' एका सुपरस्टारला सोडवण्यासाठी सरकारने वीरप्पनला तब्बल १५ करोड दिले होते? – InMarathi

एका सुपरस्टारला सोडवण्यासाठी सरकारने वीरप्पनला तब्बल १५ करोड दिले होते?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुख्यात तस्कर आणि दरोडेखोर वीरप्पनचे नाव घेतले की आपल्याला आठवतात त्याच्या मोठमोठ्या मिश्या आणि क्रूरता! कुस मुनीस्वामी वीरप्पन असे त्याचे पूर्ण नाव होते. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात तो हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची शिकार करत असे. तसेच तो चंदनाची देखील तस्करी करत असे.

 

 

त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना तो निर्दयीपणाने मारून टाकत असे. पोलीस, वन्य अधिकारी यांची हत्या आणि अपहरणाचे अनेक गुन्हे त्याने केले होते. असे म्हणतात की सरकारने त्याला पकडण्यासाठी जवळजवळ २० कोटी रुपये खर्च केले होते.

 

veerappan inmarathi
cyberspaceandtime.com

 

वीरप्पनचा पोलिसांवर विशेष राग होता. त्याचा असा समज होता की त्याची बहीण मारी आणि भाऊ अर्जुनन यांच्या हत्येसाठी पोलीसच जबाबदार आहेत.

वीरप्पन आणखी एका गोष्टीसाठी कुख्यात होता. ती गोष्ट म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींचे अपहरण करायचे, त्यांच्या हत्येची धमकी द्यायची आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. असे त्याने अनेकदा केले. त्यापैकी डॉक्टर राजकुमार यांच्या अपहरणाची केस तर चांगलीच गाजली होती.

अर्थात नेमके कसे काय घडले याबद्दल कर्नाटक सरकारने अजूनही जाहीर खुलासा केला नाही पण पोलीस आणि पत्रकारांनी त्या वेळी ह्या घटनेबाबत बरीच माहिती दिली होती आणि या केसवर अनेक पुस्तके सुद्धा लिहिली गेली. रामगोपाल वर्मा आणि एम आर रमेश यांनी या घटनेवर आधारित सिनेमे सुद्धा बनवले.

काही दिवसांपूर्वी एका तामिळ पत्रकाराने असे म्हटले की सरकारने डॉक्टर राजकुमार या प्रसिद्ध अभिनेत्याला वीरप्पनच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याला भरपूर मोठी रक्कम दिली होती.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर राजकुमार यांचे वीरप्पनने ३० जुलै २००० च्या रात्री त्यांच्या फार्महाउस मधून अपहरण केले होते. राजकुमार त्यांच्या पत्नी पार्वथाम्मा यांच्यासह त्यांच्या गजनूर येथील फार्महाउसवर राहण्यासाठी गेले होते.

 

rajkumar inmarathi

 

अपहरण कसे झाले याची तर माहिती नाही पण कर्नाटकवासियांसाठी दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली ती या धक्कादायक बातमीने की त्यांच्या लाडक्या अभिनेत्याचे कुख्यात क्रूर दरोडेखोर वीरप्पनने अपहरण केले आहे.

वीरप्पनने राजकुमार यांना ना तब्बल १०८ दिवस स्वतःच्या तावडीत ठेवले होते आणि अखेर त्यांची सुखरूप सुटका झाली.

असे म्हणतात की सुटकेच्या दिवशी पार्वथाम्मा यांनी एस एम कृष्णा यांची दुपारी दीड वाजता भेट घेतली होती. त्या आधी सकाळी एस एम कृष्णा तामिळनाडूला गेले होते आणि त्यांनी तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एन करुणानिधी यांची भेट घेतली होती. याबाबत तामिळनाडूचे पत्रकार शिवा सुब्रमण्यम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.

याबद्दल अधिक माहिती शिवा सुब्रमण्यनच्या “लाईफ अँड फॉल ऑफ वीरप्पन” पुस्तकात वाचायला मिळेल. त्यांच्या पुस्तकात त्यांनी असेदेखील लिहिले आहे की राजकुमार यांच्या सुटकेसाठी वीरप्पनला भरपूर मोठी रक्कम द्यावी लागली.

सुरुवातीला वीरप्पनने राजकुमार ह्यांच्या सुटकेसाठी एक हजार कोटींची मागणी केली होती. त्याने नऊशे कोटी रुपये किमतीचे सोने आणि १ कोटी रोकड देण्याची मागणी केली होती.

सरकारने नक्कीरण या मासिकाचे संपादक गोपालन यांच्या मदतीने वीरप्पनशी रकमेबाबत समझोता केला आणि १५ कोटी रुपये वीरप्पनला तीन हफ्त्यांमध्ये देण्यात आले असे म्हणतात.

