आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारत समृद्ध होण्यासाठी काही लोकांनी दिलेलं योगदान हे अनमोल आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यासाठी आजीवन आग्रही राहीलेले ‘राजीव दीक्षित’ हे अशा व्यक्तिमत्वांपैकीच एक आहेत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ज्याप्रमाणे विदेशी कपड्यांची होळी करून इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते त्याच प्रकारे राजीव दीक्षित या एका माणसाने स्वतंत्र भारतात आपला व्यवसाय थाटलेल्या इंग्रजी कंपन्यांची झोप उडवली होती.
‘भारत स्वाभिमान आंदोलन’ या नावाने सुरू केलेल्या स्वदेशी मोहीमेत राजीव दीक्षित यांनी भारतीय लोकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला आणि या कार्यक्रमामुळे कित्येक लोक भारतीय वस्तूंबद्दल जागरूक झाले. लोक भारतीय वस्तू कोणत्या? याची यादी शोधू लागले, दुकानदारांकडे भारतीय वस्तूंची मागणी करू लागले.
‘स्वदेशी’ ही मोहीम लोकप्रिय होत असतांनाच ३० नोव्हेंबर २०१० रोजी राजीव दीक्षित यांचं निधन झालं आणि त्यानंतर ही एक मोहीम न रहाता त्याचं ‘पतंजली’ सारख्या व्यवसायिक कंपनीत रूपांतर झालं.
आज पतंजलीच्या उत्पादनांनी मार्केटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. पण, ती राष्ट्रवादाची भावना कुठेतरी लुप्त झाली आहे हे नक्की.
राजीव दीक्षित जर आजच्या ‘स्मार्ट’ युगात असते तर ‘स्वदेशी’ ही मोहीम अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकली असती. योग गुरू बाबा रामदेव यांचे अगदी जवळचे मित्र असलेले राजीव यांचं निधन नेमकं कोणत्या कारणाने झालं? हे आज ११ वर्षानंतरही एक गूढच आहे.
डॉक्टरांनी राजीव दीक्षित यांचं निधन हे हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं असं सांगितलं होतं. पण, राजीवजींच्या नातेवाईकांनी, निकटवर्तीय व्यक्तींनी त्यांच्या चेहऱ्यावर, ओठांजवळ निळ्या रंगाचे काही डाग बघितले होते. हेच कारण आहे की, एक ठराविक वर्ग आजही राजीव दीक्षित यांच्या निधनाला नैसर्गिक मृत्यू न समजता एक खून मानतो.
२००० ते २००९ या नऊ वर्षात राजीव दीक्षित यांनी सुरू केलेल्या ‘स्वदेशी ओवर विदेशी’ या हॅशटॅगमुळे ते खूप लोकप्रिय झाले होते. २००९ च्या सुरुवातीला राजीव दीक्षित यांची बाबा रामदेव यांच्यासोबत भेट झाली. आयुर्वेद आणि भारताबाहेर गेलेलं ‘काला धन’ सारख्या विचाराने प्रेरित असलेल्या या दोन्ही व्यक्तींमध्ये फार कमी वेळात खूप घट्ट मैत्री झाली.
नोव्हेंबर २००९ मध्ये बाबा रामदेव यांनी राजीव दीक्षित यांची भारत स्वाभिमान ट्रस्ट’चे प्रमुख वक्ता, राष्ट्रीय सचिव म्हणून नेमणूक केली होती. ही जवळीक बाबा रामदेव यांच्या निकटवर्तीय लोकांना खुपत होती असं सुद्धा त्या काळात दबक्या आवाजात बोललं जायचं.
राजीव दीक्षित यांच्या मृत्यूच्या वेळी काय घडलं होतं?
२९ नोव्हेंबर २००९ रोजी राजीव दीक्षित यांनी छत्तीसगडमधील ‘दुर्ग’ या शहरात आपलं नियोजित भाषण केलं. ‘भारत स्वाभिमान ट्रस्ट’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम आटोपून येत असतांना राजीव यांना अचानक खूप घाम आला होता आणि त्यामुळे त्यांना संस्थेच्या दुर्ग आश्रममध्ये नेण्यात आलं होतं.
आश्रमात असतांना ते तिथल्या बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडले आणि मग त्यांना भिलाई येथील ‘बीएसार अपोलो’ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं.
डॉक्टर दिलीप रत्नानी राजीव यांच्यावर उपचार करत होते. दुसऱ्या दिवशी १ डिसेंबर २०१० रोजी डॉक्टरांनी त्यांना ‘मृत’ घोषित केलं होतं. ही घोषणा होताच बाबा रामदेव यांच्या आदेशानुसार राजीव दीक्षित यांचं पार्थिव हे ‘चार्टर्ड’ विमानाने हरिद्वारला नेण्यात आलं होतं.
