' घरी न सांगता स्कॉलरशिपसाठी अर्ज, ‘कोरियन Squid Game’ स्टारची प्रेरणादायी गोष्ट! – InMarathi

घरी न सांगता स्कॉलरशिपसाठी अर्ज, ‘कोरियन Squid Game’ स्टारची प्रेरणादायी गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतीय कलाकार आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्र्वात आपलं स्थान बनवतात तेव्हा तो भारतीय म्हणून आपल्यासाठी अभिमानाचाच विषय असतो. प्रियांका, दीपिका यांनी हॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर आता ओटीटी विश्र्वात धमाका करणारं भारतीय नाव आहे, अनुपम त्रिपाठी! त्याची कोरियन सिरीज सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे.

 

priyanka in hollywood inmarathi

 

अनुपम त्रिपाठी हे नाव उच्चारलं, तर कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही मात्र स्क्वीड गेम प्लेयर नम्बर १९९ म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर एक पाकिस्तानी व्यक्ती उभी राहिल. हा प्लेयर नंबर १९९, ज्याचं नाव अली आहे, तो सिरीजमध्ये पाकिस्तानी दाखविलेला असला तरी वास्तवात आपल्या दिल्लीचा मुलगा आहे.

मनोरंजन क्षेत्रात त्रिपाठी हे नाव नेहमीच खळबळ माजवून जातं. पंकज त्रिपाठी नंतर आता हे नवीन तरूण नाव ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. अर्थात आडनाव सोडलं तर या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही. साम्य असेल तर इतकंच आहे, की दोघंही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना स्वबळावर येथे येऊन खळबळ माजवू लागलेत.

दिल्ली का मुंडा…

दिल्लीतला एक तरूण थेट साऊथ कोरियात जाऊन एका मोठ्या ‘शो’चा घटक होतो काय आणि जगभरात प्रसिध्द होतो काय. अर्थात या योगायोगाच्या गोष्टी नाहीत. या यशामागे अनुपमचे कष्टही आहेत आणि अभिनयात करियर करण्याचा त्याचा ध्यासही…

 

anupam tripathi inmarathi

 

अनुपमची जन्म तारीख साक्षात किंग म्हणजेच शाहरूखची जन्म तारीख आहे, २ नोव्हेंबर. शाहरुखप्रमाणेच अनुपमही दिल्लीचा मुंडा आहे आणि सामान्य कुटुंबातला आहे.

बॉलिवुडमध्ये नाव कमवायचं या ध्यासानं शाहरुखने दिल्ली सोडून थेट मुंबई गाठली आणि अनुपमनं दिल्लीतून थेट साऊथ कोरिया गाठलं. अनुपमचं कुटुंब इतर चारचौघांसारखंच मध्यमवर्गीय संस्कार असणारं सामान्य आहे. इतर पालकांना वाटतं तसंच अनुपमच्याही पालकांना वाटायचं, की अनुपमनं डिग्री घेऊन नोकरी करून आयुष्य सेट करावं.

अनुपमला मात्र अभिनयाचं क्षेत्र खुणावत होतं. अनुपमनं २००५ साली पार्टकस नावाच्या नाटकासाठी स्टेज प्रोडक्शनचं काम पाहिलं. या कामात अनुपमला इतकी मजा आली, की त्याने नाटकाच्या सर्व विभागात रूची घ्यायला सुरवात केली. जिथे गरज लागेल तिथे अनुपम उभा राहू लागला.

हे करता करता कधी त्याला अभिनयात रस वाटू लागला हेही त्याला कळलं नाही. त्यानं चक्क याच नाटकात भूमिकाही साकारली. या नाटकातील एका गुलामाची भूमिका त्याने साकारली.

 

anupam tripathi inmarathi

 

अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर २००६ साली तो शाहिद अनवर यांचा बहिरूपी ग्रुपमध्ये सहभागी झाला. थिएटर करताना त्याला खूप मजा यायची. काही काळासाठी परकाया प्रवेश करता येऊ शकणं हे त्याला मजेचं वाटायचं.

