Site icon InMarathi

नट्टू काका नव्हते म्हणून ‘तो’ आला; आता मात्र त्यालाच पुढचं सारं काम पाहावं लागेल…!

bagha and nattu kaka inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील सगळीच पात्र लोकांना अगदी आपलीशी वाटतात. त्यामुळेच आजही मालिकेची लोकप्रियता टिकून आहे. ‘गोकुळधाम’मध्ये राहत नसूनही लोकांच्या गळ्यातील ताईत ठरलेली दोन अवलिया पात्रं म्हणजे नट्टू काका आणि बाघा!

खरं तर, बाघा हे पात्रच मुळी या  मालिकेचा भाग नव्हतं. नट्टू काका हे पात्र साकारणारे दिवंगत अभिनेते घनश्याम नायक यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे मालिकेच्या चित्रीकरणात ते सहभागी होऊ शकले नाहीत. मालिका थांबवणं शक्य नव्हतं आणि मग बाघाची एंट्री झाली…

नट्टू काका नाहीत म्हणून मालिकेत शिरलेला बाघा त्याच्या खास शैलीमुळे आणि उभ्या राहण्याच्या लकबीमुळे सगळ्यांचा लाडका बनला.

 

 

बाघाचं पात्र साकारणाऱ्या तन्मयविषयी…

तन्मय या क्षेत्रात येण्यापूर्वी बँकेत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असे. अवघ्या चार हजार रूपयात बँकेतलं तेच तेच काम करून तन्मय कंटाळला होता. त्याला हे काम करण्यात तितकीशी रुची नव्हती.

तन्मयला अभिनयाचा वारसा त्याच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. त्याचे वडिल गुजराती रंगभूमीवर अभिनय करतात. अनेक गुजराती नाटकं आणि श्रीमान श्रीमतीसारख्या काही हिंदी मालिकांतही त्यांनी काम केले आहे. वडिलांकडे बघून तन्मयलाही आपण या क्षेत्रात यावं असं वाटत होतं.

तन्मयनेही मग त्याचा अभिनयाचा प्रवास गुजराती रंगभूमीवरुनच सुरू केला. थोडी थोडकी नाहीत तर तब्बल १५ वर्षे त्यानं गुजराती रंगभूमीवर काम केलं. त्यानंनतर मग तो मालिकांकडे वळला. २००९ साली त्यानं सब टिव्हीवर प्रसारित होणार्‍या मणिबेन डॉट कॉम मालिकेत मणीबेनच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती. मणिबेनच्या भूमिकेत स्मृती ईराणी होती.

 

 

त्यानंतर मात्र पुन्हा भूमिका मिळवण्यासाठी तन्मयचा संघर्ष सुरु झाला. अभिनयाची पार्श्वभूमी असूनही, खडतर प्रवासाला त्याला सामोरं जावंच लागलं.

‘तारक मेहता का चष्मा’ या मालिकेत त्याने प्रवेश केला तो एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. कोणत्याही विशिष्ट अशा भूमिकेसाठी त्याला कास्ट केलं गेलं नव्हतं. कधी शिक्षक, कधी टॅक्सी किंवा रिक्षाचा ड्रायव्हर, कधी पोलीस अशा गरज पडेल त्या बारिकसारिक भूमिका तो साकारत असे. विशेषतः रिक्षावाला म्हणून त्याची एंट्री लोकांना लक्षात राहू लागली होती.

 

विधात्यानं मात्र या शोमधलं एक खास स्थान तन्मयच्या कुंडलीत बनवलं असणार. हा शो त्याच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरणार हे विधीलिखित होतं.

२०१० साली तारक मेहता मधील लोकप्रिय पात्र नट्टू काका म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक यांच्यावर एक शस्त्रक्रिया झालि त्यामुळे शोमध्ये त्यांच्या अनुपस्थितीत जेठालालसोबत कोणीतरी असणं गरजेचं झालं. आणि त्यातूनच जन्माला आला बाघा… नट्टू काकांचा पुतण्या म्हणून बाघाची मालिकेत एण्ट्री झाली.

 

 

५०७ व्या भागापासून बाघा आणि तन्मय दोघांना या शोमध्ये कायमचं स्थान मिळालं. २०१० मध्ये अनेक ऑडिशन्स दिल्यानंतर तन्मयला बाघाची भूमिका मिळाली होती. मिळालेल्या संधीचं तन्मयनं अक्षरश: सोनं करून दाखविलं.

आज बाघा ही भूमिका लोकांना फारच आवडते. त्यात आता नट्टू काका या पात्राची भूमिका साकारणारे घनश्याम नायक स्वर्गवासी झाल्यामुळे, त्यांच्या जागी येणाऱ्या नव्या कलाकाराला प्रेक्षक स्वीकारू शकतील का, हा प्रश्न आहेच.

म्हणूनच एका अर्थाने यापुढे जेठालालची आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी बाघा म्हणजेच तन्मयला आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे, हे मात्र नक्की…!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.-

Exit mobile version