राजीव दीक्षित यांचे मोठे भाऊ प्रदीप दीक्षित त्यावेळी त्या विमानात हजर होते. राजीव दीक्षित यांचा निळा पडलेला चेहरा, ओठ हे प्रदीप यांच्या सर्वप्रथम लक्षात आलं होतं. राजीव यांच्या समर्थकांनी ‘पोस्ट मॉर्टम’ करून मृत्यूचं नेमकं कारण येऊ द्यावं अशी मागणी केली होती. पण, बाबा रामदेव यांनी ही परवानगी दिली नाही.
–
- एकाच कुटुंबातल्या ११ सदस्यांच्या रहस्यमयी मृत्यूचं कोडं CBI ने सोडवलं खरं, पण…
- “धंदा यशस्वी कसा करावा?”- पतंजलिकडून शिका यशाचे “हे” सिक्रेट्स
–
राजीव दीक्षित यांचे जवळचे मित्र मदन दुबे हे बाबा रामदेव यांना भेटले होते. पण, त्यांना बाबा रामदेव यांच्यात ‘अंतिम संस्कार’ लवकर व्हावेत यासाठी कमालीची घाई दिसून आली होती. मदन दुबे यांच्या मते, राजीव दीक्षित यांच्याबद्दल अंतर्गत लोकांची असलेली मतभिन्नता, जगफळाट हेच राजीव दीक्षित यांच्या मृत्यूचं खरं कारण आहे.
मदन दुबे यांना असं वाटण्याचं अजून हे एक कारण होतं की, ज्या हॉलमध्ये राजीव दीक्षित यांचा पार्थिव ठेवण्यात आलं होतं तिथे रामदेव बाबा आले आणि त्यांनी हे वाक्य वापरलं की, “पोस्ट मॉर्टम हे हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे, अंतिम संस्कार लगेच झाले पाहिजे.”
योग गुरू बाबा रामदेव हे धर्माची कुबडी घेऊन फार क्वचित एखादं वाक्य वापरतात. ते भगव्या रंगात असतात. पण, त्यांचा प्रमुख भर हा योग शिकवण्याकडे असतो. पण, त्यावेळी रामदेव बाबांनी अशी धार्मिक बाब सांगितली की, जमलेल्या लोकांनी लगेच त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. प्रदीप दीक्षित, मदन दुबे यांची मागणी त्यामुळे पुर्णपणे दुर्लक्षित झाली.
राजीव दीक्षित यांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात हे नेहमीसाठी रहाणारं एक गूढ आहे. शवविच्छेदनाला झालेला विरोध, घाईत केलेले अंतिम संस्कार आणि ऐनवेळी प्रदीप दीक्षित यांनी पाळलेलं मौन हे यामागची प्रमुख कारणं सांगितली जातात.
जानेवारी २०१९ मध्ये भारत सरकारने दुर्ग येथील पोलिसांना या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले होते. पण, तसं काहीच घडलं नाही.
राजीव दीक्षित यांचा जन्म देखील ३० नोव्हेंबर याच तारखेला १९६७ मध्ये उत्तरप्रदेशच्या अलिगढ येथे झाला होता. राजीव दीक्षित यांनी अलाहाबाद येथून बी.टेक. आणि आयआयटी कानपुर मधून एम.टेकचं शिक्षण घेतलं होतं. सीएसआयआर आणि फ्रांस टेलिकम्युनिकेशन्स या कंपनीत त्यांनी नोकरी सुद्धा केली होती.
एका प्रोजेक्टवर काम करत असतांना ते डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या सुद्धा संपर्कात आले होते. ‘राष्ट्रसेवा’ हे एकच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं.
आपलं ध्येय गाठण्यासाठी त्यांनी ‘युनिलिव्हर’ ही भारतीय कंपनी नाहीये, कोका कोला कसं तयार केलं जातं ? ‘पेप्सी’ प्यायल्याने उदभवू शकणारे दुष्परिणाम याबद्दल त्यांनी लोकांना नेहमीच माहिती दिली होती.
राजीव दीक्षित आणि बाबा रामदेव हे दोन घनिष्ठ मित्र २०१४ मध्ये एक राजकीय पक्षसुद्धा निर्माण करणार होते ज्यामध्ये केवळ प्रामाणिक लोक असतील.
“भारत जगात शक्तीशाली देश असेल” आणि “स्वदेशी आंदोलन हे भारताच्या शेवटच्या व्यक्तिपर्यंत जाईल” सारखे मनसुबे मात्र राजीव दीक्षित यांच्या अवघ्या ४२ व्या वर्षी झालेला अकाली मृत्यूमुळे अर्धवट राहिले याचं त्यांच्या समर्थकांना आजही दुःख आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.