' सिनेमाच्या वेडापायी खेड्यातील मुलीने घडवला इतिहास! रंगूचा ‘सुलोचना’पर्यंतचा प्रवास – InMarathi

सिनेमाच्या वेडापायी खेड्यातील मुलीने घडवला इतिहास! रंगूचा ‘सुलोचना’पर्यंतचा प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सुलोचना दीदी म्हणजे मूर्तिमंत सोज्वळता, वात्सल्य, खानदानीपणा, सोशिकता आणि त्याग मूर्ती!

१९४३ पासून १९९५ पर्यंत प्रदीर्घ काळ मराठी – हिंदी सिने सृष्टीत आपल्या अभिनयानंच नव्हे, तर वागण्या – बोलण्यानंही निर्माण केलेला आपल्या नावाचा दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरलेली आपली अभिनेत्री.

बेळगांव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट नावाच्या खेड्यात फौजदार शंकरराव दिवाण आणि तानी बाई यांच्या पोटी नवसासायासानं ३० जुलै १९२९ रोजी नागपंचमीच्या दिवशी जन्माला आली, म्हणून कोणी तिला नागू म्हणत. पण तिचं नाव ठेवलं होतं “रंगू”.

उघड्या रानमाळावर मनसोक्त हुंदडणारी, सायकल चालवणारी रंगू जेमतेम चौथीपर्यंत शिकली. लहानपणी रंगू चुलतभाबरोबर गावभर फिरताना बारा वर्षांची होईपर्यंत विजार शर्ट घालून सायकलवर उंडारायची हे कुणाला सांगूनही पटायचं नाही, पण खरं आहे ते.

बालपणापासूनच तिला सिनेमाचं मोठं वेड. फौजदाराची लाडाची लेक! तिला तिकीट कोण विचारतोय? गैबीसाहेबाच्या दर्ग्याच्या उरूसात सिनेमाची हौस रंगू मनसोक्त पुरवून घ्यायची. पडद्याच्या जास्तीत जास्त जवळ बसून सिनेमा पहाण्याची आवड तिला.

पडद्यामागे काय आणि कोण असतंय याची उत्सुकता असे. मावशी बनूअक्का यांना वाटे, पोरगी सिनेमात जाणार. त्यांनीच रंगूच्या सिनेमा वेडाला खतपाणी घातलं वाटतं.

जवळच्या चिक्कोडी या तालुक्याच्या गावचे‌ प्रसिध्द‌ वकील श्री. पुरुषोत्तम बेनाडीकर हे वडीलांचे मित्र. त्यांच्याकडे नेहमी जाणं येणं असे.  मावशीनी एकदा बेनाडीकर वहिनींकडे तक्रार केली, “नुसती भटकते, कामधाम करत नाही. शंकररावांनी लाडावून ठेवलंय अगदी”. त्यावर बेनाडीकर वकील म्हणाले, “आपण हिला सिनेमात पाठवू. मोठी कलाकार होईल ही “.

बेनाडीकर वकीलांच्या तोंडून नियतीच बोलत असावी बहुतेक. मास्टर विनायक हे बेनाडीकरांचे विद्यार्थी. मा.विनायक एकदा गुरुंना भेटायला चिक्कोडीला आले असतांनाच वकील साहेबांनी त्यांच्याकडं म्हणणं मांडलं. विनायकांनी संमती देऊन प्रफुल्ल चित्र मध्ये पाठवायला सांगितलं.

गुरुंना कबुल केल्याप्रमाणे विनायकरावांनी रंगूला महिना ३० रुपये पगारावर ठेवून आपल्याकडं कामावर घेतलं. रोज सकाळी ११ ते ६ जावं लागे स्टुडिओत हजेरी लावायला. लवकरच नव्या सिनेमाचं काम सुरू झालं. १९४३ साली “चिमुकला संसार” या सिनेमातून रंगूचा अभिनय संसारही सुरू झाला. नवागत रंगू आणि नवेच राजा गोसावी यांच्यावर एक सीन चित्रीत करण्यात आला.

 

sulochana didi

 

प्रफुल्ल चित्र मधली सारी मंडळी सुशिक्षित, बरेचजण पदवीधर. शहरी, बरेचदा इंग्रजी, एरवी शुद्ध शुद्ध मराठी बोलणारी ती माणसं. रंगू गावंढळ , खेडवळ भाषा बोलणारी. काही जण तिची टिंगल करत. खोचक टिका ऐकून रंगूला जीव नकोसा झाला अगदी, पण वडीलांनी समजूत काढली.

