Site icon InMarathi

विमान अपघाताने त्याचं आयुष्यच उध्वस्त केलं होतं! पण नंतर तोच ठरला ‘मिरॅकल मॅन’…

morris goodman miracle man inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

इच्छाशक्ती ही जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. ध्येय साध्य करण्यासाठी जर तुमच्याकडे ज्ञान आहे, कला आहे, उपलब्ध सामुग्री आहे, पण जर इच्छाशक्ती नसेल तर यश तुम्हाला हुलकावणी देऊ शकतं.

तुमच्या प्रकृतीबद्दल सुद्धा हे तंतोतंत खरं आहे. तुम्हाला एखादी व्याधी झाली, अपघात झाला तर त्या परिस्थितीतून सुद्धा तुमची इच्छाशक्तीच तुम्हाला पूर्ववत करत असते हे वारंवार सिद्ध झालं आहे.

 

 

कोरोना काळात सुद्धा आपण हेच बघितलं, की कोरोनापेक्षा त्याच्या धास्तीने कित्येक लोकांनी आपला जीव गमावला; आणि ज्यांनी त्या परिस्थितीकडे लढाऊ वृत्तीने बघितलं, त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आणि लोकांसमोर एक आदर्श ठेवला.

‘मॉरिस गुडमन’ ही एक अशीच आदर्श व्यक्ती आहे ज्यांनी विमान अपघातातून ओढवलेल्या परिस्थितीवर केवळ आपल्या इच्छाशक्तीने मात केली आणि चमत्कार करून दाखवला. डॉक्टरांनी हात टेकले होते. पण, ‘मॉरिस गुडमन’ने जीवनरुपी युद्धात हार मानली नव्हती. तो आपल्या पायावर चालून घरी गेला आणि आज तो जगभरात फिरून लोकांना इच्छाशक्तीची महात्म्य सांगत असतो.

 

कोण आहे ‘मॉरिस गुडमन’? काय झालं होतं?

‘मॉरिस गुडमन’ हा अमेरिकेत राहणारा एक व्यावसायिक होता, ज्याने आपल्या कामाने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर प्रत्येक प्रांतात यश मिळवलं. व्यावसायिक यश मिळवल्यानंतर ‘मॉरिस गुडमन’ने विमान विकत घेण्याची, विमान चालवण्याचा परवाना काढण्याची इच्छा व्यक्त केली.

युनिव्हर्सने मॉरिसच्या या दोन्ही इच्छा मान्य केल्या. मार्च १९८१ मध्ये मॉरिसने ‘सेसना १७२’ हे विमान खरेदी केलं आणि तो त्या विमानाच्या ड्रायव्हिंग सीटवर होता.

१० मार्च १९८१ रोजी मॉरिस ‘चेस्पेक् आणि पेनिनसुला’ या भागात विमानात फेरफटका मारण्यासाठी तो कॉकपिटमध्ये बसला. विमान हवेत असतांना एक दुर्दैवी घटना घडली, की विमानाचं इंजिन खराब झालं.

मॉरिसने विमानावर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. व्हर्जिनिया या गावात विमानाचं ‘इमर्जन्सी लँडिंग’ करण्याचा प्रयत्न केला. विमान जमिनीवर लँड होण्याच्या वेळी इंजिन पूर्णपणे बंद पडलं, पॉवर लाईन्स बंद झाल्या आणि विमान उलटं होऊन पडलं. ‘मॉरिस गुडमन’ विमानापासून दूरवर फेकला गेला.

 

 

‘मॉरिस गुडमन’ जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याला ‘पॅरालिसिस’चा अटॅक आला होता. त्याच्या चेहऱ्यावर, गळ्याला मार लागला होता. चव घेणे, गिळणे या सर्व शक्ती त्याने गमावल्या होत्या. लांब उडून पडल्याने छातीच्या पिंजऱ्यावर मार लागला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. मॉरिस फक्त डोळ्यांची उघडझाप करू शकत होता.

डॉक्टरांनी आवश्यक तितक्या सर्व चाचण्या केल्या. रिपोर्ट हाती आल्यावर डॉक्टरांनी असं सांगितलं, की इथून पुढे मॉरिस असाच राहील. त्याला मात्र सगळं ऐकू येत नव्हतं, त्याला फक्त त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता. त्याच्या विचारांमध्ये तो पूर्णपणे बरा होऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडला होता.

आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेल्या मॉरिसला श्वास घेण्यासाठी कृत्रिम व्यवस्था करण्यात आली होती. “मॉरिस इथून पुढे कधीच श्वास घेऊ शकणार नाही” असं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं.

शरीरातील सर्व अवयवांपैकी ‘मॉरिस गुडमन’चं फक्त मन व्यवस्थित कार्य करत होतं. त्याचं मन त्याला सतत “दीर्घ श्वास घे” असं सांगत होतं. या विचारांमुळे मॉरिसच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि काही दिवसातच त्याची कृत्रिम श्वास घेण्याची गरज संपली.

 

 

श्वसन नलिका खराब झालेली व्यक्ती श्वास कसा घेऊ शकते या विचारांनी डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले होते. ‘मॉरिस गुडमन’ने स्वतःसाठी ख्रिसमसच्या दिवशी आपल्या पायावर चालून घरी येण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, आणि त्यांनी इच्छाशक्तीचा जोरावर ते साध्य सुद्धा करून दाखवलं. कधीच न चालू, बोलू शकणारा मॉरिस आज ४० वर्षांनी देखील जगभर प्रवास करतो आणि लोकांना इच्छाशक्तीचं महत्त्व सांगत असतो.

१९८१ च्या सर्व वर्तमानपत्रांनी या अपघाताची आणि मॉरिसच्या या कामगिरीची सर्वांनी दखल घेतली होती. आपल्या आजारपणातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर मॉरिसने १९८३ मध्ये ‘फार्मासायन्स आयएनसी’ या इंडस्ट्रीच्या लोकांना आरोग्यदायी सेवा, औषधी पुरवणाऱ्या संस्थेची स्थापना केली.

कॅनडामध्ये स्थापन केलेल्या या संस्थेला जगातील सर्व मोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या औषध वितरणाची संधी दिली होती.

‘मॉरिस गुडमन’ हा स्वतः कंपनीचा वितरण भाग सांभाळतो. कॅनडामधील प्रथम ३ जैविक औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये आज ‘फर्मासायन्स’चा समावेश होतो. ज्या आजारी लोकांना कोणतेच औषध लागू पडत नाही आणि ज्यांनी जगण्याची आशा सोडून दिली आहे त्यांचा ‘मॉरिस गुडमन’च्या या केवळ काही शब्दांनी कायापालट होतो : “आपण तेच बनतो, जे आपण विचार करतो.”

 

 

मॉरिसला आज जगभरात ‘चमत्कारी’ माणूस म्हणून ओळखलं जातं. त्याची ही कथा माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची प्रचिती लोकांना देत असते. आपल्यापैकी कोणीही, कधीही, कोणत्याही कारणामुळे अवघड मानसिक, शारीरिक परिस्थितीतून जात असेल तर ती व्यक्ती आनंदी आयुष्य जगण्यासाठी ‘मॉरिस गुडमन’च्या कथेतून नक्कीच बोध घेऊ शकते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version