Site icon InMarathi

इंग्लंडच्या नाकावर टिच्चून, अंबानींनी वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे आणलं होतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतासाठी कपिल देव आणि त्यांच्या संघाने जिंकलेला १९८३ चा विश्वचषक जितका महत्वाचा ठरतो, तितकाच त्या पुढचा १९८७ चा विश्वचषक सुद्धा महत्वाचा ठरतो. भारतही क्रिकेटमधील विश्वचषक जिंकू शकतो हे कपिल देव आणि त्यांच्या संघाने जगाला दाखवून दिले होते.

संपूर्ण जगाला भारताची क्रिकेटमधील ताकद कळली. भारतासोबतच संपूर्ण जगातून कपिल देव यांच्या संघाचे कौतुक झाले. ज्या पद्धतीने त्यांनी वेस्ट इंडिज संघाला हरवले ते पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला होता.

या पार्श्वभूमीवर १९८७ साली होणाऱ्या विश्वचषकात भारताला यजमानपद भूषवायचे होते. भारत आणि पाकिस्तान यांना मिळून हा विश्वचषक दोन्ही देशांमध्ये खेळवायचा होता.

 

tribuneindia.com

 

अशी इच्छा असली तरी भारतापुढे एक समस्या होती, ती म्हणजे भारताला यजमानपदासाठी ३० करोड रुपये लागणार होते आणि यातील एकही नवा पैसा भारताकडे नव्हता. एखादी गोष्ट करायची ठरवली की करायचीच या भारतीयांच्या जिद्दीने एकही रुपया नसताना कशापद्धतीने भारताने या विश्वचषकाचे यजमानपद भूषवलं ही फार रंजक कथा आहे.

अशी झाली सुरुवात…

जेव्हा विश्वचषक कोणत्या देशात घ्यावा यासाठी बोली लावण्यात आली, तेव्हा भारताच्या धीरूभाई अंबानी यांनी इंदिरा गांधींसोबत इंग्लंडने मागितलेल्या पैशांपेक्षा ४ ते ५ पट जास्त पैसे देण्याची हमी दिली होती. परंतु भारत ही बोली जिंकण्याची शक्यता असतानाच इंदिरा गांधींचे निधन झाले. नंतर पंतप्रधान बनलेल्या राजीव गांधी यांचे अंबानींसोबत तितके सलोख्याचे संबंध नव्हते.

उलट राजीव गांधी यांच्या काळातील अर्थमंत्री असणाऱ्या व्ही. पी. सिंघ यांनी अंबानींच्या मागे आयकर विभागाची चौकशी सुरु केली. यातून हे संबंध अजूनच बिघडले आणि अंबानी विश्वचषकासाठी पैसे देतील ही आशा सुद्धा धूसर झाली. बीसीसीआयला नवीन प्रायोजक शोधण्यास सुरुवात करावी लागली.

 

 

पुढे काय घडलं?

बीसीसीआयला विश्वचषकाचे आयोजन करायचे होते पण त्यासाठी त्यांना या विश्वचषकात जे संघ खेळणार आहेत त्यांना पैसे देण्याची हमी द्यावी लागणार होती. या सोबतच त्यांना राहण्यासाठी, प्रवासासाठी लागणारी किंमत सुद्धा द्यावी लागणारच होती. ही एकूण किंमत होती ३० करोड रुपये.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश मिळून ही रक्कम देणार होते, ज्यातील भारत दोन तृतीयांश भाग भारत आणि उरलेला एक तृतीयांश भाग पाकिस्तान अशी विभागणी करण्यात आली होती. यानुसार भारताला २० करोड द्यावे लागणार होते.

बीसीसीआयने प्रायोजक आणि सामन्याच्या प्रसारणातून पैसे उभे करण्याचे ठरवले. यात प्रसार माध्यमातून येणारे पैसे दोन भागात विभागले होते, ज्यातील एक टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या जाहिराती आणि सामना चालू असताना मैदानावरील दिसणाऱ्या जाहिराती! परंतु यातही एक समस्या होती, की हे प्रसार माध्यमाचे काम दूरदर्शनकडे होते आणि सगळ्या जाहिरातींपासून मिळणारे पैसे विश्वचषक झाल्यावर मिळणार होते.