अशा अपमानास्पद परिस्थितीत तिच्याच वयाची एक चुणचुणीत मुलगी तिच्या मदतीला धावून आली. ही लहानपणीची मैत्री आजवर (अगदी नव्वदी नंतरही) टिकवून ठेवणारी मैत्रिण म्हणजे भारतरत्न लता दीदी. रंगूला दिलासा मिळाला. ती रमायला लागली, तोच प्रफुल्ल चित्र कोल्हापूरातून मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला विनायक रावांनी. त्यांना हिंदी सिनेमा सुध्दा बनवायचे होते. आग्रह झाला तरी रंगू काही मुंबईला जायला धजावली नाही.

 

sulochana lata didi inmarathi

 

इथंच तिच्या जीवनात नवी कथा घडली. श्री आबासाहेब चव्हाण यांच्याशी तिचा विवाह झाला. आबासाहेबांची भालजी पेंढारकर यांच्याशी मैत्री होती. पत्नीनं सिनेमात काम करावं अशी त्यांचीही इच्छा होती. रंगूला सहज भालजींच्या प्रभाकर स्टुडीओत प्रवेश मिळाला. भालजींनी तिची पारख केली होती. तिचं सोज्वळ रुप नजरेत भरावं असंच होतं.

“महारथी कर्ण ” मध्ये रंगूला दासीची भूमिका मिळाली. कुंतीची भूमिका करणाऱ्या दुर्गाबाई खोटे यांच्या रुप अभिनय आणि दराऱ्यानं रंगू पुर्णपणे भारावून गेली. रंगूला पाहून दुर्गाबाईंनी ही उद्याची भारतीय सिनेसृष्टीत आघाडीची अभिनेत्री ठरेल असं बिनचूक भाकीत केलं होतं. महारथी कर्ण मध्ये बऱ्याच समूह दृश्यात रंगू चमकली.

पुढच्या वाल्मिकी सिनेमात सूर्यकांत राम, तर ती सीतेच्या भूमिकेत ” दिसले” शब्दशः दिसले, कारण त्यांना संवादच नव्हते फक्त दर्शन देण्यापुरते रोल होते.

१९४४ साली छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतांना निमंत्रितांसमोर सादर करण्यासाठी श्री जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली “करीन ती पूर्व” या नाटकाचा प्रयोग बसवला गेला. त्या नाटकात गजराची- हिरोजीची बायकोची प्रमुख भूमिका रंगूला मिळाली. त्याचवेळी बाबांनी त्यांचं नवं नामकरण केलं “सुलोचना”.

पुढच्या सासुरवास या सिनेमात चंचल वृत्तीच्या फॅशनेबल तरुणीची भूमिका सुलोचनाला दिली गेली. ती गाजली.

गांधी वधोत्तर जाळपोळीत भालजींच्या स्टुडीओची राखरांगोळी झाली. बऱ्याच मंडळींची पांगापांग झाली. सुलोचनाही पुण्यात गेली. त्याकाळात पुण्यात मराठी चित्रपटांचं सुवर्णयुग होतं म्हणा ना. राजा परांजपे यांच्या दिग्दर्शनाखालील “जीवाचा सखा” या चित्रपटात काम मिळालं.

हा चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला. पुढं‌ दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या “स्री जन्मा ही तुझी कहाणी” ” बाळा जो जो रे” या सिनेमातून सुलोचनाचा अभिनय पाहून स्त्री प्रेक्षक ढसाढसा रडत.

अनंत माने यांच्या ओवाळणी, शाहिर परशुराम, धाकटी जाऊ , सांगत्ये ऐका या चित्रपटात सुलोचना बाईंना अभिनयाच्या निरनिराळ्या छटा दाखवता आल्या. दिनकर द.पाटील यांच्या “तारका” चित्रपटात सुलोचना सिनेमा नटी व चंद्रकांत दिग्दर्शक अशा भूमिकाही प्रेक्षकांना आवडल्या.

