' गर्भवतींनो नवरात्रात उपवास करताय? मग या टिप्स नक्की वापरा!! – InMarathi

गर्भवतींनो नवरात्रात उपवास करताय? मग या टिप्स नक्की वापरा!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जगभरात सगळीकडेच धार्मीक कारणांसाठी उपवास करण्याची पद्धत आहे. हिंदू असो की मुसलमान किंवा ज्यू असो की ख्रिश्चन , प्रत्येक धर्मात काही विशेष दिवशी, विशेष प्रसंगी उपवास केले जातात. काही कट्टर घरांमध्ये लहानपणापासूनच उपवास करण्याचे संस्कार केले जातात. त्यात कुणालाही सूट नसते. फक्त आजारी, वृद्ध, लहान मुले ह्यांना उपवासातून सूट दिली जाते.

आपल्या हिंदू धर्मांत मात्र कुठल्याही प्रकारची कट्टरता नसून उपवास हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग म्हणून प्रत्येकाला उपवास करण्याचे किंवा न करण्याचे स्वातंत्र्य आहे. ज्यांची उपवास करण्याची इच्छा असते आणि तब्येतीने शक्य असते ते लोक कार्यप्रसंगी नक्कीच उपवास करतात. त्यात शारदीय नवरात्र , चैत्र नवरात्र, महाशिवरात्र, एकादशी या सणांच्या वेळेला उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आबालवृद्ध या प्रसंगी अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून उपवासाचे व्रत करतात.

 

festivals-of-india

 

नवरात्रात तर सगळे नऊ दिवस उपवास करणारे देखील बरेच आहेत. आपल्या घरात ,शेजारीपाजारी सुद्धा आपल्याला अनेक लोक संपूर्ण नऊ दिवस उपास करणारे दिसतात. खास करून स्त्रिया तर आपल्या कुटुंबाच्या सौख्यासाठी, स्वास्थ्यासाठी आणि समृद्धीसाठी मनापासून हे व्रत करतात. पण हे उपवासाचे व्रत करताना तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही.

खास करून जर तुम्ही गर्भवती असाल किंवा तुमच्या घरातील गर्भवती स्त्रिया जर नवरात्राचे नऊ दिवस उपवास करत असतील तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. कारण गर्भावस्थेचा काळ हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी तसेच त्यांच्या पोटातील बाळासाठी खूप महत्वाचा काळ असतो.

 

pregnant women inmarathi

 

या काळात त्यांची तब्येत नाजूक असते. त्यांना अधिक आराम ,अधिक पोषण व अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. ह्यात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा आईच्या व बाळाच्या जीवावर बेतू शकतो. म्हणूनच अश्या अवस्थेत जर तुमच्यापैकी कुणी नवरात्राचे उपवास करत असाल तर तब्येत जपण्यासाठी पुढील टिप्स नक्की वापरा.

खरं तर स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते गर्भवती असताना स्त्रियांनी शक्यतोवर उपवासाच्या भानगडीत पडू नये. खास करून पहिल्या तीन महिन्यांत तर स्त्रियांनी उपवास करूच नयेत. त्यात जर गर्भवती स्त्रीला ऍनेमिया , उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यातील कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर त्यांनी उपवास न करणेच श्रेयस्कर ठरेल.

 

sugar-level-check-inmarathi

कारण पहिल्या तीन महिन्यांत बाळाच्या वाढीला सुरुवात होते. आणि बाळाचे पोषण पूर्णपणे आईच्या आहारावर अवलंबून असते. अश्या परिस्थितीत जर आईने उपवास केले तर तिच्या आहारावर परिणाम होतो. तिच्या आहारातून मिळणारी आवश्यक पोषणमूल्ये बाळाला मिळत नाहीत आणि उपाशी राहिल्यामुळे बाळाच्या वाढीवर गंभीर परिणाम होतात.

“जर तुमच्या गर्भावस्थेला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर तुम्ही थोडा काळ उपवास करू शकता. पण हा उपवास देखील संपूर्णपणे उपाशी राहून करू नका. दर दोन तासांनी उपवासाला चालेल असा आहार घेत राहिलात तर उपवास करून चालेल. म्हणजेच दूध, फळे, सुकामेवा असा आहार उपवासादरम्यान घेतला तर ते व्रत केल्यास हरकत नाही. तसेच थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहावे.

