Site icon InMarathi

एक अनोखा तुरुंग जिथे चार भिंतींमध्ये नाही, तर ‘मोकळ्या हवेत जगतात कैदी’…!

open jail sangli inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गुन्हेगार म्हटलं की शिक्षा आली आणि शिक्षा म्हटलं की कारागृह आलं. कारागृह म्हटलं की डोळ्यासमोर येतं दगडी भिंतीआडचं बंदिस्त जीवघेणं जीवन. मात्र सांगली जिल्ह्यात एक कारागृह असं आहे जिथे कैद्यांना चार भिंतीआड नाही तर मुक्तपणे एका वसाहतीत ठेवलं जातं.

कायद्यानं शिक्षा दिलेली असते, पण ती गुन्हेगाराला लाजिरवाण्या आयुष्याकडे नेत नाही तर माणसात आणते. देशातील एकमेव अशा या अनोख्या कारागृहाबाबत जाणून घेऊया.

गुन्हेगार, कैदी म्हटलं की डोळ्यासमोर येतात कारागृहाच्या जीर्ण, मळक्या गणवेशातले क्रूर चेहर्‍याचे खुनशी कैदी! बेड्यांमधे जखडलेले आणि आयुष्यात केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत दिवस कंठणारे.

 

 

जगभरात कैद्यांबाबत, गुन्हेगारांबाबत दोन मतप्रवाह आढळतात. पहिला म्हणजे त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि दुसरा त्यांना समाजापासून अलिप्त ठेऊन प्रायश्चित्त घ्यायला लावणारा.

दुसरा गट असं मानतो की माणसातला गुन्हेगारी प्रवृत्ती मिटली पाहिजे, शिक्षा व्हायची तर त्याच्यातला माणूस जीवंत झाला पाहिजे. गुन्हेगारालाही सामान्य आयुष्य जगण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे.

साधारणपणे जग पहिल्याच विचारसरणीवर चालत असल्यानं, जगभरात उंच दगडी भिंतींनी, कडेकोट पहार्‍यात बाहेरच्या जगापासून तोडलेली कारागृहं आढळतात. गुन्हेगाराला शिक्षा तर व्हायला हवी मात्र त्याला कारागृहात डांबता कामा नये अशी सोय जगभरात काही देशांत आहे. या कारागृहांना खुली कारागृहं असं म्हटलं जातं.

 

bbc.com

समाजासाठी तुलनेनं कमी उपद्रवी असे गुन्हेगार या कारागृहात ठेवले जातात. मात्र तसं पहायला गेलं तर ही सर्व कारागृहं पारंपरिक कारागृहंच आहेत. मुख्य कारागृहाच्या आवारात किंवा आसपासच्याच परिसरात ती असल्याचं आढळतं.

भारतातल्या महाराष्ट्र राज्यात मात्र एक अनोखा कारागृह आढळतो. इथे कोणत्याही इमारतीच्या आत खुलं कारागृह नसून एक संपूर्ण गावच कैद्यांसाठी उभं करण्यात आलं आहे.

या गावात शिक्षा भोगत असणारे कैदी तुम्हाला बेड्यांत बंद आढळणार नाहीत, तर तुमच्या आमच्यासारखेच मुक्तपणे हिंडताना दिसतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतंत्र भारतात या कारागृहाची निर्मिती झालेली नसून एका द्रष्ट्या राजाच्या राजवटीत या कारागृहाची स्थापना करण्यात आली आहे.

 

 

महाराष्ट्रातील माणदेशात औंध संस्थानाचे पंतप्रतिनिधी राजा भवानराव श्रीनिवासराव हे प्रगतीशील राजा म्हणून ओळखले जात. औंध संस्थान हे सर्वार्थानं आदर्श असं संस्थान मानलं जाण्याचं कारण आहे हा द्रष्टा राजा. आधुनिक शिक्षण घेतलेला उदार विचारांच्या या राजानं कला, संगीत, शिक्षण सर्वच आघाड्यांवर आपलं संस्थान कायम अग्रस्थानी ठेवलं.

इंग्रज अधिकारी प्रिगमन याच्याशी झालेल्या चर्चेतून या तुरुंगाची अनोखी संकल्पना जन्माला आली आणि आज आठ दशकांनंतरही ती चालू आहे.

त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना अनेक कैद्यांना आपल्या दु:वर्तनाची जाणीव होत असते आणि सामान्य आयुष्य जगण्याची ओढही लागते. याचाच परिणाम म्हणजे त्यांचं वर्तन सुधारतं. अशा वर्तन सुधारलेल्या मात्र शिक्षेची वर्षं शिल्लक असणार्‍या कैद्यांना त्यांच्या सदवर्तनाचं बक्षीस म्हणून या कारागृहात आणलं जातं. अर्थात रुढार्थानं हे कारागृह नसून हे स्वतंत्रपूर नावाचं छोटसं गाव आहे.

 

 

शेत जमिनीनं समृध्द असं हे गाव कैद्यांना माणसात आणतं. कैदी इथे पक्क्या बांधलेल्या स्वतंत्र घरांमधून रहातात, त्यांचं कुटुंबही त्यांना भेटू शकतं किंवा सोबत राहू शकतं. कैदी शेतात काम करतात आणि भाजीपाला, पिकं विकायला बाजारातही मोकळेपणानं जाऊ शकतात.

१९३९ साली हा अनोखा तुरूंग बनला तेव्हा इथे एक जेलर आणि सहा कैदी आणले गेले होते. जेव्हा हा तुरूंग बनला तेव्हा इथे ओसाड माळरान होतं. गुन्हेगारांना मोकाट सोडण्याचा धाडसी प्रयोग प्रथमच केला जाणार होता.

त्यांच्यावर नेमकी कोण आणि कशी देखरेख ठेवणार याचा प्रश्न जेलरनी सोडवला. सहाजणांसोबत त्यांचा सातवा साथीदार म्हणून ते राहू लागले कारण आपल्या राजाप्रमाणेच त्यांचाही गुन्हेगारांमधल्या माणसावर विश्र्वास होता. या सहा कैद्यांच्याबरोबरीनं त्यांनी या ओसाड जमिनीवर हिरवीगार शेती उभी केली, तुरुंगाच्या खोल्यांचं बांधकामही सगळ्यांनी मिळून केलं.

कैद्यांनी स्वत:चा तुरूंग स्वत:च बांधण्याचं इतिहासातील बहुतेक हे एकमेव उदाहरण असावं. या तुरूंगाची खासियत म्हणजे, इथे जरी कैद्यांच्या हातापायात बेड्या नसल्या तरीही कैदी इथून पळून जात नाहीत.

 

या अनोख्या जेलवर आधारित ‘दो आँखे बारह हाथ’ हा चित्रपट व्ही. शांताराम यांनी बनविला. या चित्रपटाचं चित्रीकरणही याच खर्‍या-खुर्‍या तुरूंगात झालं होतं.

अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट याच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या एका दुर्दैवी अपघातामुळे व्ही. शांताराम यांचा अभिनेता म्हणून अखेरचा चित्रपट ठरला.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version