आचार्य अत्रे यांच्या महात्मा फुले या चित्रपटात त्या सावित्रीबाई फुले झाल्या होत्या. या चित्रपटाला फाळके अवार्ड मिळालं. भालजींनी पुन्हा स्टुडीओची उभारणी केल्यावर शिवा रामोशी, मीठभाकर, साधी माणसं, राजा शिवाजी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका तर हातखंडा होत्या. त्यांची जिजाऊंची भूमिका सर्वांना आवडते, पण मला विशेष आवडलेल्या भूमिका म्हणजे “संत गोरा कुंभार” मधली गोरा कुंभाराची बायको, “वहिनीच्या बांगड्या” मधली वहिनी आणि मधुकर पाठकांच्या “प्रपंच” मधली ” पारू”.

फाटक्या , जोड लावलेल्या लुगड्यातही सुलोचनाबाई एवढ्या सुंदर‌रित्या वावरल्या आहेत. सहा सात पोरांचा पोरवडा , नवऱ्याचा मृत्यू , मुंबईच्या इस्पितळात खाटेवर निपचित पडलेल्या पोराचं मरण, मरणाआधीच त्या बापड्या आईच्या डोळ्यात दिसत होतं. मूक आक्रोश करण्याचं काम त्यांचे डोळेच करत होते. राजा ठाकूर यांच्या “एकटी” ची( सतत फिरणारं मशिनचं चाक आणि त्या पार्श्वभूमीवर मोठा होत जाणारा मधू ( डॉ. काशिनाथ घाणेकर) भूमिकाही त्या अक्षरशः जगल्या. तशीच “मोलकरीण ” मधली ( “देव जरी मज कधी भेटला” गाणारी ) कोकणातली आई.

“वहिनीच्या बांगड्या” माझ्या जन्माच्या आधीचा चित्रपट, पण आईकडून इतकं ऐकलं होतं की पुढं दूरदर्शनवर बघतांना शॉट नि शॉट आठवत होता. ती भूमिका काळजात रुतून बसली ती बसलीच. ही कथा प्रसाद मासिकाचे संपादक य.गो. जोशी यांची. मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील थोरल्या वहिनीची आणि दिराची गोष्ट.

आजवर सुलोचना बाईंना मिळालेल्या सगळ्या भूमिका मराठमोळ्या, खानदानी घराण्यातील स्त्रियांच्या वा बहुजन समाजातील गोरगरीब बायकांच्या, शेतकरी कुटुंबातील नवऱ्यासाठी भाकर घेऊन बिगी बिगी शेतावर जाणाऱ्या बायकांच्या.वा पाटलीणबाईंच्या व्यक्ती रेखा रंगवणाऱ्या. भाऊबीज (कलावती ) व तारका ( सिनेनटी ) हे अपवाद.

असं वाचलंय, की वहिनीची भूमिका सुलोचना बाईंना दिली हे जोशीबुवांना फारसं पसंत पडलं नाही. त्यांना ते पटेचना. पण प्रत्यक्षात सिनेमा पाहिल्यावर मात्र त्यांनी सुलोचनाबाईंना दाद दिली. या चित्रपटात ओचे पदराची नऊवारी साडी चापून चोपून नेसलेल्या सुलोचनाबाई इतक्या सुंदर आणि सोज्वळ दिसतात की उपमा नाही.

त्यांना नऊवारी लुगडं नेसवायला मला वाटतं चांदबीबी असायच्या कोल्हापूरात तरी आणि मेकअप साठी पंढरीदादा जूकर. जिजाऊंच्या भूमिकेतही त्यांचं रूप खुलून दिसलंय नेहमीच. अन्नपूर्णा या सदाशिव रावकवींच्या चित्रपटात “तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्वदिशा उजळती , अरुण उगवला, प्रभात झाली —— उठ महागणपती ” गाणाऱ्या सुलोचना बाई अजून डोळ्यासमोर आहेत माझ्या.

वसुंधरा पटवर्धन यांच्या “मधूची आई “वरून निर्मिलेला ” एकटी ” असाच हमखास रडवणारा चित्रपट. मशिनवर बसून दिवसरात्र सतत शिवणकाम करणारी ती आई विसरु म्हणता विसरता येत नाही.

अरविंद गोखले यांच्या कथेवर आधारित “माझे घर माझी माणसं “मधली डॉ इरावतीही संवेदनशील प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. वर्हाडी आणि वाजंत्री मधली त्यांची ग.दि.माडगुळकरांची बायको- विनोद निर्माण करणारी कानडी ढंगाची “ह्ये मुलगं” टाईप मराठी बोलणारी मुलीची आई गालातल्या गालात हसवून गेली.

