Site icon InMarathi

“त्यांनी अक्कल पाजळलीच!” म्हणे भारतीय संघ पाकिस्तानशी स्पर्धाच करू शकत नाही…

virat kohli abdul razzaq inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे 

===

क्रिकेट चाहत्यांना अब्दुल रझाक हा पाकिस्तानी अष्टपैलू माहित असेल. कधी कधी फलंदाजांकडून बेदम मार खाणारा, कधी वेड्यासारखा बाद होणारा आणि क्वचित कधीतरी चांगली कामगिरी करणारा, एक गुणी (?) खेळाडू…

‘तब्बल’ ४६ कसोटी सामन्यांमध्ये त्याने १९४६ धावा केल्या आणि १०० गडी बाद केले होते. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!

म्हणजे साधारणपणे शोएब अख्तर जसा उचलला चेंडू आणि फेकून मारला फलंदाजाला असं करायचा, अगदी तसं…

 

 

याच अब्दुल मियांनी पुन्हा अक्कल पाजळली आहे म्हणे… एका मुलाखतीमधील प्रश्नाचं उत्तर देताना, (मुळात अशा लोकांच्या मुलाखती घ्यायची वेळ येत असेल तर; असो…) त्याने म्हणे असं मत मांडलं, की भारतीय संघ पाकिस्तानच्या संघाशी स्पर्धाच करू शकत नाही. म्हणून भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळत नाही.

ऋतुराज गायकवाड, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि अशा सध्या भारताच्या दुय्यम फळीत मानल्या जाणाऱ्या खेळाडूंविरुद्ध सुद्धा पाकिस्तानचा टिकाव लागेल का, हा प्रश्न निराळाच आहे. पण तोदेखील सध्या बाजूला ठेऊयात. रझाक साहेबांनी मांडलेलं मत असं आहे, की भारत पाकिस्तान विरुद्ध घाबरून खेळत नाही. यावर काय बोलणार बाबा! असेल त्याचं खरं…

 

आता अगदी अलीकडेच घडलेल्या घटना आठवतायत, न्यूझीलंडच्या संघाने टॉसच्या काही मिनिटांपूर्वी थेट मालिकाच रद्द केली; कारण होतं सुरक्षेचं! त्यापाठोपाठ इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव मालिका रद्द केल्याचं ठरवलं. न्यूझीलंड आणि इंग्लंडचं सुद्धा सोडा हो, अफगाणिस्तानने सुद्धा ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ (!) पाकिस्तानात खेळायला जायला नकार दिला.

तरीही अब्दुल रझाकचं म्हणणं खरं असेल बुवा… काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या खेळाडूंवर पाकिस्तानात गोळीबार झाला होता, हेसुद्धा विसरून जाऊयात आपण, कारण अब्दुल मियांना वेगळंच वाटतंय…

 

 

अब्दुल रझाक साहेब इथेही थांबले नाहीत बरं, ही तुलना करताना ते पार लिटिल मास्टर सुनील गावस्करांच्या काळात पोचले आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की भारताकडे सुनील गावस्कर होते तसा पाकड्यांकडे जावेद मियांदाद होता. त्यांची तुलना होऊच शकत नाही.

तसं पाहायला गेलं, तर खरंच बोललात अब्दुल मियाँ, तुलना होऊ शकत नाहीच कुठे द ग्रेट सुनील गावस्कर आणि कुठे मियांदाद… सुनील गावस्करांनी कसोटी सामन्यांमध्ये विश्वविक्रमी ३४ शतकं ठोकली होती, मियांदाद भाऊंची कसोटी आणि वनडे अशी दोन्ही मिळून सुद्धा तेवढी शतकं नाहीत. तरीही मियाँच्या मते जावेदभाई ग्रेट आहेत, असो…

त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे, की आमच्याकडे इम्रान खान होता आणि भारताकडे कपिलदेव, पण इम्रान या दोघांमध्ये उजवा होता म्हणे. आता इथेही कपिल देव यांची नाबाद १७५ धावांची खेळी आठवावी ना… इम्रान खान वरचढ असेल, तर त्याची एक तरी अशी खेळी स्मरणात राहिली असती हो मियाँ…

 

 

बरं त्यांचं असंही म्हणणं आहे, की आमच्याकडे वसिम अक्रम होता आणि भारताकडे त्या तोडीचा खेळाडू नव्हता. गोष्ट काहीशी खरी आहे, अगदीच चुकीची नाही. पण त्यांच्याकडे अक्रम होता आणि भारताकडे नव्हता तरीही एकाही विश्वचषक स्पर्धेत भारताच्या संघाला हरवणं कधीही पाकड्यांना जमलं नाही गड्या!

अब्दुल मियाँनी द्रविडच्या संघालाही टार्गेट केलंय. पाकिस्तानकडे इंझमाम, युसूफ, युनूस, आफ्रिदी होते आणि भारताकडे द्रविड आणि सेहवाग असं हे महाशय म्हणतात. त्यामुळे तुलना होऊ शकत नाही. सचिन, लक्ष्मण, युवराज, झहीर, कुंबळे वगैरे इतर रथी-महारथींचा उल्लेख करायला रझाक विसरलाय. पण तेही जाऊ द्या, द्रविड आणि सेहवाग दोघेच पुरून उरणारे होते.

द्रविडने अख्तर आणि मंडळींना अनेकदा रडकुंडीला आणलंय आणि वीरूने तर थेट मुलतानमध्ये जाऊन पाकिस्तानी गोलंदाजांची जी पिसं काढली आहेत, तीसुद्धा विसरले वाटतं अब्दुल मियाँ…

 

ज्या डावात स्वतः ४ च्या इकॉनॉमीने आणि एकही गडी बाद न करता मार खाल्लाय तोच डाव कसा काय विसरलात अब्दुल मियाँ…

विराट कोहली आणि सध्याचा भारतीय संघ आणि पाकिस्तानचा सध्याचा संघ यांची तुलना करायला तर कुणी जाऊच नये. हाताच्या बोटावर मोजण्याइतके चांगले खेळाडू सोडले, तर पाकिस्तानी मंडळी भारतीय खेळाडूंच्या जवळपास सुद्धा पोचू शकत नाहीत. आपलं काही झालं की आमचा बाबर आझम असा आणि तसा यावरच येऊन अडणार तुम्ही…

जाऊ द्या, आम्ही घाबरतो असा विचार करून तुम्हाला आनंद होत असेल तर मानून घ्या; शेवटी ‘बापाने’च मुलाला समजून घ्यायचं असतं त्यामुळे आम्ही घेऊ समजून… बाकी कोण वरचढ आहे, ते २४ ऑक्टोबरला कळेलच…!!

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version