अठरा वर्षांचा होईपर्यंत तो गाणं आणि अभिनय यांचं रितसर प्रशिक्षण घेऊ लागला. यानंतर त्यानं अभिनयातच करियर करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीतील NSD मध्ये प्रवेशासाठी त्याने अर्ज करण्याचा विचार आपल्या मित्रांना बोलून दाखविला. त्याच्या एका मित्रानं त्याला सुचविलं की त्यापेक्षा तू कोरियाई नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्टस् ॲक्टिंग स्कॉलरशिपसाठी प्रयत्न का करत नाहीस? यात त्याची निवड झाली, तर त्याला शिकताही येणार होतं आणि कामही करता येणार होतं.

मित्राच्या या सल्ल्यात अनुपमला दम वाटला आणि त्याच्या डोक्यात तेच विचार घुमू लागले. घरून आई वडिलांची परवानगी मिळणं अशक्य आहे, हे अनुपमला माहित होतं. त्यामुळे त्याने घरी न सांगताच स्कॉलरशिपसाठी अर्ज केला. महिनाभराने निकाल लागला आणि चक्क त्याची निवडही झाली. त्यानंतर त्याने घरी याबाबत सांगितल्यावर घरचे आधी नाराज झाले, चिडले पण नंतर त्यांनी अनुपमला परवानगीही दिली.

 

anupam tripathi player 199 inmarathi

 

नवा प्रवास

२०१० पासून अनुपमचा हा नवा आणि वेगळा प्रवास सुरू झाला. परका देश, परकी भाषा मात्र अभिनयाची भाषा तीच जी तो दिल्लीतल्या थिएटरमधे शिकला होता. अर्थात कोरियामधे राहणं सोपं नव्हतं. संस्कृतीपासून खाण्यापर्यंत भारताहून भिन्न वातावाणात त्याला रहायचं होतं.

त्याने सुरुवात कोरियन भाषा शिकण्यापासून केली, तिथलं रहाणीमान आत्मसात केलं. हळूहळू ही परकी भूमी त्याच्या परिचयाची होऊ लागली. केवळ दोन वर्षात तो अस्खलितपणे कोरियन भाषा बोलायला शिकला. स्क्विड गेमच्या निमित्तानं तो ऊर्दूही शिकला. आता त्याला कोरियन, ऊर्दू, हिंदी, इंग्लिश अशा भाषा उत्तम बोलायला येतात.

 

squid game inmarathi

 

महाविद्यालयात शिकता शिकता अनुपम कामही करत होता. कॉलेजच्या तिसर्‍या वर्षापर्यंत त्यानं मॉडेल म्हणून अनेक जाहिरातीत कामं केली.

२०१४ साली अनुपमने त्याचा पहिला चित्रपट साईन केला. ज्याचं नाव होतं, ‘स ओड टू माय फादर’. या चित्रपटात अनुपमनं बॉम्ब एक्सपर्टची भूमिका साकारली होती. बॉलिवुडमध्ये ज्याप्रमाणे गोर्‍या कलाकारांना फिरंगी भूमिकांत अडकावं लागतं, तसाच प्रकार अनुपमच्याही बाबतीत कोरियात घडला.

त्याला मुख्यत्वे मायग्रंट भूमिका मिळत गेल्या. तो त्यातच अडकत गेला. स्क्विड गेम्सनं जागतिक लोकप्रियता मिळविल्यावर आता त्याला वेध आहेत बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका करण्याचे.

अद्याप अशी ऑफर त्याला मिळालेली नाही. सध्या अनुपम अभिनयातली मास्टर्स डिग्री घेत आहे. लवकरच हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कलाकार आपल्याला हिंदीतही बघायला मिळेल याची खात्री बाळगायला हरकत नाही.

 

anupam tripathi inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?