सुलोचना बाईंची प्रेक्षकांना न आवडलेली भूमिका एकच भाऊबीज चित्रपटातील पायात घुंगरू बांधून नाचणाऱ्या बहिणीची.

सिनेमाच्या वेडापोटी कोल्हापूरात आलेली ही अल्पशिक्षित खेडवळ मुलगी. वयाच्या १४ व्या वर्षी प्रफुल्ल चित्र मधून सिनेमात प्रवेश केला आणि तब्बल साठ वर्ष पडद्यावर झळकत राहिली. कधी नायिका, गरीब, श्रीमंत, खानदानी, दरिद्री, हरिज , ब्राह्मणी मध्यमवर्गीय अशी नाना रुपं धारण केली.

पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक सगळ्या प्रकारच्या भूमिका आल्या त्यांच्या वाट्याला. मास्टर विठ्ठल पासून चंद्रकांत, सूर्यकांत ( मांडरे), चंद्रकांत गोखले, चित्तरंजन कोल्हटकर, अशा एकापेक्षा एक मराठी आणि राज, देव आनंद, दिलिप कुमार, दादामुनी अशोक कुमार, गीता बाली, नूतन, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन पर्यंत हिंदी अभिनेत्यासोबत कामं केली.

भूमिकेची लांबी रुंदी त्यांनी कधी पाहिली नाही. नायिकेची मुख्य भूमिका नसली तरी सुलोचना दीदींचा ठसा उमटला नाही असं कधी झालं नाही.

भालजी पेंढारकर या आपल्या गुरुंनी आपल्याला जे दिलं ते आपलं भाग्य, असं त्या मानतात. त्यांनी नुसता अभिनय नाही शिकवला तर जगाच्या रंगमंचावर जगायला शिकवलं असं त्यांना वाटतं. भाषा शुध्द, स्वच्छ व्हावी म्हणून बाबांच्या सांगण्यानुसार अर्थ समजत नसतांना मोठमोठ्यानं संस्कृत वाड्मयसुध्दा वाचलं.

भालजी पेंढारकर यांच्या हाताखाली शिकतांना दिवस दिवसभर तालमी कराव्या लागल्या. सकाळपासून रात्रीपर्यंत. वातावरण अगदी घरगुती , एखाद्या मोठ्या कुटुंबात असावं असं. पण काम मात्र शिस्तीतच व्हावं लागे , टाळाटाळ चालायची नाही. कोवळ्या संस्कारक्षम वयात मनावर बिंबवलेली ती शिस्त अंगात भिनून गेली जणू .

गुरुवर्य भालजीबाबांनी अभिनयाबरोबरच शिष्टाचार शिकवले. परंपरांचं भान दिलं. कामाबद्दलची निष्ठा शिकवली. देव – देश अन् धर्मासाठी जगावं कसं याचे धडे तिथंच मिळाले छोट्या रंगूला.

जरा आधीच्या काळात कलावंतिणीसुध्दा सिनेमात काम करायला, तोंडाला रंग लावून घ्यायला तयार नसत. पण दुर्गाबाई खोटे, रत्नमाला बाई यांच्यासारख्या प्रतिष्ठित घराण्यातील स्रिया अभिनय क्षेत्रात आल्या आणि सिनेअभिनेत्री बनणं म्हणजे बाऊ करण्यासारखे‌ दिवस उरले नाहीत.

सुरुवातीला दिवस दिवस कलाकारांची कामं बघत निरिक्षण करण्यात घालवली दीदींनी. तो वस्तुपाठच होता एक प्रकारचा. ऍक्टिंग किंवा फिनिशिंग स्कूल्स नव्हती तेव्हा.

भालजींचे अधिकतर चित्रपट ऐतिहासिक. त्यात काम करायचं तर तलवार बाजी, घोडसवारी येणं गरजेचं. ते शिकता आलं, शिकावं लागलं. मास्टर विठ्ठल यांच्या बरोबर काम करतांना त्याचा उपयोग झाला.

सुलोचना बाईंना हिंदी चित्रपटात पहिल्यांदा संधी मिळाली ती १९४४ साली “महारथी कर्ण” मध्ये. त्यानंतर कितीतरी हिंदी चित्रपटात. संतपट, बहुतांश पौराणिक चित्रपट व सामाजिक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.