 

dry fruits inmarathi
LBB

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास बाळाच्या मुव्हमेंटवर परिणाम होऊ शकतो. आणि उपवासादरम्यान तुम्हाला काहीही त्रास झाला तर लगेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या”, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजुषा गोयल यांनी गर्भवतींना दिला आहे.

 

mineral water inmarathi

 

उपवास करताना देखील आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश असायला हवा. आपल्या शरीराच्या विकासासाठी कार्बोहायड्रेट्स शरीरात योग्य प्रमाणात जाणे अत्यंत आवश्यक आहे कारण कार्बोहैड्रेट्समुळेच आपल्या शरीरातील स्नायूंना शक्ती मिळते आणि मेंदूचे काम सुरळीत चालते. गर्भवती स्त्रियांना तर दोन जीवांची काळजी घ्यायची असते म्हणूनच गर्भवतींनी उपवासाच्या फराळात कार्बोहायड्रेट्सचा समावेश आवर्जून करावा.

गर्भवती स्त्रियांची इन्शुलिन लेव्हल योग्य प्रमाणात मेंटेन होणे आवश्यक असते. म्हणूनच योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स शरीरात जायलाच हवेत. इन्शुलिन लेव्हल योग्य राहावी ह्यासाठी अतिरिक्त प्रमाणात साखर असलेले फळांचे रस वगैरे न घेता आणि बटाट्याचे वेफर्स वगैरे न खाता शक्यतोवर फळे खावीत, साबुदाणा नि उकडलेल्या बटाट्याचे पदार्थ काही प्रमाणात खावेत , रताळी , लाल भोपळा, काकडी यासारख्या भाज्या ज्या काही ठिकाणी उपवासाला चालतात त्यांनी खाव्यात.

 

cucumber-inmarathi

राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे राजगिऱ्याच्या लाह्या, राजगिऱ्याच्या पिठाचे पदार्थ गर्भवती स्त्रिया उपवासाच्या फराळात खाऊ शकतात. राजगिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम , फॉस्फरस अशी पोषणमूल्ये देखील आहेत त्यामुळे राजगिरा व गुळाचा लाडू उपवासादरम्यान खाऊ शकतात. तसेच शेंगदाणे -गुळाची चिक्की, सुकामेवा-गूळ ह्याची चिक्की सुद्धा पौष्टिक आहे आणि या गोष्टी उपवासाला देखील चालतात. म्हणूनच गर्भवतींनी उपवास करताना या गोष्टी आहारात ठेवल्या पाहिजेत.

कुठल्याही प्रकारचे खारट आणि तळलेले पदार्थ उपवासाला खाऊ नयेत. भरपूर प्रमाणात मिठाया आणि गोड पदार्थ खाणे देखील शरीरासाठी चांगले नाही. कारण या पदार्थांतून पोषण मिळत नाही उलट वजन अतिरिक्त प्रमाणात वाढते आणि त्यामुळे बाळाच्या वाढीवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून नारळपाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक घेतले तर थकवा येत नाही आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील मेंटेन राहते.

 

coconut water inmarathi
babycenter.com

उपवास असला तरी गर्भवतींनी सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या फराळापर्यंत पौष्टीक पदार्थ खाल्ले पाहिजेत. कडक निर्जळी उपवास किंवा काहीही न खाता फक्त चहा/कॉफी पिऊन उपवास करू नयेत. फक्त फळे /दूध यावर दिवसभर राहू नये. श्रद्धापूर्वक उपवास करताना स्वतःच्या तब्येतीची देखील काळजी घ्यावी जेणे करून स्त्रियांचे स्वतःचे व बाळाचे आरोग्य देखील चांगले राहील.

अखेर नवरात्रात केलेल्या उपवासाचे उद्दिष्ट हेच असते की संपूर्ण कुटुंबाला जगदंबेने उत्तम आरोग्याचा, सुखसमृद्धी व समाधानाचा आशीर्वाद द्यावा! खरे की नाही?

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?