 

nakkiran goapl inmarathi

 

वीरप्पनचे १५ कोटींवर समाधान व्हावे यासाठी आणि त्याचे मन वळवण्यासाठी नक्कीरण गोपालन यांना वीरप्पनशी सहा वेळा चर्चा करावी लागली होती. केवळ पैसाच नव्हे तर राजकुमार यांना सोडवण्यासाठी वीरप्पनच्या इतर काही मागण्या देखील सरकारला पूर्ण कराव्या लागल्या होत्या.

या सगळ्या मागण्यांबद्दल “लाईफ अँड फॉल ऑफ वीरप्पन” या पुस्तकात विस्तारपूर्वक माहिती दिलेली आहे.

थालवाडी जवळील गजनूर येथील फार्महाउसमधून राजकुमार यांच्यासह त्यांचे नातेवाईक गोविंदराज, नाकेश आणि त्यांचे सहाय्यक नागप्पा यांचेही अपहरण करण्यात आले होते.

तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारच्या वतीने वीरप्पनशी चर्चा करण्यासाठी गोपालन यांच्या नेतृत्वाखाली एक टीम जंगलात पाठवण्यात आली होती. आणि या पुस्तकाचे लेखक पी शिवा सुब्रमण्यन देखील टीममध्ये होते जे जंगलात जाऊन वीरप्पनशी चर्चा करून आले होते.

अखेर वीरप्पनने स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घेतल्यानंतर १३ नोव्हेम्बर २००० रोजी राजकुमारची सुटका केली. त्यावेळी देखील चर्चा झाली होती की राजकुमार यांच्या सुटकेसाठी वीरप्पनला पैसे दिले पण त्यावेळी राजकुमारच्या कुटुंबीयांनी आणि कर्नाटक शासन आणि तामिळनाडू शासनाने “ही एक अफवा आहे” असे म्हणत पैसे दिल्याचे नाकारले होते.

 

veerappan 2 inmarathi

 

२०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात शिवा सुब्रमण्यन यांनी लाईफ अँड फॉल ऑफ वीरप्पन पार्ट टू अँड थ्री हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचा पहिला भाग मागच्या वर्षी प्रकाशित झाला होता. या पुस्तकामुळे राजकीय क्षेत्रात वादंग उठले.

शिवा सुब्रमण्यन हे पहिले पत्रकार आहेत जे वीरप्पनला प्रत्यक्ष भेटले होते आणि त्यांनीच वीरप्पनचा फोटो प्रकाशित केला होता. ते म्हणतात की, “तामिळनाडू आणि कर्नाटकच्या लोकांना सत्य जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. वीरप्पनला १५ कोटी २२ लाख रोकड देण्यात आली.

हे पैसे डॉक्टर राजकुमार यांच्या सुटकेसाठी कर्नाटक सरकारने दिले. कर्नाटक सरकारने दोन हफ्त्यांत दहा कोटी रुपये वीरप्पनपर्यंत नक्कीरण गोपाल यांच्या मार्फत पोचवले.

शेवटचा ५ कोटी २२ लाख रुपयांचा हफ्ता १३ नोव्हेम्बर २००० रोजी वीरप्पनला देण्यात आला आणि वीरप्पनने राजकुमार यांना डीव्हीकेचे अध्यक्ष कोलथूर मणी आणि टीडीएमचे अध्यक्ष पी नेदुमारन यांच्या ताब्यात दिले. राजकुमार यांच्या सुटकेच्या तीन दिवसांआधी वीरप्पनचे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्याशी सॅटेलाईट फोनवर बोलणे झाले होते.”

त्यांनी असेही सांगितले की या प्रकरणात वीरप्पनशी चर्चा करण्यासाठी जी टीम तयार करण्यात आली होती त्यावर तामिळनाडू सरकारने देखील १० लाख रुपये इतका खर्च केला होता.

या प्रकरणाबद्दल नक्कीरण गोपाल यांना विचारले असता ते म्हणतात की राजकुमार यांच्या सुटकेसाठी वीरप्पनला काहीही दिले नाही. त्यांची सुटका वीरप्पनशी विविध प्रकारे केलेल्या चर्चेमुळे झाली.

 

nakkiran rajkumar inmarathi

 

अर्थात काय खरे काय खोटे हे त्या वीरप्पनला आणि सरकारलाच ठाऊक! पण वीरप्पनचा इतिहास बघता त्याला राजकुमारच्या सुटकेसाठी पैसे द्यावे लागले असतील याची शक्यता नाकारता येत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?