“औरत यह तेरी कहानी” सारखे काही त्यांच्या मराठी चित्रपटांची (स्त्री जन्मा ही तुझी कहाणी) हिंदी आवृत्ती ( रिमेक) होते. त्यांची बिमल रॉय यांच्या “सुजाता” मधली भूमिका विशेष गाजली.

काही काळानंतर हळूहळू आईच्या भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली. तेव्हा सुलोचना बाईंना निर्णय घेणं कठीण होऊन बसलं. पण अशावेळी ललिता पवार यांनी वडीलधाऱ्याच्या भूमिकेतून त्यांना सल्ला दिला , “अगर लंबी करियर चाहिए तो कॅरेक्टर रोल करो” हा सल्ला सुलोचना बाईंना मानला आणि पुढचं सारं आपल्याला ठाऊकच आहे.

बाईंनी महिपाल पासून दादा मुनी- अशोककुमार , राज कपूर , देव आनंद , दिलिप कुमार यांच्या समवेत काम केलं. तसंच पुढच्या पिढीतील धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बरोबरही त्यांनी भुमिका केल्या. सुलोचना बाईंची नवी ओळख “सुलोचना दीदी” अशी झाली ती “औरत ये तेरी कहानी ” या चित्रपटापासून.

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी मधली “अक्का” हिंदीत “दीदी” बनली होती आणि सुलोचना बाई सगळ्यांच्याच दीदी होऊन बसल्या. मात्र हे संबोधन निव्वळ शुटिंग पुरतं कधीच नव्हतं. आपली स्वच्छ, सोज्वळ प्रतिमा मायानगरी हिंदी सिनेसृष्टीत कायम राखण्यात त्या यशस्वी ठरल्या. मराठमोळ्या खानदानी संस्कृतीची अदब आणि दबदबा त्यांनी आजवर टिकवून ठेवला आहे.

 

sulochana didi inmarathi 1

 

मुखवट्यांच्या या दुनियेत आपलं पारदर्शक मराठीपण त्यांनी सदैव शाबूत ठेवलं. अनेक चांगल्या भूमिका, अगणित पुरस्कार ( ती यादी इथं देण्याचं पाळलेली बरं.) आणि मुबलक संपदा मिळवूनही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. “पूरेपूर कोल्हापूर” म्हणजे काय हे सुलोचना दीदींच्या वागण्यातून सतत दिसत राहिलं.

माणसं जोडण्याची आणि नातेसंबंध टिकवून ठेवण्याची कला त्यांना अवगत आहे. प्रारंभीच्या काळात कोल्हापूरात स्टुडिओत जोडलेली नाती जन्मभर टिकवली आहेत त्यांनी. भालजींचा पेंढारकर परिवार , पुण्याच्या पुना गेस्ट हाऊसचा सरपोतदार परिवार, कोल्हापूर चा गजबर परिवार अशी कित्येक उदाहरणं आहेत.

मैत्री करावी तर सुलोचना दीदींनीच. पुण्याच्या माणिक बेहरे यांच्याशी जमलेली त्यांची मैत्री अखंड आहे. एकदा संबंध जोडले, की त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी दीदी हजर असणार हे नक्की. लग्नप्रसंगी घरच्यासारखा भरघोस अहेर करणार आवर्जून.

हे लिखाण काल – गुरुवारी सायंकाळी टाईप करत असतांना मला एक फोन आला, काय करताय म्हटल्यावर मी म्हटलं, “असं असं लिहितेय सुलोचना दीदींविषयी उद्यासाठी” तर त्यांना आठवलं , पूर्वी जाधव म्हणून दीदींचे मेकअपमन होते कोल्हापूरात. त्यांच्या घरच्या लग्नासाठी दीदी मुद्दाम आल्या होत्या मुंबई वरून.

हे झालं लग्नाचं. पण दीदींचं “कोल्हापुरी स्पिरीट” खरं दिसलं होतं ते दत्ता माने नावाचे मराठी दिग्दर्शक मुंबईच्या रस्त्यावर अकस्मात मृत्यू पावले, तेव्हा दीदींनी दाखवलेल्या माणुसकीतून. गावावरून मानेंच्या घरची माणसं येऊन, मृतदेह ताब्यात घेईपर्यंत दीदींनी त्यांचं पार्थिव चक्क आपल्या घरात आणून ठेवलं होतं.

