Site icon InMarathi

सापशिडीचा शोध संत ज्ञानेश्वरांनी लावलाय, हा दावा कितपत सत्य?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेणारे, पाठीवर मांडे भाजणारे, सोळाव्या वर्षी रसाळ ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानदेव आपल्या सगळ्यांसाठीच दैवत आहेत.

गेल्या अनेक पिढ्या टाईमपास म्हणून जो सापशिडीचा खेळ आपण खेळतो तो माऊलींनी बनविला हे तुम्हाला माहित आहे का? विशेष म्हणजे ही अदभूत माहिती शोधून काढली एका परदेशी व्यक्तीने!

 

 

समजा कोणी तुम्हाला विचारलं, की आपण मोक्षपटाचा खेळ खेळूया का? तर तुमच्या चेहर्‍यावर भलं मोठं प्रश्न चिन्हं उमटेल, पण तेच जर का कोणी विचारलं आपण सापशिडी खेळूया का तर ते लगेच तुम्हाला कळेल कारण लहानपणापासून आपण हा खेळ खेळत आलो आहोत.

सापशिडी माहित नाही अशी व्यक्ती दुर्मिळच, पण हा सापशिडीचा खेळ तयार कोणी केला? हे कितीजणांना माहित आहे? समजा याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगितलं, की हा खेळ ज्ञानेश्वरमाऊलींनी बनविला तर? बसला ना आश्चर्याचा धक्का? पण हे खरं आहे.

सापशिडीचा खेळ ज्ञानेश्वरांनी शोधला आहे आणि आता हे लिखित पुराव्यानिशी सिध्द झालेले आहे. गंमत म्हणजे हा शोध कोणी भारतीय अभ्यासकानं प्रकाशात आणला नाही तर एका परदेशी व्यक्तीनं हे जगासमोर आणलं.

 

 

हा खेळ ज्ञानेश्वरमाउलींना कसा सुचला? माऊली आणि निवृत्तीनाथ गावात भिक्षा मागायला जात असत. हे दोघे गावात जात तेव्हा त्यांची लहान भावंडं, मुक्ताई आणि सोपानदेव घरात एकटेच असत. या दोघांचा जीव रमावा म्हणून ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांनी हा खेळ शोधून काढल्याचं सांगितलं जातं.

खेळ खेळत असताना त्यातून मनोरंजन व्हावं, पण काही शिकता आलं तर शिकताही यावं हा उद्देश असतोच. सापशिडीचा खेळ बनवितानाही माऊलींचा हाच उद्देश होता.

मोक्षपट बनविताना त्यांनी या खेळातून जीवनाचं सार शिकविण्याचं ठरवलं आणि त्यानुसार ५० चौकोनी घरांचा २० बाय २० अशा चौरसाकाराचा पट तयार केला.

या पटावरचं पहिलं घर हे मनुष्य जन्माचं घर आणि शेवटचं घर हे मोक्षाचं घर बनविलं गेलं. माणसाच्या आयुष्यात जसे चढ उतार येतात तसेच या पटावरही कधी शिड्य़ा असत तर कधी गिळून टाकणारा अडचणींचा, संकटांचा साप.

सापानं गिळल्यावर काही  घर मागे येऊन पुन्हा नवीन उमेदिनं खेळ खेळत मोक्ष मिळविणं हे या खेळाचं सार होतं. या खेळात असणार्‍या सापांना क्रोध, लोभ, मत्सर अशा षडरिपूंची नावं देण्यात आली होती आणि शिड्यांना सत्संग, अध्यात्म दया, बुध्दी यांची नावं होती.

 

 

आता प्रश्न हा पडतो की माऊलींची ही सापशिडी कोणी शोधली आणि कशी? डेन्मार्क येथील डॉ. एरिक सॅण्ड यांचे विद्यार्थी जेकॉब यांनी इंडियन कल्चरल ट्रॅडिशन या संकल्पने अंतर्गत मध्ययुगात भारतदेशात खेळले जाणारे खेळ यावर संशोधन सुरू केले.

या अभ्यासादरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं, की तेराव्या शतकातील भारतीय संत ज्ञानेश्वरांनी सापशिडीच्या खेळाचा शोध लावला आहे. याबाबत त्यांनी संशोधन तर सुरू केले मात्र ठोस अशी माहिती कुठेही उपलब्ध नव्हती.

या शोधादरम्यान त्यांना असं कळलं, की संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक वा. ल. मंजुळे यांच्याकडे काही माहिती मिळू शकेल.  मंजुळे यानी डेक्कन कॉलेजमधे काही संदर्भ सापडू शकतात असं सांगितल्यावर तिकडे शोधाशोध चालू झाली.

जेकॉब यांना डेक्कन कॉलेजमधून रा. चि. ढेरे यांच्या हस्तलिखितावरून दोन “मोक्षपटांची” माहिती मिळाली. हा मोक्षपट म्हणजेच सुरवातीच्या काळातला सापशिडीचा खेळ होय.

इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ खूप आवडला. इतर खेळांप्रमाणेच ते या खेळाला आपल्या देशात घेऊन गेले आणि तिथे याचं बारसं झालं, स्नेक ॲण्ड लॅडर.

 

 

आज हा खेळ परकियांनी आपल्याकडे आणलेला बोर्ड गेम म्हणून आपण ओळखत असलो, तरीही त्याचे मूळ इथे या भूमित आहे हे मात्र साफ विसरलो आहोत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version