आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
“देव तारी त्याला कोण मारी” किंवा “काळ आला होता पण वेळ आली नव्हती” या म्हणी आपण जीवघेण्या संकटातून सुखरूप वाचलेल्या व्यक्तींसाठी बऱ्याचदा वापरतो. असे म्हणतात, की जर नशिबातच भरपूर आयुष्य असेल तर माणूस वाटेल त्या संकटातून वाचतो. मृत्यूही त्याला वेळेच्या आधी नेऊ शकत नाही.
ज्यांचा या मान्यतांवर विश्वास नाही ते लोक यामागे काही ना काही लॉजिक शोधून काढतात, पण बहुसंख्य देवभोळ्या लोकांची श्रद्धा असते की त्यांच्या देवानेच त्यांना संकटातून तारले.
अशीच वेळ व्हायलेट जेसोप नावाच्या स्त्रीवर आली होती. ही स्त्री एकदा नव्हे दोनदा नव्हे, तर तीन वेळा अशा जीवघेण्या संकटांतून सुखरूप वाचली. तिला “मिस अनसिंकेबल” असे म्हटले गेले. या स्त्रीने तीनवेळा मृत्यूचे तांडव स्वतःच्या डोळ्यांनी बघितले परंतु मृत्यूने तिला स्पर्शही केला नाही.
नशीब थोर म्हणून…
व्हायलेट जेसोपचा जन्म २ ऑक्टोबर १८८७ रोजी अर्जेंटिना येथे झाला. ती टायटॅनिक जहाजावर परिचारिका म्हणून कामाला होती. तिने टायटॅनिक जहाज बुडताना प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आहे. टायटॅनिक बुडाले आणि स्वतःबरोबर शेकडो माणसांना देखील समुद्राच्या तळाशी घेऊन गेले पण या अपघातातून व्हायलेट मात्र सुखरूप वाचली.
टायटॅनिक प्रमाणेच बरीच जहाजे अपघातात सापडून बुडाली आणि योगायोगाने त्यापैकी आणखी दोन जहाजांवर व्हायलेट देखील होती. त्या जहाजांच्या अखेरच्या प्रवासात व्हायलेट जहाजावर नर्स म्हणून कामाला होती आणि ती जहाजे बुडतानादेखील तिने स्वतः बघितले आणि ती त्यातून सुखरूप वाचली. म्हणूनच तिला ‘क्वीन ऑफ सिंकिंग शिप’ असेही म्हटले गेले.
कोण होती व्हायलेट?
अर्जेंटिनामध्ये जन्माला आलेली व्हायलेट, भावडांमध्ये सर्वात थोरली होती. तिचे आईवडील विल्यम आणि कॅथरीन जेसोप हे आयरिश होते आणि अर्जेंटिनामध्ये स्थायिक झाले होते. या जोडप्याला एकूण नऊ अपत्ये झाली आणि त्यातली सहा जगली. यातली व्हायलेट सर्वात थोरली होती त्यामुळे आपल्या लहान बहीण भावांची काळजी ती लहानपणापासूनच घेत असे.
ती लहान असताना खूप आजारी झाली होती आणि डॉक्टरांनी क्षयरोगाचे निदान केले. ती आजारातून बरी होणार नाही आणि लवकरच तिचा मृत्यू होईल असे तिच्या डॉक्टरांनी तिच्या वडिलांना सांगितले होते. पण मृत्यूवर मात करून ती आजारातून पूर्ण बरी झाली. मृत्यूच्या हातावर तुरी देण्याची तिची ही पहिली वेळ होती.
व्हायलेट सोळा वर्षांची असताना तिच्या वडिलांचा एका ऑपरेशनमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर ती, तिचे कुटुंब इंग्लंडला स्थायिक झाले.
इंग्लंडला आल्यानंतर तिने कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेतले. वडील गेल्यानंतर तिच्या आईने कुटुंबाची सगळी जबाबदारी घेतली आणि जहाजांवर कर्मचारी म्हणून काम सुरु केले. त्यामुळे आई नोकरीसाठी बाहेर असताना सगळ्या लहान भावंडांची काळजी व्हायलेट घेत असे. काहीच वर्षांत तिची आई देखील आजारी झाली तेव्हा व्हायलेटने शिक्षण सोडले आणि आईप्रमाणेच जहाजांवर नोकरी करण्यासाठी अर्ज केला.
–
- बर्म्युडा ट्रँगलबद्दल खूप वाचलंत, आता अंतराळातील आश्चर्यकारक ट्रँगल बद्दल जाणून घ्या
- भर समुद्रात, कासवाचं रक्त पिऊन ४३८ दिवस जगलेल्या माणसाची गोष्ट
–
कामाची सुरुवात…
व्हायलेट दिसायला जात्याच सुंदर होती परंतु जहाजावर काम करताना काही त्रास होऊ नये म्हणून ती सुंदर न दिसण्याचा प्रयत्न करत असे. १९०८ साली वयाच्या एकविसाव्या वर्षी तिला पहिले काम मिळाले. ती रॉयल मेल लाईन या ब्रिटिश शिपिंग कंपनीच्या जहाजावर कर्मचारी म्हणून काम करू लागली.
