Site icon InMarathi

बॉलिवूडच्या थरारपटालाही लाजवेल अशा शीना बोरा केसचा तपास CBI ने का थांबवला?

sheena bora featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

९ वर्षांपूर्वी २४ वर्षीय शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे या केसमधील प्रमुख आरोपी होते. आश्चर्याची बाब म्हणजे हत्या झाली २०१२ साली पण तीन वर्षे या हत्येबद्दल कुणालाही बारीकशी कल्पना देखील नव्हती.

शीना बोरा नामक व्यक्ती तब्बल तीन वर्षे बेपत्ता असूनदेखील कुणाला पुसटसा संशय देखील आला नाही. पण सत्य फार काळ लपून राहत नाही. २०१५ साली शीना बोराच्या हत्येचे सत्य अखेर समोर आले आणि संपूर्ण देशात या केसची चर्चा झाली.

इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि शीना बोरा ही तीन नावे मीडियात बरेच दिवस गाजली. अत्यंत गुंतागुंतीची ही केस एखाद्या बॉलिवूड सस्पेन्स थ्रिलरला देखील लाजवेल अशी आहे.

२४ वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली आणि तिचे शव मुंबईपासून १०३ किमी लांब असलेल्या रायगड जिल्ह्यातील एका जंगलात पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आले.

 

 

काही दिवसांनी स्थानिक पोलिसांना एका जळालेल्या शवाचे काही अवशेष जंगलात आढळले. परंतु त्या अवशेषांवरून मृताची ओळख पटली नाही. अनेक दिवस तपास करूनदेखील मृताची ओळख न पटल्याने अखेर पोलिसांनीच त्या अवशेषांवर अंत्यसंस्कार केले.

यादरम्यान शीना बोरा बेपत्ता आहे किंवा संपर्काच्या बाहेर आहे ही साधी कल्पनादेखील कुणाला आली नाही आणि खुन्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु अचानक तीन वर्षांनी ऑगस्ट महिन्यात पोलिसांनी श्यामवर राय नावाच्या एका इसमाला अवैध शस्त्र बाळगण्याच्या आरोपाखाली अटक केली.

त्याची चौकशी करत असताना त्याने कबूल केले की त्याने याआधी अनेक गुन्हे केले आहेत आणि २०१२ साली झालेल्या एका खुनातदेखील त्याचा सहभाग होता. श्यामवर राय नामक या इसमाने असाही धक्कादायक खुलासा केला की रायगडमध्ये जे अर्ध्यावर जळलेल्या शवाचे अवशेष पोलिसांना सापडले होते, ते शव शीना बोरा ह्या मुलीचे होते.

कोण होती ही शीना बोरा?

शीना बोरा ही आयएनएक्स मीडिया ग्रुपची फाउंडर इंद्राणी मुखर्जी आणि सिद्धार्थ दास यांची मुलगी होती. सिद्धार्थ दास हा इंद्राणी मुखर्जीचा पहिला नवरा होय. या दोघांना मिखाईल बोरा हा एक मुलगा देखील आहे. लग्नानंतर काहीच काळात या दोघांचा घटस्फोट झाला.

 

 

सीबीआयच्या चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार इंद्राणी मुखर्जी तिच्या पहिल्या लग्नाबाबत लपवत असे. तिने घटस्फोट झाल्यानंतर आपले मूळ गाव सोडून मुंबई गाठली आणि नव्याने आयुष्य सुरु केले. इतकेच नव्हे तर ती स्वतःच्या मुलांची ओळख ही धाकटे बहीण भाऊ म्हणून करून देत असे.

कारण तिला भीती वाटत असे की लोकांना जर सत्य कळले तर तिच्या बिझनेसवर त्याचा वाईट परिणाम होईल. सुरुवातीला तर तिने मुलांना गुवाहाटीमध्ये स्वतःच्या आईवडिलांकडे ठेवले होते. नंतर काही काळाने ती शीनाला स्वतःकडे मुंबईला घेऊन आली.

यादरम्यान इंद्राणीने कोलकाताच्या एका व्यावसायिकाशी दुसरे लग्न केले होते. या व्यावसायिकाचे नाव संजीव खन्ना असे होते. या लग्नापासून देखील तिला एक मुलगी झाली जीचे नाव विधी असे आहे.

मीडियाच्या रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार इंद्राणीचे स्वतःच्या अपत्यांशी फारसे चांगले नाते नव्हते. इंद्राणी आणि शीनामध्ये बऱ्याचदा खटके उडत असत.

याबाबतीत शीनाने स्वतःच्या खाजगी डायरीत देखील लिहून ठेवले होते. तिने डायरीत अशी नोंद केली होती की ,“आज माझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू मी! पण आज मी अजिबात आनंदात नाहीये. असे वाटतेय की माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. माझे भविष्य अंधकारमय आहे. मला माझ्या आईबद्दल आता घृणा आणि तिरस्कार वाटतो. ती आई नाही तर कैदाशीण आहे.”

