Site icon InMarathi

त्यांनी बाळासाहेबांना नवं जीवन दिलं, पण त्यांचं स्वतःचं स्वप्न मात्र…

nitu mandke dream inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

डॉ. नित्यानंद मांडके हे नाव भारतीय वैद्यकिय क्षेत्रातील दबदबा असणारं नाव होतं. अनेकांची लाखों दिल की धडकन सुरळीत ठेवणारे आणि त्यांच्या या कामानं लाखो पेशंटच्या दिलों की धडकन बनलेले असे ह्रदयस्थ डॉ. मांडके.

डॉ. नित्यानंद मांडके म्हणलं तर कदाचित ओळखणं कठीण होईल पण नितू मांडके नाव उच्चारलं की ताबडतोब एक जिव्हाळा वाटतो. हे मराठमोळं नाव अनेकांच्या ह्रदयात बसलेलं आणि याचं कारण म्हणजे त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं काम!

 

 

मुंबईतील प्रसिध्द कार्डियाक सर्जन डॉ. नीतू मांडके यांना भारतातील MICAS (minimally invasive coronary artery surgery ) चे प्रणेते मानलं जातं. त्यांना ‘सुपरफास्ट मांडके’ म्हणून ओळखलम जायचं याचं कारण, ते अत्यंत कमी वेळात आणि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात निष्णात होते.

प्रचंड यश मिळवूनही आणि सतत व्यस्त असूनही, मोठमोठ्या व्हीव्हीआयपींचे डॉक्टर असूनही सामान्यांसाठीही ते कायम उपलब्ध असत.

जमिनीवर असणारा आकाशाएवढा माणूस अशी त्यांची ख्याती होती. गरीब रुग्णांसाठी कायम मदतीचा हात पुढे करणारे मांडके डॉक्टर गरिबांचे मसिहा म्हणून ओळखले जात. डॉ. मांडकेची महाराष्ट्राला आणि देशाला खरी ओळख झाली ती बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टर म्हणून!

 

 

हिंदू ह्रदय सम्राट असणार्‍या बाळासाहेबांचं हृदय कमकुवत होणं मराठी माणसाला हादरविणारं ठरलं. मात्र त्याच वेळी डॉ. मांडके नावाचा चमत्कार धावून आला आणि त्यानं हे हृदय धडधडतं ठेवलं.

पुण्यात जन्म झालेले नीतू मांडके बी.जे. महाविद्यालयातून वैद्यकीय शास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडले. एमबीबीएस नंतर त्यांनी ह्रदयशस्त्रक्रियेसंबंधीचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी ते आधी इंग्लंड आणि मग अमेरिकेला स्वबळावर गेले. अमेरिकेत जगविख्यात डॉक्टर पिकासिओ आणि मागधी याकुब यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

परदेशात राहिले असते तर अक्षरश: खोर्‍याने पैसा कमवून अब्जाधिश झाले असते. सुखनैव जीवन नाकारून त्यांनी मायदेशात येऊन इथे प्रॅक्टीस करण्याचा विचार केला जेणेकरून आपल्या ज्ञानाचा भारतीय समाजाला उपयोग व्हावा.

 

 

केवळ अभ्यासातच ते हुशार होते असं नव्हे तर फुटबॉल आणि बॉक्सिंग या क्रीडाप्रकारातही निपूण होते. तीक्ष्ण ग्रहण शक्ती, शीघ्रकोपी, परखड, निर्भिड असे मांडके अध्यात्मिक प्रवृत्तीचे होते.

भारतात परतल्यावर त्यांनी जे.जे. रुग्णालयात काम सुरू केले. झटपट निदान आणि त्याहूनही झटपट औषधोपचार ही त्यांची खासियत होती. त्यांचा कामाचा वेग बघून त्यांचे सहकारी थक्क होत असत. त्यांच्या कामामुळे अल्पावधीतच त्यांची ख्याती सर्वदूर पसरली.

अगदी काही महिन्याच्या बालकापासून ते वयोवृध्द पेशंटपर्यंत, गुंतागुंतीच्या जीवाला धोका असू शकणार्‍या शस्त्रक्रियाही त्यांनी यशस्वीरित्या केल्या आणि डॉ. मांडके नावाचा वैद्यकीय क्षेत्रातला चमत्कार चर्चेचा विषय झाला.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच्या शस्त्रक्रियेनंतर ते प्रसिध्दीच्या झोतात आले. त्यानंतर अनेक खेळाडू, राजकीय नेते, चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय कलाकार यांच्यावरचे उपचार डॉ. मांडकेनी केले.

सामान्यांपासून व्हीआयपींपर्यंत सर्वांवर त्याच निष्ठेनं उपचार अरणार्‍या डॉ. मांडकेंचंही एक स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी ते कायम झटत होते. हे स्वप्न होतं, आपल्या मायदेशात खास हृदयविकार आणि यासंबंधित शस्त्रक्रियेसाठीचं, सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी आपत्कालीन यंत्रणेनं सुसज्ज, अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज असं भव्य दिव्य हॉस्पिटल उभं करण्याचं.

