किचनमध्ये प्रोडक्शन, एका खोलीत गोदाम – कॉस्मेटिक्समधील ‘पहिला’ भारतीय ब्रँड!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे. कोणताही ‘साईड-इफेक्ट’ नाही, स्वस्त दर आणि त्रासाचा समूळ नाश करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांना भारतात लोकप्रिय होण्यासाठी काही वर्ष वाट बघावी लागली हे मात्र आश्चर्य आहे.
आयुर्वेदिक औषधांचा प्रसार कोणत्या संस्थेने यशस्वीपणे केला? असं सर्वेक्षण केलं तर पतंजली, दिवंगत डॉ. बालाजी तांबे यांची औषधं आणि ‘विको वज्रदंती’ ही नावं प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात.
कित्येक वर्षांपासून आपण ‘विको टर्मरीक’ची मृणाल कुलकर्णी यांची जाहिरात टिव्हीवर आणि थिएटरमध्ये बघत आलो आहोत. विकोच्या जाहिरातींमुळे या वस्तू लोकांच्या लक्षात राहिल्या आणि मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन लोक त्यांची मागणी करू लागले ही वस्तुस्थिती आहे. ‘विको नारायणी क्रीम’ने सुद्धा हा पायंडा पुढे सुरू ठेवला.
मराठी माणसाचा व्यवसाय
केशव पेंढारकर या मराठी माणसाने भारताला ‘विको’च्या रूपाने पहिली ‘स्वदेशी’ आयुर्वेदिक औषधांची कंपनी उभी केली ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असली पाहिजे. १९५२ मध्ये ‘विष्णू इंडस्ट्रीयल केमिकल कंपनी’ या नावाने डोंबिवलीत औषधांचं उत्पादन सुरू करणाऱ्या केशव सरांनी हा प्रवास कसा साध्य केला? जाणून घेऊयात.
१९५२ मध्ये भारतात झालेल्या पहिल्या निवडणुकानंतर ‘स्वदेशी’ वस्तूंचा वापर करावा अशी एक मोहीम विविध सामाजिक संस्थांकडून सतत राबवण्यात येत होती. स्वदेशी गोष्टींचा प्रचार करत असतांना परळमध्ये राहत असणाऱ्या केशव पेंढारकर यांच्या असं लक्षात आलं, की रोजच्या वापरात येणारी वस्तू हीदेखील स्वदेशी असली पाहिजे.
–
- एमबीए करून तो बनला चहावाला – आणि पठ्ठ्या कमावतोय वर्षाला कोट्यावधी रुपये!
- पैशांच्या चणचणीमुळे शाळाही सोडणारा पठ्या असा बनला मुंबई एअरपोर्टचा मालक!
–
या विचाराने त्यांनी १८ विविध आयुर्वेदिक औषधींपासून ‘विको वज्रदंती’ या टूथ पावडरची निर्मिती केली. तत्पूर्वी, त्यांनी आपल्या मेहुण्यासोबत काम करून त्यांनी आयुर्वेदिक औषधींचा सखोल अभ्यास केला होता.
कोण होते केशव पेंढारकर?
केशव पेंढारकर हे मूळचे नागपूरचे होते. नागपूरमध्ये ते एक किराणा मालाचं दुकान चालवायचे. दुकानाला मिळणारा थंड प्रतिसाद बघून त्यांनी आपलं दुकान बंद केलं मुंबईत स्थलांतरित होण्याचं ठरवलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी बांद्रा येथे राहून विविध छोटे मोठे व्यवसाय केले. मार्केटिंगचं प्रचंड कौशल्य अवगत असलेले केशव पेंढारकर हे नंतर परळला स्थायिक झाले.
परळमधील तीन खोल्यांचं घर हेच विको वज्रदंतीचं पहिलं उत्पादन केंद्र झालं होतं. स्वयपाकघर हे प्रॉडक्शन डिपार्टमेंट झालं आणि इतर दोन खोल्या या कंपनीचं गोदाम आणि ऑफिस झाल्या होत्या.
अथक परिश्रमानंतर पेंढारकर कुटुंबियांना एक अशी पावडर तयार करण्यात यश आलं होतं जी दात स्वच्छ करू शकते आणि हिरड्यांना मजबूत सुद्धा करते. हे संशोधन असंच सुरू राहिलं आणि विकोने पहिल्या भारतीय ‘टुथपेस्ट’ची निर्मिती केली.
