Site icon InMarathi

प्राण्यांची हत्या न करता नॉनव्हेज एन्जॉय करायचंय, वाचा या नव्या प्रयोगाबद्दल!

lab meat IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

जगभर शाकाहारी लोकांपेक्षा मांसाहारी लोकांची संख्या खूप जास्त आहे. प्राण्यांच्या मांसामध्ये माणसाच्या शरीराला उपयुक्त अशी पोषणमूल्येही असतात.

पुरातन काळापासून आपल्या अन्नाची गरज मनुष्य प्राण्यांच्या मांसातून भागवत आलेला आहे. जगभरातील प्रत्येक देशातील खाद्यसंस्कृतीमध्ये प्राण्यांच्या मांसाचा वापर केलेला दिसून येतो.

डुक्कर, कोंबडी, गाय, म्हैस यांसारख्या प्राण्यांची पैदास मांस मिळवण्यासाठी प्रामुख्याने केली जाते. सध्याच्या आकडेवारीनुसार जगात वर्षाकाठी मांसाची दरडोई खपत सुमारे ४३ किलोग्रॅम एवढी आहे!

यातही अमेरिकेसारख्या देशात हे प्रमाण १०० किलोग्रामपेक्षा अधिक आहे, तर भारतात हेच प्रमाण ५ किलोग्रॅम एवढे कमी आहे!

गेल्या ५० वर्षांमध्ये जगात मांसाच्या उत्पादनात तीन पटीने वाढ झालेली आहे. सध्याच्या घडीला जगात ३४ कोटी टन पेक्षा जास्त मांसाचे उत्पादन होते.

 

हे सगळे असले, तरी मांस उत्पादनाचे काही दुष्परिणामही पहावयास मिळतात. मांस उत्पादनात हरितगृह परिणामासाठी कारणीभूत असणाऱ्या वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते.

एक किलोग्रॅम मांसाच्या उत्पादनासाठी हजारो लिटर गोड्या पाण्याची आवश्यकता असते. तसेच मांसावरील प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च होते.

याखेरीज मांस मिळवताना प्राण्यांची कत्तल केली जाते ज्या विरोधात “पेटा” सारख्या संघटना वेळोवेळी आवाज उठवत असतात. यातूनच प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने मांस तयार करता येईल का यावर संशोधन सुरू झाले.

२०१२ मध्ये सर्वप्रथम या प्रयोगाला यश मिळाले. स्टेम सेल्स हा सजीवांच्या शरीरातील पेशींचा महत्त्वाचा घटक असतो. अमिनो ऍसिड आणि कर्बोदके या पेशींच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

प्रयोगशाळेत नियंत्रित वातावरणात स्टेम सेल्सना अमिनो ऍसिड आणि कर्बोदकांचा पुरवठा करून त्यांची वृद्धी केली जाते. प्राण्यांचे स्नायू अशा पेशींनीच बनलेले असतात.

अशाप्रकारे कृत्रिमरीत्या पेशींची वाढ करून प्राण्यांपासून मिळालेल्या मांसाप्रमाणे दिसणारे मांस तयार होते.

केवळ दृश्य स्वरूपातच नव्हे, तर प्राण्यांच्या मांसामध्ये आढळणारी सर्व प्रकारची पोषणमूल्येही या कृत्रिम मांसात आढळून येतात.

 

 

२०१२ मध्ये जेव्हा सर्वप्रथम हा प्रयोग केला गेला, तेव्हा कृत्रिम मांसापासून काही पदार्थ तयार केले गेले. तेव्हा प्राण्यांपासून मिळालेल्या मांसापेक्षा कृत्रिम मांस काहीसे कोरडे भासले.

पण हे तंत्रज्ञान अजूनही विकसित होऊ शकते. कृत्रिम मांसाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हे मांस उत्पादनातून पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करते. कमीत कमी कार्बन उत्सर्जन, पाण्याची बचत ही कृत्रिम मांसाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.

