Site icon InMarathi

“बेबी”, मी आणि तोरणा! गोष्ट एका प्रेमी युगुलाबरोबर तोरणा किल्ला चढतांनाची….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका उत्तर भारतीय मैत्रिणीला (गर्लफ्रेंडला) तोरण्याच्या ट्रेक ला घेऊन आलेल्या माझ्या एका मराठी मित्राची ही करूण कथा आहे.

शनिवारी पहाटे ५:३० ला स्वारगेट असं ठरलं होतं, तिथे यांना ७:०० झाले. त्याचा आणखी एक मित्र मात्र अगदी वेळेत पोचला त्याच्या बायकोला घेऊन. मला तेव्हाच साधारण अंदाज आला की पुढे काय वाढून ठेवलंय ते. माझी एक आणि त्या चौघांसाठी २ अशा ३ टू-व्हिलर्स वरून निघालो वेल्ह्याकडे. म्हटलं मध्ये थांबायला नको कुठे.

जेवढ्या लवकर चढायला लागू तेवढं उत्तम. नाश्ता वगैरे सगळं पायथ्याला करू. वेल्ह्याला पोचलो, ओळखी झाल्या आणि मला पक्का अंदाज आला की आज काळा बाजार ठरलेला आहे. याचं कारण या माझ्या मित्राबरोबरची त्याची मैत्रीण.

तिनं उतरल्या उतरल्या आधी फेस वॉश ने तोंड धुतलं. मग साधारण 45 मिनिटं नाश्ता केला. त्यातही “पोहा बहोत ऑईली है ऑर चाय मे शक्कर बहोत ज्यादा है” हे तिने साधारण १०-१२ वेळा सांगितलं. इधर ऐसी हि मिलता है असं मी आणि तिच्या बेबीने (माझ्या मित्राला ती बेबी म्हणत होती) तिला सांगायचा प्रयत्न केला.

 

 

चढाई सुरु केली आणि कासवपेक्षाही मंद गतीनं चालणाऱ्या या दोघांना वर कधी पोचवणार या चिंतेत मी पडलो.

प्रश्न पोराचा नव्हता, औंध मधला का होईना पण पोरगा पुण्याचा होता. कॉस्मोपॉलिटन भागात लहानाचा मोठा झालेला असला तरी शाळेच्या “कल्चरल इव्हेंट” मध्ये त्याने मराठी संस्कृती, शिवाजी महाराज वगैरे कार्यक्रम केलेले होते. पण पोरगी लईच “साऊथ दिल्ली” निघाली.

 

 

एकतर का कोण जाणे, ती सँडल्स घालून आली होती, त्यात तिला सारखी तहान लागायची. इतकं पाणी पिऊ नका, पाणी नाहीच मध्ये मिळालं तर रेशनिंग करावं लागतं वगैरे “ट्रेकरी उपदेश” मी जरा करून पाहिला, पण गाढवापुढे गीता वाचलेली परवडली असं वाटलं मला म्हणून गप्प बसलो.

कसाबसा पाऊण एक तास गेला आणि बाई मटकन खाली बसल्या. “क्रॅम्प्स आ गये है” असं त्यांनी जाहीर केलं. मग बेबीने जमेल तेवढं डॉक्टरी ज्ञान पाजळलं. वॉलिनी होता तो दिला त्याला आणि विश्रांती झाल्यावर प्रवास पुढे सुरु झाला.

एव्हाना त्यांच्याकडंच पाणी सगळं संपलं होतं आणि मला आता दुष्काळाच्या छाया गडद होताना दिसून आल्या. पाणी जपून वापरावं लागेल असं आता मी अक्षरशः दटावलं.

या सगळ्यात एक प्रॉब्लेम म्हणजे ते जे दुसरं जोडपं होतं, त्यांची उगीच गोची होत होती. ते बिचारे याच्यावर विश्वास ठेवून आले होते. “आपण काय आज तोरणा बघत नाही” असं भाव त्यांच्या चेहऱ्यावर दाटून आले होते.

शेवटी त्यांना म्हणालो, की ही सरळ पायवाट थेट दरवाज्यात जाते तिथे जाऊन थांबा, हे आले तर ठीक नाहीतर यांना मध्ये बसवून मी वर येईनच आणि जेवढा जमेल तेवढा गड आपण फिरू. ते गेले.

उरलो मी, बेबी आणि बेबीची जोखीम.

बाबापुता करत कसाबसा बेबी तिला आणि मी बेबीला ढकलत होतो. मी थोडा पुढे गेलेलो असायचो आणि बाई एकदम ओरडायच्या, “बेबी, मुझे प्यास लगी है” आणि मग बेबीची जाम धावपळ व्हायची. भंजाळलं होत पोरगं. त्यात त्याला तिचे सेल्फीहट्ट पूर्ण करावेच लागायचे.

थोडे फार सेल्फी वगैरे घेऊन ताई जरा स्थिरावल्या आहेत असं वाटतं न वाटतं तोच नियतीनं शेवटचा दणका घातला, ताईंची सँडल तुटली. तुटली म्हणजे कुठलाही जुगाड करण्याच्या पलीकडे गेली. त्यात तिचा पाय ट्विस्ट झाला (हा ‘ट्विस्ट’ शब्द ती US ACCENT मध्ये उच्चारत होती). आता बेबीचा धीर पूर्ण खचला.

 

 

कितीही कॉपी केली तरी हा विषय नाहीच निघणार आपला, हे कळल्यावर पोरांचा चेहरा होतो ना साधारण तसा झाला त्याचा चेहरा.

या सगळ्यात एक तास गेला. बाई आणि बेबी नॉर्मलला आले. त्यांना थोडं पाणी दिलं आणि त्याला म्हटलं आता तुझे बूट तिच्या पायात घाल आणि हळू हळू खाली उतरायला लाग. मी वरून त्यांना घेऊन येतो. जास्त काही न बोलता त्यान हे ऐकलं.

वर जाऊन त्यांना गड फिरवला थोडा आणि खाली उतरलो. तोवर इथे बाईंनी बरच फैलावर घेतलं होतं बेबीला असं वाटल, कारण मी आल्या आल्या तो निघूया असं म्हणाला. गाडी चालवतानाही बूट बाईंच्याच पायात होते. हा हिरो आता अनवाणी गाडी थेट पुण्यापर्यंत चालवणार होता. असो प्रेमात जस आंधळं व्हावं लागतं तसंच अनवाणीही.

ते पुढे गेले आणि मी नसरापूर फाट्याला चहाला थांबलो एकटाच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version