आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
शेती हा अनिश्चितता असलेला एक व्यवसाय आहे असा समज बरीच वर्ष भारतात प्रचलित होता. कधी हवामानामुळे तर कधी शासकीय धोरणांमुळे शेतकरी हा कित्येक वर्ष प्रगतीसाठी संघर्ष करत होता. मागील काही वर्षात मात्र, शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांमुळे आणि ‘रिटेल’ क्षेत्रात झालेल्या भरभराटीमुळे शेती हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो हे आता लोकांना हळूहळू पटत आहे.
कित्येक उच्चशिक्षित तरुण आज शेतीकडे वळतांना दिसत आहेत. नुकतंच हरियाणा मधील ‘फुल कुमार’ या तरुणाने हे दाखवून दिलं की, तुमच्याकडे जर १ एकर जमीन असेल तर तुम्ही ६ ते १२ लाख इतकं वार्षिक उत्पन्न कमवू शकतात. या बातमी नंतर आधीच उद्योगाचा दर्जा मिळवलेल्या शेतीकडे अधिक लोक वळतील यात शंकाच नाही. ‘फुल कुमार’ यांनी काय वेगळं केलं ज्यामुळे त्यांना ही कमाल करता आली ? जाणून घेऊयात.
रोहतक मधील भैनी मातो या गावाचे रहिवासी असलेले फुल कुमार यांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. आपल्या यशाचं श्रेय ते प्रचंड मेहनत आणि शेतीची योग्य पद्धत या दोन गोष्टींना देतात. १९९८ पासून फुल कुमार यांनी शेती करण्यास सुरुवात केली. त्या काळात रासायनिक खतांच्या मदतीने फुल कुमार यांनी कापसाची शेती केली होती. रासायनिक खतांचा वापर करत असतांना या दोन अडचणींचा फुल कुमार यांना प्रामुख्याने त्रास व्हायचा:
१. रासायनिक खतं ही प्रचंड महाग होती. १ लाख १५ हजार रुपयांच्या कापसाच्या विक्रीमागे जवळपास तितक्याच किमतीच्या रासायनिक खतांची फवारणी शेतात करावी लागायची.
२. फुल कुमार यांच्या गावातील तीन चार लोकांचा रासायनिक खतांच्या वापरामुळे मृत्यू झाला होता.
हताश झालेले फुल कुमार आणि त्यांचे कुटुंबीय शेतीचा विचार सोडून देणारे होते, पण त्याच वेळी त्यांच्या पहाण्यात स्वदेशीचे प्रवर्तक राजीव दीक्षित यांचा टीव्हीवर झालेला ‘ऑर्गनिक फार्मिंग’ म्हणजेच जैविक खतांचा वापर कसा करावा याबाबत एक कार्यक्रम बघण्यात आला.
- CA, MBA ची पदवी घेऊनही ह्या दोघी करत आहेत शेती. पण का? जाणून घ्या
- अमेरिकेतील नोकरी सोडून ‘हा’ तरुण सेंद्रिय शेतीतून कमावतोय लाखो रुपये!
–
राजीव दीक्षित यांनी त्यांच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की, ” युरिया शिवाय सुद्धा शेतकरी शेती करू शकतात. रासायनिक खतांमुळे नकळत आपण सगळे केमिकल्सच्या आहारी जात आहोत. जे शेतकरी हा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांनी सुरुवातीला केवळ १ एकर शेतीमध्ये जैविक खतांचा वापर करावा आणि आपल्या उत्पन्नात होणारा फरक बघावा.”
राजीव दीक्षित सरांचं हे वाक्य फुल कुमार यांचं जीवन बदलून टाकणारे होते. त्यांनी इंटरनेटवर बघून आणि इतर मित्रांच्या मदतीने ‘ऑर्गनिक फार्मिंग’ वर पूर्ण माहिती काढली, कार्यशाळा अटेंड करण्यास सुरुवात केली. पण, म्हणावं तसं यश मिळत नव्हतं.
२०१० मध्ये फुल कुमार यांनी घरखर्च भागवण्यासाठी दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन मध्ये ‘ड्रायव्हर’ची नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. नोकरी करत असतांना सुद्धा ‘ऑर्गनिक फार्मिंग’चं प्रशिक्षण घेणं फुल कुमार यांनी सुरूच ठेवलं होतं. काही दिवसात त्यांना अपेक्षित उत्पन्न शेतीतून होऊ लागलं आणि त्यांनी २०१४ मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
जैविक खतांनी शेती केल्यास आपल्याला स्वतःच्या परिवाराला आणि समाजाला सकस आहार मिळवून देण्यास मदत करता येईल हा विचार सुद्धा फुल कुमार यांच्या डोक्यात होता. पण, आर्थिक संघर्ष अजूनही सुरूच होता.