 

 

शीना मुंबईत आल्यावर तिला मेट्रो वन या कंपनीत नोकरी मिळाली. याच काळात इंद्राणीचा तिच्या दुसऱ्या नवऱ्याबरोबरदेखील घटस्फोट झाला आणि तिने तिच्याहून १६ वर्षांनी मोठ्या असलेल्या पीटर मुखर्जी या मोठ्या बिझनेस टायकूनबरोबर तिसरे लग्न केले.

पीटर मुखर्जीचा देखील त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट झाला होता. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून राहुल नावाचा एक मुलगा होता.

इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांनी लग्न केल्यामुळे शीना बोरा आणि राहुल मुखर्जी एकमेकांच्या संपर्कात आले. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि अधिक जवळीक निर्माण झाली. सहाजिकच पीटर आणि इंद्राणी यांना हे नाते मान्य नव्हते. ते दोघेही या नात्याच्या विरोधात होते.

न्यूज १८ मध्ये प्रसारित झालेल्या एका रिपोर्टनुसार इंद्राणी मुखर्जीने शीना आणि राहुल यांच्यातील नाते संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तिने शीनाच्या एक्स बॉयफ्रेंड कौस्तुभशी संपर्क करून तिला बंगलोरला नेण्यास सांगितले.

शीना बोराच्या हत्येमागील सत्य

प्रसिद्ध पत्रकार मनीष पचौली यांनी केसवर “द शीना बोरा केस” नामक एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात असे दिले आहे की राहुलशी असलेल्या नात्यामुळे नाराज असलेल्या इंद्राणीने २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाला बांद्राच्या एका मोठ्या दुकानाबाहेर भेटायला बोलावले.

 

 

शीनाला या ठिकाणी राहुलनेच त्याच्या गाडीतून सोडले. बांद्रयाला शीना इंद्राणीला भेटली. इंद्राणीने तिला दुकानात नेले आणि प्यायला पाणी दिले. नंतर दोघी इंद्राणीच्या कारमध्ये आल्या. इंद्राणीने पाण्यात गुंगीचे औषध टाकले होते त्यामुळे काही वेळातच शीना बेशुद्ध झाली.

शीना बेशुद्ध असताना इंद्राणीने तिच्या ड्रायव्हरला इशारा दिला. तिने ड्रायव्हरला आधीच काय करायचे ते सांगून ठेवले होते. त्यानुसार इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने गाडी बांद्रयाच्या एका एकांत स्थळी नेली. राय आणि खन्नाने शीनाला पकडून ठेवले व इंद्राणीने स्वतःच्याच मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली.

यानंतर इंद्राणीने शीनाचे शव रात्रभर गाडीतच ठेवले. गाडी तिच्या वरळीच्या अपार्टमेंटच्या बाहेरच पार्क केली होती. सकाळी सकाळी ते तिघे गाडी घेऊन रायगडच्या जंगलात गेले आणि त्यांनी शीनाचे शव पेट्रोल टाकून जाळून टाकले.

यानंतर तब्बल तीन वर्षे हा भयंकर गुन्हा लपून राहिला आणि गुन्हेगार राजरोस मोकळे फिरत होते. शीना बोरा कुठे गेली, अचानक गायब कशी झाली याबद्दल कुणालाही सुतराम कल्पना नव्हती.

२०१५ साली मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर राकेश मारिया यांना एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने सांगितले की शीना बोरा ही गेले तीन वर्षं बेपत्ता आहे. या फोननंतर राकेश मारियानी खार पोलीस स्टेशनचे प्रमुख दिनेश कदम यांना तपास करण्याचे आदेश दिले.

 

 

तपासाच्या सुरुवातीलाच संशयाची सुई इंद्राणीकडे वळली. पण पोलिसांकडे इंद्राणीविरुद्ध काहीही पुरावा नव्हता म्हणून त्यांनी इंद्राणीवर नजर ठेवली. यादरम्यान २१ ऑगस्ट २०१५ रोजी पोलिसांनी ४३ वर्षीय श्यामवर रायला अवैध शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली आणि चौकशी दरम्यान त्याने अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच २०१२ साली केलेल्या शीना बोराच्या हत्येची हत्येची देखील माहिती दिली.

इंद्राणीवर तिचा मुलगा मिखाईलने देखील विषबाधा करून हत्येचा प्रयत्न केल्याचे आरोप केले होते. श्यामवर रायने चौकशी दरम्यान असेही सांगितले होते की इंद्राणीने त्याच्याशी संपर्क करून शीना आणि मिखाईल या दोन्ही मुलांना मारायचे ठरवले होते.

राय यानेच पहिल्यांदा शीना बोरा मर्डर केसबाबत माहिती उघड केली. त्याने सांगितले की शीनाचा खून केल्यानंतर त्यांनी तिचे शव रायगडच्या जंगलात जाळले आणि नंतर जमिनीत गाडून टाकले.

या माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांनी रायगड पोलिसांशी संपर्क केला तेव्हा त्यांना माहिती मिळाली मे २०१२ मध्ये स्थानिक पोलिसांना एका महिलेचे अर्धवट जळलेल्या शवाचे काही अवशेष आढळले होते.

