Site icon InMarathi

देशाचे तुकडे करू पाहणारा कन्हैया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये; आता या पक्षाचा विनाश अटळ!

kanhaiya kumar featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यात ज्या पक्षाचा सिंहाचा वाटा होता, ६० वर्षं ज्या पक्षाने या देशाची सूत्रं सांभाळली, भले त्यावर कितीही आरोप लागले असो पण ज्या पक्षाशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण आहे असा कॉँग्रेस पक्ष आज मात्र फार बिकट परिस्थितीतून जात आहे. याची जाणीव आज प्रकर्षाने झाली जेव्हा कन्हैया कुमार नामक माणसाने या पक्षात प्रवेश घेतला आणि कॉंग्रेसने त्याला रेड कारपेट एंट्रीसुद्धा दिली.

कन्हैयाच्या कॉंग्रेसप्रवेशाची बातमी जशी समोर आली तसं एकच प्रश्न माझ्या मनात डोकावला तो म्हणजे “कॉंग्रेस पक्ष हा अजून कीती खालच्या पातळीवर उतरणार आहे?”

एकेकाळी जेएनयुच्या कॅम्पसमध्ये “भारत तेरे तुकडे होंगे..”, “अफजल हम शरमिंदा है..तेरे कातील जिंदा है” अशा घोषणा दिल्या गेल्या आणि या सगळ्याचा म्होरक्या कोण होता तर कन्हैया कुमार!

 

 

धडधडीत व्हीडियो स्वरूपात पुरावे असतानासुद्धा मी त्याठिकाणी हजरच नव्हतो असा कांगावा करणारा कन्हैया कुमार आपल्याला नवीन नाही. आज या अशा माणसाला कॉँग्रेससारख्या पक्षात स्थान मिळालेले बघून कॉंग्रेसची कीवसुद्धा करावीशी वाटत नाही.

जेएनयुमध्ये काय चालतं, तिथे कोणत्या प्रकारच्या विचारांना खतपाणी घातलं जातं हे सगळं आपल्याला माहीत आहे. शिवाय हे विद्यापीठ म्हणजे अॅंटी नॅशनल लोकांचा अड्डा आहे हेसुद्धा आपल्याला माहीत आहे, शिवाय इथल्या लोकांचा भारतीय राजकारणात असलेला हस्तक्षेपसुद्धा आपल्यासाठी नवीन नाही.

एवढं होऊनही देशाचे तुकडे करायची भाषा ज्याच्या नेतृत्वाखाली केली जाते, अफजल गुरुसारख्या नराधमाचे गुणगान गायले जातात अशा माणसाला कॉंग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष आश्रय देतो ही गोष्ट काही केल्या पचत नाही.

बरं इथवर हा कन्हैया थांबला का तर नाही! आज ज्या देशात तो मोकळेपणाने श्वास घेतोय, स्वतःच्या तोंडातून जी गरळ ओकतोय, याचं स्वातंत्र्य देणाऱ्या भारतीय आर्मीलासुद्धा तो ‘रेपिस्ट’ म्हणून संबोधतो, पण कॉंग्रेससारखा पक्ष मात्र या अशा माणसाचे पायघड्या घालून स्वागत करतो.

 

एवढं सगळं बोलूनसुद्धा आज कन्हैया मोकाट फिरतोय, ना शिक्षण ना नोकरी तरीही एक टुकार पुस्तक लिहून त्याच्या रॉयल्टीवर मस्त मजा करतोय, आता तर तो कॉँग्रेसमध्ये शिरलाय, आणि समजा हेच जर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाने केले असते तर?

अहो, देशाला आणि आर्मी नावं ठेवणं तर दूरच राहिलं, आपल्या विभागातल्या एखाद्या नगरसेवकाविरोधात आपण एक शब्द जरी काढला तरी त्याने पाळलेले कुत्रे आपल्याला चावायलासुद्धा पुढे मागे बघत नाही.