दूरदर्शनकडून येणारे पैसे बीसीसीआयला दूरदर्शनकडून १९८७ मध्ये मिळणार होते आणि त्यांना हमी म्हणून जी किंमत द्यायची होती ती ४ करोड रुपयाची रक्कम डिसेंबर १९८४ मध्ये द्यायची होती. ही किंमत पौंडमध्ये द्यावी लागणार होती.

 

 

बीसीसीआयचा प्रयत्न सुरु झाला, पण…

बीसीसीआयने भारतातील वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून पैसे जमवण्यास सुरुवात केली आणि तेव्हा केवळ ३८ लाख रुपये जमा झाले आणि गरज होती तब्बल ४ करोड रुपयांची!

त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष असणारे साळवे हे राजीव गांधी यांना जाऊन भेटले. त्यांनी गांधींना ४ करोड रुपये देण्याची मागणी केली. ही किंमत त्यावेळेच्या काळानुसार आणि सरकारसाठी फार मोठी होती. परंतु भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा आणि क्रिकेट जगतात भारताचे तयार होणारे नाव यातून सरकारने पैसे देण्याचे ठरवले.

हे सगळं चालू असताना दूरदर्शनने जाहिरातीतून मिळणारे पैसे बीसीसीआयला देता येणार नाहीत असे सांगितले. कारण प्रसारण करण्यासाठी आयसीसीआयच्या अटींनुसार दूरदर्शनला त्यांना उत्तम सुविधा द्याव्या लागणार होत्या आणि हा खर्च दूरदर्शनलाच करावा लागणार होता.

 

 

पैसे मिळाले नव्हते तरीही…

बीसीसायकडे पैसे नाहीत हे त्यांनी आयसीसीपासून लपवले होते, जेणेकरून ही संधी भारताकडून जाऊ नये. एकीकडे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

साळवेंनी धीरूभाईंकडे पैशांची मागणी केली, तेव्हा त्यांनी होकार दिला पण एक अट ठेवली. ती अशी की, भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात धीरूभाई अंबानींना राजीव गांधींच्या शेजारी बसण्याची परवानगी मिळावी. त्यांना ती परवानगी मिळाली आणि त्यांनी सरकारला ४ करोड रुपये दिले.

नंतर प्रयोजक म्हणूनही १.५ करोड रुपये दिले. अनिल अंबानी यांना रिलायन्सकडून आयोजक म्हणून नेमण्यात आले. अंबानीनी या कपचे नाव रिलायन्स कप असे ठेवले. त्यांना या विश्वचषकातून आपल्या नावाची जगभरात ओळख करून द्यायची होती.

 

हादेखील प्रश्न सुटला

साळवेंनी ज्याप्रकारे अंबानींचा प्रश्न सोडवला, तसेच त्यांनी राजीव गांधींना सांगून दूरदर्शन सोबतही तडजोड केली. यातून दूरदर्शनने स्वतः खर्च करायचे ठरवले, परंतु त्यांनी रॉयल्टी फी बीसीसीआयला द्यायला नकार दिला. दूरदर्शन मैदानावरील जाहिरातींचे पैसे बीसीसीआयला द्यायला मात्र तयार झाले. अंबानींनी ते अधिकार विकत घेतले.

मैदानातील जाहिरातींसाठी २.६ करोड अधिक देण्याची तयारी दाखवली. या जाहिरातींसाठी अंबानींनी मैदानांवरही खर्च केला. या सोबतच अंबानींनी विविध कंपन्यांना सप्लायर म्हणून काही अधिकार विकले आणि त्यांना या कपचे ऑफिशिअल सप्लायर घोषित केले.

यानंतर खेळाडूंचा राहण्याचा प्रश्न आला आणि तोदेखील अंबानींनीच सोडवला. त्यांनी यासाठी पैसे देण्यास तयारी दाखवली. भारतातील विविध हॉटेल्स चेनसोबत त्यांनी खेळाडूंच्या राहण्याची सोय केली. आणि त्या हॉटेल्सच्या जाहिराती करून त्यांना प्रसिद्धी मिळावी याची काळजी घेतली. ज्यातून हॉटेल आणि अंबानींना सुद्धा पैसे मिळाले.

 

 

अशा सगळ्या समस्यांतून मार्ग काढत भारताने या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले. या विश्वचषकाच्या यजमानपदामुळे भारताची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण झाली.

एखादी गोष्ट ठरवली की ती करून दाखवायचीच या भारतीयांच्या जिद्दीनेच हे यजमानपद भारताला मिळाले असे यातून लक्षात येते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version