान करत. स्वयंपाक तर उत्तम आणि मोठ्या प्रमाणात करु शकतात. व्यावसायिक सफाईचं क्रोशा- विणकाम करतात. रात्री लवकर झोप येत नाही त्या वेळात महत्त्वाचा पत्रव्यवहार आटपतात.
बेडसोअर्स, कॅथेटर, नाना प्रकारचे उपचार, पाच- पाच ऑपरेशन्स, सहकाऱ्यांशी अनेकदा झालेले मतभेद विसरून पुढेच जात रहातात न थांबता, न थकता …. आपल्या चाकाच्या खुर्चीवरून…….
नसीमा दीदीं कडून आपण काय शिकणार आहोत? हेलन केलरचं चरित्र आणि हेन्री व्हिस्कार्डी यांचं “गिव्ह अस द टूल्स” ( मराठी अनुवाद : (” हात न पसरु कधी “) हे पुस्तक त्यांना अजून जगण्याची प्रेरणा व नवऊर्जा देतात. शेवटी हेल्पर्स ची पुढील प्रार्थना तरी वेगळं काय मागते?
” सुखदुःखाचे घास दे
परी पचवायची शक्ती दे
पराभवाचे घाव झेलता
हसवायाची युक्ती दे
अश्रूंच्या मग बिंदू बिंदूतून
इंद्रधनु आम्ही नटवू
सुखदुःखाचे घेऊन धागे
जीवनपट आमचा पटवू
एकच दे मज देई श्रध्दा
अढळ ध्रुवापरी परमेशा
विघ्नांचा जरी अग्नी चेतला
फुलेल पुनरपी मनी आशा .”
विना व्हीलचेअर एक वर्ष अनुभव घेतल्यानंतर एकही अपंग कृत्रिम साधनांपासून वंचित रहातात कामा नये अशी इच्छा बाळगणाऱ्या नसीमादीदींच्या सर्व मनिषा पूर्ण होवोत हीच श्री अंबाबाई चरणी प्रार्थना!
संदर्भ : चाकाची खुर्ची- नसीमा हुरजूक.
फोटो सौजन्य: श्री. अजीज हुरजूक.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.