Site icon InMarathi

‘प्रति लता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गायिकेचा आवाज ‘लता’युगात दडपला गेला!

suman kalyanpur featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

किलो, लिटर, मिटर, किलोमिटर ही जशी मापकं आहेत तसंच हिंदी चित्रपटातील गायिकेचा आवाज मोजण्याचं प्रमाण म्हणजे लता मंगेशकर! येणारा प्रत्येक नवा आवाज या मापकावर तोलून बघितला जातोच जातो. लता आणि आशा ही दोन प्रमाणं इतकी पक्की आहेत की येणारी प्रत्येक नवी गायिका या दोघींपैकी एका जातकुळीत गणली जाते.

जन्मत:च गळ्यात सरस्वती घेऊन जन्मलेला गळा म्हणजे लता मंगेशकर. त्याला जोड कुटुंबातल्या गाण्याच्या परंपरेची आणि साधनेची. या आवाजानं रसिकांवर राज्य नसतं केलं तरच नवल.

 

 

नूरजहां की लता? या वादाला भारत पाकिस्तान फाळणीचा पूर्णविराम मिळाला तरी हिंदी चित्रपट संगीतात यानंतर एक नवी सूरपरंपरा जन्माला आली आणि ती म्हणजे लता मंगेशकर.

या तुलनेमुळे एक तोटाही झाला आणि तो म्हणजे अनेक उत्तम आवाज पुढे येऊ शकले नाहीत. सुमन कल्याणपूर या नावाची तर आणखिनच वेगळी कोंडी झाली. निसर्गत:च लता आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात इतकं कमालिचं साम्य होतं की अनेक गाण्यातला आवाज लताचा की सुमनचा हे ओळखता येत नाही.

याबाबत एक किस्सा सांगितला जातो, ऐंशीच्या दशकातली ही गोष्ट आहे, त्यावेळेस दूरदर्शनवर छायागीत हा गाण्यांचा कार्यक्रम खूप लोकप्रिय होता. या कार्यक्रमात एकदा ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे हे गाणं लावलं गेलं आणि या गाण्याची गायिका म्हणून लता मंगेशकर यांचं नाव सांगितलं गेलं.

कार्यक्रमाचं प्रसारण झाल्यानंतर थोड्या वेळानं प्रसार भारतीच्या कार्यालयातील फोन खणखणला. फोनवर पलिकडे होत्या वीस वर्षीय चारुल कल्याणपूर. सुमन कल्याणपूर यांची मुलगी.

 

चारुल यांनी सांगितलं की ना ना करते हे गाणं लताजींनी नाही तर त्यांची आई सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे कार्यक्रमाच्या होस्टनं लता मंगेशकर यांचं नाव घेतलेलं आहे. हे ऐकून अनेकांचा यावर विश्र्वास बसला नाही मात्र हे सत्य होतं की या लोकप्रिय गाण्यातला आवाज लता दिदींचा नसून सुमन कल्याणपूर यांचा आहे.

२८ जानेवारी १९३७ ला ढाक्यात सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच सुमन यांना गाण्याची आणि चित्रकलेची आवड होती. हे कुटुंब १९४३ साली मुंबईला आलं.

इथं त्यांचे शेजारी होते मराठीतले सुप्रसिद्द संगीतकार पंडीत केशवरराव भोळे. त्यांनी सुमनचा आवाज ऐकून तिला शास्त्रीय संगीत शिकविण्याचा तिच्या वडिलांना सल्ला दिला. आतापर्यंत सुमन आवड म्हणूनच गात असे मात्र आता केशवरावांच्या सल्ल्यानुसार तिची उस्ताद खान, अब्दुल रहमान खान, मास्टर नवरंग यांच्याकडे तालिम घ्यायला सुरवात केली.

केशवराव भोळे तेंव्हा ऑल इंडिया रेडिओमध्ये म्युझिक प्रोड्युसर म्हणून काम पहात असत. त्यांनी सुमनला रेडिओवर गाण्याचा प्रस्ताव दिला. घरी संगीताची आवड असली तरीही अशा प्रकारे बाहेर जाऊन गाणं त्यांच्या वडिलांना पसंत नव्हतं मात्र पंडित केशवराव भोळ्यांना नकार देणंही शक्य नव्हतं.

 

cinestaan.com

 

रेडिओवर गायल्यानंतर त्यांना चित्रपटांतून गाण्यासाठी मागणी येऊ लागली. त्यांना पहिला मराठी चित्रपट मिळाला,”शुक्राची चांदणी’.

