' वडिलांचा विरोध, गच्चीवर सराव ते एका कार्यक्रमाचे २२ लाख, संघर्ष दांडिया क्वीनचा! – InMarathi

वडिलांचा विरोध, गच्चीवर सराव ते एका कार्यक्रमाचे २२ लाख, संघर्ष दांडिया क्वीनचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही काही गोष्टींची समीकरणं अगदी पक्की असतात. दांडिया म्हणलं, की फाल्गुनी पाठक हे इतक्या दशकांचं समीकरणं पक्कं आहे.

गरबा नाईटस आणि दांडिया नाईटस हिट करणारे कितीतरी आले आणि गेले मात्र नव्वदच्या दशकापासून असणारं फाल्गुनी नावाचं गारूड अजूनही कायम आहे. आजही फाल्गुनीच्या गाण्यांशिवाय गरबा अपूर्ण वाटतो.

 

falguni pathak inmarathi

 

मागच्यावर्षी करोनानं कहर केल्यानं एकूणच वर्षभरातले सगए सणवार उत्सव अगदी साधेपणानं घरातल्या घरात साजरे केले गेले. सार्वजनिक दांडियावर बंदी असल्याने इतक्या वर्षात प्रथमच मंडळांमधून घुमणारा , ए हालोSS हा गरब्याची हाक देणारा आवाज घुमला नाही.

इतक्या वर्षात प्रथमच उंचे डेरावाली बिगडे बना दे मेरे काम रे म्हणत दांडियाच्या आंबे मां चा फ़ेरा झाला नाही, की मैं तो भूल चली बाबुल का देस वर गरब्याच्या टाळ्या वाजल्या नाहीत.

दरवर्षी प्रमाणे फाल्गुनीच्या ‘चुडी जो खनके हात में याद पिया कई आने लगी’ च्या ठेक्यावरचा गरबाही प्रथमच झाला नाही. गेली अनेक दशकं दांडिया क्विन म्हणून ओळखल्या जाणार्‍या फाल्गुनी पाठकने कितीतरी वर्ष आणि तीन पिढ्या आपल्या तालावर नाचवल्या आहेत.

यंदा थोड्या बंधनात, नियमात बांधलेला का होईना, पण दांडिया गरबा देशभरात होतोय. एक वर्ष सुट्टी घेतल्यानंतर पुन्हा एकदा फाल्गुनीचा आवाज सर्वत्र ऐकू येऊ लागला आणि नवरात्र सजल्यासारखं वाटू लागलं आहे.

 

falguni pathak inmarathi 1

 

यंदा तर फाल्गुनीनं अमेरिकेतही दौरा आखला आहे. गुजराती समाजात अत्यंत लोकप्रिय अशा या गायिकेनं २०१३ या वर्षात या नऊ दिवसातल्या गरबा कार्यक्रमातून उच्चांकी म्हनजे तब्बल २ कोटी रुपयांची कमाई केल्याच्या बातम्यांनी भल्या भल्या गायकांना चकीत केलं होतं.

केवळ एकारात्रीच्या कार्यक्रमाचे ती २२ लाख घेत असे. ही गोष्ट ती प्रसिद्धीच्या पायर्‍या चढत असतानाच्या काळातली आहे.

तिच्या एका कार्यक्रमासाठी हजारोंची तिकीटं विकत घेऊन लोक येत असतात आणि तिला आमंत्रित करणारी मंडळं या तिकिटांमधून लाखो, करोडो कमवत असतात म्हणूनच आज ती निर्विवाद दांडिया क्विन आहे.

फाल्गुनी आपल्या मंडळात, संस्थेत गरब्यासाठी येणं ही प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे. फाल्गुनी स्वत:चा बॅण्ड, “ता थैय्या” घेऊन येते. तिच्या मते रात्रभर मनोरंजन करणार्‍या, न थकता गाणी म्हणणार्‍या गायकांना, वाजविणार्‍या साथीदारांना इतकी कमाई तर झालीच पाहिजे.

फाल्गुनी स्वत:ची तुलना आंब्याशी करते. ती म्हणते की आंबा कधी खातात? फक्त उन्हाळ्यात. उन्हाळा हा फळांचा राजा असलेल्या आंब्याचा सिझन आहे. आंब्यालाच मागणी असते. इतर फळांकडे कोणी ढुंकून पहात नाही. तसाच फाल्गुनी पाठक या नावाचा सिझन आहे. नवरात्र.

