' खड्ड्यांची पाहणी चक्क लोकलमधून! ठाकरेंच्या सुपुत्राचा जगावेगळा (?) दौरा – InMarathi

खड्ड्यांची पाहणी चक्क लोकलमधून! ठाकरेंच्या सुपुत्राचा जगावेगळा (?) दौरा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही वर्षापुर्वी एका सोडा कंपनीने जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्यात खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी शक्कल लढवत गावात आलेल्या नेतेमंडळींनाच मुद्दाम खड्ड्यांची त्रासदायक सफर घडवली, परिणामी पुढच्याच दिवशी त्या गावात रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाली.

या जाहिरातीप्रमाणे ”एखादा तरी नेता आपल्या शहरात यावा, आपल्या तावडीत सापडावा मग बघा कसा त्याला खड्ड्यातून फिरवतो” याकडे आशाळभुत नजरेने डोळे लावून बसलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांचं हे स्वप्न अजून तरी पूर्ण झालेलं नाही.

 

roads inmarathi

 

अर्थात यामागे कोणत्याही प्रकारची सुडबुद्धी नाही तर शतकानुशतकं जो मनस्ताप आम्ही भोगतोय त्याची किमान थोडीतरी जाणीव राजकारण्यांना व्हावी, ज्या खड्ड्यांमुळे आमची हाडं खिळखिळी झाली, त्याचे थोडे तरी हादरे नेत्यांना बसावे, ज्यांनी आमचं शहर खड्ड्यात घातलं, त्यांनी एकदा तरी खरोखर खड्ड्यांची पाहणी ही खड्ड्यांतून प्रवास करत करावी हे कल्याण-डोंबिवलीकरांचं स्वप्न काल नजरेच्या टप्प्यात आलं होतं.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीकरांच्या दौऱ्यावर येणार असं जाहीर झालं आणि आता किमान मनसेला तरी आमची कीव यावी यासाठी कल्याण-डोंबिवलीकरांनी घरातले देव पाण्यात ठेवले.

राजकारण्यांचा दौरा म्हटला की महापालिकेचे अधिकारी झोपेतून जागे होतात, आणि सामान्यांना वर्षभर त्रास देणारे खड्डे एका रात्रीत बुजवले जातात. मात्र अमित ठाकरे यांचा दौरा केवळ दोन दिवस आधीच जाहीर झाल्याने खड्डे बुजवण्यालाही वेळ न मिळाल्याने ”आता यांची बरी जिरेल” म्हणून नागरिक शुक्रवारची पहाट होण्याची आतुरतेने वाट पहात होते.

मात्र रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता अशा समस्या सुटण्याचं भाग्य लाभलं तर कल्याण-डोंबिवलीकरांचं आयुष्य फिकं पडेल या उदात्त विचाराने अमित ठाकरे यांनीही आपल्या दौऱ्यात ‘यु टर्न’ घेतला.

 

amit thakrey inmarathi

राज ठाकरेंच्या वेगवान राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागण्याची ५ कारणे जाणून घ्या!

मनसे-भाजप युती: आशाळभूत स्वप्नाळूंना पडद्यामागच्या ‘या’ खेळींची जाणीवच नाही

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर दौरा आखलेल्या अमित ठाकरे यांचा मुख्य मुद्दा आहे शहरांतील रस्ते! अर्थात निवडणूकांपुर्वी या मुद्द्यावर पल्लेदार भाषणांची आता नागरिकांनाही सवय झाल्याने त्याचं कौतुक वाटणंही बंद झालंय.

तर पुन्हा एकदा मतदारांच्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन ठाक-यांचे सुपुत्र प्रवासाला निघाले, मात्र खड्ड्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी उघडलेलं त्यांचंं तोंड शहरातील खड्ड्यांनीच आपोआप बंद केलं.

कधीही न सुटणारी शिळफाट्याची कोंडी, कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यारस्त्यांवर पसरलेलं खड्ड्यांचं जाळं या सगळ्याच परिस्थितीमुळे मुंबई ते डोंबिवली या प्रवासात ३-४ तास घालण्यापेक्षा थेट सामान्यांचं वाहन असलेली आपली लोकलं भली असा आगळावेगळा विचार अमित ठाकरे यांनी मांडला.

 

amit mns inmarathi

 

मात्र प्रत्यक्षात ज्या खड्ड्यांच्या प्रश्नांची पाहणी करायची आहे, खड्डे या मुद्द्याच्याच आधारे निवडणूक लढवायची आहे ते खड्डे न पाहता त्यावर बोलणंं हे कितपत योग्य आहे? खड्ड्यांमुळे लांबलेला कंंटाळवाणा प्रवास टाळण्याची ही शक्कल म्हणजे हुशारी वाटत असली तरी यामुळे खड्ड्यांचा प्रश्न मिटणार का?

एखादी समस्या सोडवायची असेल तर आधी त्या समस्येचा अनुभव घ्यावा लागतो, ती समस्या जवळून बघावी लागते, तरच त्या समस्येची दाहकता कळते, मग अशावेळी खड्ड्यांना बगल देत लोकलचा सोपा प्रवास करणं आणि त्यानंतर खड्ड्यांमुळे होणारा त्रास, सत्ताधा-यांचं दुर्लक्ष, त्यामुळे भरडली जाणारी गरीबबिचारी जनता अशा लंब्याचौड्या गप्पा मारणं किती योग्य आहे? याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा,

लोकलमध्ये बसलेल्या अमित ठाकरे यांना काही पत्रकारांनी हा पर्याय का निवडला? असा खुला सवाल केला, त्यावेळी ”कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांची दुरावस्था, खड्डयांचे साम्राज्य यांमुले प्रवासाचा वेळ वाढत असल्याने लोकलचा प्रवास सोपा वाटतो” अशी कबुलीही अमित ठाकरे यांनी दिली.

आता यांचं हे उत्तर म्हणजे प्रामाणिकपणा म्हणावा की सोईस्कररित्या टाळलेली जबाबदारी?

 

road inmarathi

 

बरं, एक दिवस प्रवास करणा-यांना रस्तेप्रवास टाळून लोकलची निवड करणं सोप आहे, मात्र ज्यांना वर्षानुवर्ष दररोज बस, कार, टु व्हिलर अशा वाहनांनी प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्याचं काय? याचं उत्तरही दौरक-यांनी दिलं असं तर अधिक बरं झालं असतं.

असो, असे अपेक्षाभंग कल्याण-डोंबिवलीकरांसाठी काही नवे नाहीत. मुळात आपल्या समस्या सुटतील, सगळं काही अलबेल होईल अशी आशा करणं हेच चुकीच आहे, याची जाणीव असूनही मतदरा पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात, आपलं भलं होईल अशी अपेक्षा करतात, आणि ज्या क्षणी अपेक्षा केली जाते त्याच क्षणापासून अपेक्षाभंगाच्या दुःखाला सुरुवात होते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?