त्यानंतर १९११ साली तिला व्हाईट स्टारच्या आरएमएस ऑलिम्पिक या जहाजावर काम मिळाले. हे एक मोठे प्रवासी जहाज होते आणि त्याकाळचे सर्वात मोठे जहाज म्हणून प्रसिद्ध होते. २० सप्टेंबर १९११ रोजी हे जहाज साऊथहॅम्पटन येथून निघाले आणि एचएमएस हॉक या ब्रिटिश युद्धनौकेला धडकले.
ही घटना घडली तेव्हा व्हायलेट त्या जहाजावरच होती. सुदैवाने या अपघातात प्राणहानी झाली नाही आणि इतकी मोठी धडक बसून सुद्धा जहाज न बुडता कसेबसे किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकले. यानंतर जहाज दुरुस्त झाल्यावर तिने ऑलिम्पिकवर नोकरी सुरु ठेवली.
टायटॅनिकमध्येही वाचला जीव…
त्यानंतर तिला टायटॅनिक जहाजावर काम मिळाले. त्यावेळी ती २४ वर्षांची होती. १० एप्रिल १९१२ रोजी आरएमएस टायटॅनिक हे जहाज साऊथहॅम्पटनहून न्यूयॉर्क साठी निघाले होते. हा या जहाजाचा पहिलाच प्रवास होता. टायटॅनिकचा अपघात भयानक होता. ही भयंकर घटना व्हायलेटने प्रत्यक्ष बघितली आहे.
टायटॅनिकला धडक बसल्यानंतर प्रवाश्यांना लाईफबोटमध्ये बसवून टायटॅनिकच्या बाहेर काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी व्हायलेटला लाईफबोट नंबर सोळामध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले. ती लाईफबोट नंबर सोळामध्ये बसली तेव्हा एका अधिकाऱ्याने तिच्या हातात एक बाळ देऊन तिला त्या बाळाची काळजी घेण्यास सांगितले.
त्या रात्री टायटॅनिक बुडाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अपघातातून वाचलेल्यांना सुखरूप किनाऱ्यापर्यंत आणण्यासाठी आरएमएस कार्पेथिया हे जहाज आले आणि त्या सगळ्यांना न्यूयॉर्कला नेण्यात आले. सुदैवाने जे बाळ व्हायलेटच्या ताब्यात दिले होते त्याची आईसुद्धा अपघातातून वाचली होती आणि तिने तिच्या बाळाला आपल्या ताब्यात घेतले.
अपघातातून वाचलेल्या लोकांना नंतर परत इंग्लंडला पोहोचवण्यात आले तेव्हा व्हायलेट देखील तिच्या घरी परत गेली. इतक्या मोठ्या अपघातातून वाचणे ही काही गंमत नाही. तरी देखील घरच्या परिस्थितीमुळे तिने तिचे काम सुरु ठेवले.
नवं जहाज, नवा अनुभव…
त्यानंतर व्हायलेटने १९१६ साली एचएमएस ब्रिटॅनिक या जहाजावर काम करणे सुरु केले. यादरम्यान पहिले महायुद्ध सुरु होते आणि हे जहाज ब्रिटिश रेड क्रॉसचे होते. जहाजाचे रूपांतर एका हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते.
२१ नोव्हेंबर १९१६ रोजी व्हायलेट नेहमीप्रमाणे जहाजावर काम करत असताना जहाजावर अचानक एक स्फोट झाला. २०१६ साली झालेल्या पाहणीत असा निष्कर्ष निघाला की या जहाजाने समुद्रात खोलवर असलेल्या सुरुंगाजवळून प्रवास केल्याने तो स्फोट झाला. हा स्फोट झाल्यानंतर ५५ मिनिटांतच जहाज एजियन समुद्रात बुडाले.
या अपघातात १०६६ लोकांपैकी फक्त ३० लोक वाचू शकले ज्यांत व्हायलेट देखील होती.
जहाज बुडायला लागल्यानंतर पटापट अनेक लोक लाईफबोट्समध्ये गेले. पण जहाज बुडताना जवळच्या लाईफबोट्सना देखील तळाशी खेचू लागले. तेव्हा व्हायलेटने जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. तेव्हा तिच्या डोक्याला मोठी जखम झाली, तरीही तिचा जीव वाचला.
–
- ‘टायटॅनिक समुद्रात बुडालं’, याव्यतिरिक्त तुम्हाला माहित नसलेल्या २० गोष्टी जाणून घ्या
- टायटॅनिक हिमनगाशी टक्कर होऊन बुडालेलं नाही, “खरं” कारण काय आहे, वाचा!
–
तिच्या बरोबर या जहाजावर आर्थर जॉन प्रिस्ट आणि आर्ची ज्वेल ही दोन माणसे देखील होती. हे लोक टायटॅनिक अपघातातून सुद्धा सुखरूप वाचले होते आणि योगायोगाने ब्रिटॅनिकाच्या अपघातातही हे दोघे वाचले.
या अपघातानंतर सुद्धा व्हायलेटने जहाजांवर काम करणे सुरु ठेवले. १९५० साली तिने कामातून निवृत्ती घेतली आणि ती ग्रेट ऍशफिल्ड, इंग्लंड येथे स्थायिक झाली.अखेर १९७१ साली वयाच्या ८३ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.
इतक्या वेळा मृत्यू इतक्या जवळून बघणाऱ्या मिस अनसिंकेबल व्हायलेट जेसोपचे आयुष्य इतके थ्रिलिंग होते. ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.