मार्च २०१७ मध्ये पंचकुला येथे ‘झिरो बजेट फार्मिंग’ चे संचालक श्री. सौरभ पालेकर यांनी एक चर्चासत्र ठेवलं होतं. तिथे “ऑर्गनिक पद्धतीच्या शेतीने एका वर्षात ६ ते १२ लाख रुपये कमावले जाऊ शकतात” या मुद्द्यावर फुल पालेकर यांनी सौरभ पालेकर यांच्यासोबत चांगलाच वाद घातला होता.
श्री. सौरभ पालेकर यांनी फुल कुमार यांनी ‘जंगल’ पद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला. ‘जंगल’ पद्धतीने शेती करण्याचं प्रशिक्षण फुल कुमार यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये घेतलं. पहिल्या फेरीत फुल कुमार यांनी ५४ लिंब, १३३ डाळींब, १७० केळी, ४२० द्राक्ष आणि शेवग्याच्या शेंगाची लागवड केली आणि १ एकर्सच्या जागेचा सदुपयोग केला. ‘
जंगल’ पद्धतीत एक जागा आखून दिलेली असते ज्यामध्ये बियांच्या माध्यमातूनच झाडांची लागवड केली जाते. इतर पद्धतींपेक्षा ‘जंगल’ पद्धतीने झाडं येण्यास उशीर लागतो, पण फळं येण्यास मात्र पहिल्याच वर्षी सुरुवात होते.
फुल कुमार यांनी याच पद्धतीने दोडके, मिरची, टोमॅटो, हळद, अद्रक यांची सुद्धा लागवड केली. तीन वर्षांपासून फुल कुमार या पद्धतीवर काम करत आहेत. दुसऱ्या सत्रात फुल कुमार यांनी मोसंबी, काकडी, सीताफळ सारखे झाड दुसऱ्या १ एकर मध्ये लागवड केली. त्या झाडांनी सुद्धा फुल कुमार यांना पहिल्याच वर्षी फळ देण्यास सुरुवात झाली. तिसऱ्या एकर मध्ये झाडांच्या लागवडीचं काम सध्या फुल कुमार करत आहेत.
‘ऑर्गनिक फार्मिंग’ ही पद्धत स्वस्त का असते ?
जैविक खतांमध्ये प्रामुख्याने गायींचं शेण, गोमूत्र यांचा वापर केला जातो. त्यामुळे खतांवर येणारा खर्च हा मुळातच कमी असतो. जितकी ही शेती जुनी होते तितकं त्याच्यात होणारा खर्च कमी होतो आणि पर्यायाने नफा वाढतो. फुल कुमार यांच्या बाबतीत तेच झालं. त्यांचं पहिल्या वर्षाची कमाई ही दीड लाख रुपये इतकी होती जी की, दुसऱ्या वर्षात वाढून अडीच लाख इतकी झाली.
फुल कुमार आपल्या शेतातच ‘जीवामृत’ आणि ‘घनजीवामृत’ या दोन प्रकारचे खत शेतातच तयार करतात. या खतांचा वापर केल्याने पिकांना कमी पाणी लागतं. जमिनीत असलेल्या कार्बनमुळे, गोमूत्रामुळे हे खत तयार होण्यास कमी वेळेत सुरुवात होते.
मार्केटिंग कशी केली ?
फुल कुमार यांच्या कार्याची दखल मीडियाने आणि गावातील लोकांनी लगेच घेतली. गावातील लोकांनी फुल कुमार यांच्याकडून फळं, भाज्या विकत घेण्यास सुरुवात केली. इतर मोठया शेतकऱ्यांनी सुद्धा फुल कुमार यांच्याकडून खत विकत घेण्यास सुरुवात झाली. संपूर्ण कुटुंब एकच काम करत असल्याने सुद्धा हे यश मिळालं असं फुल कुमार सांगत असतात.
- शेतीसाठी गुंतवले १० हजार, आता कमाई महिन्याला लाख रुपये, वाचा, तुम्हीही करा…
- सिनेमाच्या परफेक्शनसाठी काय पण! नोलनने केली होती चक्क मक्याची शेती…
–
आज फुल कुमार यांच्या शेतात त्यांच्या परिवाराशिवाय ३ मजुरांना सुद्धा काम मिळालं आहे. मागच्या वर्षाचं फुल कुमार यांचं वार्षिक उत्पन्न हे १२ लाख रुपये इतकं होतं. “प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गनिक पद्धतीची शेती शिकावी आणि इतर लोक नोकरीत १००% मेहनत घेऊन काम करतात तसंच शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीला आपले १००% द्यावे, मग यश नक्की मिळेल” असा सल्ला फुल कुमार नेहमीच देत असतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.