या त्यांच्या जगावेगळ्या वेगळेपणामुळेच मायावी हिंदी चित्रपटात सुध्दा आजही त्यांचे पाय सच्चेपणानं आदरपूर्वक धरले जातात.

“राज” चित्रपटाच्या शुटिंग वेळी राजेश खन्ना आणि ” रेश्मा और शेरा “च्या शुटिंगवेळी अमिताभ बच्चन यांची पारख करुन हे तरुण सुपर स्टार होणार अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली होती. दोघांनीही दीदींना आईसारखा मान दिला आहे नेहमी. दादा मुनी अशोककुमारसुध्दा त्यांना आदरानं वागवत.

 

sulochana didi 1

 

गुरू भालजीबाबांकडून मिळालेला “देव – देश अन् धर्मासाठी” काही करण्याचा मंत्र दीदी कधीच विसरल्या नाहीत. त्यांच्या वहिनींचं निधन झालं तो काळ भारत चीन युध्दाचा ( १९६२) वहिनीचे सर्व दागिने त्यांनी मुंबईला परतल्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले युध्द फंडासाठी.

गरजूंना मूकपणे मदत करत रहाणं हा त्यांचा जणू धर्म आहे. आज पूर्वीसारखी आवक नसली तरी त्या यथाशक्ती समाजातील गरजूंना मदत करत रहातात. मग ते थकलेले कलाकार असोत, तंत्रज्ञ असोत वा कामगार.

त्यागमूर्ती आईची भूमिका त्यांनी फक्त पडद्यावर रंगवली असं नाही, तर आयुष्यभर ती त्या जगत राहिल्या. कुटुंबातल्या वीस बावीस जणांची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडली. स्वतः ची एकुलती मुलगी पण आठ भाचवंडात व तिच्यात भेदभाव कधी केला नाही. त्या सगळ्यांची “आत्ती ” होऊन जगल्या कायम.

हे कमी की काय , म्हणून कै.मधू आपटे ( मराठी – हिंदी चित्रपटात तोतरं बोलत विनोदी भूमिका करणारे ) यांना मायेनं आपल्या जवळ घेतलं. त्यांचं सारं केलं. त्यांची “साठी” सुध्दा मोठ्या कौतुकानं साजरी केली. ही संवेदनशीलता अंगातच त्यांच्या.

दीदींना स्वतः ला वैवाहिक जीवनाचं सौख्य फार काळ लाभलं नाही. आबासाहेब अकाली गेले. पुढं एकुलत्या मुलीच्या – कांचनच्या वाट्याला सुध्दा पतीनिधनाचा धक्का पचवणं आलं. दीदीसाठीसुध्दा हे सहन करण्याच्या पलीकडचं‌ होतं.

कांचन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या बारा तेरा वर्षांच्या प्रेमसंबंधात लग्न केलंच पाहिजे या मुद्द्यावर त्या ठाम राहिल्या. हे त्यांचे विचार जुनाट वाटतील कोणाला , पण स्वतःच्या तरुण विधवा वहिनीला पुनर्विवाहाची परवानगी देण्याचा सुधारकी विचारही त्या करू शकल्या. मात्र स्वत:ला तरुण वयात पुनर्विवाह करण्याच्या अनेक संधी येऊनही मुलगी आणि आपली माणसं यांच्यासाठी त्यांनी तो मोह बाजूला सारला.

माणसं आणि गोतावळा हेच त्यांचं सुखनिधान. नव्या पिढीच्या कल्पना, योजना, प्लॅन्स जाणून घेण्यात त्यांना रस. आता आतापर्यंत चित्रपट गृहात जाऊन सिनेमा पहायच्या. आता मात्र घरातच बघतात. चांगली नाटकं पाहाणं, उत्तम पुस्तकं वाचणं ही आवड.

 

sulochana chavan inmarathi

 

शिक्षण कमी झालेलं असलं तरी आपली अभिरुची त्यांनी प्रयत्नपूर्वक वाढवली आहे. पांढरा व भगवा हे आवडते रंग . पांढऱ्या रंगाची भगव्या काकांची साडी म्हणजे अपूर्वाई. पुरणपोळी, मोदक आणि कोल्हापूरी मटण हे आवडते पदार्थ.

