आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
चित्रकला, हस्ताक्षर, हस्तकला हे आपल्या सगळ्यांच्या शालेय जीवनातले अविभाज्य घटक. तेलकट खडू, रंगांच्या पेन्सिली किंवा चित्रे काढण्यासाठी लागणार्या वेगवेगळ्या लीडच्या पेन्सिली, लिहिण्यासाठी शाईचे पेन, वह्या हे सगळं साहित्य आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना नक्कीच वापरले असेल.
यापुढे जाऊन चित्रकला आवडणार्या प्रत्येकाने जलरंग, पोस्टर कलर, तेलरंग असे रंगांचे ही प्रकार वापरले असतील. या सगळ्या आठवणीशी जोडले गेलेलं एक नाव आजही आपल्या चेहर्यावर स्मितहास्य आणते.
भूमितीसाठी वापरलेले कंपास असो की फूट पट्टी, पेन्सिल असो की शाईपेन प्रत्येक गोष्टीत हे नाव आपल्यासोबत होते आणि आहे. ते नाव आहे शालेय स्टेशनरी आणि चित्ररंगांच्या क्षेत्रातील अग्रगण्य नाव ‘कॅम्लिन’.
कोण असेल कॅम्लिनचा निर्माता? असे रंगीत स्वप्न त्याने कधी पाहिले असेल, काय केले असेल आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी? कॅम्लिन ही स्वप्नांच्या पूर्णत्वाची गोष्ट आहे. ती ही एका मराठी माणसाने पाहिलेली.. काय होती ही कहाणी?
‘स्वप्नांना कल्पनेचे पंख मिळाले, की कलाकृती जन्माला येतात.’ हे सिद्ध करणारी कॅम्लिनची स्टोरी प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. चला तर मग करूया सफर कॅम्लिनच्या रंगीत दुंनियेची..
गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व भारताच्या मुंबई प्रांतातली. गिरगावातल्या अशाच एका चाळीत स्थापन झालेल्या ‘दांडेकर अँड कंपनी’ने हॉर्स ब्रॅंड शाई पावडर आणि गोळ्या तयार करून जवळपासच्या शाळा, कचेर्यांमधून विकण्यास सुरवात केली.
जी.पी. दांडेकर आणि डी. पी. दांडेकर या दोन भावांनी स्टेशनरी बाजारपेठेचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की स्टेशनरीची बहुतांश साधने ही बाहेरून आयात केली जातात आणि महागही असतात. जर देशी बनावटीच्या दर्जेदार स्टेशनरी वस्तु बनवून विकल्या, तर त्यामध्ये फायदा खूप आहे.
त्यांनी अशा वस्तु बनवून विकण्याचे ठरवले, त्यातून १९३१ मध्ये त्यांनी आपल्या गिरगावातल्या राहत्या चाळीतील घरी शाई पावडर व गोळ्या तयार करण्याचा उद्योग सुरू केला.
हळूहळू या व्यवसायात त्यांनी इतरही काही उत्पादनांची निर्मिती सुरू केली. ज्यामधे ‘कॅमल’ ब्रॅंड पेनचा समावेश होता, जो नंतरच्या काळात कंपनीचे ब्रॅंड प्रॉडक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला.
या पेनच्या आणि त्याच्या नावामागेही एक रंजक कहाणी आहे. जेव्हा दांडेकरांनी पेन बाजारात आणायचे ठरवले तेव्हा नवीन नावाचा विचार सुरू केला. त्यांना असे नाव हवे होते जे कोणत्याही भाषेत लक्षात ठेवणे, वाचणे आणि लिहिणे सोपे होईल. ‘उंट/ कॅमल’ – हे त्यांनी ठरवलेले अंतिम नाव!
उंट जसा विना अन्नपाण्याचा वाळवंटात कित्येक दिवस जगू शकतो, तसाच हा पेन मजबूत आणि टिकावू आहे हे त्यांना दाखवून द्यायचे होते. यातील गमतीची गोष्ट म्हणजे कॅमल हे नाव त्यांना सिगारेटच्या पाकीटावरील उंटाचे चित्र पाहून सुचले होते.
बाजारपेठेला आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीचे नाव बदलणे गरजेचे होते. १९४६ मध्ये दांडेकर अँड कंपनीला एक खाजगी कंपनी म्हणून नामांकन मिळाले होते. त्यानंतर कंपनीने यशाची अनेकानेक शिखरे गाठली.
पुढे कंपनीचे कार्यालय अंधेरीमध्ये स्थलांतरित झाले आणि पुढील दशकाच्या सुरूवातीस कॅम्लिनने कला साहित्याच्या बाजारपेठेत सर्व जातींचे रंग पेंट, क्रेयॉन, पेंट ब्रश, कॅनव्हास, रेखांकन शाई आणि भूमिती बॉक्ससह प्रवेश केला.
दांडेकर अँड कंपनी १९८८ मध्ये कॅम्लिन लिमिटेड झाली आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली. कॅम्लिन उत्पादने तीन विभागांमध्ये आहेत – ‘शाळा आणि शिक्षण, कार्यालय आणि ललित कला.’ अनेक विक्रम आज कॅम्लिनच्या नावावर जमा आहेत.
महाराष्ट्रात तीन ठिकाणी (तारापुर,तळोजा आणि वसई) आणि जम्मूतावीमध्ये एका ठिकाणी (पाताळगंगा) कंपनीची उत्पादने तयार होतात.
शैक्षणिक साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणार्या या कंपनीचे भारतात सुमारे १५०० हून अधिक वितरक आहेत आणि ३००००० हून अधिक किरकोळ विक्रेत्यांचे नेटवर्क आहे.
कंपनीची २१०० हून अधिक उत्पादने भारत आणि इतर देश-विदेशात विकली जातात. आजच्या घडीला ५ कोटींहून अधिक घरे शालेय साहित्याच्या माध्यमातून कॅम्लिनशी जोडली गेली आहेत.
२०१२ साली जपानी कंपनी कोकूयो , जी स्वत: शालेय साहित्यातील एक मोठी कंपनी होती, तिने कॅम्लिन मधील ५०.२४% भागभांडवल खरेदी केले. भारतीय बाजारपेठेत प्रवेश हाच या करारमागील मुख्य उद्देश असला, तरी भारताबाहेरील बाजारपेठ मिळवणे ही कॅम्लिनची महत्वाकांक्षा त्यामागे होती.
पेंटिंगसाठी कॅम्लिनने ‘अखिल भारतीय कॅम्लिन रंग स्पर्धा’ १९८२ मध्ये सुरू केली आणि आजही चालू आहे. त्याद्वारे, कॅम्लिन २०११ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करणारी पहिली कंपनी बनली, कारण त्यात ४८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला!
कॅम्लिनची सारी उत्पादने ही बिनविषारी आणि पर्यावरणपूरक असतात. कॅम्लिनची ही यशोगाथा सगळ्यांना प्रेरणा देईल यात काही शंका नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.