Site icon InMarathi

“राणीचं राज्य पाचशे वर्षं टिको”असं म्हटलं जात असताना त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली!

shivram pant paranjape inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

शि. म. परांजपे यांची ओळख ‘काळ’वाले परांजपे म्हणून सर्वांनाच आहे. मात्र याच शि. म. परांजपे यांनी भारतीय स्वातंत्र्याची सर्वात आधी मागणी केलेली होती. लोकमान्यांसोबत समाजकार्य क रणार्‍या शिवरामपंतानी आपल्या भाषणांमधून नेहमीच नागरिकांत जाज्वल्ल्य देशाभिमान जागविला होता.

लेखन, पत्रकारिता यात मोलाचे कार्य करणार्‍या शिवरामपंताची ओळख आज दुर्दैवानं केवळ ‘काळ’कार शि. म. इतकीच आहे.

आपल्या “काळ” या दैनिकातून स्वातंत्र्यपूर्वकाळ गाजविणारे पुण्याचे शिवरामपंत परांजपे तथा शि. म. परांजपे हे नाव आज काळाच्या ओघात विसरलं गेलं आहे. कोण होते शिवरामपंत? तर भारतीय स्वातंत्र्याचा आवाज देणारे ते पहिले सेनानी होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही इतकी महत्त्वाची गोष्ट आज अनेकांना माहितही नाही. याचं श्रेय शिवरामपंताना कधीच मिळालं नाही. काळाच्या ओघात एका वृत्तपत्राचा संस्थापक, संपादक इतकीच शिवरामपंतांची ओळख उरली आहे.

 

 

शि. म. परांजपे हे केवळ एक झुंजार पत्रकार नव्हते तर प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, आपल्या अमोघ शैलीत बोलून श्रोत्यांवर छाप पाडणारे ख्यातकीर्ती वक्तेही होते. टिळक-आगरकर यांच्या काळात त्यांच्याबरोरीनं घेतलं जाणारं नाव म्हणजे शि.म परांजपे.

शि.म. परांजपे यांचा जन्म महाडचा. दक्षिण रायगडमधल्या सावित्रीच्या तीरावरचं महाड हे शिवरायांची राजधानी असणार्‍या रायगड किल्ला असणारं म्हणून ऐतिहासिक महत्त्व असणारं. या किल्ल्यावर समर्थांचं वास्तव्य होतं त्यामुळेही याला विशेष महत्त्व आहे. इतकंच नव्हे तर पुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सुद्धा याच भूमीवर झाला.

महाडला इतिहासात नेहमीच एक महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे. २७ जून १८६४ रोजी शिवरामपंतांचा महाडात जन्म झाला. त्यांचे पिताश्री महादेवराव प्रतिथयश वकील होते, तर आई पार्वतीबाई त्यांच्या अर्धांगी सर्वार्थानं शोभाव्या अशा होत्या.

प्राथमिक शिक्षण महाडात पूर्ण केल्यानंतर त्या काळातील प्रथेनुसार शिवरामपंतांनी पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीला धाडण्यात आलं. रत्नागिरीहून ते पुण्याला आले. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी राष्ट्रीयवृत्ती निर्माण करण्यासाठी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिवरामपंतांचं पुढील शिक्षण झालं.

 

 

पुढे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन आणि डेक्कन येथे झालं. या संपूर्ण प्रवासात विद्यार्थी दशेतच शिवरामपंतांवर प्रखर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. ज्या उद्देशानं आगरकर-टिळक-चिपळूणार या त्रयीनं शाळेची स्थापना केली होती, त्याचं दृष्य फळ म्हणजे शिवरामपंतांसारखे विद्यार्थी!