आवडती मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सिनियर) तर हिंदी शबाना आझमी आहेत. आवडता हिंदी अभिनेता दिलिप कुमार आणि मराठीतले सुबोध भावे व उपेंद्र भावे.

आता नव्वदी ओलांडली तरी दीदी आरोग्य टिकवून आहेत. ( कोल्हापुरच्या मातीचाच गुण असावा हा ! उदा. सुलोचनादीदी आणि रमेश देव )

देवावर श्रध्दा असली तरी देव देव फार करत नाहीत त्या.पण श्रध्दा जपलीय ती गुरुंवरची. “आज मी आहे ती त्यांच्या मुळे” भालजी पेंढारकर )असं त्या मानतात. बाबांनी फक्त अभिनय नाही शिकवला , तर जगावं कसं हे सुध्दा शिकवलं. समाजात वावरताना कसं वागावं – बोलावं हे त्यांच्यामुळेच शिकलो” ही कृतज्ञता आहे. बिनभितीच्या या आयुष्यानं त्यांना खूप धडे दिले.

 

sulochana didi inmarathi 2

 

“लाईटस् , कॅमेरा , ऍक्शन” हे शब्द १९४३ साली पहिल्यांदा कोल्हापूरात प्रफुल्ल चित्र कंपनीत “चिमुकला संसार ” ( मा. विनायक) ६6 च्या शुटिंग वेळी कानावर पडले आणि आयुष्यभर कानात गुंजत राहिले.जन्मभर साथ दिलेले ते शब्द आताशा कानावर पडत नाहीत , पण दीदी जुन्या आठवणींत रमून जातात, पतवंडांच्या गडबडगुंड्यात रमून समाधानी रहातात. आल्यागेलेल्यांची विचारपुस आणि पाहुणचार करतात आणि आपल्या वत्सल नजरेतून सगळ्यांना कासवीच्या मायेनं न्हाऊमाखू घालतात.

( “लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू , इथून द्रुष्ट काढते निमिष एक थांब तू ” हे गाणं आठवलं की नाही ?) जन्मभराची ही माऊली आजही तशीच माया पांघरत राहिली आहे आपल्या सगळ्या गोतावळ्यावर.

सुलोचना दीदी म्हटलं की माझ्या नजरेसमोर त्यांच्या एकापेक्षा एक सरस भूमिकांचा एक “कोलाज” तयार होतो. मोलकरीण मधली आणि एकटी मधली आई , देव पावला ” मधली “कौसल्येचा राम बाई ” गात मागावर विणणारी कोष्ट्याची मुलगी , “विठू माझा लेकुरवाळा” मधली जनाबाई , “वहिनीच्या बांगड्या” मधली वहिनी , साधी माणसं मधली जयश्री गडकर ची “गडनी सजनी “वहिनी आणि “प्रपंच “मधली पारु आणि जिजाऊ विसरू म्हणता विसरता येत नाहीत .

“अभिनय म्हणजे स्विच ऑन – स्विच ऑफ करण्याची हातोटी” असं काही जणांचं म्हणणं असलं तरी दीदी या भूमिका अक्षरशः “जगल्या” आहेत. परकायाप्रवेशासारखी एखादी किमया देऊनच पाठवलं असावं त्यांना “निर्मात्यानं”!

हा देखणा, तरीही सोज्वळ, देवघरात उजळणाऱ्या समईसारखा “आपलासा” चेहरा तशाच निर्मळ वृत्तीसह जपणाऱ्या सुलोचना दीदी “आपल्या कोल्हापूरच्या” आहेत याचा आपल्याला यथार्थ अभिमान वाटतो ना ?

इथली ही “वहिनी” , “आई” साऱ्या महाराष्ट्राची जणू “तुळस ” होऊन बसली यांचं कौतुक आणि अभिमान असाच कायम बाळगायला हवा आपण!
सुलोचना दीदींना दीर्घ आयुरारोग्य , शांती व समाधान लाभो ही करवीर निवासिनी अंबाबाई चरणी प्रार्थना!
संदर्भ व फोटो :
सुलोचना दीदी , संपादक : श्री रमेश पेठे
नाथ हा माझा – कांचन घाणेकर
साधा माणूस – भालजी पेंढारकर.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?