Site icon InMarathi

”अनुराधा पौडवाल मागे का पडल्या? मंगेशकर कुटूंबाची मक्तेदारी की आणखीन काही…”

anuradha inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखिका – नेहा कुलकर्णी

===

अनुराधा पौडवाल हे नाव म्हणजे संगीतक्षेत्रातील एक अलौकिक रत्न! व्यक्तिमत्व आणि आवाज असला तरिही हे स्थान निर्माण करणं त्यांच्यासाठी सोपं काम नव्हतं. लता मंगेशकर या वादळासमोर टिकाव धरणं आणि टिकून रहाणं हे अत्यंत कठीण असं काम या सुरेल गळ्यानं केलं आणि केवळ टिकावच धरला नाही तर हिंदी चित्रपट संगीताला एक नविन ओळख दिली. अनुराधा पौडवाल हे केवळ नाव नसून ती एक संघर्षगाथा आहे.

 

 

संगीत चित्रपटात एक गाणं आहे,” जो गीत नहीं जन्मा वो गीत बनाएंगे”. अनुराधा पौडवाल या गोड गळ्यातून आलेले सूर या गाण्याला लाभले आहेत. अनुराधा यांची गायन कारकीर्दही याच अभिनिवेषानं भारलेली होती/आहे. मात्र ज्या काळात त्यांनी हिंदी पार्श्वगायनाचा निर्णय घेतला तो काळ कोणत्याही गायिकेसाठी सहज सोपा नव्हता.

लता मंगेशकर नावाचं गारूड भारतीयांच्या मनावर असं बसलं होतं की ते सहजी कोणी उतरवू शकणारच नव्हतं. केवळ आवाजच नाही तर या कुटुंबाची मक्तेदारी इतकी भक्कम होती की त्यांनी इतर कोणाला शिरकावही करू दिला नाही की टिकू दिलं नाही. समोरासमोर विरोध करणं तर दूरच आडून विरोधात उभं रहाणार्‍यांनाही कसं बाजूला केलं गेलं याचे अनेक किस्से आहेत.

आपल्याकडे जेंव्हा एखाद्या व्यक्तीला देवत्व बहाल केलं जातं तेंव्हा माणूस म्हणून त्यानं केलेल्या चुकांकडे डोळेझाक करण्याची पध्द्त आहे अशीदेखील अनेक उदाहरण सापडतील. नेमकं हेच घडलं भारतीय हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात!

अर्थात लतादीदींच्या करोडों चाहत्यांच्या गर्दीत मी देखील आहेच. गानसम्राज्ञींच्या सुरांची भुरळ मलाही पडतेच. त्यांच्या गाण्यांशिवाय माझ्यासह कोणत्याही संगीतप्रेमींचं आयुष्य पुर्ण होणं शक्यच नाही. केवळ दीदीचं नव्हे तर संपुर्ण मंगेशकर कुटुंबाने जगभरातील रसिकांना सुरांची जी देणगी दिली आहे त्यासाठी त्यांचे ऋण कधीही फेडले जाणार नाहीत.

 

 

लता मंगेशकर हे हिंदी चित्रपट संगीतातलं अखेरचं स्थानक मानलं गेलं. मात्र  त्यानंतर आलेल्या आवाजांना कधी इथल्या सिस्टिमनं तर कधी लताच्या राक्षसी चाहत्यांनी टिकूनच दिलं नाही. येणार्‍या प्रत्येक आवाजाची तुलना लतादीदींशी केली जाऊ लागली आणि दीदींहून कमी असल्याचे ताशेरे ओढत त्यांचं खच्चीकरणही केलं जाऊ लागलं. अनेक आवाज आले, हिट गाणी देऊन नंतर गायब झाले. कोणीच टिकलं नाही याला सूर कच्चा असणं हे कारण खचितच नव्हतं.

 

 

मराठीत आशा-उषा आणि हिंदीत लता-आशा अशी चिरेबंदी भिंतं बांधली गेली. यातून पार होणं सामान्य गायिकेचं काम उरलंच नाही. यातूनही काहीजणींनी टिकाव धरला. मात्र अनुराधा पौडवाल हे नाव असं आहे जिनं पहिल्यांदाच जाहीर बंडखोरी केली.

हिंदी चित्रपटात गाणी गाणं हे कोणा एक गळ्याचं मक्तेदारीचं काम नाहि हे  ‘डंके की चोट पे’ सांगणारी ही पहिली आणि एकमेव गायिका ठरली.

