Site icon InMarathi

…आणि हे असंच सुरु राहिलं, तर भारताचा नाही ‘फक्त IPL चा’ हिरो बनून राहशील वेड्या

hardik surya and ishan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

त्याचं नाव ऐकलं की खरंतर दोनच गोष्टी आधी आठवतात. एक म्हणजे आयपीएल आणि दुसरं म्हणजे ‘कॉफी विथ करण’ हा करण जोहरचा टॉक शो! या शोमध्ये त्याने तो किती बोल्ड आणि बिनधास्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो चांगलाच गोत्यात आला. आता तुम्हाला कळलंच असेल, मी नक्की कुणाबद्दल बोलतोय.

 

 

हार्दिक पंड्या म्हणजे controversy असं समीकरण झालंय, असं कुणी म्हटलं तरी ते चूक ठरू नये. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात त्याने ज्या गोष्टीची फुशारक्या मारल्या होत्या, ते त्याने त्याच्या आयुष्यात नंतर खरं करून दाखवलं.

पत्नी नताशा हिच्यासोबत झालेल्या हार्दिकच्या लग्नाआधीच, त्या दोघांनी ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. म्हणजे हार्दिकच्या ज्या वाक्यावरून वाद निर्माण झाले, तसाच तो त्याच्या आयुष्यात नंतरही वागला हे खरंच!

जरा जास्तच डोक्यावर घेतलं गेलं…

हार्दिक चांगला अष्टपैलू आहे हे क्रिकेट प्रेमींना मान्य असेल. मलाही ते मान्य आहेच. पण तो भन्नाट फॉर्मात येऊ लागला त्याची गोलंदाजी सुधारली आणि मग त्याला भारताचा आधुनिक कपिल देव म्हणून डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. तो एक चांगला अष्टपैलू आहे हे खरंय मंडळी, पण कपिल देव, (!) हे फारच जास्त नाही का झालं?

 

 

आधीच डोक्यात हवा गेलेला आणि मस्तमौला स्वभावाचा हार्दिक यामुळे अधिकच शेफारला की… स्वतःला तो खरंच कपिल देव समजू लागला की काय, ठाऊक नाही. पण त्यानंतर हार्दिक म्हणजे जायबंदी असं नवं समीकरण अस्तित्वात आलं.

हार्दिक पंड्या हा भारतीय संघात परफेक्ट बॅलन्स साधण्यात यशस्वी ठरला होता. त्याची धुवांधार फलंदाजी आणि पाचवा गोलंदाज म्हणून मध्यमगती गोलंदाजी या गोष्टी भारतीय संघाच्या डावपेचात अविभाज्य भाग बनल्या होत्या. ‘फिकर नॉट, हार्दिक हैं ना’ असं क्रिकेट चाहते म्हणू लागले होते. गोष्ट तशी खरी सुद्धा होती. मीही त्याचा फॅन झालोय. अजूनही आहे, पण…

हार्दिकची गोष्ट वेगळी आहे…

माझ्या पिढीने याआधी भारतीय संघात असा कुणी खमका अष्टपैलू पाहिला असेल, तर तो इरफान पठाण. त्याची कारकीर्द हवी तशी बहरू शकली नाही. पण त्याला कारण तो स्वतः किंवा त्याचा नाकर्तेपणा हा नव्हता.

 

 

हार्दिकच्या बाबतीत तसं नाहीये. पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्या कारकिर्दीत मोठा खड्डा पडलाय.

कसोटीत सुद्धा गोलंदाजी करणारा हार्दिक आता वनडे आणि टी-२० मध्ये सुद्धा त्याचा स्पेल पूर्ण करू शकेल का, असा प्रश्न विचारावासा वाटतो. ‘आधुनिक कपिल देव’ची चार षटकं गोलंदाजी करताना फॅफॅ होणार असेल, तर मग काय बोलावं नाही का?

संघात स्थान सुद्धा निश्चित नाही

गेले काही महिने भारतीय संघ हार्दिक नसताना खेळतोय. नुसता खेळत नाहीये, तर दमदार कामगिरी सुद्धा करतोय. तो संघात होता म्हणून संघ बॅलन्स होता, पण तो नाहीये म्हणून बॅलन्स फारसा बिघडला नाही. त्याची ‘फार उणीव’ भासली नाही. खरं तर तो शेवटची इंटरनॅशनल मॅच नेमकी कधी खेळला असं विचारलं, तर गुगल बाबाला विचारावं लागेल अशी स्थिती आहे आता.

