आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
काळाकुट्ट रंग, शरीरयष्टी देखील काटक, नाकी डोळीही आकर्षक नाही, असा व्यक्त एक प्रसिद्ध हिरो असणे ही बाब शाहरुख, अमीर, रणबीर सारखे हँडसम हिरो बघायची सवय असणाऱ्या आपल्या समजला पटणे कठीणच! नाही का?!
फोटो मध्ये दिसत असलेला हा व्यक्ती मध्यंतरी इंटरनेटवर भयंकर चर्चेत आला होता का? तर तो हिरो आहे आणि अनेक सुंदर मुलींसोबत त्याने चित्रपटात आणि गाण्यांमध्ये रोमान्स केला आहे. जेवढी शाहरुख खानला आपल्या देशात आपण प्रसिद्धी देतो तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी या व्यक्तीला बांगलादेशामध्ये मिळते.
हा व्यक्ती म्हणजे बांगलादेशचा सुपरस्टार- ‘हिरो अलोम’! नेमकी हीच गोष्ट आपल्या ‘सुंदर’ समाजाला पटेनाशी झाली. हा हिरो होऊ शकतो, तर मी का नाही असा विचार प्रत्येक जण करत होता, पण मंडळी, हिरो अलोम घडला कसा हे जाणून घेतल्याशिवाय असा विचार करणे वा त्याची खिल्ली उडवणे कितपत योग्य आहे?
अशराफुल अलोम बगोरा हे हिरो अलोमचे पूर्ण नाव होय. बांगलादेश मध्ये बोगरा नामक एक जिल्हा आहे. या जिल्ह्यातील छोट्याश्या इकलिया गावामध्ये अलोमचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती.
१० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि त्याला त्याच्या आईसोबत टाकून पळ काढला. आपल्या आईकडे पाहत अलोमने स्वत: जबाबदारी हाती घेतली आणि वयाच्या १० व्या वर्षीपासून त्याचा खडतर संघर्ष सुरु झाला.
चणे शेंगदाणे विकून जे मिळेल त्यात आई-मुलगा पोट भरायचे. गरिबीमुळे आधीच त्याचे शिक्षणात लक्ष नव्हते. सातवीत असताना तो नापास झाला आणि त्याने शाळेला आणि शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला.
–
हे ही वाचा – म्हणून व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात “बाबा का ढाबाच्या” मालकाने केली पोलिसात तक्रार!
त्याच्या घराशेजारी एक व्हिडियोचे दुकान होते. तोच काय तो त्याच्या संघर्षमय जीवनातील एक मात्र मनोरंजनाचा आसरा होता, वेळ मिळेल तसा तो तेथे जाऊन व्हिडियो पाहायचा. एके दिवशी त्या दुकानाच्या मालकाने आपले दुकान विकण्याचा विचार केला.
अलोमने त्याच्या हातापाया पडून ते दुकान स्वत: विकत घेतले. त्याच्याकडे दुकान विकत घेण्याचे पैसे नव्हते, म्हणून हफ्त्या हफ्त्याने त्याने मालकाला पैसे देण्याचे कबुल केले. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी या मुलाच्या नावावर दोन बिझनेस होते. एक होता चणे-शेंगदाण्याचा आणि दुसरा आता हा व्हिडियो शॉपचा!
कालांतराने गावामध्ये केबल टीव्हीचे युग आले. संधीचा फायदा घेत अलोमने अब्दुर रज्जाक नावाच्या व्यक्तीच्या सहाय्याने ‘सोकल-सोंधा केबल नेटवर्क’ नावाने केबल चा व्यवसाय सुरु केला.
लहानपणापासून गाण्याच्या व्हिडियो पाहत आल्याने अलोमच्या डोक्यात देखील आता हिरो बनण्याचे खूळ चढले. आपण काही दिसायला आकर्षक नाही ही गोष्ट त्याला माहित होती, तरी हिरो बनण्याचे स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे त्याने ठरवले.
२००८ साली अतिशय मेहनतीने त्याने एक म्युजिक व्हिडियो शूट केला, ज्यात गावातील मुलींसोबतच त्याने काम केले होते. हा व्हिडियो त्याने आपल्या केबल टीव्हीवर प्रसारित केला. हा व्हिडियो पाहून फारच कमी लोकांनी त्याची स्तुती केली, तर उर्वरित लोकांनी त्याची खिल्ली उडवली, पण अलोम हार मानण्यातला नव्हता.
स्वत: पैसा उभारून तो म्युजिक व्हिडियो बनवत राहिला. आज त्याच्या नावावर तब्बल ५०० म्युजिक व्हिडीयोज आहेत. यात केवळ त्याने अभिनयच नाही तर लिखाण देखील केले आहे.
त्याला सर्वात जास्त प्रसिद्धी लाभली युट्युबवर! लाखोच्या संख्येनी त्याला हिट्स मिळाल्या आणि बांगलादेशमध्ये तो प्रसिद्धीस पावत गेला. आज बांगलादेशमधील सर्व मोठ्या हिरोईन्स त्याच्यासोबत काम करू इच्छीतात, त्याचं कारण म्हणजे अलोमची बांगलादेश मधील कामगार आणि गरीब लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे आणि हाच तो घटक आहे जो बांगलादेशच्या हिट चित्रपटांमध्ये, म्युजिक व्हिडियोजमध्ये महत्त्वाचे योगदान देतो.
म्हणूनच नवोदित आणि प्रस्थापित दोन्ही कलाकारांना कळून चुकले आहे की अलोम सोबत काम करणे म्हणजे १००% यशाची खात्री! पूर्वी अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्यास मनाई करायच्या, आज बांगलादेश मधील सगळ्याच नवीन अभिनेत्रींना हिरो अलोम पहिला ब्रेक देतो.
आज तो इतका प्रसिद्ध आहे की बांगलादेशचे बडे राजकारणी आणि क्रिकेटर्स देखील तो आला की स्वत: उठून त्याचे स्वागत करतात.
हा मनुष्य स्वत: स्वत:च्या हिंमतीने पुढे आला आहे. आपल्याला लोक हसतात याचे त्याला अजिबात वाईट वाटत नाही, उलट आपले हिरो होण्याचे स्वप्न पूर्ण झाले यातच त्याला समाधान मिळते.
सध्या बांगलादेशची परिस्थिती इतकी वाईट आहे की, ड्रग्ज, नशा यांमध्ये तरुण वर्ग पूर्णत: बुडाला आहे. अलोमला देखील अश्या सवयी सहज लागल्या असत्या, पण त्याचे ध्येयच वेगळे होते, जे आज पूर्ण झाले आहे. पण हातात पैसा खेळू लागल्यावर देखील त्याला एकही व्यसन लागलेले नाही याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
असा आहे हा हिरो अलोम.
दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय देणारा.
मेहनतीने सुपरस्टार बनून देखील वर्णद्वेषाचा बळी पडणारा!
===
हे ही वाचा – पुण्याच्या या आयआयटीयन व्यक्तीने हॉलीवूड अॅनिमेशनचा चेहरामोहरा बदलून टाकलाय!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.