केशव पेंढारकर यांचं पुढचं लक्ष्य हे कॉस्मेटिक क्रिममधील केमिकलपासून लोकांच्या त्वचेचं होणारं नुकसान टाळणं हे होतं. ‘विको टर्मरीक’ हे हळदीपासून तयार झालेलं क्रीम १९६० च्या दशकात भारतात विकल्या जाणाऱ्या महागड्या परदेशी क्रीमला आपलं भारतीय उत्तर होतं.
मार्केटिंग कसं केलं?
पेंढारकरांची मार्केटिंगची पद्धत प्रामाणिक होती. ते त्यांच्या राहत्या घराच्या आसपास विको पावडर, टर्मरीक पिशवीत घेऊन, स्वतः विकण्यासाठी घेऊन जायचे. लोकांचं दार वाजवून ते लोकांना इतकंच म्हणायचे की, “मी तुम्हाला काही विकायला आलो नाहीये. तुम्हाला जे हवं आहे, ते द्यायला मी आलो आहे.”
केशव पेंढारकर यांच्या दोन्ही मुलांनी काही वर्षांनी कामात हातभार लावण्याचं ठरवलं. तिघेही मिळून मुंबईतील चाळींमध्ये जायचे. ऊन, वारा, पाऊस आणि काही ग्राहकांच्या नकाराचा, अपमानाचा सुद्धा सामना करायचे.
चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर लोक विकोच्या ऊत्पादनांना ओळखायला लागले होते. १९५६ मध्ये केशव पेंढारकरांनी पहिलं शेड खरेदी केलं आणि तिथे विकोची उतपादनं तयार होण्यास सुरुवात झाली.
गजानन पेंढारकर या केशव सरांच्या मुलाने बी.फार्मचं शिक्षण घेतलं आणि व्यवसाय पुढे नेण्यास हातभार लावला. ७ वर्षांच्या संशोधनानंतर विको टर्मरीकची निर्मिती करण्यात विको समूहाला यश आलं.
विको टर्मरिकची सुरुवात
विको टर्मरीक हे हळदयुक्त क्रीम सुरुवातीच्या काळात पिवळा रंग असल्याने विकलं जात नव्हतं. लोकांना क्रीम म्हणजे पांढरा रंग हेच बघण्याची सवय झालेली होती. लोकांचं मत बदलण्यासाठी केशव पेंढारकर यांनी अशी जाहिरात करायचं ठरवलं ज्यामध्ये चमकदार त्वचेबद्दल माहिती सांगण्यात आली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही संकल्पना अगदी योग्य होती.
१९७१ मध्ये केशव पेंढारकर यांचं निधन झालं आणि ‘विको आयुर्वेदिक’ची धुरा सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी गजानन पेंढारकर यांच्यावर आली. केशव पेंढारकर यांच्या चार लहान भावांनी विकोमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंपनीने ‘विको शुगर फ्री पेस्ट’, ‘विको टर्मरीक फोम बेस मल्टीपर्पज क्रीम’, ‘विको टर्मरिक ऑईल’ असे नवीन प्रॉडक्ट्स बाजारात आणले.
भारतीय मार्केट सोबतच अमेरिका आणि इतर ३५ देशांमध्ये विकोची उत्पादनं विकली जाऊ लागली.
प्रस्थापित आंतरराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देऊन विको उद्योग समूह मार्केटमधील आपलं अढळ स्थान टिकवून आहे. विकोची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी गजानन पेंढारकर यांनी टीव्ही शोजना प्रायोजकत्व देण्यास सुरुवात केली. विडिओ कॅसेट्स मधून सिनेमा बघण्याच्या १९८० च्या दशकात विकोने जाहिरात करण्यासाठी या माध्यमाचा सुद्धा वापर केला.
७०० कोटी रुपये इतका टर्नओवर असलेल्या विको उद्योग समूहाने आता ‘सन-स्क्रीन लोशन्स’, ‘शेविंग क्रीम’, ‘फेस वॉश’ या प्रॉडक्ट्सवर विकोने आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. आज विको उद्योग समूहाची तिसरी पिढी संजीव पेंढारकर यांच्या रूपाने कंपनीचं नेतृत्व करत आहे.
–
- अभिमानास्पद: नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये ‘भारतीय वैज्ञानिकाचा’ मोलाचा वाटा
- बेरोजगार ते बिलियन डॉलर्सचा मालक ई-कॉमर्स जगतातला खरा ‘अलिबाबा’ – जॅक मा!
–
२०१९ मध्ये विको उद्योग समूहाने आलिया भटला जाहिरातीसाठी साईन केलं आणि कंपनीला आजच्या तरुण पिढीला विको वज्रदंतीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. आयुर्वेदाचा प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आणि गुणवत्तेत सातत्य ठेवणाऱ्या विको उद्योग समूहाला यशाची नवीन शिखर गाठण्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.