 

 

मध्यंतरीच्या काळात शार्दूल ठाकूरने उत्तम फलंदाजी करून दाखवली. त्याला अष्टपैलू म्हणून लगेच दर्जा देता येईल असं नाही, पण त्याने फलंदाजीची चुणूक तर दाखवली. रणजी सामन्यांमध्ये त्याने अनेकदा चांगली फलंदाजी केली आहे. मग नियमित गोलंदाजी करू शकणारा शार्दूल जर प्रॉमिसिंग बॅटिंग सुद्धा करायला लागला, तर हार्दिकची गरज उरणार नाही.

आयपीएलची वाट बघावी लागणार

हार्दिकच्या फिटनेसची सध्याची स्थिती पाहता, तो पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार नाही यात शंका नाही. तो नियमित दहा षटकांचा स्पेल टाकू शकेल अशी शक्यता नाही. त्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह असेल, तर त्याचा कसोटीसाठी विचार केला जाणार नाही, हेदेखील निवड समितीने स्पष्ट केलं आहे. म्हणजे एकूणच परिस्थिती कठीण आहे.

त्याची गोलंदाजी सुद्धा प्रभावी ठरू लागली होती. मोक्याच्या क्षणी विकेट घेण्यात तो पटाईत झाला होता. त्याच्या हातोडा स्टाईल धमाकेदार फलंदाजीप्रमाणेच त्याची गोलंदाजी पाहणं हे सुद्धा चाहत्यांसाठी हवंहवंसं झालं होतं. पण जर त्याला ४-५ षटकांहून अधिक गोलंदाजी जमणार नसेल, तर मग त्याची गोलंदाजी अनुभवण्यासाठी आयपीएल हाच मुख्य पर्याय उरेल.

 

 

आंतरराष्ट्रीय पातळीवर टी-२० सामने फारसे खेळवले जातातच असं नाही. मग त्यात त्याला किती संधी मिळणार, (तो कितीवेळा फिट असणार…) कितीवेळा तो संपूर्ण चार षटकं गोलंदाजी करणार वगैरे अनेक प्रश्न उभे राहतील. मग त्याची गोलंदाजी बघणार कुठे, तर फक्त आयपीएलमध्ये…

मुळात, ज्या कारणांसाठी आज हार्दिक संघात आहे, त्यातली मुख्य दोन कारणं म्हणजे त्याची स्फोटक फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजी! टी-२० च्या या जमान्यात फलंदाजीत धमाका करणारे अनेक खेळाडू रोज तयार होतायत. त्यामुळे ती बाजू कधी कमकुवत ठरेल, ते सांगणं कठीण आहे. गोलंदाजीची विकेट तर त्याने स्वतःच्या हाताने घेतलीच आहे.

 

 

तरी आश्चर्य वाटणार नाही

काल हार्दिक पुन्हा फॉर्मात आला, त्याने सामना जिंकून दिला हे खरंय; पण त्याला संघातून डच्चू देऊन श्रेयस किंवा शार्दूलला वर्ल्डकप संघाच्या मुख्य १५ जणांमध्ये घेतलं जाईल अशी चर्चा सुरु आहे हेदेखील तितकंच खरं आहे. म्हणजे तुझ्यावाचून अडणार नाही, असं त्याला सुचवायला निवड समितीने सुरुवात केली आहे.

हार्दिक नसला तर भारतीय संघाचं खूप काही अडेल, असं कुणाला वाटत असलं, तर तो त्याचा गैरसमज आहे असं मला वाटतं. त्याचं असणं फायदेशीर होतं, पण त्याच्याशिवाय अडलंय असं अजिबात घडणार नाही. रविचंद्रन अश्विन एक उत्तम अष्टपैलू झाला होता, पण तो नसताना सुद्धा भारतीय कसोटी संघ जिंकला, जिंकू शकतो, हे सत्य आहे.

 

 

हेच सत्य हार्दिकच्या बाबतीत सुद्धा कागू आहे. तो चांगला आहे, जबरदस्त आहे, भारी आहे हे खरंय; पण तो ‘एक एकच एकमेव’ नाहीये.

त्यामुळे या पठ्ठयाला चाहत्याकडून एकच सांगणं आहे. आता तरी सुधार बाबा… कारण, हे असंच सुरु राहिलं तर भारताचा नाही ‘फक्त आयपीएलचा’ हिरो बनून राहशील वेड्या…!!! 

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version