‘ईट जस्ट’ नावाची नव्यानेच सुरू झालेली अमेरिकन कंपनी कृत्रिम मांसाबद्दल संशोधन करत आहे. या कंपनीने यशस्वीरीत्या कृत्रिम मांसाची निर्मितीही केलेली आहे.

नुकताच या कंपनीला सिंगापूर मध्ये कृत्रिम मांस उत्पादित करून त्याची विक्री करण्याचा परवाना मिळाला. कृत्रिम मांसाला अधिकृतरित्या मान्यता देणारा सिंगापूर हा जगातील पहिला देश ठरला आहे.

‘ईट जस्ट’ आपल्या ‘गुड मीट’ या ब्रँड अंतर्गत सिंगापूरमध्ये कृत्रिम मांसाची विक्री करणार आहे. सध्या सिंगापूरमधीलच एका स्थानिक उत्पादकाच्या सहकार्याने ‘ईट जस्ट’ कृत्रिम चिकन (Cultured Chicken) ची निर्मिती करीत आहे.

आगामी काळात सिंगापूरमधील रेस्टोरंट्स आणि दुकानांमधून आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.

सध्या ‘ईट जस्ट’ ने तयार केलेले चिकन आणि बाहेर उपलब्ध असणारे चिकन यांच्या चवीत अजिबात फरक नसल्याचा कंपनीचा दावा आहे.

 

सिंगापूरमधील लोकसंख्येची घनता जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. सिंगापूर हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. सध्या गरजेच्या सुमारे १० टक्के एवढेच अन्नधान्याचे उत्पादन सिंगापूरमध्ये घेतले जाते.

२०३० पर्यंत हे प्रमाण ३० टक्क्यांवर नेण्याचे सिंगापूरचे ध्येय आहे. कृत्रिम मांसनिर्मितीसाठी परवाना देणे हे सिंगापूरच्या अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकडे टाकलेले एक पाऊल आहे.

कृत्रिम मांस तयार करणे हा प्रकार सध्या काहीसा खर्चिक आहे. २०१२ मध्ये जेव्हा सर्वप्रथम याचा प्रयोग झाला तेव्हा यासाठी ३,२५,००० डॉलर्स एवढा खर्च आला होता!

सध्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना त्याचा खर्च बऱ्यापैकी कमी झालेला आहे. ‘ईट जस्ट’ जे मुख्य कार्यकारी अधिकारी जोश टेट्रिक यांच्या मते कृत्रिम मांसाचे जगभर मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यावर याची किंमत बरीच कमी होऊ शकते.

सध्या सिंगापूरमध्ये ईट जस्टकडे Cultured Chicken च्या उत्पादन आणि विक्रीचा परवाना आहे. आगामी वर्षात कृत्रिम गोमांस (बीफ) साठी परवाना मिळवण्याचा त्यांचा विचार आहे.

चिकन हा प्रथिने मिळवण्यासाठी इतर मांसाच्या तुलनेत स्वस्त पर्याय आहे. अमेरिकेसारख्या देशातही चिकन इतर मांसापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ले जाते. अशा स्थितीत कृत्रिम मांसाला मान्यता मिळाल्यास त्याचे अनेक फायदे दिसून येऊ शकतात.

कृत्रिम मांसाची संकल्पना सगळ्याच पातळीवर यशस्वी ठरेल असे सध्याचे अनुमान आहे. पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने कृत्रिम मांसनिर्मिती मोठा हातभार लावू शकते.

परंतु या मांसाच्या वापरामुळे आरोग्यावर काही दुष्परिणाम होत नाहीत ना, यावरही संशोधन होणे गरजेचे आहेत.

 

 

हजारो मुक्या प्राण्यांची कत्तल थांबवता येऊ शकेल असा हा पर्याय कोणत्याही दुष्परिणामांशिवाय यशस्वी झाल्यास तो जगाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा शोध ठरू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version