१८९२ साली शिवरामपंत एम.ए. उत्तीर्ण झाले आणि या परिक्षेतील यशाबद्दल त्यांना संस्कृत विषयातील एक नव्हे तर प्रतिष्ठीत अशा दोन जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्त्या मिळाल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लोकमान्यांच्या राष्ट्रकार्यात भाग घेतला. मात्र ते ज्या कॉलेजात प्राध्यापकी करत होते, त्या महाराष्ट्र कॉलेजला त्यांचं या चळवळीत असणं अडचणीचं ठरू लागल्यानं शिवरामपंतांना ती नोकरी सोडावी लागली.

यानंतर शिवरामपंतांनी राष्ट्रकार्याला वाहून घेतलं आणि पुढे ‘काळ’ नावाचं साप्ताहिक चालू केलं.

२५ मार्च १८९८ चा तो दिवस; पुण्यातील जुनी मंडई येथील कानडेंच्या वड्यातून शिवरामपंतांचा काळचा पहिला अंक बाहेर पडला आणि त्यानंतर तब्बल एक तप या साप्ताहिकानं गाजविला.

शिवरामपंताची ओळख वक्रोक्तीकार म्हणून होती, त्यांच्या काळ मधूनही हा वक्रोक्ती विलास आढळून येत असे. या काळची लोकप्रियता इतकी होती की, तो शुक्रवारी बाहेर पडण्याच्या वेळेत पहाटेपासूनच लोक प्रेसच्या बाहेर रांग लावून उभे असत.

 

 

सुरुवातीला सहाशे वर्गणीदार असणार्‍या काळचे अल्पावधीतच १६ हजार वर्गणीदार झाले. याशिवाय सहा ते आठ हजार फुटकळ विक्री होत असे ते वेगळंच.

काळमधील निबंध हे समाज घडविण्याचं काम करू लागलं होतं. खरंतर आज छापलेलं वृत्तपत्र उद्याची रद्दी असतं असं म्हणलं जातं, मात्र काळचे अंकच्या अंक महिनो न् महिने नुसते जपूनच ठेवले जात असत असं नव्हे तर त्यावर चर्चाही झडत आणि विचारमंथनही होत असे.

त्या काळात राष्ट्रवादी साप्ताहिकं, दैनिकं, मासिक, पाक्षिकं चालविणं फार कठीण होतं, कारण गोर्‍या साहेबाची वक्रदृष्टी ताबडतोब पडून ही प्रकाशनं बंद पडत असत.

अशा परिस्थितीत काळ सलग बारा वर्षं चालण्याचं कारण, शिवरामपंताची वक्रोक्तिपूर्ण लेखनशैली. यातील विचार इतक्या वक्राकार पध्दतीनं मांडलेले असत की गोर्‍या साहेबाच्या ते डोक्यावरून जात असत.

 

 

लेखात गोर्‍या साहेबाची सुरवातीला पाठ थोपटून, तोंड फाडून तिरकं कौतुक करून शेवटाला त्याला शालीतले असे काही करकरीत जोडे हाणले जात, की वाचकांना ते वाचून धमाल येत असे आणि साहेबाला ते कळतही नसे.

अखेर तो दिवस आलाच, ही चलाखी इंग्रजांच्या लक्षात आली आणि शिवरामपंतांना राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून अटक झाली. त्यांच्यावर खटला चालला अणि त्यांना तब्बल १९ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली. बाहेर आल्यानंतरही इंग्रजांनी काळ सुरु होऊ दिला नाही आणि अखेर तो बंद पडला.

ज्या काळात बरेच काँग्रेसजन राणीचं राज्य पाचशे वर्ष टिको अशा प्रार्थना करत, गोडवे गाणारी गाणी गात त्या काळात शिवरामपंतांनी भारताच्या संपूर्ण आणि निर्विवाद स्वातंत्र्याची मागणी करण्याचं धारिष्ट्य पहिल्यांदा दाखविलं.

शिवरामपंतांच्या काळची ग्रंथसंपदा गोर्‍या साहेबानं नष्ट करण्याचा चंग बांधून तसं करूनही दाखविलं. सावरकरांनीही ज्यांना गुरू मानलं असे शिवरामपंत काळकर्ते म्हणून इतिहासात नोंदविले गेले.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version