 

garba inmarathi

 

फाल्गुनीचं बालपण मुंबईतील एका उपनगरात गेलं आहे. मुंबईतील खार या उपनगरातल्या मध्यमवर्गीय गुजराती पाठक कुटुंबात १९७१ साली फाल्गुनीचा जन्म झाला. पाच मुलीत फाल्गुनी सर्वात धाकटी मुलगी होती.

या कुटुंबात सगळ्यांनाच संगिताची आवड होती. घरात सतत रेडिओ चालू असायचा आणि त्यावर गाणी लागलेली असायची. तिच्या एका बहिणीला शास्त्रीय गायन शिकवलं जात होतं. गाणं शिकविणारे घरीच येत असत.

बहिणीची शिकवणी चालू असताना फाल्गुनी तिच्या बाजूला बसून ऐकत असे. मात्र तिनं कधीच गायन शिकलं नाही. तिचा गळा उपजतच गाता होता. गच्चीवर जाऊन मोठ्या आणि मोकळ्या आवाजात ती गाणी गात असे.

तिची गाणी शेजार पाजारचे नुसते कौतुकानं ऐकतच असत असं नाही तर तिला, “फ़ालू अमूक गाणं गा” अशी फ़र्माईशही करत असत. हे तिचे पहिले प्रेक्षक होते. वयाच्या नवव्या वर्षी ती प्रथमच जाहिर कार्यक्रमात गायली. निमित्त होतं स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम.

 

falguni pathak inmarathi 2

 

या कार्यक्रमात तिनं कुर्बानी चित्रपटातलं लैला मै लैला गाणं गायलं आणि त्यासाठी तिला प्रथमच २५ रुपये मिळाले. ते तिनं घरी येऊन आईला दिले मात्र वडिल या प्रकारानं संतापले आणि त्यांनी तिला अशा प्रकारे पैसे घेऊन गाण्याची मनाई केली.

वडिलांनी मनाई करूनही फाल्गुनीनं त्यांचं कधीच ऐकलं नाही. त्या कार्यक्रमात गातच राहिल्या आणि प्रत्येक कार्यक्रमानंतर घरी येऊन वडिलांचा मार खात राहिल्या. अखेर वडिलांनी हार मानली आणि तिला साथ देण्याचा निर्णय घेतला.

१९८९ साली फाल्गुनीला तिचा पहिला ब्रेक मिळाला. इथून तिच्या दांडिया क्विन होण्याचा खर्‍या अर्थानं प्रवास चालू झाला. बीट्रेझ नावाच्या बॅण्डतर्फ़े तिनं दांडिया नाईटसमधे गायला सुरवात केली. दांडियाची सगळी गाणी ती या बॅण्डमधेच गायला शिकली.

१९९४ साली तिनं तिची लोकप्रियता आणि मागणी ओळखत स्वत:चा , ता थैय्या हा स्वतंत्र बॅण्ड सुरू केला. नव्वादच्या मध्यापर्यंत दांडिया नाईट्स आणि फाल्गुनी हे फ़ेविकॉल का मजबूत जोड सारखं समीकरण बनलं.

फाल्गुनी यांची वेशभूषाही आयकॉनिक बनली आहे. फाल्गुनी पाठक म्हणलं, की डोळ्यासमोर येणारी व्यक्ती ही इतर महिलांप्रमाणे नटलेली सजलेली, घागरा चोळीतली व्यक्ती येत नाही तर ट्राऊजर, जॅकेट आणि बॉयकट केलेली व्यक्ती येते.

 

falguni pathak inmarathi 3

 

नव्वदच्या दशकात अशी वेशभूषा (androgynous attire) करून वावरणं हे अनेकांच्या भुवया वर करणारं होतं. “याचं कारण माझं बालपण आणि माझे पालक आहेत” असं त्या सांगतात.

“चार मुलींनतर त्यांना मुलगा हवा होता आणि मी झाले. मग मुलाची सगळी हौस त्यांनी माझ्यात पूर्ण केली. मला नेहमीच मुलासारखं वागवलं गेलं आणि कपडेही तसे घातले गेले. नंतर नंतर मला त्यातच छान वाटू लागलं मुलींसारखं वागणं मला कधीच शिकवलं न गेल्यानं आणि मलाही ते करणं जमलं नाही. ” असं त्या सांगतात.

आवाजापासून दिसण्यापर्यंत फाल्गुनीचं वेगळेपण कायमच उठून दिसलं आणि फाल्गुनी पाठक हे नुसतं नाव न रहाता एक ब्रॅण्ड बनलं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?