काही वर्षांपूर्वी ज्या कन्हैया कुमारला कुणी कुत्रंसुद्धा विचारत नव्हतं आज तोच कन्हैया देशाला, आर्मीला शिव्या घालून कॉंग्रेसच्या मांडीत जाऊन बसलाय, आणि हो ही तर सुरुवात आहे आता पुढे तो आणखीन काय करेल, काय काय बरळेल याचा विचारसुद्धा न केलेला बरा.

कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना तो एवढा मोकाट सुटला होता आता तर कॉंग्रेससारखं खेळणं हाती दिल्यावर हा कन्हैया त्याच्या रासलीला नक्कीच दाखवणार!

 

 

कॉंग्रेसमध्ये शिरल्यावर कन्हैया म्हणाला “कॉंग्रेस हा एक फक्त पक्ष नाहीये तर तो एक विचार आहे, कॉंग्रेससारखा पक्ष टिकून राहीला तरच गांधीजींची एकता टीकेल, भगत सिंहचं साहस टिकेल, आंबेडकरांची समानता टिकेल, आणि हे सगळं झालं तरच भारत टिकेल!”

या महाशयांच्या म्हणण्यानुसार कॉंग्रेसशिवाय भारत या जगाच्या नकाशावर टिकूनच राहणार नाही, आणि हाच पक्ष टिकवून ठेवण्यासाठी कन्हैयासारख्याला सोबत घेणे हाच एक खूप मोठा विनोद आहे.

ज्या माणसाने देशाच्या विभाजनाची भाषा केली, ज्याने आर्मीवर बलात्कारासारखा गंभीर आरोप लावला त्याच माणसाला आज कॉंग्रेस पक्ष टिकवण्यासाठी बरोबर घेतलं जातंय हा केवढा मोठा विरोधाभास आहे ना?

 

 

राजकारण हे किती खालच्या पातळीवर खेळलं जाऊ शकतं याची माहिती आहे मला, शिवाय या राजकारणात एकही व्यक्ती धुतल्या तांदळासारखा नाही याचीही जाणीव आहे, कोणत्याही पक्षात सुशिक्षित लोकांपेक्षा गुंडच जास्त भरलेत हेसुद्धा ठाऊक आहे मला!

अट्टल गुंड, गुन्हेगारांनासुद्धा खासदार, आमदार, मंत्री बनून शपथ घेताना आपण बघितलं आहे, पण ज्या माणसाने देशाच्या मुळांवरच आघात केला आहे, जो माणूस या देशातल्या सिक्युरिटी फोर्सेसचा अपमान करतो त्याला एका राष्ट्रीय पक्षाने स्वतःच्या गोटात स्थान देणं हासुद्धा एक अक्षम्य गुन्हाच आहे.

गेल्या काही वर्षात कॉंग्रेस पक्ष विनाशाकडे जातोय का अशी शंका होती, पण कन्हैयाच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर मला या गोष्टीची खात्रीच पटली. कन्हैयाला पक्षात स्थान देण्यामागे कॉंग्रेस नेमका काय विचार आहे हे अजूनतरी तितकंसं स्पष्ट झालेलं नाही.

पण आज गांधी वरून बघत असतील तर पक्षाची ही अवस्था बघून नक्कीच त्यांच्या आत्म्याला वेदना होत असतील.

 

कन्हैया कुमारने कितीही अभ्यास केलेला असू दे, स्टुडंट पॉलिटिक्समध्ये तो मुरलेला असू दे, डीबेट शोजमध्ये त्याने जरी कित्येकांना गप्प केलेलं असेल, त्याच्याकडे कितीही नॉलेज असू दे, ज्या माणसाला स्वतःच्या देशाचे तुकडे व्हावेत असं वाटतं त्या माणसाबद्दल काडीचाही आदर माझ्या मनात निर्माण होणं शक्य नाही.

भले हे सगळं करण्यामागचा कन्हैयाचा उद्देश हा दलित आणि मागासवर्गीय लोकांसाठी झटणे हा असेल पण जो देशाचा सार्वभौमत्वावर घाला घालणारा असेल त्याला कुठेच थारा मिळू नये, असं माझं मत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version