‘मेहबुबा मुफ्तीपासून ते अगदी गांधी परिवारापर्यंत’, सगळ्यांनीच या देवीचे दर्शन घेतले आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारत हा जसा इतिहासाचा देश आहे, मिथकांचा देश आहे, कथा-कहाण्यांचा देश आहे तसाच तो चमत्कारांचा देश आहे. मग ते चमत्कार दंतकथेतील असो की एखाद्या ठिकाणचे भौगोलिक माहात्म्य असो ती प्रत्येक गोष्ट एकमेवाद्वितीय असते. जसा चमत्कारांचा तसाच तो अद्भुत मंदिरांचा देश आहे. अशी अनेक चमत्कारी आणि अनोखी मंदिरे आपल्याला भारतात अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात.
या मंदिरांमध्ये घडणार्या अनोख्या घटनानमागील गुढ आजही विज्ञानाला सोडवता आलेले नाही. या मंदिरांसोबत जोडल्या गेलेल्या काही कहाण्या ,दंतकथा देखील असतात त्यामध्ये धार्मिक आस्था जोडल्या गेलेल्या असतात. काश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यातील तुल्लामुल्ला गावात चिनारच्या वृक्षांनी व्यापलेले एक मंदिर आहे जे एका चमत्काराशिवाय कमी नाही.
–
- पॅरेलिसिस झालेली व्यक्ती ठणठणीत बरी होते या मंदिरात! खरं की खोटं? वाचा
- जगातलं एकमेव असं मंदिर जिथे सोंड नसलेल्या बाप्पाची मूर्ती आहे!!
–
हे आहे ‘खीर भवानी’ चे मंदिर, जिचे दर्शन घेण्यास पोचले राहुल गांधी सुद्धा! आहे ना वेगळी गोष्ट. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर राहुल गांधी यांनी घाटीचा दौरा केला तेव्हा त्यांनी या मंदिराला आवर्जून भेट दिली होती.
काश्मीरच्या सुंदर अशा डोंगर रांगांमध्ये असलेले हे खीर भवानी मंदिर तिथल्या संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान मिळवून आहे. काश्मिरी पंडितांची आराध्य देवता ‘महाराज्ञी’ हिला हे मंदिर समर्पित असून या मंदिरात केवळ आणि केवळ खिरीचा भोग देवीला दिला जातो. म्हणूनही या देवीला ‘खीर भवानी’ म्हंटले जाते. याच खीर भवानी मंदिराबाबतच्या काही रंजक गोष्टी आपण जाणून घेवू.
या मंदिराच्या स्थापनेविषयी एक रोचक कथा सांगितली जाते ती अशी की लंकेचा राजा दशनन रावण हा या महाराज्ञी देवीची उपासना करत असे. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होवून देवी स्वत: लंकेत जाऊन राहिली होती. पण सीताहरण सारखे दुष्कृत्य रावणाने केल्यानंतर देवी उद्विग्न झाली व राम-रावण युद्धाच्या वेळी तिने लंकेतून दुसरीकडे घेवून जावून आपली प्राणप्रतिष्ठा करावी असे तिने हनुमानाला सुचवले.
त्यानुसार हनुमान देवीची मूर्ति घेवून काश्मीरमध्ये आले व त्यांनी तुल्लामुल्ला येथे देवीची स्थापना केली. असेही मानले जाते की वनवास काळात असताना रामाने या जागेचा तपस्थळ म्हणूनही उपयोग केला होता.
दरवर्षी जेष्ठ अष्टमी च्या दिवशी देवीचा खूप मोठा उत्सव साजरा होतो. अनेक शतकांपासून काश्मिरी पंडित देवीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात आयोजित करतात. केवळ काश्मिरी पंडितच नाही तर सर्व धर्म आणि संप्रदायचे लोक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. हे काश्मीरच्या जनतेमधील सद्भावना आणि ऐक्याचे प्रतीक आहे.
अशीही प्रथा आहे की जेव्हा काश्मिरी पंडित देवीच्या मंदिरात पुजा-अर्चना करण्यासाठी येतात तेव्हा मुसलमान भाऊबंद त्यांचे स्वागत करतात आणि त्यांना पूजेचे साहित्य पुरवतात. माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुला यांच्यापासून मेहबूबा मुफ्तिंपर्यंत सगळ्यांनी तेथे जाऊन देवीची पूजा केली आहे.
देवीच्या उत्सवादरम्यान तिथे भरलेल्या मेळ्यात हजारोंच्या संख्येने दीप उजळले जातात. देवीचे दर्शन झाल्यावर भक्तांना खीर प्रसाद म्हणून दिली जाते. देवीचे हे मंदिर एका झर्यावर बांधण्यात आले असून ह्या झर्याचे पाणी पवित्र आणि चमत्कारी असल्याचे मानले जाते.
पौराणिक कथेनुसार मंदिराच्या अवतीभवती एकूण ३६० झारे होते जे आता गायब झाले असून तो सारा प्रदेश आता दलदलीचा बनला आहे. या झर्याचे वैशिष्ठ्य म्हणजे या झर्याच्या पाण्याचा रंग प्रसंग,घटनेनुसार बदलतो. असे म्हंटले जाते की जेव्हा जेव्हा या परिसरात आपत्ति येणार असते तेव्हा तेव्हा या झर्याच्या पाण्याचा रंग काळा होतो.
१९९० मध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांवर विस्थापित व्हायची वेळ आली होती तेव्हाही हे पाणी काळे झाले होते. तसेच काश्मीरमध्ये आलेल्या पुराच्या वेळी देखील ते पाणीकाळे झाले होते,तर कारगिल युद्धाच्या वेळी त्याचा रंग लाल झाला होता आणि कलाम ३७० रद्द झाल्यानंतर पाण्याचा रंग हिरवा झाला होता.
–
- ब्रिटिश काळापासून भारतीय सैनिकांना संकटकाळी पावणारी ‘हाटकालिका माता’
- लसींचं सर्टिफिकेट घेतलंत ना? मग आता पाप मुक्तीचं सर्टिफिकेट या मंदिरातून घ्या!
–
या मंदिरातील मुखी देवता महाराज्ञी देवीला फक्त आणि फक्त खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. सोबतच या चमत्कारी झर्याची पुजा करून तिथेही खीर अर्पण केली जाते. काश्मिरी संस्कृतीचे, तेथील ऐक्याचे प्रतीक असलेले हे ‘खीरभवानी’ मंदिर खरोखर श्रद्धा, आस्था आणि निसर्गाच्या चमत्काराचे प्रतीक आहे हे निश्चित !
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.