२०० कोटी रुपयांची गुंतवणूक असणारं १८ मजली सुसज्ज हॉस्पिटल बांधायला त्यांनी सुरुवातही केली. या हॉस्पिटलचं अर्धाधिक काम पूर्ण झालेलं असतानाच लाखोंची निकामी हृदय पूर्ववत करून त्यांना दुसरा जन्म देणार्‍या या जादुगाराचा ह्रदयाच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली आणि महाराष्ट्र दु:खात बुडाला. त्यांचं स्वप्न अपुरं राहिलं.

हे हॉस्पिटल त्यांना त्यांच्या मातोश्रींना अर्पण करायचं होतं. त्यांच्या पश्चात हे अपूर्ण, रखडलेलं काम भारतातील अग्रणी उद्योगपती अंबानी यांनी नंतर पूर्ण केले मात्र भावनेपेक्षा पैशाची किंमत जास्त असल्यानं हे हॉस्पिटल मांडकेंचं स्वप्न न उरता अंबांनींचा प्रोजेक्ट म्हणून ओळखलं जाणार होतं.

 

 

हॉस्पिटलला नावही मांडकेंचं न देता अंबानींची मोहोर आणणारं नाव दिलं गेलं. या सगळ्याबाबत डॉ. मांडके यांच्या पत्नीनं, ज्या स्वत: भूलतज्ज्ञ आहेत, त्यांनी हॉस्पिटलला नाव कोणतं आहे यापेक्षा डॉक्टरांचं स्वप्न पूर्ण होत आहे मग ते कोणी का पूर्ण करेना? अशी समंजस आणि पडती भूमिका घेतली.

मांडके कुटुंबाकडून अंबानींकडे हा प्रकल्प कसा गेला? तर जेंव्हा हा महत्वाकांक्षी प्रकल्प चालू झाला तेंव्हा म्हणजे १९९७ साली राज्य सरकारकडून ३.५ एकर जमीन मिळविली गेली आणि त्यानंतर लगेचच मांडके दांपत्यानं निधी उभारण्यासाठी मांडके फाऊंडेशनची स्थापना केली.

या फाऊंडेशनच्या मदतीनं त्याकाळात अंदाजे शंभर कोटींचं बजेट उभं करायचं होतं. बॅन्केकडून त्यांनी ६० कोटी रुपये घेतले मात्र मांडके यांचा मृत्यू झाल्यानंतर हेच बजेट अडीचशे कोटींचं झालं. त्यांच्या मृत्यूनंतर ट्रस्टने मदतीचे आवाहन केले मात्र ७० कोटीच उभे राहू शकले.

निधी अभावी हॉस्पिटलचे काम पूर्णपणे थांबले आणि डॉ. नीतू मांडके यांचे स्वप्न त्या अपूर्ण उभ्या सांगाड्यात बघून डॉ. अलका मांडके यांना त्रास होत असे.

त्यांनी मदतीसाठी अगदी शर्थ केली. अखेर मे २००३ मध्ये, म्हणजेच डॉ. मांडकेंचे निधन झाल्यानंतर सहा सात महिन्यांनी हे वर्ष संपता संपता डॉ. अलका मांडकेंनी मेसर्स प्राइसवॉटरहाऊस कूपर्सकडे मदत मागितली. या फर्मच्या सहाय्यानं त्या अनिल अंबानी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचल्या आणि अंबानींनी हा प्रकल्प हाती घेण्यास हिरवा झेंडा दाखविला.

 

 

हा प्रकल्प हाती घेताना कर्ज फेडीच्या बदल्यात काही नवीन अटी घालण्यात आल्या, काही बदल करण्यात आले ज्याला अर्थातच डॉ. अलका मांडकेंची सहमती होती.

यातली महत्वाची अट होती, की हॉस्पिटलला डॉ. मांडके नाही तर कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल म्हणून नाव देण्यात येईल आणि भविष्यातही हीच ओळख राहिल. दुसरी महत्वाची अट ही होती की, डॉ. मांडकेंना अपेक्षित असणारं असं पूर्णपणे हृदयविकारांशी संबंधित उपचारांचं हॉस्पिटल न रहाता इतरही उपचार आणि शस्त्रक्रिया होतील. सातशेपैकी पाचशे खाटा यासाठी वापरल्या जातील.

या सगळ्याच्या बदल्यात विशेषत: नावाच्या बदल्यात हॉस्पिटलमधील आवारातील एका अधिवेशन केंद्राला दिवंगत डॉ. मांडकेंचे नाव देण्यात येईल. याठिकाणी त्यांचा पुतळाही उभारण्यात येईल.

अशा रीतीने डॉ. मांडके या गोरगरिंबांच्या दीर्घायुष्यासाठी शेवटपर्यंत झटणार्‍या मराठी माणसानं पाहिलेलं भव्य स्वप्न एका व्यावसायिकाच्या पैशातून जिवंत राहिलं. पुढील पिढीला कोण मांडके? त्यांचं स्वप्न काय होतं? हे कदाचित माहित होणार नाही मात्र कोकिलाबेन हॉस्पिटलची इमारत त्याला एक अद्ययावत उच्चभ्रू हॉस्पिटल म्हणून कायम दिसत राहिल.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version