भारतातील जम्मू-काश्मीर हे असे राज्य आहे जिथे गेल्या काही दशकांमध्ये ‘तरुण वर्ग’ म्हटले की हातात दगड घेवून रस्त्यांवर फिरणारे, पोलिस आणि सेनादलाच्या सैनिकांशी हुज्जत घालणारे तरुण हेच चित्र कोणाच्याही डोळ्यांसमोर येत होते. आता परिस्थिती हळूहळू निवळते आहे. तिथला तरुण वर्ग वास्तवाला सामोरा जात स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या विकासाचा विचार करू लागला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांबरोबर आता तिथल्या मुली देखील हा विचार करू लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी जिथे मुली घरातून बाहेर पडायलाही घाबरत होत्या तिथे आज चांगले शिक्षण घेवून त्या स्वत:ला सिद्धा करू पहात आहेत. हा बदलाव आला आहे तिथल्याच एका मुलीमुळे!
जेव्हा लोक तिला पोलिस गणवेशात पाहतात तेव्हा आश्चर्यचकीत होतात. ती आहे जम्मू-काश्मीर ची पहिली ‘महिला आयपीएस- रुवेदा सलाम.’ काय आहे रुवेदाची कहाणी. वैद्यकीय परीक्षा पास होऊन डॉक्टर बनलेल्या रुवेदा यांना पोलिस ऑफिसर का व्हावेसे वाटले असावे? जाणून घेऊया कहाणीमागची कहाणी..
‘भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा’ ही केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील परीक्षांपैकी काठिन्य पातळी अधिक असलेली एक परीक्षा आहे. असे असतांनाही रुवेदा ही परीक्षा एकदा नाही तर दोनवेळा पास झाल्या आहेत.
पाहिल्यावेळी परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना आयपीएस चा हुद्दा मिळाला व त्यांनी हैदराबादच्या ‘सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी मधून रीतसर पोलिस प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांचे पोस्टिंग चेन्नई येथे ‘असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस’ म्हणून झाले.
indiatimes.com
आपल्या दैनंदिन कामाविषयी बोलताना रुवेदा यांनी संगितले की रोज त्यांचा दिवस सकाळी सात वाजता त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्ट करून व त्यांच्या कनिष्ठ सहकार्यांशी बोलून सुरू होतो. पण त्यांची ड्यूटी कधी संपेल हे सांगता येत नाही. कधी कधी १२,१२ तास तर कधी त्याहूनही अधिक काळ कामकाज करावे लागते.
एक स्त्री असल्यामुळे त्यांच्याकडे येणार्या महिला तक्रारदारांची संख्या जास्त आहे. आयपीएस ऑफिसर बनल्यावरही रुवेदा थांबल्या नाहीत तर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रशासकीय सेवेची परीक्षा पुन्हा दिली व त्या दुसर्या वेळेलाही उत्त्र्न झाल्या.
रुवेदा यांना आशा आहे की त्यांना उपजिल्हाधिकारी पद मिळू शकते. एमबीबीएस ची पदवी प्राप्त रुवेदा सांगतात,” माझे वडील एमएलए नेहमी सांगायचे की मोठी झाल्यावर तू आयएएस ऑफिसर बनलेच पाहिजेस. तेव्हापासूनच मी ठाम निश्चय केला होता की मी एक दिवस आयएएस ऑफिसर होईनच! माझ्या वडिलांचे शब्द माला नेहमीच प्रेरणा देतात.”
jagran.com
रुवेदा सांगतात की नव्वदच्या दशकात काश्मीर घाटीमधील वातावरण पूर्ण बिघडलेले होते. बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क नव्हता. पण आता इंटरनेटच्या सोयीमुळे हळूहळू परिस्थिती बदलते आहे. आणि त्यामुळे तेथील तरुण वर्गासाठी नव्या संधी काही प्रमाणात का होईना उपलब्ध होत आहेत.
ट्रेनिंग आणि पोस्टिंग मुळे बराचकाळ त्या आपल्या घरी देखील जाऊ शकल्या नाहीत. तरी त्याना हे समाधान आहे की आपल्या राज्यात बदल होतो आहे. आणि राज्याबाहेर राहूनच त्या आपल्या राज्यातील बदलांचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करू शकतील.
सध्या स्थिती फारशी चांगली नसली तरी आता कोणत्याही प्रकारच्या निर्देशनांचा सामान्य जनतेच्या रोजच्या व्यवहारावर काही परिणाम होत नाही. याचे त्यांना समाधान वाटते. आपापसात स्नेहपूर्ण संबंध असावेत, एकमेकांबद्दल सद्भावना असावी असे त्यांना वाटते. यासाठी त्या ‘सूफी’ विचारांना आपला आदर्श मानतात.
घाटीमध्ये काश्मिरी पंडितांनी परतणे हे बदलाचे महत्वपूर्ण लक्षण आहे असे त्यांना वाटते. मागील वर्षी सिडनी येथे झालेल्या जी-२० देशांच्या परिषदेमध्ये भारतीय मंडळात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली होती. एक तरुण आयपीएस अधिकारी होणे हे खूप जबाबदारीचे काम आहे असे त्या म्हणतात. आणि हे ही आवर्जून सांगतात की त्या अशा ठिकाणी आहेत जिथे पोलिसांना आदर दिला जातो. त्या तामिळ लोकांचे त्यासाठी आभार मानतात.
युवकांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या प्रेरणादायी भाषणे करतात. खासकरून जर तो कार्यक्रम जर मुलींसाठी आयोजित असेल तर त्या आवर्जून उपस्थित राहता. अनेक मुली त्यांना आपल्या रोल मॉडेल मानतात. जम्मू-काश्मीर मधल्या मुलींनी आयएएस परीक्षा द्यावी असे त्यांना वाटते. मोकळ्या वेळात त्या भरपूर वाचतात, कविता करतात. वर्डसवर्थ हा त्यांचा आवडता कवी आहे.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना स्थैर्य हवे आहे. काश्मिरी असल्याच्या कारणावरून त्यांना अनेक प्रकारचे भलेबुरे अनुभव आले आहेत. काश्मिरी म्हंटले की लोक लगेच दहशतवादी समजतात.. ही गोष्ट त्यांना अस्वस्थ करते. त्यांनी हे ही पहिले आहे की काश्मिरी लोकांवर माया करणारे लोक ही खूप आहेत. आपण कसे वागतो त्यावर सर्व अवलंबून असते असेही त्या सांगतात.
आपली जिद्द, आपली स्वप्न आणि टी पूर्ण करण्यासाठी घेतलेली खडतर मदत यांमुळे डॉ. रुवेदा सलाम या फक्त जम्मू-काश्मीरमधीलच नाही तर देशभरातल्या कित्येक मुलींसाठी प्रेरणा बनल्या आहेत.