अनुराधा या नावानं लता या ब्रॅण्डची मक्तेदारी मोडून काढली. तरिही इथे कामं मिळणं आणखीनच कठीण होऊन बसलं कारण या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर होते लक्ष्मीकांत प्यारेलाल! लताचे भक्त असणारे एलपी नव्या काळातील आवाजाच्याही शोधात होते आणि अनुराधाचे गुरू-मार्गदर्शकही! त्यांनी अनुराधा यांनी वारंवार संधी दिली. लताचा विरोध बगलेत घेऊन पुढे जाण्याचं धाडस फ़क्त याच ज्येष्ठ जोडीकडे होतं.

अनेक चित्रपटात त्यांनी फक्त अनुराधा यांचाच आवाज वापरला मात्र नंतर दीदींनी ती गाणी डब करून अल्बमच्या अल्बम खाऊन टाकले हे वास्तव आहे. सच्चा सूर लपत नाही हे मात्र अनुराधा यांनी सिध्द केलं आणि त्याचं उदाहरण म्हणजे ‘नगिना’ आणि ‘प्यार झुकता नहीं’. नगिनामधली सगळी गाणी लतादीदींनी डब करून घेऊनही अनुराधाच्या आवाजातलं ‘तुने बेचैन’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं तसंच ‘प्यार झुकता नहीं है’ मध्ये अनुराधा यांची गाणी खाऊन टाकतानाही एका गाण्याची केवळ सुरवात अनुराधाच्या आवाजात ठेवली गेली.

 

 

गायिका म्हणून अल्बमवर लतादीदींचं नाव झळकलं तरिही या चित्रपटासाठी अनुराधा यांना पुरस्कार मिळाला.

दीदींचा अनुराधा यांना असणारा विरोध आणि त्यामुळे अनुराधा यांचा इंडस्ट्रीबाहेर फेकला जाण्याचा धोका लक्षात घेऊन एलपींनी लतादीदींच्या विरोधातही अनुराधा यांना गाण्याची संधी देताना शक्कल लढविली आणि एक नविन फॉर्म्युला बनविला.

 

 

पूर्वी सिनेमातली सर्वच्या सर्व गाणी बहुतेक करून लतादीदी एकट्याच गात असत. एखादं  उडत्या चालीचं गाणं असेल तर ते आशाताईंच्या वाटेला जात असे. जसजसे हे दोन्ही गळे प्रौढ होऊ लागले तशी नव्या तरूण नायिकांसाठी कोवळ्या आवाजाची गरज निर्माण झाली. मग सिनेमात जर चार गाणी असतील तर दोन अलका, एक कविता आणि एक अनुराधा अशी विभागणी होऊ लागली. खरंतर यामुळे पुन्हा अनुराधाच्या वाट्याला उपेक्षाच येत राहिली. तरिही खचून न जाता, निराश न होता अनुराधा यांनी संघर्ष चालूच ठेवला.

त्या आणि त्यांचे पती यांना आलेले अनुभव सर्वश्रुतच आहेत. अनुराधा यांनी स्विकारलेल्या या बंडखोरीचा परिणाम म्युझिक अरेंजर म्हणून काम करणार्‍या त्यांचे पती अरूण पौडवाल यांच्या करियरवरही झाला. त्या काळात अरूण आघाडीच्या अनेक संगीतकारांकडे अरेंजर म्हणून काम करत होते मात्र आशा भोसले स्टुडिओत येणार असतील तर त्यांना स्टुडिओमधून अगदी अपमानास्पद पध्दतीनं बाहेर जायला सांगितलं जात असे.

अनेक संगीतकारांना रीतसर धमक्या दिल्या जात की, जर त्यांनी अनुराधाकडून गाऊन घेतलं तर लता आणि आशा त्यांच्यासोबत काम करणार नाहीत.

 

 

लता-आशा ब्रँडशी पंगा घेण्याचं धाडस अर्थातच कोणात नव्हतं त्यामुळे अनुराधा यांना केवळ नावापुरतं घेतलं जात असे. अखेर नव्वदीच्या दशकात अनुराधाला टी सिरीजची साथ मिळाली अणि संगीतक्षेत्रातील बड्या ब्रॅण्डची उरली सुरली राक्षसी मक्तेदारी संपली. त्यानंतर महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात अनुराधा यांचे सुर नव्याने घुमू लागले.

असंख्य भजनं, भक्तीगीतं आजही अनुराधा यांच्याच गोड गळ्यानं अधिक पवित्र भासतात.

 

 

लता या आवाजाचं गारूड रसिकांच्या मनावर कायम राहिल यात शंकाच नाही मात्र ‘लता दीदींनंतर गाणं थांबतं’ हा विचार अनुराधा या आवाजानं कायमचा मोडीत काढल्यानं नंतरच्या पिढीतील श्रेया, बेलासारखे नितांतसुंदर गळे इथे मोकळेपणानं गाऊ शकले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version