आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
७० आणि ८० चा काळ सिनेसृष्टिसाठी खूप महत्वाचा होता, एकीकडे कमर्शियल सिनेमांची लोकप्रियता कमी होऊन समांतर सिनेमांना यश मिळायला सुरुवात झाली होती. याच समांतर सिनेमाच्या चळवळीने बऱ्याच मोठ्या लोकांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली.
दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आजमी, इरफान, अनुपम खेर, पंकज कपूर, सीमा बिसवास, रोहिणी हट्टंगडी यांच्यासारखे मुरलेले कलाकार इंडस्ट्रीत यायला सुरुवात झाली होती.
यांच्या सिनेमांना फक्त समीक्षकच नव्हे तर प्रेक्षकांनीसुद्धा पसंती दर्शवायला सुरुवात केली होती. याचदरम्यान सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश मेहरा हे दिल्लीत आले तेव्हा एका थिएटर आर्टिस्टला बघून त्यांनी त्याला त्वरित मुंबईला यायला सांगितलं तो आर्टिस्ट म्हणजे दूसरा तिसरा कुणी नसून राज बब्बर होते!
१९८० मध्ये आलेल्या इन्साफ का तराजू या सिनेमाने राज बब्बर यांना बॉलिवूडमध्ये ओळख तर मिळालीच होती, पण एका ‘महानायका’मुळे राज बब्बर यांचं करियर कधीच पुढे जाऊ शकलं नाही, ही गोष्ट आहे त्याआधीपासून घडणाऱ्या फिल्मी राजकारणाची.
राज बब्बर एनएसडी मधून बाहेर पडून त्यावेळेस दिल्लीत थिएटर करत होते, एका नाटकादरम्यान प्रकाश मेहरा यांना त्यांचा अभिनय प्रचंड आवडला आणि त्यांनी राज यांना मुंबईला येण्यास सांगितले, शिवाय स्वतःच्या घरात राहायची सोय करून द्यायचं आणि एक सिनेमासुद्धा करायचं असं वचन दिलं.
प्रकाशजी यांनी सांगितल्याप्रमाणे राज मुंबईत आले, ज्या सिनेमासाठी प्रकाश यांनी राज बब्बरचा विचार केला होता तो सिनेमा म्हणजे नमक हलाल, अमिताभ बच्चनसारखा मोठा स्टार या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार होता आणि सहाय्यक भूमिकेसाठी प्रकाशजी यांनी राज बब्बर यांना निवडलं होतं.
सिनेमात अमिताभसारखा स्टार असल्यावर त्यावेळचे दिग्दर्शक निर्माते हे स्टारच्या मर्जीविरुद्ध काहीच करत नव्हते. अमिताभ तेव्हा यशाच्या शिखरावर होते. नमक हलाल या सिनेमात त्यांच्या सोबत कुणीतरी त्यांच्याच तोलामोलाचा स्टार हवा अशी मागणी अमिताभ यांनी प्रकाश मेहरा यांच्याकडे केली.
राज बब्बर नको म्हणून अमिताभ यांनी प्रकाश मेहरा यांच्याकडे गाऱ्हाणे गायला सुरुवात केली, अखेर प्रकाश मेहरा यांना राज बब्बरला डच्चू द्यावा लागला आणि त्याजागी वर्णी लागली ती शशी कपूर यांची.
अशाप्रकारे अमिताभमुळे पहिला मोठा सिनेमा राज बब्बर यांच्या हातून सुटला. नंतर बी. आर, चोप्रा यांच्या इन्साफ का तराजूमधून राज बब्बर यांना मोठा ब्रेक मिळाला, नंतर राज बब्बर यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या.
–
- स्त्री-अत्याचारावर बेधडक भाष्य करणारा, न्यायदेवतेच्या डोळ्यात अंजन घालणारा ज्वलंत सिनेमा
- प्रेमळ स्वप्नं दाखवणाऱ्या पडद्यावरील या १० रोमँटिक जोड्यांची खऱ्या जीवनातील कहाणी अधुरीच राहिली
–
पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्याच भूमिकांमधून त्यांनी आपलं अभिनय कौशल्य दाखवलं, एक काळ असा होता की राज बब्बर यांना भविष्यातला अमिताभ म्हणून ओळख मिळायला सुरुवात झाली, इथेच गोष्टी बिघडायला सुरुवात झाली.
सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी दिलीप कुमार यांच्यासोबत एक सिनेमा करत होते, त्यात दिलीप कुमार साहेबांसमोर त्यांनी राज बब्बर यांना घेतलं होतं, तो सिनेमा होता शक्ति. अमिताभ यांना ही बातमी जशी समजली तसं त्यांनी सिप्पी यांच्याकडे धाव घेतली आणि दिलीप कुमार यांच्यासोबत काम करायची इच्छा वर्तवली.
सिप्पी यांनीसुद्धा अमिताभ यांच्या स्टारपॉवरपुढे आपली शस्त्रं टाकली आणि राज बब्बरऐवजी त्यांनी शक्तिमध्ये अमिताभ यांना घेतलं.
शक्ति चांगलाच हीट झाला, दोन पिढ्यांचे दोन नायक एकमेकांसमोर आले आणि लोकांनी या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. पण राज बब्बरसारख्या गुणी अभिनेत्याच्या हातून मात्र ही दुसरी मोठी फिल्मसुद्धा केवळ बच्चनमुळे निसटली.
बच्चन आणि राज बब्बर यांच्यातल्या या वादांमागच्या बऱ्याच थिओरीज समोर आल्या होत्या, त्यातला एक सर्वात महत्वाचा आणि गाजलेला मुद्दा म्हणजे रेखा, राज बब्बर यांच्यातली जवळीक!
हे ऐकून तुमच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील कारण अमिताभ आणि रेखा यांच्यातल्या अफेअरची चर्चा सगळीकडेच होत होती, आणि लग्न होऊनसुद्धा या अशा चर्चा घडत असल्याने अमिताभ आणि जय बच्चन यांच्यातही बरेच खटके उडत होते.
या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आल्या नसल्या तरी या कलाकारांच्या वागण्यावरून ते स्पष्ट दिसत होतं. याच दरम्यान रेखाने अमिताभ यांच्यापासून अलिप्त व्हायचं ठरवलं, आणि हळू हळू राज बब्बर आणि रेखा जवळ येऊ लागले.
आमच्या दोघांतले संबंध “फक्त मैत्री”च्याही पलीकडचे होते हे खुद्द राज यांनी स्मिता पाटील यांच्या निधनानंतर दिलेल्या कित्येक मुलाखतीत स्पष्ट केले होते.
रेखा आणि राज बब्बर यांच्यातली ही जवळीकच अमिताभ यांना खटकायची की इच्छा असूनही अमिताभ यांना रेखावर असलेलं प्रेम व्यक्त न करता येणे ही खंत वाटायची हे तर आता खुद्द अमिताभच जाणे!
रेखाने नंतर राज बब्बर यांच्याशीसुद्धा फारकत घेतली, पण या सगळ्या गोष्टींमुळे राज बब्बर यांना बॉलिवूडच्या सुपरस्टार पदापासून कायमच लांब राहायला लागलं.
पहिले उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट खलनायक आणि मग उत्कृष्ट चरित्र भूमिका लीलया साकाराणारे राज बब्बर यांनी कालांतराने सिनेमामधून काढता पाय घेतला आणि राजकारणात नशीब आजमावलं, लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे त्यांनी उत्तम कामगिरी केली.
बच्चनच्या स्टार पॉवरमुळे जरी राज बब्बर यांना स्टारडमपासून लांब रहावं लागलं असलं तरी, त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं ते कायमचं! इंडस्ट्रीतल्या काही तज्ञांच्या मते फक्त राज बब्बरच नाही तर विनोद खन्नासारख्या अभिनेत्यालासुद्धा अमिताभ यांनी इंडस्ट्रीतून बाहेर काढायचा बराच प्रयत्न केला.
अर्थात यामध्ये तथ्य कीती हे या कलाकारांनाच ठाऊक, पण एकाअर्थी या सगळ्या चर्चा बिनबुडाच्या नक्कीच नव्हत्या कारण आज या सगळ्यांच्याही कित्येक पटीने यशस्वी आणि लोकप्रिय नाव एकच आहे ते म्हणजे अमिताभ बच्चन.
त्यामुळे या सगळ्या थिओरीमध्ये काहीच तथ्य नाही हे म्हणणंसुद्धा तितकंच चुकीचं आहे!
===
- जेव्हा परवीन बाबीने केले होते अमिताभवर “अतिशय गंभीर” स्वरूपाचे आरोप
- अमिताभ बच्चनजींमुळे चक्क एका मुख्यमंत्र्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.