त्यानंतर मुंबई पोलिसांची टीम तात्काळ रायगडला पोहोचली आणि रायने सांगितलेल्या जागेवर त्यांनी खोदून बघितले असता त्यांना अधिक पुरावे सापडले.

 

आश्चर्याची बाब अशी, की तीन वर्षे शीनाचा काहीच ठावठिकाणा लागत नसताना देखील हे प्रकरण गुप्त राहिलेच कसे! शीनाला शेवटचे राहुलनेच बघितले होते. त्यानेच शीनाला इंद्राणीला भेटण्यासाठी सोडले होते. कुणी इंद्राणीला शीनाच्या बाबतीत विचारले असता ती वेगवेगळी वक्त्यव्ये करत असे.

इंद्राणीनेच शीनाचा फोन ताब्यात घेऊन राहुलला ब्रेकअपचा मेसेज केला होता. राहुलने इंद्राणीकडे शीनाची चौकशी केली असता तिने राहुलला शीनाचा विचार सोडून देण्यास सांगितले. जेव्हा- जेव्हा कुणी इंद्राणीकडे शीनाची चौकशी करत असे तेव्हा शीना अमेरिकेला निघून गेली आहे असेच इंद्राणी सर्वांना सांगत असे. म्हणूनच तीन वर्षे हा गुन्हा लपून राहिला.

हत्येबाबत पोलिसांनी तपास केला असता इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांचा या गुन्ह्यात सहभाग होता. त्यामुळे या सर्वांना अटक झाली. इंद्राणी मुखर्जीने वेळोवेळी आपली वक्त्यव्ये बदलली. तिने या गुन्ह्यात सहभाग नाकारला. परंतु पुरावे मात्र तिच्याविरुद्धच साक्ष देतात. तिच्या मते तिने शीनाला मारले नाही. ती फक्त गुन्ह्यात सहभागी होती.

सतत साक्ष बदलल्याने ही केस खूपच गुंतागुंतीची झाली. या केसने अनेक वळणे घेतली. अगदी एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची गोष्ट असते अशी ही केस होती.

२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराने ईमेलवर कंपनीला राजीनामा पाठवला. २३ मे २०१२ रोजी पोलिसांना पेण ,रायगड येथील जंगलात एका सडलेल्या शवाचे अवशेष आढळले. २५ ऑगस्ट २०१५ रोजी पुराव्यांच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला पोलिसांनी शीना बोराच्या हत्येसंदर्भात अटक केली.

 

 

३ सप्टेंबर २०१५ रोजी इंद्राणीने हत्येत सहभागी असल्याचे पहिल्यांदा मान्य केले. १० सप्टेंबर २०१५ रोजी पोलिसांना इंद्राणीने शीना आणि मिखाईलला केलेला ईमेल सापडला. केसची वाढत जाणारी गुंतागुंत आणि केसमध्ये सामील असणारी मोठी नावे बघता १८ सप्टेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र सरकारने ही केस सीबीआय कडे दिली. २ ऑक्टोबर २०१५ रोजी इंद्राणी मुखर्जीला प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जेजे हॉस्पिटलला नेण्यात आले.

१९ नोव्हेंबर २०१५ रोजी सीबीआयने पीटर मुखर्जीला अटक केली आणि इंद्राणी, संजीव खन्ना व श्यामवर राय ह्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केली. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी पीटर मुखर्जीचा देखील गुन्ह्यात सहभाग आढळल्याने सीबीआयने त्याच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केली.

२०१७ मध्ये पीटर आणि इंद्राणीने एकमेकांवर हत्येचे आरोप केले. नंतर इंद्राणीने लगेच आपले वक्तव्य बदलले. एप्रिल २०१८ मध्ये इंद्राणीची असिस्टंट काजल शर्माने पोलिसांना सांगितले की इंद्राणीने तिला शीना बोराच्या राजीनाम्यावर शीनाची खोटी सही करण्यास भाग पाडले होते.

हा राजीनामा शीनाच्या खुनानंतर मुंबई मेट्रो वनच्या कार्यालयात पाठवण्यात आला होता. २३ एप्रिल २०१८ रोजी इंद्राणी मुखर्जीने जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती.

 

 

८ डिसेंबर २०१८ रोजी सीबीआयने पीटर मुखर्जीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे जाहीर केले होते. ३ ऑक्टोबर २०१९ रोजी पीटर आणि इंद्राणी यांचा घटस्फोट झाला.

अनेकदा जामिनासाठी अर्ज केल्यानंतर अखेर २० मार्च २०२० रोजी पीटर मुखर्जीला जामीन मंजूर झाला आणि चार वर्षे तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर सुटला.

कोर्टाने इंद्राणी मुखर्जीचा जामिन अर्ज फेटाळला कारण या गुन्ह्यात तिचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. अखेर सीबीआयने शीना बोरा खून प्रकरणाचा पुढील तपास बंद करत असल्याचे जाहीर केले.

तर अशी ही गुंतागुंतीची शीना बोरा केस, जिच्यावर खरंच एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा बनू शकेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version