' ती आई होती म्हणुनी….. – InMarathi

ती आई होती म्हणुनी…..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

रीमा लागू यांचे निधन झाल्याची बातमी येताच पायाखालची जणू जमीनच सरकली, कारण हा त्यांच्या चाहत्यांसाठीच नाही तर सर्वच भारतीय सिनेसृष्टीसाठी अनपेक्षित धक्का होता. त्याचं वय अवघं ५९ वर्षे! त्यांच्या अश्या अचानक जाण्याने भारतीय रंगमंचामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

reema-lagoo-marathipizza01
justdial.com

हिंदी, मराठी, गुजराती या तिन्ही भाषांच्या सिनेमा, नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून त्यांनी प्रत्येक रसिकाच्या मनात घर केलं होतं. कोणत्याही प्रकारच पात्र असून द्या, ते रंगवताना ते स्वत: त्या जगायच्या, त्यामुळेच एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून त्यांना आपली ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या कोणत्या भूमिका सर्वात गाजल्या असतील तर त्या आईच्या! आईची भूमिका वठवण्यात त्यांचा अगदी हातखंडा होता. ‘मैंने प्यार किया’, ‘आशिकी’, ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’, ‘वास्तव’, ‘कुछ कुछ होता है’ और ‘हम साथ साथ हैं’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या आईच्या भूमिकांची रसिक आजही आठवण काढतात यातच त्यांच्या कामाचे यश आहे. मैंने प्यार किया चित्रपटामध्ये त्यांनी आपल्यापेक्षा केवळ सात वर्षांनी लहान असलेल्या सलमानच्या आईची भूमिका केली होती आणि त्या काळी त्या भूमिकेची रसिकांनी प्रचंड वाहवा केली होती.

reema-lagoo-marathipizza02
bollywoodlife.com

पुन्हा एकदा ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटामध्ये सलमान खान आणि रीमा लागू यांची माता-पुत्राची जोडी पाहायला मिळाली आणि ती देखील हिट ठरली. एकीकडे अशी प्रेमळ, मायाळू आई साकारताना त्यांनी दुसरीकडे वास्तव सारख्या चित्रपटात संजय दत्तच्या कणखर आईचा रोल करून आपल्या अभिनयाची वेगळी उंचीच सिद्ध करून दाखवली.

reema-lagoo-marathipizza03
koimoi.com

अश्या या आईचं ओमकार दाभाडकर यांनी आपल्या पोस्टमधून सुरेख वर्णन केलं आहे.

बापाशी भांडून घर सोडून जाणाऱ्या मुलाने “मै सही हूं ना मा…” विचारल्यावर एकीकडे दुःखाने रडत दुसरीकडे निग्रहाने मान होकारार्थी डोलवणारी आई…
मुलगी लग्नाला आली असतानाही कॉलेज काळातील मित्र दिसला की गांगरणारी, सावरून बसणारी आई…
आणि –
आपल्या मुंबईच्या “भाई” असलेल्या मुलाला आधी घरातून हाकलून देणारी आणि नंतर “वो मरा नहीं है” म्हणत विलाप करणारी आई…
आमची आई पडद्यावर बघायला मिळाली ती रीमा लागूं मुळे.
त्यांची कारकीर्द फक्त “आई” पणात सामावणारी नाही…पण माझ्यावर त्यांचा ठसा “माँ sss” च्या हाकेला “ओ” देणाऱ्या माय चाच आहे.
कधीही नं भेटलेल्या ह्या आई ला श्रद्धांजली..!

 

‘श्रीमान श्रीमती’ या गाजलेल्या टीव्ही सिरियलमधील त्यांची भूमिका अजरामर राहिली. तसेच ‘तू तू मैं मै’, ‘दो और दोन पांच’ या मालिकांमुळे रीमा लागू घराघरांत पोहोचल्या. अनेक सिरियल्स, नाटके आणि चित्रपटांमधील सासू आणि सुनेच्या जुगलबंदीमध्ये नेहमीच त्यांची सासू वरचढ राहिली.

‘लेकुरे उदंड जाहले’ या नाटकातून प्रसिद्धीस पावलेल्या अभिनेत्री मंदाकिनी भडकडे यांच्या त्या कन्या होत्या, आपल्याला अभिनयाचा हा वारसा आपल्या आईकडूनच मिळाल्याचे रीमा लागू नेहमी सांगायच्या.

reema-lagoo-marathipizza04
रीमा लागू यांनी आपल्या अभिनयाने मराठी नाटकाचा रंगमंच देखील समृद्ध केला होता. ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष’, ‘बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘सासू माझी ढांसू’ यासारख्या दर्जेदार नाटकांमधून त्यांनी आपलं अभिनयसामर्थ्य सिद्ध केलं होतं. ‘पुरुष’ या नाटकातील त्यांची भूमिका तर प्रचंड गाजली होती.

reema-lagoo-marathipizza05
indianexpress.com

 सुमारे चार दशकं चित्रपट आणि नाट्य सृष्टी गाजवणाऱ्या या हुरहुन्नरी कलावंतास मराठी पिझ्झातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?