त्या काळात लता मंगेशकर हे नाव शिखरावर होतं. लतादीदींचे एका गाण्याचे दरही अनेकांना न परवडणारे असत मात्र लता या आवाजाला पर्याय नसल्यानं संगीतकार, निर्माते लतादीदींच्या तारखांसाठी ताटकळत बसत आणि लागतील तितके पैसे मोजून गाणी बनवत असत. हा काळ होता भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ!

अशा परिस्थितीत प्रति लता सापडणं हे अनेकांसाठी लॉटरी लागण्यासारखंच होतं. लतासारखाच आवाज, तशाच बारकाव्यांनी गाणं आणि तुलनेनं मानधन कमी. आणखिन काय हवं होतं?

सहाजिकच सुमन कल्याणपूर या नावाची मागणी वाढू लागली. हीच शोकांतिका झाली सुमन कल्याणपूर या आवाजाची. या आवाजाला डिट्टो लताचा आवाज म्हणून मागणीही येत गेली आणि त्यामुळेच स्वतंत्र ओळख बनणंही कठीण झालं. सुमन यांची ओळखच प्रती लता अशी बनली.

 

 

अर्थातच ही गोष्ट लता मंगेशकर यांना रुचणारी नव्हतीच. इंडस्ट्रीत असंही बोललं जातं की, त्यांनी जे निर्माते, संगीतकार सुमन कल्याणपूर यांच्यासोबत काम करतील त्यांच्यासोबत काम करण्यास नकार देण्यास सुरवात केली. लताचा नकार म्हणजे साक्षात सरस्वतीचा नकार.

रसिकांना लता मंगेशकरांचाच आवाज इतका भावायचा की त्यांचं गाणं चित्रपटात असणं म्हणजे चित्रपटाला हमखास यश मिळणं, चित्रपटाचं संगीत गाजणं. इतकं मोठं नुकसान अर्थात कोणालाच नको होतं.

याच दरम्यान आणखीन एक मोठा वाद संगीत क्षेत्रात झाला, तो म्हणजे, रफी आणि लतामधे रॉयल्टीवरून झालेला वाद. आता रफी लता ही जोडी दुरावल्यानं रफीसोबत गायला लतासारख्या आवाजाचा शोध सुरू झाला. अर्थातच हा शोध सुमन कल्याणपूर या नावाजवळ येऊन संपला आणि या दोघांची अनेक युगुलगीतं नंतरच्या काळात आली.

 

 

प्रती लता या ओळखीमुळेच सुमन कल्याणपूर ज्या स्थानावर जाऊ इच्छित होत्या तिथे त्यांना पोहोचता आलं नाही ही शोकांतिकाच म्हंटली पाहिजे.

गंमत म्हणजे २०१० साली महाराष्ट्र सरकारनं त्यांना “लता मंगेशकर” पुरस्कार देऊन गौरविलं. सुमनजी कायमच जमिनीवर पाय असणार्‍या, मितभाषी व्यक्ती होत्या.

आणखीन गमतीची गोष्ट म्हणजे खरंतर सर्वतोमुखी असणारं हे नाव, आपली थोडीफार का होईना एक स्वतंत्र ओळख बनविलेल्या या गायिकेला कधीच कोणत्याही संगीत स्पर्धेत ज्युरी म्हणूनही बोलावलं गेलं नाही. केवळ आपल्या गाण्यांच्या रुपातच त्या रसिकांत वावरल्या.

एका मुलाखतीसाठी तब्बल ४५ वर्षं वाट पहायला लावली –

सुप्रसिध्द निवेदक अमित सयानी यांना सुमन यांची मुलाखत घेण्याची खूप इच्छा होती. मात्र दरवेळेस सुमन काही ना काही कारण सांगून ही मुलाखत टाळत आल्या. अखेर २००५ साली तब्बल ४५ वर्षांनंतर त्यांनी या मुलाखतीला होकार दिला मात्र अनेक अटी घालून.

 

 

यातल्या दोन महत्वाच्या अटी अशा होत्या की मुलाखती दरम्यान छायाचित्र काढता येणार नाही आणि एखादा प्रश्न आवडला नाही तर तो बदलावा लागेल. अमिनजींनी आनंदानं या अटी मान्य केल्या आणि ही मुलाखत पार पडली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version